समाजस्वास्थ्य
माझ्यातल्या हट्टी मुलीला सांभाळणं अपूर्व कायम हसतमुखानं करत असतोच. आजही त्याचं न ऐकता मी ‘आज 'समाजस्वास्थ्य'ला दोघांनी जायचंच’ हे जाहीर करून टाकलं होतं! भरतनाट्य मंदिरचं वातावरण नेहमीप्रमाणे फुललेलं होतं.....तिथं पोहोचताच सदानंद मोरे, अतुल पेठे, देविका दफ्तरदार, नीला लिमये वगैरे दिसले/भेटले......धनूकृपेने समोरच आसनव्यवस्था मिळालेली होती. अपूर्व, मी, मंजू आणि नुपूर स्थानापन्न झालो आणि नाटकाला सुरुवात झाली.
धनूबद्दल काय लिहू? माझा अकरावीपासूनचा मित्र - धनंजय सरदेशपांडे! आम्ही एकत्र नाटकांत कामं केली, न बोलता एकमेकांच्या आयुष्यातल्या चढ-उतारांचे साक्षी बनलो, कधीही काहीही न विचारता एकमेकांची सुख-दुःखंही जाणून घेतली, समजून घेतली आणि त्याबद्दल कधी वाच्यताही न केली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला हा मित्र सगळ्यांप्रकारेच शिकला, नोकरीला लागला, लग्न केलं, संसार केला आणि जमेल तशी नाटकांतून, चित्रपटांतून कामं करत राहिला. मग तरीही हा वेगळा! वेगळा कसा? वेगळा यासाठी की कधीही आयुष्यात व्यसनं केली नाहीत, गॉसिपिंग केलं नाही, स्वतःमधल्या मर्यादांचं भान ठेवूनही चालत राहिला.....नाटकाशी, अभिनयाशी, लिखाणाशी एकनिष्ठ राहिला.....सध्या 'व्यक्ती' संस्थेतर्फे सुयश झुन्झुर्के आणि टीमबरोबर कथावाचन आपल्या घरी असा अभिनव प्रयोग करत आहे.
मला आठवतं, त्याचाच चैतू (मुलगा) जेव्हा कम्प्युटर्समधलं शिक्षण घेतलं आणि एके दिवशी बापाला म्हणाला, ‘मला कम्प्युटर क्षेत्रात काहीही करायचं नाही मला अभिनय क्षेत्रातच काही करायचंय.’ धनू आणि मी जंगली महाराज रोडवर संभाजी पार्कच्या कठड्यावर बसलो होतो. धनूसमोर पेचप्रसंग पडला होता. मी त्याची मैत्रीण म्हणून मनात येईल ते बोलत गेले....‘ज्या पालकांच्या मुलांना जगाचं भान नसतं, मानसिक विकारांनी ते ग्रस्त असतात, पण तरीही ते पालक आपल्या मुलांना सांभाळतात, जमेल ते ते त्यांच्यासाठी करतात. धनू आपली मुलं नाकी, डोळी, मनानं निर्व्यंग आहेत.....बस्स, काही वर्षं .....कदाचित कायमच आपल्याला जमेल तितकी वर्षं तनामनाधनानं त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल. त्यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाहीत, सर्वसामान्य पालकांप्रमाणे. कदाचित ती चुकतीलही, पण आपण बरोबर राहू या. जगू देऊ त्यांना त्यांच्या मनासारखं आयुष्य. त्यांच्या आयुष्यात संघर्ष चुकणार नाहीचये, पण आपण आपल्याकडून तो उभा करायला नको. राहू या पाठीशी. करू देत त्याला काय करायचंय ते.’ धनूनं चैतूला नाट्य-चित्रपट क्षेत्राची वाट चोखाळण्यास संमती दिली. चैतूनं मुंबईची वाट धरली. भानू काळेंच्या ‘अंतर्नाद’ या प्रथितयश मासिकांमधून चैतू अनेकदा लिखाण करतो आणि पारितोषिकंही मिळवतो, अनेक मालिकांचं पटकथा-संवाद लेखन करतो. दिग्दर्शन करतो आणि छोट्यामोठ्या भूमिकाही करतो. वेळ लागेल, पण यश नक्कीच त्याच्याकडे धावत येईल!
खरं तर थोडी भरकटत गेले, पण त्याच धनूचं - माझ्या मित्राचं - नाटक बघायला मला या वेळी खूप उशीर लागला. पण आज काहीही झालं तरी जायचंच होतं. त्यामुळे आज त्याच्यासाठीच खरं तर मी ‘समास्वास्थ्य’ला गेले.
मी अनेक वर्षांपूर्वी अमोल पालेकरचा 'ध्यासपर्व' हा चित्रपट बघितला होता. थँक्स टू माय वीक मेमरी....मला तो आज आठवत नव्हता. त्यामुळे कोरी पाटी घेऊन मी हे नाटक बघू शकले.
र. धों. काळाच्या कितीतरी पुढलं बघणारा माणूस! एकदा वाटतं उगाचंच त्या काळी जन्मला. पण लगेचच वाटतं, अरे, हा माणूस त्याच वेळी जन्मला म्हणून बरं.....समाजप्रबोधनाचं इतकं महत्वाचं काम तेही इतक्या नाजूक विषयावरचं कोणी केलं असतं? संस्कृतीचा उदो उदो करत गोडवे गाणारे आपण शास्त्रीय शिक्षणाला किती घाबरतो. धर्माचं प्रस्थ वाढवण्याच्या नादात, सत्तेच्या मोहाला बळी पडलेलो आम्ही रोजच्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रश्नांना किती सोयीनं बगल देतो? आमचे किती स्वार्थ गुंतले आहेत अशा अनेक विषयांमध्ये!
जात, धर्म, अंधश्रद्धा, लैंगिकता, विज्ञान अशा अनेक विषयांवर 'समाजस्वास्थ्य' हे नाटक बोलतं. या नाटकात र. धों. ही व्यक्तिरेखा सशक्तपणे उलगडत जातेच, पण त्याचबरोबर त्या वेळचे न्यायाधीश, त्यांच्या मर्यादा, समाजावर पडलेला धार्मिकतेचा पगडा, शेट्ये वकील आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि साथ याही व्यक्तिरेखा आपला ठसा उमटवतात.
मला अत्रे आणि मामा वरेरकर यांच्यातले वाद आणि अत्रेंनी अनेकदा मामा वरेरकर यांची उडवलेली खिल्ली आठवत होती. पण नंतर जेव्हा मी मामा वरेरकर यांनी शरदचंद्र चटर्जी यांच्या ‘शेषप्रश्न’ या कांदबरीचा मराठीतून केलेला अनुवाद वाचला आणि मी उडालेच. मला अत्रे आवडत असले तरी मामा वरेरकरांना मी त्यांच्या नजरेतून बघायला लागल्याचा मला स्वतःचाच राग आला. खूपच पश्चाताप झाला. ‘समाजस्वास्थ्य’ मध्ये तर मामा वरेरकरांचे अनेक पैलू खूप जवळून लेखक आणि दिग्दर्शक यांनी दाखवले. र. धो, मालतीबाई आणि मामा वरेरकर यांच्यातले नातेसंबंध, मामांनी र. धों.ला शेवटपर्यंत दिलेली साथ व्वा! विशेषतः कॉग्रेसमध्ये असताना, गांधीजींचे अनुयायी असतानाही आपल्या विचारांशी बांधिलकी मानत र. धों.ला साथ देणारे मामा वरेरकर आज बघितले आणि स्तिमित झाले.
‘ध्यासपर्व’मध्ये र. धों. बरोबरच त्यांच्या पत्नी मालतीबाई यांच्या भूमिकेलाही न्याय मिळाला होता. ‘समाजस्वास्थ्य’मध्ये मालतीबाईचं स्वतंत्र्य व्यक्तिमत्व तितकंसं समोर येत नाही. त्या केवळ र. धों.च्या साथीदार बनून राहतात. अर्थात यात दिग्दर्शकापेक्षा लेखकानंच ती व्यक्तिरेखा कदाचित वेळेअभावी फुलवली नसावी हे लक्षात येतं. पण मालतीबाईंची भूमिका करणार्या राजश्री सावंत-वाड यांनी ही भूमिका अतिशय सुरेखरीत्या पेलली आहे. त्यातले बारकावे त्यांनी उत्तमरीत्या टिपले आहेत.
