संपूर्ण जगभर अतीव उत्साहाची लहर पसरवणारा ‘स्पायडर मॅन: नो वे होम’!

संपूर्ण जगभर अतीव उत्साहाची लहर पसरवणारा ‘स्पायडर मॅन: नो वे होम’!

१६ डिसेंबर २०२१ या दिवशी संपूर्ण भारतात एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कोविडचे सर्व नियम पाळून सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रेक्षक त्यांचा लाडका नायक पडद्यावर कधी एकदा दिसतो याची आतुरतेने वाट पाहू लागले. या चित्रपटासाठी प्रेक्षक इतके अधीर झाले होते, की सगळ्या थिएटरमधली सगळ्या वेळांमधली तिकिटं लोकांनी आधीच आरक्षित करून ठेवली होती. पडद्यावर चित्रपटाची दृश्य दिसायला लागली आणि प्रेक्षकांच्या तोंडातून आश्चर्याचे, आनंदाचे चित्कार एकापाठोपाठ एक असे बाहेर पडू लागले.  तर, हा चित्रपट म्हणजे ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ आणि त्यातला नायक म्हणजे अर्थातच स्पायडर मॅन! सध्या याच चित्रपटाची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून बॉक्स ऑफीसवर त्याने अल्पावधीत कोटयवधी रुपयांची उलाढाल केली आहे. कोविडच्या मळभ दाटून आलेल्या आणि साचलेल्या आयुष्यात प्रेक्षकांना या स्पायडरमॅनने उल्हसित करून सोडलं आहे.
स्पायडर मॅनच्या इतिहासात डोकावून बघितलं तर, स्टॅन ली आणि स्टीव्‍ह डिटको यांच्या कल्पकतेतून स्पायडर मॅन नावाचं एक पात्र साकारलं गेलं आणि सुरुवातीला हा स्पायडर मॅन लोकांसमोर मार्वल कॉमिक्स मधून वाचकांसमोर आला. पुढे याच स्पायडर मॅनने चित्रपटांत प्रवेश केला आणि बघता बघता त्याने जगभरातल्या किशोरांना आणि तरूणांना वेड लावलं.  
स्पायडर मॅन हे पात्र संकटात सापडलेल्या लोकांना साहाय्य करतं. त्याची अफलातून वेशभूषा, त्याच्यातली अतिद्रिंय शक्‍ती, त्याच्यातला चपळपणा, अगदी भिंत असो वा छत, त्याला चिटकून सरपटत जाण्याचं कौशल्य, त्याच्याकडे असलेलं कोळ्याचं जाळं त्याला कुठेही जाण्यासाठी मदतकारी ठरतं. स्पायडरमॅनला गेल्या काही वर्षांमध्ये स्पाइडी, वेबस्लिंगर, वॉलक्राउलर, वेबहेड, अरॅक्निड आणि युवर फ्रेंडली नेबरहूड स्पायडर मॅन असं संबोधतात. व्‍यावसायिकदृष्‍ट्या सगळ्यात लोकप्रिय आणि यशस्वी असा सुपरहिरोंमध्ये स्पायडरमॅन आहे. मार्वलच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातली पात्रं ब्लॅक अँड व्‍हाईट नसतात, तर त्या प्रत्येक पात्राची स्वत:ची एक गोष्ट असते आणि त्यामुळे नायक किंवा खलनायक असा शिक्का न मारता त्या त्या पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मॅग्नेटो, थानोस, लोकी, ग्रीन गॉब्लिन, किंगपिन, अल्ट्रॉन, द मँडरिन, डॉ. ऑक्टोपस, कँग, डॉर्मम्मू, व्‍हेनॉम आणि गॅलॅक्ट्स यासारखी अशी अनेक पात्रं आहेत. 
संपूर्ण जगभर अल्पावधीत धुमाकूळ घालणारा ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिरो चित्रपट मार्वलच्या कॉमिक्समधल्या स्पायडर मॅन या पात्रावर आधारित आहे. हा चित्रपट २०१७चा स्पायडर मॅन : होमकमिंग, २०१७ चा स्पायडर मॅन: फार फ्रॉम होम आणि मार्वल सिनेमॅटिक युनिव्‍हर्स म्हणजेच एमसीयू च्या शृंखलेतला २७ वा चित्रपट असून तो सिक्वेल आहे. किंवा पुढचा भाग आहे म्हटलं तरी चालेल. स्पायडर मॅन: नो वे होम या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन जोन वाट्स आणि चेरिस मॅक्केन्ना आणि एरिक सोमर्स केलं आहे. स्पायडर मॅन म्हणजेच पीटर पार्करची भूमिका टॉम हॉलंड याने साकारली आहे. आजवर टोबी मॅग्वायर, अँड्रू गारफिल्ड, टॉम हॉलंड यासारख्या अभिनेत्यांनी स्पायडरमॅनचं पात्र रंगवलं आहे.
या चित्रपटात डॉ. स्ट्रेंज आणि स्पायडर मॅन ही दोन पात्रं पुन्हा एकत्र बघायला मिळतात. आपण स्पायडर मॅन आहोत हे जगाला कळू नये म्हणून पीटर पार्कर डॉ. स्ट्रेंजला तू तुझी शक्‍ती वापरून लोकांच्या स्मृतीतून मला घालव अशी विनंती करतो. थोडक्यात स्पायडर मॅन खऱ्या आयुष्यात कोण आहे हे लोकांना कळू नये असं त्याला वाटत असतं. पण डॉ. स्ट्रेंज मदतीला तयार असला, तरी ती एक अशक्यप्राय गोष्ट असते कारण पीटर पार्करने त्याला काही लोकांनी लक्षात ठेवावं आणि काहींनी नाही असं म्हटलेलं असतं. याच गोष्टीमुळे अनेक गुंतागुंती निर्माण होतात. हा चित्रपट उत्कंठावर्धक यासाठी आहे की यात अनेक विश्वातली माणसं एकत्र आली तर काय घडू शकतं हे दाखवलं आहे. पहिल्यांदाच आजवर काम केलेले सगळे स्पायडर मॅन अनेक चित्रपटांमधले हिरो आणि इतर महत्वाची पात्रं सगळीच या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता होती. इतकंच नाही तर ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित झाल्याझाल्याच व्‍हयूजची आजवरची रेकॉर्डस मोडली.  
स्पायडरमॅनचे हक्‍क सोनी कंपनीकडे असून वेगवेगळी पात्रं एकाच ठिकाणी एकत्र आणणं ही अत्यंत कठीण गोष्ट असताना, तसंच आजवरचे सगळे स्पायडर मॅनचं पात्र रंगवणारे अभिनेते एकत्र आणणं ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. या चित्रपटाचं वैशिष्‍ट्य म्हणजे जरी प्रत्येक चित्रपट त्या त्या नायकांवर केंद्रित असला, तरी या चित्रपटांची एक कलेक्टिव्‍ह स्टोरी देखील आहे. कॅप्टन अमेरिका, आर्यन मॅन यांच्या चित्रपटात ॲव्‍हेन्जर्स या चित्रपटांत हे सगळे हिरो एकाच चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळाले. असं असताना सोनी कंपनी आणि मार्वल सिनेमॅटिक युनिव्‍हर्स यांनी एकत्रितपणे हा चित्रपट बनवायचं ठरवलं आणि २०१९ मध्ये संयुक्त करार केला. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक अनोखी पर्वणीच होती.
स्पायडर मॅन : नो वे होम हा चित्रपट लॉस एन्जेलिसमध्ये फॉक्स व्‍हिलेज थिएटरला१३ डिसेंबर २०२१ या दिवशी, तर १७ डिसेंबरला अमेरिकेमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरातल्या स्पायडरप्रेमी प्रेक्षकांना अचंबित करून सोडलं. अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला. सर्वसामान्य लोकांनीच नव्‍हे तर समीक्षकांनी देखील  स्पायडरमॅनची भूमिका साकारणाऱ्या टॉम हॉलंडवर प्रशंसेचा वर्षाव केला आहे. वेगवेगळी एकापेक्षा एक दिग्गज पात्रं, उत्कृष्ट तंत्रज्ञान यांनी प्रेक्षकांना तृप्त करणारा, अतीव समाधान देणारा असा स्पायडर मॅन: नो वे होम एकदा नव्‍हे तर पुन्हा पुन्हा बघायलाच हवा.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.