चॉपस्टिक्स
आजच म्हणजे ३१ मे २०१९ या दिवशी नेटफ्लिक्सवर चॉपस्टिक्स हा सर्वत्र प्रदर्शित झालेला सचिन यार्दी दिग्दर्शित चित्रपट बघितला. आपल्याला निरमाची एजन्सी मिळाली, त्या खुशीत आपल्या जन्माला आलेल्या मुलीचं नाव ‘निरमा’ ठेवणारं सहस्त्रबुद्धे हे औरंगाबादचं मध्यमवर्गीय जोडपं. ही निरमा नोकरीसाठी मुंबईत पोहोचते. तिथं पर्यटकांना चिनी भाषा बोलून मुंबई दर्शन घडवत असते. इंग्रजी भाषा जेमतेम बोलू शकणारी, घाबरट, आत्मविश्वासाचा अभाव असणारी निरमा मुंबईत स्वतःला सामावून घेण्यासाठी धडपडत असते. मुंबईत प्रवासासाठी ती आय टेन गाडी विकत घेते. थोडी देवभोळी आणि दैवावर विश्वास असणारी निरमा गाडीचा आरटीओ नम्बरही आपल्या मनासारखा मिळावा यासाठी प्रयत्नशील असते. पहिल्याच दिवशी व्हॅले पार्किंग करण्यासाठी गाडीची चावी एका भामट्याला देते आणि तिथूनच या चित्रपटाला सुरुवात होते.
मस्त मजा आहे संपूर्ण चित्रपटभर! मिथिला पालकर! खरं तर मला ही कार्टी जाम आवडते. मुरंबा, कारवाँ सारखे चित्रपट, द गर्ल इन द सिटी सारखी वेबसीरीज देणारी ही पोर अभिनय अगदी सहजसुंदर करते. दिसतेही तशीच गोड. आपली कारकिर्द घडवताना खूप जाणतेपणानं भूमिकांची निवड करताना दिसते. आता तिच्यासोबत आहे अभय देओल! अतिशय चांगला अभिनय करणारा अभिनेता! धर्मेद्र, सनी देओल, बॉबी देओल कुठे आणि हा अभय देओल कुठे.....!
मिथिला पालकर म्हणजेच निरमा, अभय देओल म्हणजेच आर्टिस्ट आणि विजयराज म्हणजेच फयाज भाई या सगळ्यांचीच कामं मस्त! फयाज भाई मुंबईचा कुख्यात दादा, त्याचं बोकडावरचं (बाहुबली त्याचं नाव!) अतिरेकी प्रेम एकूणच सगळी धमाल आहे. हिंदूस्तान टाइम्सनं परीक्षण काहीही केलं असलं तरी चॉपस्टिक्स चित्रपट जरूर बघा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment