महेशिंते प्रथिकारम
राष्ट्रीय पारितोषिक विजेता 'महेशिंते प्रथिकारम' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट काल रात्री फेसबुक दोस्त डॉ. प्रशांत पाटील यांच्या आग्रहामुळे बघितला. या चित्रपटाची गोष्ट एकदम सरळसाधी! महेश नावाचा एक फोटोग्राफर आपल्या दुकानात पासपोर्ट साईझ किंवा स्टील फोटोग्राफी करत असतो. खरं तर त्याच्या फोटोग्राफीत कुठलीही सर्जनशीलता, नावीन्य नसतं. उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच तो या व्यवसायाकडे बघत असतो. आई वारल्यामुळे घरात तो, त्याचे वडील आणि एक कुत्रा ही तीनच मंडळी राहत असतात.
महेशचे वडील देखील फोटोग्राफर असतात. मात्र आयुष्यभर त्यांनी आपला हा नाद जपलेला असतो. महेशचं गावातल्याच सौम्या नावाच्या मुलीवर प्रेम असतं. अगदी शाळेत असल्यापासून. सगळं काही सुरळीत चाललेलं असतानाच महेशच्या आयुष्यात उलथपालथ होते. सौम्यासाठी सुशिक्षित, श्रीमंत, देखण्या तरुणाचं स्थळ सांगून येतं. काय निर्णय घ्यावा यात ती गोंधळून जाते. ज्या अर्थी तिची द्विधा अवस्था झालीये, तेव्हा त्यातला दडलेला अर्थ महेशला लक्षात येतो आणि तो माघार घेतो. त्याच दरम्यान काही अरेरावी करणारे तरूण विनाकारण मारामारी करतात आणि त्यात मध्ये पडलेल्या महेशला ते अपमानास्पद रीतीनं धुवून काढतात. या अपमानाचा बदला घेण्यासाठी महेश आपण जोपर्यंत या तरुणाला मारून नामोहरम करणार नाही, तोपर्यंत पायात स्लिपर घालणार नाही असं ठरवतो.
महेश आपला बदला पूर्ण करतो का, त्याच्यासारख्या साधारण तरुणात इतकी ताकद आणि हिम्मत येते का, सौम्याचं प्रेम दुरावल्यानं तो त्या दुःखातून बाहेर येतो का, त्याच्या साचलेपणाच्या जगण्यात काही बदल होतात का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात हळूहळू मिळत जातात. केरळचा नयनरम्य हिरवागार निसर्ग आपले डोळे तृप्त करून सोडतो. केरळमधल्या इडुक्की जिल्ह्यात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. खरं तर हा चित्रपट म्हणजे एक चित्रकथाच आहे. आपल्याला भाषा कळण्याची गरजच नाही. यातल्या पात्रांचे डोळे, हालचाल, चेहरा, निसर्ग सगळं काही बोलतं. महेशच्या कुत्र्याचे देखील एक्स्प्रेशन्स बघत राहावेत असे टीपले आहेत.
हलक्याशा वार्याबरोबरचं गवताचं लहरणं, केरळमधल्या गावातल्या लोकांचा एकोपा, मिळून जगणं, तिथल्या सावळ्या, तजेलदार कांतीच्या आणि टपोर्या डोळ्याच्या तरुणी, एकूणच बहुतांशी घरात लागलेली टीव्हीची लागण, ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असं बरंच काही बघायला मिळतं. यात महेश आणि त्याचे वडील यांच्यात फारसे संवाद नाहीत, पण तरीही त्यांचं न बोलता एक वेगळं हळुवार बाप-लेकाचं नातं आपण अनुभवत राहतो. तसंच गावातल्या कुणाएकाच्या मृत्युनंतरही प्रेमिकांना मात्र याही प्रसंगात एकमेकांना भेटायला मिळतंय याचा झालेला आनंद आपल्याला बघायला मिळतो. अशाच प्रकारचा प्रसंग कमल हसनच्या 'पुष्पक' या मूकपटातही बघायला मिळाला होता, ती आठवण हा चित्रपट बघताना झाली.
तसंच या चित्रपटात अनेक खुससुशीत चेहर्यावर हासू पेरणारे देखील अनेक प्रसंग आहेत. दिग्दर्शक दिलीश पोथन हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असून आशिक अबू हा निर्माता आहे. फहाद फासिल, अपर्णा बालामुरली, अनुश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे उत्कृष्ट छायाचित्रणाबरोबरच या चित्रपटाचं संगीतही अतिशय श्रवणीय आहे. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रियदर्शननं तमीळ भाषेत देखील केला. महेशिंते प्रथिकारम या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार मिळवले आहेत. जरूर बघा.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment