एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

आज सकाळी स्वारगेटला जाऊन नागब्रह्म इथे मनसोक्त आप्पे खाल्ले आणि लगेचच एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बघितला. खरं तर मला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नाही. दोन ते तीन लोक सक्रिय असतात आणि बाकी सगळे निष्क्रिय! त्यात बघणारे हजारो, लाखो लोक दिल की धडकन थामके वगैरे बसलेले असतात. त्यापेक्षा मला खो-खो, लंगडी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फूटबॉल, कबड्डी वगैरे खेळ आवडतात. मला काय आवडतं किंवा आवडत नाही हे इथंच थांबवते. पण चित्रपट होता, क्रिकेटचा भारतीय सर्वात लोकप्रिय कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्यावरचा! त्यामुळे क्रिकेटवरचं भाष्य तोंडून सहजपणे निघून गेलं.

चित्रपट बघायला सुरूवात केली. ट्रेलर आणि गाणी काही वेळा बघितली होती. त्यातली हिरोईन आवडली होती आणि धोनीचं काम करणारा सुशांतसिंग राजपूत हाही! त्याला पवित्र रिश्ता मालिकेपासून बघत होतेच! बरं झालं त्यानं ती मालिका सोडली आणि त्यानंतर ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माबरोबर त्याचं एकदम आल्हाददायक दर्शन झालं. त्यातलं त्याच्यावर चित्रित केलेलं गाणं, 'बिन कुछ कहे, बिन कुछ सुने हाथो मे हाथ लिए, चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे...' हे गाणं खूप आवडलं. अजूनही आवडतं. वातावरण एकदम गुलाबी होऊन जातं!

धोनी चित्रपट सुरू झाला आणि मी त्यात रमून गेले. मराठी, तेलगू, तमीळ आणि हिंदी या चार भाषेत हा चित्रपट असून ३० सप्टेंबरला म्हणजे नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटानं दोनच दिवसांत ४५ कोटींचा बिझिनेस केलाय. या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतंय. खरं तर जेव्हा ती व्यक्ती अस्तित्वात असते आणि जेव्हा तिची भूमिका तुम्हाला वठवायची असते, तेव्हा लोक तुलना करणार....तुम्ही थोडे जरी कमी पडलात की सगळंच संपलं. निर्माता, दिग्दर्शक सगळ्यांच्याच दृष्टीनं हा खूपच मोठा जुगार! असं असताना सुशांतसिंग राजपूतनं ही भूमिका स्वीकारून ती यशस्वीपणे निभावलीये. असंही म्हटलं जातंय की प्रत्यक्षात धोनी नसेल, तितका विनयशील, नम्र असा सुशांतसिंगने धोनी रंगवलाय!

चित्रपटात खरे क्रिकेटचे प्रसंग आणि सुशांतसिंगवर चित्रित केलेले प्रसंग यांचं बेमालूम मिश्रण केलंय. वर्ल्ड कपच्या मॅचपासून चित्रपट सुरू होतो आणि मग तो फ्लॅशबॅकमध्ये जातो, पुन्हा वर्ल्ड कपपर्यंत येऊन २८ वर्षांनी भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यावरच थांबतो. यात सुरुवातीला क्रिकेटचं वेड नसलेला माही, क्रिकेटमध्ये कसा येतो आणि नंतर क्रिकेटचा दिवाना कसा होतो याचं खूप सुरेख चित्रण यात दाखवलंय. त्याला मिळालेली टीसीची नोकरी आणि त्या वेळी क्रिकेटच्या मॅचेस, क्रिकेटचा सराव आणि नोकरी यातली त्याची दमछाक आपल्यालाही बघवत नाही.

धोनी खूपच संयमशील दाखवलाय. तो आतल्याआत त्रास करून घेतो, पण आक्रस्ताळेपणा त्याच्या कुठल्याच कृतीत दिसत नाही. त्याचे जिवाला जीव देणारे मित्र, कुटुंब, प्रवासात भेटणारी माणसं हा प्रवास खूप सुंदर आहे. खरं तर मनाला स्पर्शून जाते ती त्याची उत्कट, हळवी प्रेमकहाणी.....खूप काही शब्दांत व्यक्त न करताही अव्यक्त असलेली प्रेमभावना दोघांच्याही मनात कशी जागा करते आणि हे प्रेम संपूच नये असं वाटत असतानाच एका क्षणात ते संपतं, तेव्हा नकळत डोळे झरायला लागले...अरे, अजून तर सुरुवातही झाली नव्हती आणि हे काय झालं? सगळी स्वप्नं अशी पटापट मिटून कशी गेली...उद्धवस्त कशी झाली? काही क्षण मन सुन्न झालं......नको आता काहीच बघायला पुढलं असंही वाटायला लागलं.....पण धोनीचा प्रवास सुरूच होता....त्या सगळ्यातून दुःखाला गिळणं....त्यानंतर येणारं अपयश सहन करणं....आणि मग पुन्हा स्वतःला सावरत पुढला प्रवास करणं....खरं तर प्रत्येकाच्याच वाट्याला थोडयफार फरकानं येणारा हा आयुष्यातल्या चढउताराचा प्रवास....पण तरीही तो दुसर्‍याचा बघताना त्यातले परिश्रम, त्यातला संयम, ती उभारी, ते खचून न जाणं, चालत राहणं हे सगळं खूप काही शिकवून जातं......सुशांतला काही नाजूक प्रसंगात ‘ती’ची होणारी आठवण....खूप हळवे प्रसंग आहेत ते!

एकूण चित्रपट चांगला....फार उच्च कोटीच्या अपेक्षा न ठेवता पाहण्यासारखा! जरा लांबल्यासारखा वाटतो....पण तरीही प्रेक्षक त्यात गुंतूनही राहतो. अभिनयाच्या बाबतीत सगळेच ग्रेट! सुशांतसिंगची मैत्रीण (मैत्रिणी?) गोड दिसते. सुशांतसिंगचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे! चित्रपट बघितल्यानंतर मी धोनी आणि सुशांतसिंग यांचे एकत्रित काही इंटरव्ह्यूज बघितले. सुशांतसिंगने धोनीचं निरीक्षण करत, प्रश्‍न विचारत आपल्या भूमिकेवर किती कष्ट घेतले तेही लक्षात आलं आणि खरं सांगायचं झाल्यास प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर सारखी सुशांतसिंगच्या बाबतीत माझी अवस्था झाली. तुम्ही चित्रपट बघा कदाचित तुमचंही हेच मत असू शकेल. 

दीपा, २ ऑक्टोबर २०१६

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.