प्यासा

प्यासा

काय म्हणायचं या गुरुदत्त नावाच्या माणसाला? वेदनेचा वाटसरू की दुःखाचा पुजारी? एखादा माणूस इतका संवेदनशील कसा काय असू शकतो? 'प्यासा' बघितल्यावर पुन्हा तेच बधिरपण मनावर पसरलं. कागज के फूल बरा, इतकं 'प्यासा'नं सतावलं आणि गुरुदत्तबद्दल विचार करताना तो माणूस म्हणून, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून सगळयाच पातळीवर कमालीचा पारदर्शी दिसतो. या बेगडी, दुटप्पी जगात राहणं त्याच्यातल्या कलावंताला अशक्य झालं असावं.

'प्यासा' हा १९५७ सालचा चित्रपट....६० वर्षं उलटली तरी अद्याप समाजातल्या स्वार्थाचं, भ्रष्टमनाचं, नातेसंबंधातल्या फाटकेपणाचं तेच जळजळीत सत्य मांडणारा! या चित्रपटाचं अब्रार अल्वीचं कथानक ग्रेट म्हणू, की निर्माता-दिग्दर्शक असलेला गुरुदत्त ग्रेट म्हणू? गुरुदत्तच्या अभिनयाला ग्रेट म्हणू, की आपल्या तितक्याच ताकदीच्या अभिनयानं त्याला तोडीस तोड टक्कर देणारी वहिदा रेहमान ग्रेट म्हणू? यातलं छायातंत्र ग्रेट म्हणू, की साहिरची गीतं ग्रेट म्हणू? एसडी बर्मनचं दीर्घकाळ मनावर राज्य करणारं संगीत ग्रेट म्हणू, की गीता दत्त आणि म. रफी यांच्या मधाळ आवाजातला दर्द ग्रेट म्हणू? सगळयाच एकाहून एक अशा ग्रेट गोष्टी एकत्र आल्यावर एखादी कलाकती किती उंची गाठते हे 'प्यासा' बघितल्यावर समजतं.

आज सजन मोहे अंग लगा लो जनम सफल हो जाये, हम आपकी आँखोमे इस दिलको बसा दे तो, जाने क्या तुने कही जाने क्या मैने सुनी, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है, ये हँसते हुये फूल, जिन्हे नाज है हिंदपर वो कहॉं है, तंग आ चुके है कसमे-कशी जिन्दगीसे ही गाणी या चित्रपटातल्या पात्रांचं, त्यातल्या कथानकाचं यथार्थ चित्रं उभं करतात. आज सजन मोहे अंग लगा लो, हे बंगाली पद्धतीचं भजनरुपी गाणं देखील नायिकेच्या मनातल्या आपल्या प्रेमाप्रति असलेल्या सच्च्या भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय खुबीनं वापरण्यात आलं आहे. रफीच्या रेंज बद्दल काय बोलायचं?? हा एक चित्रपट त्याच्या चौफेर प्रतिभेचं द्योतक आहे. कुठल्याही साथ संगीताशिवाय गायलेलं हे गाणं असो किंवा जिन्हें नाझ है हिंदपर असो किंवा जला दो चा टाहो असो किंवा हम आपकी आखों में चे टिपिकल रोमँटिक गीत असो किंवा सर जो तेरा चकरये सारखे विनोदी गीत असो...... ही सगळी एका गळ्यातून आलेली आहेत यावर विश्वास ठेवावा लागतो!! प्यासा वर अनंत काळ बोलत राहू शकतो आपण......

'प्यासा’ मधला विजय (गुरुदत्त) एक अतिशय संवेदनशील कवी असून प्रत्यक्ष जीवनात मात्र तो अयशस्वी ठरतो. त्याचे भाऊ आणि प्रकाशक यांना कोणालाही त्याच्या कवितेचं मोल कळत नाही. भाऊ त्याच्या कविता रददीत विकतात, तर प्रकाशक त्यांना कचर्‍याच्या डब्याची वाट दाखवतात. शिकलेला असूनही नोकरी न मिळाल्याने एका बेरोजगार माणसाच्या वाटयाला येणारी उपेक्षा त्याच्याबरोबर सावलीसारखी साथ देत असते. त्याच्या आईला (लीला मिश्रा) त्याची सदोदित काळजी वाटत असते, पण तिच्या मोठया दोन मुलांसमोर तिचं फारसं काही चालत नाही. विजयचे दोन्ही भाऊ (त्यातला एक महेमूद) त्याला सतत टोमणे मारत असतात. विजयच्या हळव्या मनावर या गोष्टींचा परिणाम होऊन शक्यतो घराबाहेरच दिवस काढत असतो. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याचं प्रेम मीना (माला सिन्हा) नावाच्या तरुणीवर जडतं. दोघांची प्रेमकहाणी फुलते, बहरते, पण विजयचं पुढलं भविष्य तिला अंधकारमय दिसतं. आयुष्य जगताना फक्त प्रेमावर जगता येत नाही, तर सोबतीला पैसा, ऐषोआराम, प्रतिष्ठा, मानमरातब हे सगळंही आवश्यक असतं या तिच्या विचारांमुळे ती विजयबरोबर लग्न न करता घोष नावाच्या एका श्रीमंत अशा प्रकाशकाबरोबर करते.

प्रेमभंगामुळे विजय आतून तुटून जातो. त्याच्या झोळीत सगळीकडूनच अवहेलनाच पडलेली असते. अशा अवस्थेत त्याचे भाऊ देखील त्याला घराबाहेर काढतात. आपली आर्थिक स्थिती बरी झाल्यावर आपण आईला बरोबर नेऊ असं विजय आईला आश्‍वासन देतो आणि पुन्हा रस्तोरस्ती फिरत राहतो. भावाने त्याची वही ज्या रददीच्या दुकानात विकली तिथं विजय पोहोचतो आणि त्या ढिगार्‍यात आपली वही शोधायला लागतो. पण एका स्त्रीनं ती विकत नेली असं रददीवाला आठवून सांगतो. विजय स्वतःवर आणखीनच नाराज होतो.

मात्र एके दिवशी विजयच्या कानावर एका तरुणीच्या तोंडून त्याच्या कवितेच्या ओळी पडतात. जाने क्या तूने कही, जाने क्या मैने सुनी बात कुछ बन ही गई तो तिचा पिच्छा करतो. या गाण्याच्या वेळी गोंधळलेला, चकित झालेला विजय त्या तरुणीच्या मागे मागे धावतोय आणि तिच्या ते लक्षात येऊनही ती मात्र आपल्याच मस्तीत मीश्किल भाव चेहर्‍यावर घेऊन त्याची कविता गात पुढे पुढे जाते. ती त्याला अजिबातच दाद देत नाही. विजय तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत पोहोचतो, तेव्हा मात्र ती त्याला अपमानित करून उलट हाकलून लावते. गुलाबो (वहिदा रेहमान) नावाची ती एक वेश्या असते. रददीच्या दुकानात तिलाच विजयची कवितांची वही मिळालेली असते. विजयच्या काव्यावर ती फिदा असते. पण आपला पिच्छा करणारा तो तरूण म्हणजेच कवी विजय हे तिला त्या वेळी माहीत नसतं. सत्य कळल्यावर एकीकडे गुलाबो विजयकडे मनोमन ओढली जाते.

त्याच वेळी मीना विजयला पुन्हा एकदा अपघाताने त्याला भेटते. त्याची कॉलेजमधली वर्गमैत्रीण tuntun त्याला कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाला यायची गळ घालते तेव्हा 'तंग आ चुके है कश्म कशे जिंदगी से हम' ही स्वतःची नज्म म्हणतो. कौतुक तर दूर राहिले पण ख़ुशी के मौके पे कैसा बेदिली का राग छेडा है, अशी संभावना करून एकही टाळी न वाजता त्याला उतरावे लागते स्टेज वरून. तो सगळा सीन एक प्रकारचं भयानक नैराश्य आणतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी पराकोटीचा अपमान, अवहेलना आणि त्यातून निर्माण होणारे दुःख ह्याचा सामना करावा लागलेला असतो. ते निव्वळ एका कलाकाराचं दुःख राहत नाही. इथेच त्याला हा घोष (रेहमान) भेटतो आणि पूर्वाश्रमीचे मित्र .....प्रेयसी सगळे भेटतात.

एका बाजूला जगाच्या सौंदर्याच्या दृष्टीने बद्दू टुण टुण आहे पण माणुसकी असणारी ती आहे. तर सौंदर्यवती असणारी मीना (माला सिन्हा) कॉलेजक्वीन असली तरी प्रत्यक्षात मात्र कुरूप आहे असाही एक विसंवाद सहज दिसतो. त्या नज्म म्हणताना कुठल्याही परश्वसंगीताचा वापर टाळला आहे. असा प्रकार बहुदा प्रथमच झालेला असावा. आयुष्यात विसरू पाहत असलेल्या आठवणी पुन्हा प्रत्यक्ष समोर आल्यावर विजय बेचैन होतो. त्याला मीनाबरोबरचे ते पूर्वीचे दिवस आठवतात. त्या सगळया गुलाबी आठवणी जाग्या होतात. ‘हम आपकी आखोमे’ हे रोमँटिक गाणं आपल्यालाही आपल्या स्वप्नातल्या प्रेमाच्या गावी घेऊन जातं आणि सगळं वातावरणच हळुवार करून टाकतं. या गाण्यात विजय तिच्याजवळ आपल्या प्रेमातली निस्सिमता व्यक्त करतो, तर मीना मात्र खट्याळपणे त्याला प्रत्येक व्यक्त केलेल्या भावनेगणिक उडवून लावते. हे गाणं 'चित्रपटाची लांबी वाढतेय' म्हणून सुरुवातीला गुरुदत्तनं चक्क काढूनच टाकलं होतं. पण अब्रार अल्वी आणि इतरांच्या आग्रहाखातर ते गाणं या चित्रपटात पुन्हा सामील झालं आणि आज हे गाणं ‘यादगार’ बनलं आहे. या गाण्यातलं स्वप्नमय जग चंद्रापासून निघालेल्या पायर्‍यांतून सुरू होतं. ती त्या जादुई दुनियेतून अलगदपणे एखाद्या परीप्रमाणे त्याच्या आयुष्यात येते, मात्र हे गाणं संपताना मात्र स्वप्नात हरवलेल्या नायकाला भानावर आणण्याचं कामही हेच गाणं करतं. नायिका हळूहळू पुन्हा पायर्‍या चढत त्याच चंद्रमयी जादुई दुनियेत पुन्हा नाहिशी होते.

विजय आपल्या भूतकाळातून बाहेर येतो. नोकरीच्या प्रयत्नात असतानाच त्याला मीनाच्याच नवर्‍याकडे-घोषकडे (रेहमान) नोकरी मिळते. एके दिवशी विजयला आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीत घोष बोलावतो. घोषनं बोलावलेल्या पार्टीमध्ये मीनाला बघून ती आपल्याच मालकाची पत्नी आहे हे कळताच विजयला कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाही. त्या वेळी तिथं अनेक शायर आपल्या कविता सादर करतात. आपसूक विजयच्या तोंडून त्याच्या मनातलं दडपलेलं दुःख कविता होऊन बाहेर पडतं, जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला हम ने तो जब कलियॉं मॉंगी, कॉंटों का हार मिला या गीतातून - आनंदाच्या बदल्यात कायमच दुःख मिळत गेलं. प्रत्येक पावलावर भेटलेला सोबती सोडून गेला आणि आता जर हेच आणि असंच आयुष्य असेल तर असंच दुःखाचा कडवट घोट पित जगून बघू असं तो म्हणतो. मीनाच्या नवर्‍याला घोषला मीना आणि विजय बददल संशय येत असतोच. पण आता विजयला पुन्हा मीनाच्या सुखी आयुष्यात परतायचं नसतं. तिनं तिच्या संसारात खुश राहावं असं तो तिला सांगतो, पण त्या दोघांचं बोलणं अर्धवट ऐकून मीनाचा नवरा घोष जास्तच चवताळतो आणि विजयला कामावरून काढून टाकतो.

प्यासामध्ये विजयच्या वाटेला एकापाठोपाठ एक केवळ दुःखंच येतात. त्याला आपल्या आईच्या मृत्यूची बातमी कळते आणि आपलं दुःख रडून, आकांत करून तो व्यक्तही करू शकत नाही. हताश अवस्थेत तो मित्राच्या खोलीवर येतो, आणि तिथे असलेली दारूची पूर्ण बाटली आयुष्यात पहिल्यांदाच दुःख विसरण्यासाठी ओठांना लावतो. त्या दारूच्या अंमलाखाली असताना तो वेश्येची माडीही चढतो. पण तिथं चार पैशांसाठी नाचणारी वेश्या आणि एकीकडे तिचं भुकेनं कळवळून रडणारं तिचं बाळ हे विदारक दृश्य त्याला सहन होत नाही. तो आणखीनच उदध्वस्त होतो आणि तिथून कसाबसा बाहेर पडतो. पण मन मात्र आतमध्ये आक्रोश करत राहतं आणि तो स्वतःलाच नव्हे तर समाजाला अनेक प्रश्‍न विचारतो, जिन्हे नाझ है हिंदपर वो कहॉं है........हा त्याचा आक्रोश मात्र त्यालाच काय पण आपल्याही सहन करण्याच्या पलीकडे जातो.

