शी

शी

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली दोन सीझन्स म्हणजेच एकूण १४ भागांत विभागलेली वेबमालिका म्हणजेच ‘शी’!
भूमिका (भूमी) परदेशी ही मुंबईच्या एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातली चाळीत राहणारी तरुणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत असते. तिची आजारी आई आणि तरूण बहीण रुपा यांच्यासह घराची आर्थिक जबाबदारी भूमीच सांभाळत असते. भूमिका आणि तिचा नवरा लोखंडे यांची कोर्टात घटस्फोटासाठी केस सुरू असते. लग्नाच्या पहिल्याच रात्री लोखंडेने ‘तू थंड आहेस, तू पुरूषी आहेस’ वगैरे दुषणं देत भूमिकाला अपमानित केलेलं असतं. तसंच तिची लहान बहीण रूपा ही तिच्यापेक्षा सुंदर असल्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या भूमिकाच्या मनात न्यूनगंड तयार झालेला असतो. 
भूमिकाचं अर्थहिन असं निरस आयुष्य सुरू असतानाच एके दिवशी क्राईम ब्रँच (अँटी नार्कोटिक्स) चा पोलीस अधिकारी जेसन फर्नांडिस आपल्या टीममध्ये तिची निवड ड्रग्ज माफियांचा नायनाट करण्यासाठी करतो. तिला वेश्या बनून या गुन्हेगारीजगतापर्यंत पोहोचून पोलिसांना हवी ती माहिती पुरवायची असते. सुरूवातीला कां कू करणारी भूमिका जेव्‍हा नोकरीवर गदा यायची वेळ येते, तेव्‍हा जेसन फर्नांडिस म्हणतोय त्या कामासाठी तयार होते. हे काम करताना त्यातलं थ्रिल तिला जाणवतं. आपल्या आयुष्याला एक हेतू मिळाल्याची जाणीव तिला होते आणि काम करता करता ती ड्रग्जविश्वाच्या चक्रव्‍युहात अडकते. 
भूमिकाला या प्रवासात अनेक संकटांशी सामना करावा लागतो आणि त्यात तिला स्वत:मधल्या सामर्थ्याची जाणीव होते. तिला जेव्‍हा बरोबरीने सेक्सचं सुख देणारा पार्टनर (ड्रग माफिया नायक) मिळतो, तेव्‍हा तिच्यातला न्यूनगंड तर जातोच, पण पुरेपूर आत्मविश्वासही निर्माण होतो. ड्रग्जविश्वातली हिंसा, भीषणता आणि भयंकर असं वास्तव ती बघते. मरा किंवा मारा हेही यातलं सत्य तिच्या लक्षात येतं. आपल्याला या खेळात कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही आणि आपल्याला जिवंत राहायचंय असं मनाशी पक्‍क ठरवत भूमिका या प्रवासात स्वत:ला झोकून देते. या खेळात तिला मजाही यायला लागते. सुरुवातीला घाबरट असलेली भूमी आता कोणाच्या मदतीशिवाय सामना करायला शिकते. वेश्या म्हणून रात्रीच्या वेळी ठरावीक ठिकाणी भडक मेकअप आणि तोकडे घालून उभं राहणं, इतर वेश्यांबरोबर सामना करणं, गाड्या थांबवून बोलणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधणं, ट्रान्सजेंडरनं केलेल्या पाठलागाला तोंड देणं, लोखंडेच्या घाणेरड्या नजरेपासून बहिणीला वाचवणं, त्याच्याकडून फ्लॅट ताब्यात घेणं, नवऱ्याचं सत्य कळणं अशा अनेक प्रसंगातून भूमिका पावलं टाकत पुढे पुढे जात राहते.
‘शी’ या मालिकेत ड्रग्जचं जगभर पसरत चाललेलं जाळं, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेली तरुणाई, ड्रग्जविश्वातला महत्वाकांक्षी आणि बुद्घिमान असलेला नायकडू म्हणजेच नायक दाखवलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन चौफेर नजर ठेवणारा आणि आपला धंदा वाढवत चाललेला असा नायकडू सारखा खलनायक आपला चेहरा जगासमोर येऊ न देण्यात यशस्वी ठरलेला असतो. त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणींचा आघात त्याच्यावर झालेला असतो. काम संपलं की त्या व्‍यक्‍तीचा उपयोग संपला असं म्हणत तो त्या त्या व्‍यक्‍तींना संपवत असतो. तसंच आपला चेहरा कामासंदर्भात ज्याने बघितला, त्याला तो नंतर ठार मारत असतो. भूमीशी त्याचा संपर्क होतो आणि तिच्या मदतीने तो पोलिसांना खेळवत राहतो. बघता बघता तो ड्रग्जसारख्या गुन्हेगारी विश्वात तिला खेचून घेतो, एक एक डावपेच शिकवत तिला त्यात तरबेज करतो. तसंच हळूहळू नायक तिच्यावर प्रेम करायला लागतो. भूमीला नायक आपल्या गावी घेऊन जातो. तिच्याबरोबर आपल्या आयुष्यातल्या अनेक आठवणी तो तिच्याबरोबर शेअर करतो. एकीकडे नात्यामध्ये एकमेकांना मोकळीक असणं, स्पेस देणं, विश्वास आणि पारदर्शकता असणं त्याला महत्वाचं वाटतं, तर त्याच वेळी दुसरीकडे ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाही संपवता आलं पाहिजे अशीही त्याची मतं असतात. 
एकीकडे आजारी आई, घटस्फोट देण्यास टाळंटाळ करणारा, रूपावर डोळा ठेवणारा आणि भूमिकाचं घर हडपणारा तिचा दारूडा नवरा लोखंडे, पोलीस खात्यात काम करतानाची रोजची जिवावर बेतणारी आव्‍हानं, तर दुसरीकडे नायकडूच्या जगात त्याचा तृप्त करणारा सहवास, त्या जगातला थरार आणि चढत चाललेली नशा अशा दोन पातळ्यांवर भूमिका जगत असते.
‘शी’ ही इम्तियाज अलीची मालिका असून अरिफ अली आणि अविनाश दास यांनी दिग्दर्शित केली आहे. या मालिकेत भूमिका म्हणजेच भूमी हिची भूमिका आदिती पोहनकर हिने कमालीची रंगवली आहे. तिच्यातले बदल तिने इतके अचूकतेनं टिपले आहेत की एका महाराष्ट्रीयन मुलीचा हा अंदाज बघताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आदितीने या मालिकेत अत्यंत बोल्ड सीन दिलेले असून ती कुठेही संकोचल्यासारखी किंवा बुजल्यासारखी वाटत नाही हे विशेष. पोलीस कॉन्स्टेबलला सूट होईल अशा प्रकारचा आवाजाचा हेल तिने तंतोतंत काढलेला आहे. तिच्यासोबत यात शिवानी रांगोळे (सांग तू आहेस का मालिकेतली डॉ. वैभवी – या मालिकेतली रूपा), सुहिता थत्ते (भूमी आणि रूपा यांची आई) आणि रोहित कोकाटे (वेश्यांचा दलाल) हे मराठी चेहरे प्रामुख्याने आपला ठसा उमटवतात. किशोर (नायकडू), विजय वर्मा (सस्या), विश्वास किनी (जेसन फर्नांडिस), ही इतर महत्वाची पात्रं शी या मालिकेत आहेत. 
‘शी’ मालिकेत आजकालच्या ट्रेंडप्रमाणे प्रचंड प्रमाणात हिंसा, स्वार्थ, वखवखलेपण, अस्वस्थता, असमाधान, जागतिकीकरणाचे परिणाम, मूल्यांना दिलेली तिलांजली, राक्षसी महत्वाकांक्षा आणि शर्यत या गोष्टी मुबलक प्रमाणात असून सेक्शुअल प्रसंगांची आणि अश्लील आणि असभ्य भाषेची रेलचेल आहे. 
‘शी’ मध्ये पोलिसांनी भूमिकावर सोपवलेली कामगिरी ती यशस्वीरित्या पार पाडू शकते का, सुरूवातीला पोलिसांची हेर म्हणून वेश्येचा रोल करणारी भूमिका खरोखरंच वेश्याव्‍यवसायात अडकली जाते का, नायकडूच्या प्रेमात पडलेली भूमिका खरोखंरच त्याला कायमची साथ देते का अशा अनेक प्रश्नांची उत्तर ’शी’ या मालिकेत मिळतात.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.