भूतदया

भूतदया

रोज एक तरी चक्कर न चुकता टाकणारी माझी मैत्रीण ८-१० दिवसांत एकदाही फिरकली नाही. मला हुरहूर लागण्याऐवजी माझ्या शेजारणीनेच खवचटपणे प्रश्न केला, ''काय हो, तुमची प्रिय मैत्रीण आली नाही बरेच दिवसांत? भांडण-बिंडण झालं की काय ?'' सखी शेजारणीकडे दुर्लक्ष करीत मी घरात शिरले. खरंच, पिंकी का बरं आली नसावी ? ती आली की, टी.व्ही.ची सगळी चॅनल्स पटापट चालू झाल्यागत वाटतं. बिल-मोनिका पासून ते कॉलनीतल्या बबलु-मोनाच्या लफड्याबद्दल पिंकीला इत्थंभूत माहिती असते. कितीही रस घ्यायचा नाही असं ठरवलं तरी, मी ही तिच्या गप्पांच्या भुलभुलैयात खेचली जातेच.
पिंकीचं खरं नावं पंकजा ! टोपण नावं 'पिंकी' तिनेच केल्यामुळे आम्ही तिला पिंकीच म्हणतो. पिंकी मुलखाची बडबडी !, त्यामुळे तिचं न येणं.... मी विचारात पडले. ती आजारी तर नसेल ? आपण खरं आपल्याच नादात असतो. आपल्या लक्षात यायला हवं होतं. तिचा नवराही इथं नसतो. तो बिचारा तिकडे सातासमुद्रापलिकडे ! (म्हणजे फॉरेन-बिरेन मध्ये !) अशा वेळी तिची विचारपूस करणं आपलं कर्तव्य आहे. काय करावं बरं ? विचारात असतानाच सासूबाई समोर येऊन उभ्या राहिल्या. ''काय गं, काय झालं ?'' त्यांनी खांद्यावर हात ठेवत मला प्रश्न केला. मनातली खळबळ बोलून दाखवताच त्या हसत म्हणाल्या, ''अगं, केवढीशी गोष्ट अन् केवढा विचार करतेस ?'' त्यांनी लगेच नंबर डायल करून रिसिव्हर माझ्या हाती दिला.
तिकडून येणाऱ्या हॅलो ची वाट न पहाता मी सुरू केलं, ''हॅलो, पिंकी ! अगं कशी आहेस तू ? तुला......''
'बाई कामात आहेत, थोडया वेळानं करा फोन !' फोन दानकन् ठेवल्याचा आवाज.
नेहमी फोन पिंकीच तर उचलते, मग आज ? आपल्या सासूबाईंचंच वय झालंय. त्यामुळे त्यांनी चुकीचा नम्बर डायल केला असावा. मी परत एकदा नम्बर डायल केला. आता मात्र बाईसाहेबांचा आवाज ऐकायला आला -
''अगं कविता तू होय ? मी जरा रोहन मध्ये बिझी आहे. नंतर करते गं तुला फोन..' माझे पुढचे शब्द ऐकायच्या आतच फोन बंद !
हे मात्र फारच झालं हं! आपण केवढ्या काळजीने फोन करतोय नि ही ? आणि हा रोहन कोण ? आपल्याला कसा माहीत नाही ? हिचे सगळे नातेवाईक आपल्याला माहीत आहेत. छे ! यात रोहन नावाचा कुणीच नाही. जाऊ देत, असेल कोणी ओळखी-पाळखीचा, किंवा नव्याने शेजारी रहायला आलेला.. पण म्हणून काय झालं ? हिने नवीन ओळखीपायी आपल्याशी दोन मिनीटंही
बोलू नये ? एवढी कसली बिझी ? चांगलंच फैलावर घ्यायला पाहिजे. मी पुन्हा नव्या उत्साहाने फोन लावला.
"पिंकी, अगं..' म्हणेपर्यंत, 'कविता, अगं मी करते तुला सावकाशीनं फोन..प्लीज, डोंट डिस्टर्ब मी यार !'
''अगं, पण तू काय करते आहेस ?'' मी माझं पालूपद चालूच ठेवलं.
"अगं कविता, मी रोहन साठी चिकन बनवतेय, प्लीज, मी तुझ्याशी नंतर बोलते !" आणि पुन्हा फोन बंद !
आता मात्र माझं 'बायकी डोकं' वेगानं फिरू लागलं. शुद्ध शाकाहारी कुटुंबातली पिंकी, साधं अंड्याचं नाव काढलं तरी भडाभडा उलट्या करते. आणि आज कोण कुठला तो रोहन, त्याच्यासाठी स्वत: चिकन बनवतेय ? कोण असेल बरं बाई हा रोहन ? का नव्याने प्रेमात पडलीये ? काय बाई कोणाचं सांगता येतं आजकाल ? सासूबाई म्हणतात तेच खरं, 'कलियुगात काहीही घडू शकतं !' पिंकीचा नवरा काही दिवसांसाठी अमेरिकेला गेलाय. त्याच्या मागे हे थेर ? माझा सात्विक संताप वाढू लागला, आणि मग मागचा पुढचा विचार न करता (असं म्हणायची पद्धत आहे ना ! म्हणून..) मी सरळ कायनेटिक काढली आणि एक सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी (?) पिंकीच्या घराची वाट पकडली. रस्ता कापीत असतांना मला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मला अचानक आलेलं बघून पिंकी आणि रोहनच्या चेहऱ्यावर कसे अपराधी भाव असतील ? आपण कसं उपदेशांनी ठासून भरलेलं लेक्चर झोडायचं, मी मनातल्या मनात उजळणी करीत असतांनाच पिंकीचं घर आलं देखील !
बेल न वाजवता मी मागच्या बाजूने किचनकडनं सरळ आत शिरले. बघते तर काय, अतीप्रसन्न चेहऱ्याची पिंकी ओट्याजवळ उभी ! एका मोठ्या बाऊल मध्ये चिकनरूपी कसलासा पदार्थ ओतत होती. मी मुद्दामच जोरात हाक मारली, "पिंकी...' ती वळाली. पण मला बघून तिला आश्चर्याचाच काय पण कुठलाच धक्का बसला नाही. शिवाय ते 'रंग मे भंग' वगैरे म्हणतात, तसंही काही दिसेना. उलट 'बरं झालं बाई तुच आलीस...' असं काहीसं पुटपुटत तिने माझ्यापुढं डायनिंग टेबलची चेअर सरकवली.
खरं तर मला तिचा रागच आला. माझा केवढा अपेक्षाभंग केला होता तिनं ! बरं तर बरं तिचा तो रोहनही कुठे दिसेना. का माझा आवाज ऐकून लपलाय ? मी बारीक नजरेनं, माझ्या टप्प्यात जे काही येईल ते बघु लागले. नेहमी घर टापटीप ठेवणारी (म्हणजे बाईकडून ठेवून घेणारी !) पिंकी-घरभर पसारा करून चिकन कसली बनवतेय ? माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघत पिंकी म्हणाली 'थांब हं कविता, एवढं चिकन रोहनला खाऊ घालते, आणि मग तुझ्याशी निवांत बोलते.'
माझ्या समोरनं पिंकी चालती झाली. आणि मी ? .. अरेरे .... कसला वाईट्ट विचार घेऊन मी हिच्या घरी आले. लाज वाटायला हवी या मनाला ! हा रोहन कोणी चार-सहा वर्षाचा गोड छोकरा दिसतोय. त्यामुळेच तर पिंकी म्हणाली, 'एवढं चिकन रोहनला खाऊ घालते.' वात्सल्य, माया, ममता, आईचं आभाळाएवढं प्रेम म्हणतात ते हे असं ! साने गुरूजींची 'शामची आई' मला पिंकी मध्ये नव्याने दिसू लागली. कोणाचा कोण हा रोहन? पण पिंकीआपल्या आवडी-निवडी बाजुला सारून केवढा आटापिटा करतेय. खरचं, शिकायला हवं हिच्याकडून काही ! मुलांनी घरी काही फर्माइश केली, की आपणच त्यांचा आवाज दडपून टाकतो. म्हणजे वयाचा, मोठेपणाचा फायदा घेऊन आवाज चढवून म्हणतो, 'ए, काय सारखं खा खा अं? टेबलावरती भाजी पोळी बडवून ठेवलीये, ती घ्या अन् खा.' एवढ्यानं जमलं नाहीच तर या पोराचं तोंड बंद करण्यासाठी कधी-मधी पावभाजी, पाणीपुरी, भेळपुरी, आलुवडा, रगडापॅटीस.....ऊ, हूं हे सगळं घरी नाही, हे सगळं त्यांना बाहेर गाडीवर नेऊन खाऊ घालायचं आणि काही दिवस कृतकृत्य व्हायचं.
आजपासून असं वागायचं नाही. आजपासून पिंकीच आपला आदर्श ! इतके दिवस उगीचच आपण तिला आळशी, कामचुकार समजत होतो. मैत्रीप्रेमाने हळूहळू मला गहिवरून येऊ लागलं. माझे डोळे भरून आहे. 'काय गं, डोळ्यात काही गेलंय का ?' पिंकी कधी माझ्यासमोर आली ती मला दिसलीच नाही. मी भानावर आले. घरी गेलं की मुलांच्या सगळ्या फर्माईशी आपण स्वत: बनवून पुऱ्या करायच्या असं मी पक्कं ठरवलं. ज्या गोड छोकऱ्यासाठी हा आटापिटा चालला होता, त्या छोकऱ्याला बघायला हवं. ! __ 'ए, कुठयं तुझा लाडोबा रोहन ? झालं का त्याचं चिकन खाणं ? घेवून येना त्याला इकडंच !
। 'अगं खातोय तो अजून. त्याचं खाणं होईपर्यंत त्याला समोर दुसरं कोणीच चालत नाही. आणि आज तर त्याची आवडती डीश ! त्यामुळे मस्त चाललंय पठ्याचं !'
बोलत बोलत फ्रीज उघडून पिंकीने मिरिंडा बाहेर काढलं. माझ्यासाठीच समजून मी हात पुढे करणार तोच, बाईसाहेब मिरिंडासहित रोहनच्या रूमकडे चालत्या झाल्या. फंटा, मिरिंडा सोडा, हिने अजून मला पाणीही विचारलं नाही. 'अतिथि देवो भव: म्हणे' हूं ! आपला घोर अपमान आहे हा ! चार वर्षाच्या काट्याचे एवढे कसले लाड ? मी ताडकन् उठले अन् मागच्या रूमकडे वळाले. मला पाहताच पिंकी म्हणाली, 'ये, ये. रोहनचं आत्ताच आटोपलयं. बरं झालं तु इकडेच आलीस. अगं चिकन खाल्लं की त्याला मिरिंडाच लागतो बघ.'
'कुठेय रोहन ? मला तर दिसत नाहीये.' त्या काट्याला बघण्यासाठी मी पुन्हा नजर इकडं तिकडं वळवली. _ 'अगं इकडं तिकडं काय बघतेस ? हा काय माझ्या मांडीवर दिसत नाहीये का ? काळ्या फुलाफुलांच्या साडीत पिंकी मांडी घालून बसली होती. चष्मा न घातल्याचा पश्चाताप करीत, डोळ्याला ताण देत मी तिच्या मांडीवर बघीतलं. बघते तर काय, एक काळं बेंद्र कुत्र्याचं पिल्लू, मिरिंडाने केशरी झालेली जीभ चाटत माझ्याकडं बघत होतं. माझ्या चेहऱ्याकडे बघत पिंकी म्हणाली, 'रोहन, रोहन ! कविता मावशी आलीय. चल शेकहॅन्ड कर बघू मावशीला.'
-'अच्छा ! म्हणजे या काळ्या कुत्र्याचं नाव रोहन काय ? या गधड्याला मिरिंडा, चिकन ? आणि हा नमुना मला शेकहॅन्ड करणार ?' त्याच्या काळपट पंजाच्या स्पर्शाची मला कल्पनाही करवेना. त्यालाही बहुतेक ही मावशी आवडलेली दिसत नसावी. चिरचिर आवाजात त्याने माझ्यावर केकाटायला सरूवात केली. 'रोहन. नो बेटा ! असं नाही हं करायचं. अरे आपली कवूमावछी ना ती ! कर बघू शेकहॅन्ड, रोहन सी, शी विल् गीव्ह यू किटकॅट हं ! हो ना ग कवूमावछी, देणार ना रोहनला किटकॅट ?'
या काळ्याला मी किटकॅट द्यायचं? माझ्या मुठी संतापाने वळू लागल्या. मनात म्हटलं, 'अगं गधडे, मुलांनी कधी हट्ट केला तरी मी जाम बधत नाही. अन् या काळ्याला कसलं आलयं किटकॅट ?' पण चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता मी शेकहॅन्ड केला. माझ्याकडं एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून रोहन वामकुक्षीसाठी निघून गेला.
तो गेला त्या दिशेकडे कौतुकानं पहात पिंकी म्हणाली, 'छान आहे ना रोहन ? अगं, त्याच्या चेअर वर बसलेलं त्याला अजिबात चालत नाही. केवढासा आहे-दोन महिन्याचा, पण बघ कसं आपलं आपलं कळतं त्याला.' __ मी चाचरत पिंकीला म्हटलं, 'अगं पिंकी, तुला कुत्रच पाळायचं होतं तर मला तरी सांगायचस. आमच्या कॉलनीतल्या कुत्रीने परवाच चांगली चारपाच पिल्लं दिलीतं. अगं, मस्त गुटगुटीत आहेत. आणि कलरही छान सोन्यासारखा ! हे तुझं कुत्रं दिसायला काहीतरीच हं....'
माझं बोलणं संपायच्या आतच पिंकी जवळजवळ माझ्यावर खेकसलीच, 'अगं काहीतरी काय बोलतेस ? आणि रोहनला कुत्रं काय म्हणतेस ?'
आता कुत्र्याला कुत्रा नाही म्हणायचं तर काय हत्ती म्हणू ? (मनातल्या मनात हं !)
'तुझ्या त्या दळभद्री कॉलनीतली गावठी कुत्र्यांची पिल्लं मी पाळायची? मी ? शी: ! आम्हालाही काही प्रेस्टीज आहे म्हटलं. आणि रोहन गावठी नाही तर चांगला जर्मन शेफर्ड आहे .'
ती बडबडत होती आणि मला माझ्या तोकड्या ज्ञानाची प्रथमच जाणीव होत होती. नवऱ्याने उपहासाने मारलेले टोमणे मला आठवू लागले. तरीही मन प्रश्न विचारू लागलं, 'गावठी कुत्रे आणि प्रेस्टीज याचा संबंध काय? आणखी काय बरं म्हणाली ही ? हे कुत्रं म्हणे जर्मन शेफर्ड.. शेफर्ड म्हणाली की शोफर म्हणाली? बहुतेक शोफरच म्हणाली असावी. शोफर म्हणजे ड्रायव्हरच बहतेक! आणलं असेल जर्मनीतल्या एखाद्या ड्रायव्हरकडून.. पण म्हणून का ते चांगलं?' शेवटचं वाक्य मात्र मी जरा जोरात म्हटलं, तशी पिंकी म्हणाली, 'अगं जर्मनीहन नाही आणलं रोहनला, आणि शेफर्ड म्हटलं मी शोफर नाही. बाई, बाई डोळ्याबरोबर कानही गेलेले दिसतात तुझे. नीट तपासून घे गं बाई!'
मला मारलेल्या टोमण्यांकडं दुर्लक्ष करीत मी एक आवंढा गिळत विचारलं, 'अगं हे जर्मन शेफर्ड म्हणजे काय असतं ?'
त्यावर अतीव उत्साहाने पिंकी सांगू लागली, 'ती ना, एक जात असते.
म्हणजे बघ कोणाला ऑल्सेशियन आवडेल, कोणाला डॉबरमॅन, कोणाला पॉमेलियन तर कोणाला...
कसले किचकट शब्द उच्चारतेय ही ? बापरे ! आपल्याला यातलं फक्त ते पामतेलच माहितीयं.. पण कुत्र्याचा आणि पामतेलाचा काय संबध? आणि काय सांगत होती ही ? कुत्र्याची जात ? यांच्यातही जात? म्हणजे बरीच सुधारली म्हणायची की ही कुत्री ? पण तरी हिने एका जर्मन शब्दावरनं याला पाळायला नकोच होतं. वर त्या गावठी कुत्र्यांना नावं का ठेवतेय् ही ?'
माझ्या चेहऱ्यावरचे बावळट भाव बघत पिंकी म्हणाली, 'अगं गावठी कुत्रे फारच टुकार असतात. त्यांना कितीही चांगलं टिच करायचं म्हटलं तरी त्यांना चांगल्या सवयी लागूच शकत नाहीत. अगं त्यांना बुद्धीच मुळी कमी असते.'
मला आठवली सकाळी मॉनिंग वॉक साठी ग्रुपने उड्या मारत निघालेली गावठी कुत्री ! काळी, पांढरी, पिवळी.. उकिरड्यावरचं खाऊन वाढलेली...पण फ्रेश आणि मस्त तगडी ! आनंदी ! आपल्या कॉलनीला तर कधी गुरख्याची गरजही भासली नाही. त्यांना कोणी चिकनही देत नाही की मिरिंडाही नाही. उरली एखादी शिळी पोळी, भाकरी तर ती फेकायची कशाला म्हणून या कुत्र्यांच्या नशिबी येणार. बिन पगारी मोफत सेवाच ही कुत्री करतात की ! हल्ली दिवस खूप बदललेत म्हणा ! चोऱ्यांचं प्रमाणही वाढलयं. त्यात पिंकीचा नवराही इथं नसतो. कुत्रा पाळणं तिची गरज असेल. तिला या जर्मन का हिंडालियम जातीचं कुत्रं आवडलं असेल तर आवडू देत. आपल्याला का राग यावा ? मी पिंकीला समजुतीच्या आवाजात म्हटंल, 'पिंके, पाण्यापावसाचे दिवस आहेत. हे कुत्र्याचं पिल्लूही तसं लहानच आहे. त्याला तू बाहेर बांधणार कुठे सांग बघू?' ___ मी एवढ्या समजुतीच्या स्वरात बोलूनही पिंकी जरा घुश्शातच बोलू लागली,
'कविता, सारखी पिल्लू पिल्लू काय म्हणतेस गं? रोहन म्हण ना ! खरं तर मला याचं नाव हृतिकच ठेवायचं होतं. पण रोहन नाव घेताच यानं शेकहॅन्ड केला गं. त्यामुळे त्याचं मन नाही मोडवलं बघ. आणि रोहनही काही अगदीच वाईट नाव नाही.'
'बरं बाई, पिल्लू नाही, रो-ह-न ! त्याची बांधायची घरोबाहेरची जागा दाखवतेस ना?'
'रोहनला बांधायचं ? ते ही घराबाहेर ? अगं देवानं तुला काही हृदय, मन, काळीज नावाची गोष्ट दिलीय की नाही? 'माझ्या अल्पमतीनसार लोक कुत्री पाळतात ती घराची राखण करतात म्हणून ! पोलिसी कुत्रे तर चोरही पकडून देतात म्हणे ! पण हिचं कुत्रं घरात रहाणारं, रूममध्ये ? मी म्हटलं 'पिंकी रागावू नकोस पण कुत्र्याने घराची राखण करायची असते की नाही ?'