अखेर दुःखाशी सामना करता करता विजय थकतो आणि आत्महत्या करायला निघतो. वाटेत कुडकुडणार्‍या एका भिकार्‍याला पाहून तो आपला कोट त्याला देऊन टाकतो. इतक्या उदारपणे आपल्याला कोट देणार्‍याकडे पाहून भिकारी चकित होतो आणि तो त्याचा पाठलाग करायला लागतो. विजय रेल्वेच्या पटरीवर जाऊन जीव देणार हे लक्षात येताच, तो भिकारी त्याला वाचवण्यासाठी धावतो, पण दुर्देवानं तो भिकारीच आपला जीव गमावून बसतो. भिकार्‍याच्या अंगावरच्या कोटातल्या अखेरच्या चिठठीमुळे तो विजय होता असं समजून आता त्याचे सख्खे भाऊ आणि समाज त्याला मृत समजतात. त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी गुलाबो तिच्याकडची विजयची कवितेची वही घेऊन प्रकाशक असलेल्या घोषला गाठते आणि विजयचं पुस्तक छापण्यासाठी स्वतःची आयुष्यभराची कमाई त्याबदल्यात त्याला देते.

विजयच्या कवितेचं पुस्तक प्रचंड गाजतं. जिवंतपणी विजयचा दुःस्वास करणारा समाज आता मृत विजयचे गोडवे गायला लागतो. काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला विजय शुद्धीवर येतो आणि त्याच वेळी त्याला तिथे असलेल्या नर्सच्या हातात आपल्या कवितांचं पुस्तक दिसतं. त्या कविता ती मनापासून तल्लीन होऊन वाचत असते. त्यातले शब्द कानावर पडताच तो हे आपलं पुस्तक आहे असं सांगतो. डॉक्टर मात्र त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय असं समजून त्याला वेडयाच्या इस्पितळात पाठवतात. आपल्या एका मित्राच्या (जॉनी वॉकर) मदतीनं तो तिथून आपली सुटका करून घेतो. पण इकडे घोषला आता विजयचं मृत असणंच जास्त फायद्याचं असणार असतं. कारण त्याला पुस्तकाचे प्रचंड पैसे मिळत असतात. तो त्याच्या भावांना आणि मित्रालाही पैशाच्या जोरावर आपल्या बाजूनं वळवतो. त्यामुळे हॉस्पिटलमधून परतलेल्या विजयला त्याचे सख्खे भाऊ देखील ओळखायला नकार देतात.

विजयच्या मृत्यूनंतर त्याच्या पहिल्या स्मतीदिनानिमित ठेवलेल्या कार्यक्रमात तो पोहोचतो आणि आपल्या मृत्यूविषयीचं भाष्य ऐकून विषन्न अवस्थेत त्याच्या तोंडून काव्यच बाहेर पडतं. साहिर लुधयानवीमधला शायर आणि गुरुदत्तमधला संवेदनशील अभिनेता यांच्या एकत्र येण्यानं प्रत्येक गाण्याचा शब्द न शब्द जिवंत झालाय. ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है, या गाण्यानं जो माणूस आतून हलणार नाही तो माणूसच नाही. या जगातल्या विसंगतींवर विजय नेमकं बोट दाखवतो आणि अशी दुनिया मला नको म्हणून नाकारतो. लोकांमध्ये एकच खळबळ माजते, पण अशा वेळी विजय आपण विजय नसल्याचं लोकांना शांतपणे सांगतो. लोक चिडून त्याला खुर्च्या फेकून मारतात. एकच गोंधळ घालतात. विजय तिथून निघतो त्या वेळी त्याची प्रेयसी मीना त्याला आता पैसा, प्रसिद्धी सगळं मिळत असताना त्यानं आपली ओळख का नाकारली असा प्रश्‍न करते. तेव्हा माणसाला माणसापासून तोडणारी ही खोटी, दांभिक समाजव्यवस्था, ही बेगडी संस्कती आपल्याला मान्य नाही हे तो तिला सांगतो. मेलेल्या माणसाला इथं पुजलं जातं आणि जिवंत माणसाला जिवंतपणीच मारून टाकलं जातं असा कसा हा समाज हा प्रश्‍न तो तिला करतो. अशा समाजात आपल्याला कधीच स्वस्थता लाभणार नाही असं सांगून तो तिथून निघतो.

