शांतता! कोर्ट चालू आहे.

शांतता! कोर्ट चालू आहे.

'शांतता! कोर्ट चालू आहे' हे नाटक पुन्हा एकदा जरूर जरूर पहा. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि जिगिषानं सादर केलेलं हे नाटक आज यू-ट्यूबवर बघितलं. भारतभर गाजलेलं हे नाटक चौदा भाषांमध्ये अनुवादित झालं. चंद्रकांत कुलकर्णी ऊर्फ चंदू यानं हे नाटक पुन्हा एकदा सादर करून डीव्हीडीच्या स्वरूपातही नाट्यरसिकांसाठी आणलं. संदीप कुलकर्णी, आनंद इंगळे, निवास भिसे, विघ्नेश जोशी, समीर चौघुले, मेधा जांभोटकर आणि रेणुका शहाणे यांचा अभिनय अप्रतिम! चंद्रकात कुलकर्णीचं दिग्दर्शन अर्थातच उत्कृष्ट....मनाला थेट स्पर्श करणारं, गुंतवून ठेवणारं सादरीकरण!

साहित्यक्षेत्र असो वा नाट्यक्षेत्र विजय तेंडुलकर या बापमाणसाचं श्रेष्ठत्व निर्विवादपणे सगळ्यांना मान्यच होतं आणि आजही आहे. ‘आयुष्य स्वतःसाठी असतं आणि स्वतःसाठीच असावं’ हे रेणुका शहाणेनं सहजगत्या म्हटलेलं वाक्य मनाला छळून गेलं. कोणी एकानं किंवा एकीनं तसं जगायचं ठरवलं तरी हा दुटप्पी समाज तसं करू देत नाही. आज फिरून हे नाटक बघताना हा माणूस काळाच्या पुढे बघणारा होता हे पुन्हा पुन्हा जाणवतं. ढोंगी, बुरखे पांघरलेली, क्षणाक्षणाला आपलं रूप बदलणारी, लबाड माणसं आसपास दिसत असताना या माणसानं ती ४० वर्षांपूर्वीच कशी टिपली याचं आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही. सुलभा देशपांडे आणि सतीश दुभाषी यांनी अभिनय केलेलं हेच नाटक मी बघितलेलं नाही. पण आज रेणुका शहाणेनं उभी केलेली बेणारेबाई मी पुन्हा एकदा अनुभवली.

रेणुका शहाणेनं ही भूमिका अत्यंत उत्कटतेनं साकारलीये. थँक्स सुवर्णा आणि आशाताई! माझ्या अस्वस्थ मनावर तुम्ही नेहमीच हळुवार फुंकर घातली आहे. आज हे नाटक बघताना पुन्हा त्या सगळ्या अनुभवातून मी गेले. मी त्या बेणारेबाईचं जगणं जगले. माझी बेचैनी दूर करण्यासाठी पुन्हा तेंडुलकरच धावून आले. एक टवटवीत फुलासारखी प्रसन्न अशी शिक्षिका असलेली बेणारी बाई आपल्याला नाटकाच्या सुरुवातीला भेटते आणि आपल्याला ती अवखळ, अल्लड, खळाळणारी ३०-३२ वर्षांची लीला बेणारे आवडून जाते. मधला वेळ काढण्यासाठी म्हणून ही पात्रं एक खेळ हाती घेतात. हळूहळू नाटकाचं कथानक वेग घेऊ लागतं. या खोट्या कोर्टाच्या खेळात बेणारेबाईला आरोपी म्हणून पिंजर्‍यात उभं केलं जातं. तिच्यावर आरोपांची बरसात केली जाते. सुरुवातीला गंमत म्हणून सुरू झालेला हा खेळ गंभीर रुप धारण करतो. बेणारेबाईच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांना घेऊन त्यांना दोषी न ठरवता हीच बाई कशी चवचाल होती किंवा आहे हे सिद्ध करण्यासाठी बेणारेबाईला शाब्दिक बाणांनी रक्तबंबाळ केलं जातं. तिच्या वैयक्तिक आयुष्याला चव्हाट्यावर आणण्यात प्रत्येकालाच धन्यता वाटते. यातून माणसांचे मुखवटे गळून खरे चेहरे आपल्याला दिसू लागतात.

