या दिल की सुनो दुनियावालो.......अनुपमा
मी त्या वेळी ११-१२वीत असेन, औरंगाबादला रॉक्सी सिनेमागृहात ‘अनुपमा’ हा चित्रपट मॉर्निंग शो बघितला होता. कुठल्या मैत्रिणीबरोबर बघितला हे आज नक्की आठवत नाही. पण स्वतःच्या कोषात गुरफटलेली, संकोची, लाजाळू, भित्री, अबोल अशी शर्मिला टागोर मात्र चांगलीच लक्षात राहिली. नेहमीप्रमाणे हा चित्रपट बघितल्यावरही खूप खूप रडले होते आणि नंतरचे काही दिवसही त्याच बधिर मूडमध्ये गेले होते.
गेले १५ दिवस पुन्हा या चित्रपटानं मनाला धडका मारायला सुरुवात केली होती आणि आज कित्येक वर्षांनी अखेर यू-टयूबवर हा चित्रपट पुन्हा एकदा बघितला. हृषिकेश मुखर्जींचा ‘अनुपमा’ हा चित्रपट १९६६ या वर्षी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय रजत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सत्यकाम, चुपके चुपके, आनंद, अभिमान, गुड्डी, गोलमाल, आशीर्वाद, बावर्ची, किसी से ना कहना, नमक हराम सारखे एकसे एक चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी प्रेक्षकांना दिले. त्यानी जवळजवळ ४२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. हृषिकेश मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी काही काळ गणित आणि विज्ञान हे विषयही शिकवले. एक कॅमेरामन म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर काही काळ फिल्म एडिटिंगचं काम केलं. तसंच बिमल रॉय यांच्या हाताखालीही त्यांनी काम केलं. अनुपमा हा चित्रपट बिमल रॉय यांनाच समर्पित करण्यात आला आहे. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभुषण’ आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं.
‘सत्यकाम’मध्ये जसा धर्मेंद्र आवडला, तसाच तो ‘अनुपमा’मध्येही तितकाच भावला. अगदी प्रेमातच पडले त्याच्या. दिसायला देखणा, कवी मनाचा, स्वाभिमानी, मूल्यं जपत जगणारा, कुठल्याही मुलीच्या हृदयात प्रेमाचे अंकुर फुलवू शकेल असा......!
हृषिकेश मुखर्जी यांचा हा चित्रपट खरं तर सरळ साधं कथानक असलेला, पण मनाला भिडणारा! मोहन शर्मा आणि त्याची बायको अरुणा -जिवापाड प्रेम असलेलं एक जोडपं - सुखाच्या वर्षावात न्हात असतानाचा अघटित असं घडतं. पहिल्या बाळंतपणात अरुणा मुलीला जन्म देते आणि मोहनला सोडून या जगातून कायमचं निघून जाते. मोहन आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाचा धक्का सहनच करू शकत नाही. तो पार कोलमडून जातो. त्या एका घटनेनं तो पार बदलतो आणि प्रेमळ पतीच्या जागी एक कडवट पिता जन्म घेतो. आपल्या मुलीचा जन्म आणि बायकोची मृत्युची तारीख एकच असल्यानं तो तिचा वाढदिवस साजरा करू शकत नाही, तसच लहानपणापासून तिच्यावर प्रेमही करू शकत नाही. ज्या दिवशी बायको गेली, त्याच दिवशी मुलगी जन्माला आली म्हणून तो तिचा राग करत राहतो. मद्याच्या आहारी जातो. मात्र रोज रात्री दारू पिऊन आल्यावर त्याच्यातल्या बापाचं हृदय जागं होतं असतं आणि त्या वेळी मात्र तिचे लाड करणं, तिच्यासाठी भेटवस्तू आणणं तो करत राहतो. दिवसा मात्र ती समोर जरी दिसली तरी त्याला ते चालत नाही. इतकंच काय, पण आपल्या बायकोच्या पियानोपासून कुठल्याही वस्तूला तिनं लावलेला हातही त्याला खपत नाही. तो आपल्यावर प्रेम करत नाही, आपण अपराधी आहोत ही भावना त्याच्या मुलीच्या उमाच्या मनात घर करून असते. अशा वातावरणात उमा तरूण होते. वडिलांना प्रचंड घाबरणारी, कोणाशीही एक शब्दही न बोलणारी, स्वतःतच मिटलेली अशी उमा! तिला ना कोणी मैत्रिणी असतात, ना मित्र! वाट्याला असतो तो केवळ जन्मदात्याचा तिरस्कार!
एका क्षणी तिच्या आयुष्यात अशोक नावाचा कवी (धर्मेंद्र) येतो. त्याला तिचं मिटलेपण उमगतं. त्याच्यामुळे ती कशी उमलत जाते हे या चित्रपटात फार सुरेख रीतीनं हृषिकेश मुखर्जी यांनी दाखवलं आहे. स्वातंत्र्य स्वतः मिळवायचं असतं, या विचारांवर अशोक ठाम असतो. पण लहानपणापासून ज्या मुलीनं स्वतःच्याही मनाचा कधी आवाज ऐकलेला नसतो, जी कायम एका दडपणाखाली जगत असते, वडलांच्या एका कठोर हुंकाराबरोबर जिची पाचावर धारण बसते अशी मुलगी स्वतंत्र होऊ शकते का? मोहनमधल्या कठोर बापात परिवर्तन होतं का? या प्रश्नांची उत्तरं 'अनुपमा' या चित्रपटात दडलीत.
वडिलांसमोर एकही शब्द उच्चारू न शकणारी उमा, शेवटच्या प्रसंगात ठामपणे जे बोलते ते लाजबाब! या चित्रपटातली गाणी कैफी आझमी यांनी लिहिली असून संगीत दिग्दर्शन हेमंतकुमार द ग्रेट यांचं आहे. धिरे धिरे मचल ऐ दिले बेकरार, कोई आता है, भीगी भीगी फ़ज़ा सन सन सन के जिया ज़ुल्फ़ें उड़ाती है, ख़ुशबू चुराती है पागल चंचल मस्त हवा, कुछ दिल ने कहा, कुछ भी नही ऐसी भी बाते होती हैं, क्यूँ मुझे इतनी खुशी दे दी के घबराता है दिल, या दिल की सुनो दुनियावालो, या मुझको अभी चूप रहने दो....ही गाणी म्हणजे कहर आहेत कहर! अप्रतिम गीतरचना अप्रतिम संगीत!!!!
यात उपकथानक असलेली पात्रं दुर्गा खोटे, देवेन वर्मा, डेव्हिड, शशिकला यांच्याशी आपलं नातं जडतं. देवेन वर्मा देखील अतिशय देखणा दिसतो आणि शशीकलाची या चित्रपटातली भूमिका फारच सुरेख आहे. उमाप्रमाणेच तिचीही आई ती लहान असतानाच स्वर्गवासी झालेली असते. मात्र तिचे वडील तिला आई आणि वडील या दोघांचंही प्रेम देत तिला लाडाकोडात वाढवतात. प्रेमात वाढलेली ही मुलगी मनानं तितकीच नितळ स्वभावाची आणि प्रेमळ मनाची दाखवली आहे. हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य असं की त्यांचे चित्रपट हसत खेळत नकळत एक सामाजिक संदेश पेरत जातात. त्यामुळे ते वेगळेही ठरतात.
एक हळुवार कथा तितक्याच हळुवारपणे संपते. मात्र मनात आपला अमीट ठसा उमटवूनच! जरूर बघा.
दीपा देशमुख,
२३.०५.२०१७.
Add new comment