अव्यक्त प्रेमाची तिसरी कसम!
लहानपणी कधीतरी बघितलेला, त्या वेळी न समजलेला ‘तिसरी कसम’ हा चित्रपट आज पुन्हा बघितला. सध्या फणीश्वरनाथ रेणू या साहित्यिकाचा अभ्यास करताना त्यांच्या ‘मारे गये गुलफाम’ या साहित्यकृतीवर आधारित 'तिसरी कसम' चित्रपट बनवलेला असल्यानं तो बघण्याचा मोह झाला. हा चित्रपट विख्यात गीतकार शैलेंद्र यांनी १९६६ साली निर्माण केला होता. बासू भट्टाचार्य यांचं दिग्दर्शन होतं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानं, राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं. मात्र तिकीट खिडकीवर हा चित्रपट दणकून आपटला. खरं तर यात राजकपूर आणि वहिदा रहेमान हे त्या वेळचे लोकप्रिय कलाकार होते.
कवी मनाच्या शैलेंद्रने जेव्हा फणीश्वरनाथ रेणू यांची 'मारे गये गुलफाम' ही कथा वाचली, तेव्हा त्यांनी यावर चित्रपट काढायचा निश्चय केला. राजकपूर मित्रच असल्यानं शैलेंद्रने राजकपूरनं या चित्रपटात काम करावं अशी गळ घातली. त्या वेळी राजकपूरनं शैलेंद्रला ‘मी काम करीन, पण माझं मानधन आधी दिलं पाहिजे’ असं म्हटलं. हे ऐकल्यावर शैलेंद्रचा चेहरा उतरला. शैलेंद्रला ही उत्कृष्ट अशी साहित्यकृती प्रत्यक्ष पडद्यावर साकारायची होती. त्यातून त्याला ना पैसा कमवायचा होता, ना प्रसिद्धी! राजकपूर असं काही म्हणेल याची कल्पनाच शैलेंद्रने केली नव्हती. शैलेंद्रचा उतरलेला चेहरा पाहून राजकपूर हसत म्हणाला, 'माझं मानधन एक रूपया आहे. चल ठेव माझ्या हातात'. राजकपूर शैलेंद्रचा सच्चा मित्र होता. मिश्कीलता त्याच्या स्वभावातच भरली होती. त्यानं शैलेंद्रची फिरकी घेतली होती. आपला शब्द राजकपूरनं पाळला. मात्र त्याच वेळी 'हा चित्रपट यशस्वी होईलच याची खात्री नाही' हा सावधगीरीचा इशाराही त्यानं शैलेंद्रला दिला. आणि तसंच झालं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असफल झाला. शैलेंद्रचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या अपयशाचा धक्का त्याला सहन झाला नाही आणि वर्षाच्या आतच त्याचं निधन झालं.
या चित्रपटात एका छोट्याशा खेड्यातली गोष्ट चित्रीत केली आहे. हिरामण नावाचा एक भोळाभाबडा, सरळ मनाचा गाडीवान आणि नाटककंपनी (किंवा आपण तमाशा म्हणूयात.) मध्ये काम करणारी हिराबाई यांच्यातल्या अव्यक्त प्रेमाची ही कहाणी आहे. फणीश्वरनाथ रेणूंचं कथानक इतकं सशक्त आहे की कोणीही या कथानकाला स्पर्श केला तरी त्याचं सोनंच व्हावं. लोकगीतं, लोककथा, ग्रामीण लोकजीवन, वास्तव, समाजरचना, प्रेमाची घुसमट आणि बारीक बारीक गोष्टींनी प्रेक्षक या चित्रपटात गुंतून जातो. राजकपूर आणि वहिदा रहेमान यांचा अभिनय अप्रतिम, जिवंत, खराखुरा! चित्रपट संपला तरी हिरामण आणि हिराबाई मनातून जाता जात नाहीत. डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नाहीत आणि अशा वेळी मन म्हणतं, 'दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी, काहे को दुनिया बनायी...'
या चित्रपटातली शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेली सजन रे झूठ मत बोलो, सजनवा बैरी हो गये हमार, चलत मुसाफिर ले गयो रे, पान खाये सैंया हमारो ही गाणी अतिशय अतिशय आणि अतिशय अप्रतिम आहेत! संगीत शंकर जयकिशन या ग्रेट जोडीचं!
त्यातलंच एक गाणं ः
रहेगा इश्क़ तेरा ख़ाक में मिलाके मुझे
हुए हैं इब्तिदा में रंज इन्तिहा के मुझे
आ आ भी जा
रात ढलने लगी, चाँद छुपने चला
आ आ भी जा
तेरी याद में बेख़बर, शमा की तरह रातभर
जली आरज़ू दिल जला
आ आ भी जा …
उफ़क़ पर खड़ी है सहर, अँधेरा है दिल में इधर
वही रोज़ का सिलसिला
आ आ भी जा …
सितारों ने मुँह फेरकर, कहा अलविदा हमसफ़र
चला कारवाँ फिर चला
आ आ भी जा …
-दीपा देशमुख
Add new comment