माणसामधली क्रूरता जनावरापेक्षाही किती भयंकर असू शकते हे तेंडुलकरांनी आपल्या लिखाणातून अनेकदा दाखवलंय. तेंडुलकरांनी या खेळातून सामाजिक रुढी, परंपरा, स्त्रीकडे पाहण्याचा मागास दृष्टिकोन, तिनं आपल्या पायरीनं राहिलं पाहिजे ही संकुचित वृत्ती, कुठलीही सत्यता माहीत नसताना केलेलं गॉसिपिंग, स्त्री-पुरुष संबंध, नीती-अनितीच्या खुळचट कल्पना, दांभिक समाजाचं यथोचित दर्शन, सगळं काही इतकं चपखलपणे मांडलंय की हे सगळं आजही दुर्दैवानं तितकंच खरं ठरतंय. स्त्रीच्या वयात येण्याच्या काळापासून तिची होणारी फरफट, तिची अवहेलना, तिची कुचंबणा, तिची पदोपदी होणारी उपेक्षा या नाटकात बेणारे बाईनं उभी केलीय. यात उभा केलेला भृणहत्येचा प्रश्‍न आजही तितकाच ताजा आहे आणि आम्ही लिखाणातून कितीही गप्पा मारल्या तरी आमची मानसिकता किती बदलली आहे? वरकरणी कितीही सुशिक्षितपणाचा आव आणला तरी आम्ही खुजे आहोत. आम्ही कितीही झाकून ठेवलं तरी आज घराघरात एक बेणारेबाई तयार होतेच होते आहे. तिचा आमच्याच घरात होणारा आक्रोश आम्हाला ऐकू येत नाहीये. आजही आम्हाला दुसर्‍याच्या खासगी आयुष्यात नको तितका रस आहे. आम्ही स्वतः चिखलात किती बरबटलेलो आहोत हे आम्ही बघणार नाही, पण शहानिशा न करता न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन निवाडा करायला तयारच आहोत. आणि मग झापड लावल्यागत प्रत्येकजणच या आंधळ्या जत्रेत सामील होतो आहे. वर पुन्हा 'आम्ही नाही त्यातले' असा साळसूद आव आणून वागणार आहोतच! आज सकाळपासून १०० वेळा मनात येऊन गेलं, की असेच बुरखाधारी लोक जास्त प्रमाणात आजूबाजूला असल्यावर साने गुरुजींसारख्या माणसालाही आत्महत्या करावी लागते. जीवन सुंदर आहे यावरचा विश्‍वास डळमळीत व्हायला लागतो. प्रतिकार करण्याची शक्ती क्षीण होत जाते. या झुंडशाहीपुढे बळ कमी पडणार याची जाणीव होते.

आजही काहींची मनं साने गुरुजींच्या मनासारखी कोमल आहेत, पण आमच्या या कठोर वारांनी आम्ही आणखी किती आत्महत्या करायला भाग पाडणार आहोत? पुन्हा आम्ही या हिंसेची जबाबदारी स्वीकारणार नाहीच, उलट आमच्या खोट्या प्रतिमेला आणखी कसं उंच करू शकतो याचे नवनवे डावपेच आखणार आहोत. कोणी ठेका दिलाय आम्हाला संस्कृती रक्षक होण्याचा? सगळं काही करून पुन्हा आम्ही नामानिराळे राहणार आहोतच. हे सगळं सगळं आज हे नाटकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा जाणवलं. या नाटकात बेणारेबाई म्हणते, ‘जीवन ही एक महाभंयकर गोष्ट आहे. या जीवनाला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे, फाशी दिलं पाहिजे. या जीवनात फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे शरीर! हे विसाव्या शतकातल्या सुसंस्कृत माणसाचे अवशेष. पहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसत आहेत ते. त्यांच्या ओठावंर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत.....’ विजय तेंडुलकर, तेव्हाही आम्ही बदललो नाहीत, आजही आम्ही तोच वारसा पुढे चालवत आहोत. बरं झालं तुम्ही गेलात!

दीपा देशमुख १ जुलै २०१७

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.