डियर जिंदगी
काल अपूर्वने डियर जिंदगी ची तिकीट काढून ठेवली होती. आलिया भटवर कितीही विनोद होत असले तरी ती पोरगी मला जाम आवडते. तिचा टू स्टेटस आणि हायवे दोन्हीही चित्रपटात ती दिसलीये गोड आणि कामही मस्तच केलंय. त्यातच आपल्या गौरी शिंदेचा सिनेमा म्हटल्यावर अपेक्षा उंचावल्या. (त्या गोवारीकरच्या आशुतोषनं मोहोन्जोदारोत अशाच निर्माण केल्या होत्या !!! नतिजा डोक्यावरचे केस उपटत थेटरबाहेर ....) आणि गेले की थेटरात, वर ल्योकानं महागामोलाचे पॉपकोर्न प्रेमाने आणून दिले. मोदीबाबाच्या कृपेने सुट्ट्या पैशाचे वांधे असतानाही ....चित्रपट सुरु झाला आणि ते खास करण जोहरच्या सिनेमाचं संगीत वाजलं आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
पहिला मोहन्जोदारो, दुसरा ऐ दिल है मुश्कील आणि हा डीअर जिंदगी तिसरा ....इजा बिजा तिजा ....विनाशकाले विपरीत बुद्धी ....आपल्याच कर्माची फळ...etc etc and etc!!!
वास्तवाशी संबंध नसलेल्या पोरीची गोष्ट! आईबापानं लहानपणी दूर ठेवलं म्हणून मोठी झाल्यावर देखील ही पोरगी आईबापाशी नीट वागत नाही. पहिल्या प्रियकराशी पण मनाला येईल तसं वागते. त्याला नकार देते. दुसरा मागे असतो पण ही भाव देत नाही. तिचं वागणं न कळून तो बिचारा कंटाळून दुसरीकडे साखरपुडा करतो तेव्हा मात्र हिला लगेच प्रेमभंग झाल्याची जाणीव होते. मग ती दुख्खी होते ...मग तिसरा भेटतो....संगीतप्रेमी ....पण आयुष्यभर संगीत ऐकून पकवून घेण्यापेक्षा त्यालाही ती हुडूत करते....मग या सगळ्याला तिच्यातली असुरक्षितता वगैरे मानसशास्त्रीय कारण पेरण्यात आली आहेत ...कारण नाहीतर आपल्या शाहरुख भाऊला कामच उरणार नाय न!!! त्यातच जगाला ज्ञानाचे डोस पाजणारा पण त्याचं पण आयुष्य धड नाही....बायको सोडून गेलेली ....पोरगं पण तिच्याच ताब्यात ....मग हा समुद्राच्या पाण्याशी - म्हणजे लाटांशी - एकटाच कबड्डी कबड्डी असं खेळत बसतो. आपल्या आलिया भट ला देखील तो हा भारतीय खेळ शिकवतो. चित्रपटाच्या शेवटी ती पण हा खेळ मन लावून खेळते!!!
मी जास्त भाष्य करण्यापेक्षा सई काय म्हणते ते वाचा. मी तर हिंदी सिनेमे न बघायची शप्पथ खाल्ली भौ!!!!
डियर जिंदगीचा शेवट पाहिला आणि वैतागाने म्हणावं वाटलं , गौरी शिंदे यू टू ?
नायिकेने बनवलेला चित्रपट पाहायला तिचे 3 ex boyfriends आलेत ते हसत टाळ्या वाजवताएत, त्यातला एकजण तिची हसत गम्मत करतोय, एकजण तिच्या बाबांना म्हणतोय, कदाचित मी सोबत असतो तर ती हे करू शकली नसती आणि त्यावर कडी म्हणून की काय आता तिला एक ताजा ताजा boyfriend मिळणार असं छान गोडमिट्ट चित्र दाखवून , थिएटरचे लाईट लागायला सुरूवात होते!
हे पाहताना डियर जिंदगी, ख-या जिन्दगीपेक्षा कोसो दूर आहे हे प्रकर्षाने जाणवतं.
इतकं सहज असेल का तिच्या आधीच्या 3 boyfriends साठी तिचा कारणं न देणारा नकार पचवणं आणि अशी मधेच तुटलेली , दुखावलेली नाती इतक्या सहजतेने प्रेमाच्या पातळीवरून येऊन मित्राच्या पातळीवर स्थिरावली? बरं इतके extraordinary असे हे पुरूष आहेत ( खास आपल्या आधीच्या प्रेयसीने बनवलेला चित्रपट पाहण्यासाठी वाट वाकडी करून मुंबई आणि अमेरिकेतून गोव्याला येणारे )असं काहीच आधीच्या प्रसंगात आपल्याला दिसत नाही.
आणि मग आधीच्या चिकण्या चुपड्या पोरांसारखा अजून एक पोरगा तिच्याशी बोलायला येतो, वा वा ,, शेवटी नायिकेला किंवा नायकाला आयुष्याचा जोडीदार मिळवून दिल्याखेरीच दिग्दर्शकाला चित्रपट पूर्ण झाल्याच समाधान मिळत नाही की काय,,,
अनादी अनंत काळापासून हे बाळबोध शेवट पाहून मी पिकून पिकून बोर झालेय राव😠- सई तांबे
तरी बरं, शाहरुख खान खूपच सुसह्य वाटतो बघायला आणि ऐकायलाही!!!
Add new comment