कारवाँ.....तलाश है!!!!

कारवाँ.....तलाश है!!!!

धन्यवाद, फेसबुकमित्र प्रशांत पाटील Prashant Patil यांना. ज्यांच्या आग्रहामुळे मी दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘कारवाँ’ हा चित्रपट बघितला. चांगले चित्रपट, त्या ठरावीक कालावधीच्या प्रवासात आपल्यालाही बरोबर घेऊन जातात. त्यातलं नाट्य, त्यातलं कथानक, त्यातली पात्र, त्यातले प्रसंग, त्यातल्या घटना, सगळं काही समोर खरं खरं घडत नाहीये हे कळत असूनही चित्रपट बघताना त्यात मन इतकं गुंतलं जातं की त्या पात्रांच्या दुःखात मन तितकंच कासावीस होतं, डोळ्यांतून अश्रू कोणाचीही पर्वा न करता ओघळू लागतात. त्या पात्रांच्या आनंदाच्या क्षणात मनही सुखावतं. त्यांच्यातल्या घडणार्या गमतींनी आपल्याही चेहर्‍यावर मीश्कील भाव उमटतात. चित्रपट संपतो.

चित्रपट संपल्यावरही कितीतरी काळ मनावर त्याचा एक अदृश्य पदर तसाच राहतो. चटकन बाहेर येता येत नाही. ते सगळं असं चिमटीत धरून उडवल्यासारखं उडवता येत नाही. ‘कारवाँ’ या चित्रपटानं असंच काहीसं केलं. चित्रपटातला नायक अविनाश म्हणजे दुलकर सलमान हा तरुण. (मामुटी या अभिनेत्याचा तो मुलगा!) शौकतच्या भूमिकेत इरफान खान आणि तान्या म्हणजेच मीथिला पालकर दिसले आणि मी सुखावले. इरफान खान तर आवडता आहेच, पण ही नव्यानं आलेली कार्टी ‘गर्ल इन द सीटी’ या मालिकेमुळे मनात घर करून बसलीय.

या चित्रपटात तिघंजण भिन्न स्वभावाचे, अनपेक्षित परिस्थितीमुळे एकत्र येतात आणि त्यांचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात अनेक गोष्टी घडतात. आपलं वागणं हे अनेकदा आपल्या बाबतीत परिस्थिती, त्या त्या वेळची माणसं कशी वागली यावरून कळत नकळत बनत जातं. इथंही तेच दिसतं. नायकाचं अबोल असणं, मनातली गोष्ट कुठेही न बोलणं, नेहमी गंभीर चेहर्‍यानं वावरणं, इंजिनिअर होऊनही आयटीतल्या नोकरीत मन न रमणं, खरं तर ढकलत चाललेलं त्याचं रसहीन आयुष्य, आपल्या उदध्वस्त झालेल्या स्वप्नांबाबत आपल्या वडिलांना दोषी धरणं........ शौकत हा अविनाशचा मित्र, वयानं त्याच्यापेक्षा बराच मोठा, पण मनानं एकदम मोकळा......तान्या ही तरूणी बिनधास्त आपल्या टर्मसवर जगणारी......ही तिघं एकत्र येतात आणि त्यांच्या प्रवासात जे काही घडतं, त्यातून त्यांचे स्वभाव, त्यांच्या मनात साठलेलं, त्यांची घुसमट, त्या एकत्र येण्यातून कधी बाहेर पडलेला संताप, तर कधी चेहर्‍यावर फुललेलं हासू ....हे अनुभवताना आपण प्रेक्षक राहतच नाही. त्यांचे अदृश्य सहप्रवासी बनून आपण त्यांच्याबरोबर चालू लागतो.

‘कारवाँ’ या चित्रपटाचं कथानक सांगण्याचा प्रचंड मोह होतोय. पण आवरतेय सारखी स्वतःला. कारण चित्रपट खूपच नवा आहे. सगळ्यांनी जरूर जरूर बघायला हवा. मिथिला पालकरचं भविष्य उज्ज्वल आहे. पोर लैच गुणाची आहे. खूप सहज अभिनय करते. मुख्य म्हणजे तिच्यावर मराठी छाप जाणवत नाही. ज्या साच्यात टाकावं तशी ती भासते. दुलकर सलमान या तरुणानंही आपली भूमिका खूप समजून केली आहे. चित्रपटातलं संगीत त्या प्रवासाला साजेसं असंच आहे. इरफान खानचं काम अफलातून आहे. त्याचे सहजपणे उच्चारलेले डायलॉग्ज मनावर छाप पाडून जातात....'रोती हुयी औरत और दूधवाला इनपे कभी भरोसा नही करना चाहिए', असं तो अविनाशला ताहिरा नावाच्या स्त्रीचा फोन आल्यावर मीश्कीलपणे म्हणतो....तो एकाला उद्देशून ‘साऊथ इंडिया के मंडेला’ म्हणतो,...एका परदेशी जोडप्याला समजत नसतानाही हिंदीतून त्या तरुणीनं इतके तोकडे कपडे घालणं कसं वाईट आहे हे सांगत बसतो. किंवा एअरपोर्टच्या सामानाचा इन्चार्ज असलेला माणूस कुठली गोष्ट ऐकूनच घेत नाही, त्या वेळी त्याला 'तुझ्या बायकोला किडनॅप केलं गेलंय' असं सांगून त्याची भंबेरी उडवतो, लग्नघरात दोन इंग्रज एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात, तेव्हा हा तिथे हिंदीमध्ये ‘हमारा सबकुछ तो ले गये आता काय बाकी राहिलंय’ असं विचारतो. त्यांना काही कळत नाही, ते 'सॉरी' असं म्हणत त्याच्याकडे बघतात, तर हा म्हणतो, आता सॉरी म्हणून काय उपयोग? त्यांना तो डफर म्हणतो..............त्यानंतर तो अविनाश आणि तान्या यांना दारू पिताना बघतो तेव्हा शहनाईवाल्या चाचाला आजच्या तरुणाईबद्दल म्हणतो, 'जरासा खुश रहनेके लिए इन्हे इतना नशा करना पडता है....'

तसंच एका प्रसंगी इरफान खान म्हणतो, 'लोगोंको हक निभाना आता है, रिश्ता निभाना नही.....' कारवाँ हा चित्रपट म्हणजे अंर्तमनाच्या शोधाचा एक प्रवास आहे. अनेक गोष्टी गमावल्यावर त्यांचं महत्व कळतं, त्या व्यक्तींविषयीचे, त्या प्रसंगांमागे दडलेले अर्थ उलगडतात. या प्रवासात स्वतःचा शोध लागला, तर पुढचं जगणं सुकर होतं. मात्र काही गोष्टी काळाबरोबरच समजतात हेही तितकंच खरं! हा कारवाँ मला खूप म्हणजे खूपच भावला. तुम्हालाही नक्कीच आवडेल याची खात्री आहे. तर जरूर बघा.

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.