नाटकघर, पुणे निर्मित दोन अंकी ‘समाजस्वास्थ्य’ नाटक हा उत्तम सांघिक अनुभव देणारा प्रयोग आहे. नेपथ्य, असो वा संगीत, वेशभुषा असो वा प्रकाशयोजना, यातली कोणाचीही भूमिका कमी-अधिक कौतुक करण्यासारखी नाही - तर हे सगळेच होते, म्हणूनच हा अतिशय अप्रतिम, नितांत सुंदर असा जिवंत अनुभव आम्हाला प्रेक्षक या नात्यानं मिळाला. त्याबद्दल अतुल पेठे आणि समाजस्वास्थ्य टीम धन्यवाद!
आज नाटक झाल्यावर नेहमीच्या स्वभावानुसार मी आत जाऊन सगळ्यांना भेटले. गिरीश कुलकर्णीलाही भेटले. जरी त्याला ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटाबद्दल पारितोषिक मिळालं असलं तरी मला मात्र त्याचा त्या वेळी प्रचंड राग आला होता. या माणसाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यानं अशा चुका करू नयेत असं मनापासून वाटतं. पण आज मात्र गिरीशनं रंगवलेला रं. धों. इतका - इतका जिवंत उभा केला होता, झाला होता, की गिरीश तुला याआधीचे आणि यापुढचे १०० गुन्हे माफ! आजचा तुझा अभिनय इतका सहजसुंदर होता की खरंच तुझ्यासाठी - तुला शुभेच्छा द्यायला शब्द तोकडे आहेत! तू गिरीश कुलकर्णी मिटवून टाकला होतास, समोर उभा होता फक्त समाजस्वास्थ्यचा संपादक र. धों. कर्वे! जुग जुग जियो दोस्त!
प्रो. र. धों. कर्वे यांच्या जीवनपटातला आणि कार्यातला काही भाग म्हणजे 'समाजस्वास्थ्य' हे नाटक! समाजस्वास्थ्य या नाटकाचं कथानक र. धोंचं घर (अधिक समाजस्वास्थ्य केंद्र) आणि न्यायालय (म्हणजे त्यात चालणारे त्यांच्यावरील खटले) याभोवती फिरत राहतं. केवळ समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी, लैंगिक शिक्षण देण्यासाठी, लैंगिकतेबद्दलचं अज्ञान दूर करण्यासाठी काम करणार्या या जोडप्याला आयुष्यभर कसल्या हालअपेष्टांना सामोरं जावं लागतं आणि तरीही हे जोडपं हसतमुखानं आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही हे विशेष! अतिशय गंभीर विषय असूनही ज्या पद्धतीनं अजित दळवी यांनी नाट्यसंहिता लिहिलीय आणि अतुल पेठेनं ती पेललीये त्याबद्दल तुम्हा दोघांनाही पुनश्च सलाम! आज प्रत्येक बाबतीत आपली उलटी वाटचाल सुरू आहे असं वाटतंय. स्पष्ट बोलण्याची भीती, निर्भिडपणे लिहिण्याची भीती असं काहीसं दहशतीचं वातावरण असताना कोणीही या विषयाला हात घालण्याचं धाडस करणार नाही असं वाटत असताना प्राध्यापक अजित दळवीसारखा माणूस हे नाटक लिहितो काय आणि अतुल पेठेसारखा माणूस दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यावर पेलतो काय सगळंच अविश्वसनीय!
प्रत्येकानं हे नाटक बघायलाच हवं. यातले संवाद अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतील. आपल्या मनावर जमलेली धुळीची पुटं झटकण्याचं काम हे नाटक करेल. आपल्याच नव्हे तर आपल्या पुढल्या पिढीला काय द्यायला हवं याचं भान हे नाटक देईल. जगावं कसं हे हे नाटक सांगेल. पत्नी-पत्नीमधल्या एका उत्कट साथीची जाणीव हे नाटक देईल. सत्व आणि तत्व हरवलेल्या मनाला भानावर आणण्याचं काम हे नाटक करेल. म्हणून मित्रांनो, हे नाटक जरूर जरूर बघा आणि तनामनाधनानं बदला!
‘पद्मगंधा’ प्रकाशनाचे अरुण जाखडे यांचे विशेष आभार - ज्यांनी नाटकाच्या वेळी अगत्यानं 'समाजस्वास्थ्य'च्या १२ व्या अंकाची प्रत सर्व प्रेक्षकांना भेट दिली!
दीपा देशमुख
Add new comment