आर्टिकल 15
बदायु या उत्तर प्रदेशातल्या गावात २०१४ साली घडलेली ही घटना! एके दिवशी गावकर्यांना एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या १२ आणि १४ वर्षांच्या दोघी बहिणी आढळल्या. आदल्या दिवशीपासून त्यांचा शोध घेणार्या त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या लटकणार्या मुली बघून काय वाटलं असेल याची कल्पनाच करवत नाही. या मुली दलित समाजातल्या होत्या. गावातल्या यादव या उच्च जातीतल्या तिघांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता, यांच्यात दोन पोलिसदेखील सामील होते. गँग रेपनंतर त्यांना झाडाला लटकवण्यात आलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे आर्जवं केली, पण पोलिसांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. अखेर ही बातमी सगळीकडे पसरली. प्रसारमाध्यमांनी दलित कुटुंबीयांचा आक्रोश लोकांसमोर आणला. केवळ भारतातच नाही तर जगभर या घटनेचे पडसाद उमटले. यानंतर मात्र दबाव आल्यामुळे पोलिसांना यात दखल घ्यावी लागली. ही केस सीबीआयला सुपूर्त करण्यात आली. सीबीआयनं मात्र या मुलींवर बलात्कार झालाच नाही, तर यातल्या मोठ्या मुलीचं यादव घरातल्या एका २० वर्षीय तरुणावर प्रेम होतं. या प्रेमाला मान्यता मिळणार नसल्याचं लक्षात येताच या दोघी बहिणींनी आत्महत्या केली असं म्हणत सीबीआयनं ही केस बंद केली. या प्रकारची अनेक मुलंमुली....जी या जातीव्यवस्थेची शिकार होताना वेळेावेळी दिसतात. उच्च जातीची असल्यानं, जवळ पैसा असल्यानं ही मंडळी जरी गुन्हा दाखल झाला तरी त्यातून सहीसलामत सुटतात आणि काहीच दिवसांत उजळ माथ्यानं वावरतातही. अशा घटना कालांतरानं लोकही विसरून जातात. खरं तर प्रश्न पडतो, हे सगळं कधी संपणार? जात, धर्म, गरीब, श्रीमंत हा सगळा भेदाचा मामला कधी नष्ट होणार? आजही आपल्याच धर्मात किंवा जातीत लग्न करू पाहणारी बहुतांश मंडळी आहेत. आंतरजातीय लग्न करायचं असलं तरी दलित नको रे बाबा, किंवा मुसलमान नको असं सर्रास म्हणताना आढळतात. हे जातीधर्माचं दुष्टचक्र कधी थांबणार, त्यावर उपाय काय ठाऊक नाही. पण यासाठी जनजागृती विविध माध्यमांतून सातत्यानं व्हायला हवी हे मात्र नक्की!
याच पार्श्वभूमीवर आज अचानक आर्टिकल १५ या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं आणि हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघायचा असं ठरवलं. चित्रपटाचा विषय बदायू गावातल्या वर सांगितलेल्या घटनेभोवती फिरणारा वाटला. त्यातच यातल्या पोलिस अधिकार्याच्या भूमिकेत आयुष्यमान खुराना दिसला. मला आवडणार्या अभिनेत्यांमध्ये राजकुमार राव, आयुष्यमान खुराना, नवाजुद्दिन सिद्दिकी, विकी कौशल वगैरे मंडळी येतात. ट्रेलर बघितल्यानंतर आयुष्यमान खुरानाची ताजी या चित्रपटासंबंधीची एक मुलाखतही बघितली. मुल्क हा चित्रपट आयुष्यमानला खूप आवडला आणि त्यानं मुल्कच्या दिग्दर्शकाकडे - अनुभव सिन्हाकडे - 'अशा प्रकारचा चित्रपट मला करायचा असून मला त्यात संधी दे' अशी विनंती केली.
त्यामुळेच आर्टिकल १५ हा चित्रपट आयुष्यमानला करायला मिळाला. कलाकार असो वा सामान्य माणूस, कार्यकर्ता असो वा गृहिणी प्रत्येकानं आपापल्या परीनं सामाजिक बांधिलकीचं भान ठेवलं पाहिजे आणि आपापल्या भूमिकेतून, माध्यमातून आपले विचार मांडले पाहिजेत असं आयुष्यमाननं या मुलाखतीत म्हटलं. आयुष्यमानची मुलं अजून लहान आहेत. टिपिकल पद्धतीचा हिरो माहीत असल्यानं 'दम लगा के हैशा' सारख्या चित्रपटातून आपल्याच बापाच्या हातून चपलेनं मार खाणारा आयुष्यमान त्यांना रुचत नाही. असा कसा हिरो असा प्रश्न त्यांना पडतो. एवढंच नाही तर असले चित्रपट आपले वडील का करतात असाही प्रश्न ते वडिलांना करतात. आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे चित्रपट कळतील अशी आशा आयुष्यमानला वाटते. आयुष्यमानचे चित्रपट बर्यापैकी हटके असतात. मागच्या वर्षी धूम मचवलेला 'अंदाधून' हा चित्रपट देश-विदेशात चांगलाच गाजला. चीनमध्ये तर आयुष्यमान इतका लोकप्रिय झाला की आयुष्यमान तिथल्या स्त्रियांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ही अमाप लोकप्रियता बघून आयुष्यमान अचंबित होतो. चीनला जाऊन लोकांचं प्रेम अनुभवायचीं इच्छा असल्याचं तो नम्रपणे सांगतो.
आर्टिकल १५ या विषयानं आयुष्यमान अस्वस्थ झाला. त्यानं जातीविषयक पुस्तकं वाचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण वाचलं आणि संविधानकर्ते बाबासाहेब यांच्या लिखाणाचं मोल ओळखून लोकांनी ते आपल्या जगण्यात आणायला हवं असं आयुष्यमानला वाटतं. या सगळ्या गोष्टींमुळे मलाही उत्सुकता लागली आहे, कधी २८ जून येतो आणि आर्टिकल १५ प्रदर्शित होतो आणि मी हा चित्रपट बघते! प्रतीक्षेत आर्टिकल १५ जूनच्या!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment