भूमिका !!!

भूमिका !!!

अलिप्तपणे पाहातेय.... आजूबाजूला जमलेले नातेवाईक - माझ्या अवस्थेकडे पाहून - हे असं होणं साहजिकच आहे अशा गंभीर चेहर्‍यानं उभे. सगळंच कसं अचानक झालं. गाडीवरचा ताबा सुटला आणि पंधरा दिवसांपूर्वी घाटात झालेला तो भीषण अपघात....पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि मग सगळाच खेळ आटोपला....

मी बधिर झालेय असं सगळ्यांना वाटतंय. खरंच आपण बधिर झालो आहोत का? याही अवस्थेत हसायलाच येतंय. सासू आणि ननंद विचित्र नजरेनं आपल्याकडे बघतायेत. माझी ही अवस्था चांगली नाही. मला रडवलंच पाहिजे. माझं मन हलकं व्हायला हवं. नाहीतर या दुःखानं मी वेडीच होईल असं काहीसं बोलत त्या माझ्याजवळ आल्यात. माझ्या पाठीवरून हात फिरवत ननंद थोपटत म्हणू लागली, 'अगं, तू जर अशी दगडासारखी झालीस तर कसं होईल?' पाझर फुटेल असं काहीसं ती बोलू लागली. मग अख्खा जमावच ती भाषा बोलू लागला. त्यांच्यातली ती सांत्वन करण्याची स्पर्धा पाहून मला चमत्कारिक वाटू लागलं. त्यांच्या त्या कोलाहलात रडू येणं तर दूरच पण सरळ उठून आतल्या खोलीत जाऊन पडावं वाटू लागलं.

गेल्या पंधरा दिवसांचा शीण एकदम आल्यासारखा वाटू लागला. पण असं करता येणार नाही. या गर्दीसाठी असा चेहरा पाडून बसणं भागच आहे. आपल्या आयुष्याचा कर्ताकरविता समोर चटईवर चिरनिद्रा घेत पडलेला आहे. कोणीतरी पांढरीशुभ्र चादर त्याच्या गळ्यापर्यंत लपेटली आहे. बाजूला कोणीतरी चंदनाची उदबत्ती लावली आहे. चंदनाचा मंद सुंगध वातावरणात पसरलाय. मोठ्ठा श्वास घेत हा सुवास आत आत ओढून घ्यायला हवाय. या उदबत्तीच्या ब्रँडवरून काय अंगावर धाऊन यायचा आपला नवरा! त्याला नेहमीच उग्र वासाच्या उदबत्त्या आवडायच्या. रात्री खोलीत येताच तो त्या लावायचा. अंगावरही कसले कसले उग्र पर्फ्युम्स फवारायचा. चंदनाचा तर शत्रूच! आता मात्र तो काहीच करू शकणार नाही. हा चंदनाचा सुगंध हवा असो वा नसो त्याला घ्यावाच लागेल. पण तरीही तो चिडला तर....क्षणभर भीतीच वाटली. पटकन त्या उदबत्त्या जमिनीवर दाबून विझवल्या. जमावातली मंडळी माझ्याकडे पुन्हा चमत्कारिक नजरनें पाहू लागली. खरं तर आता माझ्या मांड्यांना कळ लागलीय. असं किती वेळ चालणार आहे कुणास ठाऊक! 

सासू ठेवणीतला खास आवाज काढत रडत बोलतेय, 'फार केलं हो हिनं, गेले पंधरा दिवस डोळ्याला डोळा नाही. खाण्यापिण्याचीसुद्धा शुद्ध नव्हती पोरीला. सारखी उशाशी बसून होती पोर! आता दगड नाही होणार तर काय होईल हिचा. कोणाकडे पाहून जगावं आता हिनं? पदरात एक पोर टाकून गेला असता तर..........पण पोरी, अगं, तू एकटी नाहीस आम्ही तुला काहीही कमी पडू देणार नाही...'

यातलं किती खरं आणि किती खोटं कुणास ठाऊक! जगरहाटीसाठी? का प्रसंगाची डिमांड? 

सासूकडे पाहून लग्नानंतरचा दुसराच दिवस डोळ्यापुढं उभा राहिला. सकाळी स्वयंपाकघरात सासूला पाहून आपण हाक मारली होती, 'आई, मी करू का काही मदत?' तशी ही नजर न उचलता अंगावर खस्सकन ओरडली होती, 'मला आई म्हणणार्‍या दोन पोरी आहेत बरं. मी तुझी सासू आहे. मला सरळ सासूबाई म्हणत जा. ती फालतू नाटकं नकोत हं इथं. सासू सासूच असते आणि सून सूनच! तू तुझ्या आईला आई म्हणतेस ना...आईविना पोर असतीस तर कदाचित ठीक होतं...समजलं?' पुढंच काही मग आपल्या डोक्यात शिरलंच नव्हतं. त्या क्षणी काहीतर तटकन् तुटलं, जे पुन्हा कधी जोडलं गेलंच नाही. सासूनं कधीच आपले सासूपणाचे हक्क सोडले नव्हते. ती म्हणते ते आणि तसंच झालं पाहिजे असचं होत गेलं. आता तर हे सांत्वनपर बोलणं - केवळ कोरडा व्यवहार! कदाचित अशा प्रसंगी असंच बोलायचं असतं.

तिथे जमलेल्या सगळ्यांवरून नजर फिरत गेली. दीर, चुलत सासरे, मावस सासरे आणखी कोण कोण...गंभीर आवाजात कुजबजू चालू आहे....खिडकीशी ननंदा, जावा सुतकी चेहर्‍यानं तोंडात बोळा कोंबून उभ्या आहेत....शेजारणी एकमेकींना माहिती पुरवताहेत....नवर्‍याचा चेहरा तरी पाहावा. आत्तापर्यंत नीटसा कधी पाहिलाच नाही. किती शांत झोपलाय. निरागस आणि निष्पाप दिसतोय....कपाळावरून हलेकच हात फिरवावा का? पण हे काय, किती बर्फासारखा थंडगार स्पर्श ....बर्फच! हात नकळत कपाळावरून हळुवारपणे फिरू लागलाय. बरं वाटतंय. लग्न झाल्यापासून त्याचा स्वभाव, त्याचा स्पर्श सगळं कसं चटके बसवणारच तर होतं.

हे काय, पायर्‍या उतरत उतरत कुठे चाललो आहोत आपण....एक....दोन...तीन....पाच.......आता उतरणं थांबवलं पाहिजे. हे काय आपण तर कॉलेजच्या आवारात जाऊन पोहोचलो की! मैत्रिणी हसत बोलवताहेत....आज काय पुष्पा भावेंचं व्याख्यान आहे.....आणि ही कोण....कथ्थई आँखोवाली इक लडकी......हसरी, उत्साही....आपणच! कसं शक्य आहे? आणि आपल्या बाजूला कोण आहे बरं - समीर? तो इथं कसा असू शकतो.....छे!

डोळे घट्ट मिटायला हवेत. समीर समोर दिसताच कामा नये. मिटल्या डोळ्यासमोर नवराच उभा राहिला पाहिजे. सासू त्याच्या बाजूला उभीय. काय बरं म्हणतेय, 'बाईच्या जातीला कशाला आवडनिवड पाहिजे हो, जे मिळेल ते गोड मानून घ्यायला हवं. आणि कमीच काय आहे या घरात? सदा न कदा हिचा चेहरा दुर्मुखलेला....घरची लक्ष्मी कशी हसतमुख पाहिजे....खरं तर आधी बघितलेल्या पंधरा पोरी एकापेक्षा एक सरस होत्या. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हे ध्यान घरात आणलं' अशी उपकाराची आणि तुच्छतेची भाषा येताजाता कानावर पडायची. आपण एकदा केव्हातरी सहन न होऊन उलट उत्तर दिलं होतं. पण केवढा गोंधळ झाला होता. आई-वडिलांच्या शिकवणुकीचा, संस्कारांचा, घराण्याचा पार उद्धारच झाला होता. आई-बाबा आणि सनी यांना बोलावून घेण्यात आलं होतं. जाताना त्यांनीही आपल्यालाच, 'या वयात आता आम्हाला चार घास सुखानं खाऊ दे हो पोरी. नको आम्हाला ताप देऊस. आता हेच तुझं माहेर आणि हेच तुझं सासर. समजलं?' वर त्याग, सोशिकपणा, समर्पण असे दागिने स्त्रीला कसे शोभून दिसतात हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं होतं.

पाण्यात राहून माशाशी वैर करायचं नसतं हे आपण शिकलो. पण एके दिवशी आपण सहजच आरशात पाहिलं तेव्हा किती दचकलो होतो. आरशातलं ते प्रतिबिंब कुठलीच ओळख देत नव्हतं. कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हाचा आरसा आणि आताचा आरसा किती फरक होता त्यात.  अंगावरचे पिवळेधम्मक दागिने, डोक्यावरचे केस पातळ झालेले, डोळ्याखालची मोठमोठी काळीशार वर्तुळं...चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या आणि त्या सुरकुत्यातून दिसणारा ताण.....या आपणच आहोत हे मान्य करावंच लागलं शेवटी. 

त्याचं ड्रिंक्स घेणं, खाण्यापिण्याच्या फर्माइशी....कुठल्या गोष्टीला नकार दर्शवताच वाट्टेल तसा अपमान करणं....कधी कधी तर सासूसमोरही हात उचलायचा आणि सासू त्या वेळी म्हणायची, 'आधी नव्हता हो माझा पोर असा. हिच्याशी लग्न केलं आणि बिथरला. नवर्‍याचं सगळं वागणं बायकोवर अवलंबून असतं. हिलाच जपता येत नाही याचं मन. आमचे नवरे नाही हो असं कधी वागले. तरी बरं आम्ही अडाणी असून संसार नीट केला.'

चला...एक मोठ्ठा श्वास घ्यायला हवा. आपला नवरा गेलाय. हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं सुख त्याच्यासोबत गेलंय. अरेच्चा, हे कोण बरं पुटपुटतंय, 'नवरा असेल तरच बाईच्या जगण्याला अर्थय हो, पण आता हिच्या नशिबात एवढंच सुख होतं त्याला कोण काय करणार?' कंटाळा आलाय का आपल्याला हे सगळा ऐकण्याचा, पण काय करू शकतो आपण? जोपर्यंत सगळं उरकत नाही. तोपर्यंत असं बसणं भागच आहे.

कोणीतरी उठवतंय आपल्याला. उभं राहायला हवं. चालायचं आहे का...याच्या मागे चाललो तसं...किती पावलं...सात...सप्तपदी म्हणतात म्हणे! सात जन्माची सोबत...तो पुढे आणि ती मागे....तो कधीच मागे वळून बघणार नसतो आणि ती कधीच त्याच्या बरोबरीनं चालू शकत नाही अशी सप्तपदी!....तिच्या वेदना, तिचं दुःख...काय संबंध त्याचा? काय बडबड चाललीय ही मनात. जरा गप्प करायला हवंय या मनाला! पण कसले आवाज कानावर पडताहेत. सगळीच मंडळी जोरजोरात रडताहेत. कोणीतरी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढतंय, हातावर हात आपटून बांगड्या फोडतंय. हे काय, कपाळावरचं कुंकूही पुसलं गेलंय. बांगड्यांचा फुटल्याचा आवाज कानावर पडतोय....कोणीतरी नवर्‍याचं शेवटचं दर्शन घ्यायला सांगतो आहे. आपला पती - परमेश्वर!

कोणीतरी कानात ओरडतंय, 'रड, रड, पोरी रड.' विनवणीच चालू आहे की प्रात्यक्षिकं? प्रयत्न करून तर बघू या. छे! जमत नाहीये. खांदेकर्‍यांनी उचललं की आपल्या नवर्‍याला....जमाव आता दूर सरकतोय....‘श्रीराम जयराम जयजयराम’चा आवाज कानावर आदळतोय...शब्द अस्पष्ट होतायेत.

स्वतःकडे आता बघायला हवंय. गळ्यात, हातात, पायांच्या बोटात, कानात....सौभाग्यचिन्हं काही काही नाही....सारं कसं मोकळं...रिकामं....स्वच्छ....चागंलं का वाईट?...............पण आपल्याला तर हलकं हलकं अगदी पिसासारखं वाटतंय. हसू येतंय. कोणीतरी ओरडून म्हणतो आहे, 'अरे, जरा हिच्याकडे बघा. हसतेय. वेडी होईल अशानं.' मोठ्यानं हसायला हवंय. म्हणू दे कोणाला वेडी म्हणायचं असलं तरी! एक मोकळा श्वास घेतेय तर पाठीवर कोणीतरी थोपटतंय. छे, मनाला सांगितलं पाहिजे, असं वागणं बरं नाही. 

पुन्हा कॉलेजचे दिवस आठवतायेत, एकांकिकेतला अभिनय आठवतोय.... रंगीत कवडसा पुन्हा अंगावर पडतोय...भूतकाळ आणि वर्तमानकाळ.....दोन्ही गोष्टी एकमेकांत मिसळू लागताहेत....पण आत्ताच्या भूमिकेशी समरस व्हायला हवंय हेच खरं.

म्हणजेच मोठ्यानं हंबरडा फोडायला हवाय!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.