ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’

ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’

ऑस्करसाठी ८ नामांकनं मिळवलेला आणि टेड चिआंग या विज्ञान लेखकानं लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ युवर लाईफ’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीवरचा ‘अरायव्हल’ हा ५ महिन्यांपूर्वी ्प्रदर्शित झालेला चित्रपट आज बघायचाच असं ठरवलं आणि बघितला.

या चित्रपटात अॅमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे एक सायन्स फिक्शन आहे. पृथ्वीवर परग्रहवासीयांचं आगमन, त्या घटना आणि नायिकेच्या आयुष्यातल्या घटना क्रमसुसंगत नाहीत, त्या का नाहीत, वेळ याकडे आपण कसे बघतो आणि परग्रहवासी कसे बघतात, परग्रहवासी आणि मानव यांच्यातला संवाद अशा अनेक गोष्टीचा उहापोह या चित्रपटात केलाय. चित्रपट संपल्यावर काही वेळ त्या चित्रपटाचा अर्थ लावण्यात गेला. डोक्याला ताण द्यावा लागला. इन्टर्नसारखा हा चित्रपट साधा, सरळ, सहजपणे उलगडेल असा नव्हता.

आपण परग्रहावरून उडत्या तबकड्या अमूक एका ठिकाणी आल्याच्या अनेक गोष्टी वाचतो आणि त्यावर वेळोवेळी चर्चाही करतो. या चित्रपटातही जगभरातल्या १२ ठिकाणी अशा परग्रहावरच्या १२ तबकड्या येऊन धडकतात. परग्रहवासी पृथ्वीवर का आले असावेत, त्यांच्यापासून पृथ्वीला काही धोका असेल का, त्यांच्याशी सामना कसा करावा लागेल असे अनेक प्रश्‍न जगभरातल्या प्रमुख नेत्यांना सतवतात. अमेरिका सजगपणे लष्कराच्या, तंत्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या मदतीने या परग्रहवासीयांशी कशाप्रकारे संवाद साधते आणि तोडगा काढते हे या चित्रपटात दाखवलं आहे.

अॅमी अॅडम्स ही एक प्रसिद्ध भाषातज्ज्ञ असून चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिच्या मुलीला कॅन्सरनं ग्रासलं असून तिच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास तुकड्यातुकड्यात दाखवला आहे. त्याच वेळी ती आंतरराष्ट्रीय विद्यापीठात भाषेचं लेक्चर देताना दाखवली आहे. ती लेक्चर देत असतानाच अमेरिकेसह जगभरात १२ ठिकाणी तबकड्या आल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली असल्याचं वृत्त तिला आणि विद्यार्थ्यांना समजतं. सगळ्यांना सोडून देण्यात येतं. ती घरी येते आणि काहीच वेळात कर्नल हा लष्कराचा अधिकारी तिला या परग्रहवासीयांशी संवाद साधण्याच्या मदतीसाठी तिला बोलावतो आणि तो तिला त्या तबकडी असलेल्या क्षेत्रात घेऊन जातो. तिच्याबरोबरच आणखी एक वैज्ञानिक जेरेमी रेनर हाही असतो. लॉस अॅलॅमस इथे मॅनहटन प्रोजेक्ट ज्याप्रमाणे प्रत्यक्षात घडला, त्याचप्रमाणे या तबकडीच्या परिसरातलं वातावरण सज्ज झालेलं असतं. काही ठरावीक वेळीच या तबकडीचं दार उघडत असतं. त्या नेमक्या वेळी अॅमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर यांच्यासह आणखी काही जण (कॅमेरामन वगैरे) त्या तबकडीत शिरतात. तेव्हा ते परग्रहनिवासी माणसासारखे असतात का, त्यांची आणि आपली भाषा एक आहे का असे अनेक प्रश्‍न इथे पडतात.

अशा वेळी संवाद करायचा कसा हाही मोठा प्रश्‍नच! अॅमी अॅडम्स ही इंग्रजीतून संवाद साधू बघतेय आणि परग्रहवासी चिन्हांच्या भाषेतून. त्या चिन्हलिपीला समजून घेण्यासाठी पुन्हा जगभरातले तज्ज्ञ कामी लागलेले. मानवी आयुष्यात संवादाचं महत्व किती मोठं आहे हे कळत असतानाच, संवाद कशाकशाप्रकारे होऊ शकतो, स्पर्शातून होणारा संवाद काय सांगतो, हा संवाद समजून घेण्यासाठीचा झगडा कसा वाढत जातो आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य! या कथानकाबरोबरच सुरुवातीला अॅमी अॅडम्सच्या मुलीचा कॅन्सरनं झालेला मृत्यू आणि ती सतत फ्लॅशबॅकच्या स्वरूपात आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येते. (प्रत्यक्षात तो फ्लॅशबॅक नाहीच!) भूत-वर्तमान-भविष्य या सगळ्याच बाबतीत चित्रपट बघताना एक प्रेक्षक म्हणून मनात गोंधळ उडतो. कारण परग्रहवासी जो संवाद साधतात, त्यात वेळ या संकल्पनेबाबतची त्यांची भाकितं काही वेगळीच असतात. सलगपणे चालणारी ती एक मालिका नव्हेच. परग्रहवासी आणि अॅमी अॅडम्सचा जो संवाद होतो, त्यातून तिला भविष्यातले अनेक संदर्भ कळू लागतात. वेळेचा विलंब आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेली भीती, त्यामुळे होणारे दंगे यामुळे चीन या तबकड्यांना नष्ट करण्याचा निर्णय घेतो. अशा वेळी अॅमी अॅडम्स त्यांना कशी थोपवते. या तबकड्यांद्वारे आलेले परग्रहवासी पृथ्वीवर मानवाला काय सांगण्यासाठी आलेले असतात, अॅमी अॅडम्सच्या मुलीच्या मृत्युचं रहस्य काय या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं ‘अरायव्हल’ हा चित्रपट बघितल्यानंतर मिळतात. मात्र थोडं अंतर्मुख होऊन विचार केल्यानंतरच! एक उत्तम चित्रपट बघितल्याचं समाधान ‘अरायव्हल’ बघून नक्कीच मिळेल. जरूर पहा. 

दीपा, 
२५ फेब्रुवारी २०१७.

Tags

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.