अखेर तो गुलाबोकडे येतो. तिच्यातला माणूस त्याला दिसलेला असतो. तिला तो म्हणतो, चलशील माझ्याबरोबर? अशा ठिकाणी जिथून परत कुठेही जावं आणखी दूर जावं लागणार नाही. तिची साथ घेऊन तो सूर्यास्त होत असताना क्षितिजापल्याड दिसेनासा होतो आणि चित्रपट संपतो.

गुरुदतच्या सर्वच चित्रपटापैकी सगळयात श्रेष्ठ अभिनय 'प्यासा'मधला मानला जातो. हिन्दीतली प्रसिदध लेखिका नसरीन मुन्नी कबीर हिनं या चित्रपटावर ‘द डॉयलॉग ऑफ प्यासा’ नावाचं एक पुस्तक हिन्दी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून लिहिलंय. या पुस्तकात हा चित्रपट कसा बनला याविषयी अतिशय रोचक माहिती आहे. प्यासाचं कथानक अब्रार अल्वीला त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या एका वेश्येच्या आयुष्यावरून सुचलं होतं. 'प्यासा'च्या चित्रिकरणाच्या वेळी गुरुदत्तला एका प्रसंगाचं चित्रिकरण कलकत्याच्या रेडलाईट एरियामध्ये करायची इच्छा होती. त्यामुळे सगळी टीम त्या एरियात पोहोचताच तिथल्या वेश्यांच्या दलालांनी दगडफेक करू गुरुदत्त आणि मंडळींना आल्या पावली परत जायला भाग पाडलं. याच पुस्तकावरून गुरुदत्तवर एक डाक्युमेंट्री फिल्म देखील बनवली गेली.

गुरुदत्त आणि अब्रार अल्वी एकदा हैद्राबादला जात असताना नत्यांगणा असलेल्या वहिदा रेहमानची आणि त्यांची अनपेक्षितरीत्या भेट झाली आणि गुरुदत्तनं तिला मुंबईला आणण्याचा निश्‍चय केला. या चित्रपटाच्या निमितानं दोघांमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक आणि त्याचेच वैयक्तिक आयुष्यात उमटलेले पडसाद यामुळे 'प्यासा' हे गुरुदत्तचं आयुष्यातलं कटू वास्तव तर नाही ना असा प्रश्‍न आपल्याला पडतो. खरं तर गुरुदत्तनं मोजकेच चित्रपट केले, पण त्याचा कुठलाही चित्रपट बघितला, की प्रेक्षक म्हणून त्याचे इतर चित्रपट बघण्याची आपली तहान वाढतच जाते. सीआयडी, प्यासा, कागज के फूल, चौहदवी का चॉंद, साहिब, बीबी और गुलाम या एक से एक चित्रपटांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केलं!

गुरुदत्तनं ‘प्यासा’ या चित्रपटात तर अनेक वेगवेगळी तंत्र आणि शैली वापरली. गुरुदत्त या चित्रपटात एक अभिनेता म्हणून, संगीतकार म्हणून, गीतकार म्हणून आणि छायाचित्रणकार म्हणूनही आपल्याला पदोपदी दिसतो. 'प्यासा' हा चित्रपट छायाचित्रणासाठी एकदा, दिग्दर्शनासाठी एकदा, अभिनयासाठी एकदा, गीतांसाठी एकदा, संगीतासाठी एकदा अशा अनेक गोष्टींसाठी एकदा - एकदाच नव्हे तर अनेकदा पाहावा आणि अनुभवावा असा चित्रपट आहे. 'टाईम’ च्या सर्व्हेक्षणात जगभरातल्या १०० सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये 'प्यासा' चित्रपट पाचव्या क्रमांकावर जाऊन बसला. असं म्हटलं जातं की भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी हा चित्रपट बघितला, तेव्हा त्यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते!

दीपा देशमुख

[email protected]

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.