माझ्या हाताला धरून ओढतच पिंकी गेटकडे घेवून गेली. मला म्हणाली 'वाच !' तिथे एक बोर्ड होता, 'कुत्र्यापासून सावध.' 'झालं आता समाधान ? हे वाचल्यावर कळेल ना लोकांना आतमध्ये रोहन आहे म्हणून ? या बोर्डाचा धाक बसेलच ना ! अगं, या कॉलनीतल्या सगळ्यांची कुत्री घरातच आहेत. मी जर रोहनला घराबाहेर ठेवलं तर सगळी मला नावं ठेवतील, हसतीलही. आणि दुसरं म्हणजे रोहनला थंडी, वारा जराही सहन होत नाही. खूप नाजुक आहे गं तो ! शिवाय त्याचा टीचर त्याला बाहेर ठेवायला अलाऊ नाही करणार ! '
'कुत्र्याला टीचर ?' मी किंचाळले.
'अगं, केवढ्यानं ओरडतेस ? रोहनची झोपमोड होईल ना ! सेन्सच नाही बाई तुला. त्याच्या टीचर वरनं तुला काय झालं ओरडायला ? आपण फार फार तर त्याला शेकहॅन्ड करायला शिकवू शकतो. आता पूर्वी सारखं नाही बाई राहीलं. आपल्या वेळेसचं शिक्षण आणि आताचं शिक्षण यात खूप फरक आहे म्हटलं. आणि रोहनचा टीचर महिन्याला फक्त तीनच हजार घेतो. आणि आठवड्यातून चांगला दोन वेळा टीच करायला येतो.'
रोहनला, या काळ्याला शिकवायला टीचर ? मी तर अजून माझ्या पोरांना ट्युशनला देखील कुठल्या टीचर कडे पाठवलं नाही. काय बाई एकेकाच्या त-हा ? कुत्र्याला काय शिकवायचं असतं एवढं ? नक्कीच हा रोहनला लिहायला वाचायला शिकवत असणार. खरंचं काय जग बदललं बाई ? ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले हे आपल्याला खोटं, अतिशयोक्तीपूर्ण वाटायचं. पण नाही, ते सारं खरंच असणार. आता त्या रेड्यासारखा रोहनही हुशार होणार.
माझं हे स्वगत ऐकताच पिंकी खो-खो हसत म्हणाली, 'कविता, तू फारच विनोदी बुआ ! जशी दिसतेस तशीच वागतेस. रोहन कसा लिहीणार, वाचणार? हे बघ तो टीचर येतो, रोहनला तो 'कम' म्हणतो. रोहन 'कम' होतो. रोहनला 'सीट' म्हटलं की रोहन 'सीट' होतो. 'स्टॅण्डअप' म्हटलं की 'स्टॅण्डअप' होतो. आणि 'नो' म्हटलं की गोष्ट हवी असली तरी नोच, पहिला महिना हाच सिलॅबस बघ.'
'अगं पण हे सगळं शिकवायचं कशाला ? त्याला वाटेल तेंव्हा तो बसेल किंवा उठेल त्याची मर्जी. आणि प्राण्यांबद्दल मी असं वाचलय एकदा त्यांनी भरल्यावर कुठल्याही पदार्थाकडे ते ढुंकूनही बघत नाहीत. माणसासारखी सारी खायला तयारच !' ही वृत्ती त्यांची नसते. त्यांचं मग 'नो' च उत्तर अर एवढ्यासाठी तीन हजार घालवायचे?' हे सगळे विचार मी मनातच म्हटले आमिर वरकरणी हसत म्हटलं,' पिंके, या रोहनने शिक्षण संपल्यावर घराची राखण करायची ना ? कधी त्याचा सिलॅबस कम्प्लीट होणार गं ?'
पिंकी प्रेमळ चेहऱ्याने बोलू लागली, 'अगं तो काय आपला पगारी नोकर आहे घराची राखण करायला ? पुन्हा नाही हं असं बोलायचं. डोन्ट हर्ट पी अगेन हं ! रोहन आता आमच्या घरातलाच एक मेंबर आहे म्हटलं. त्याचा तो टीचर कमीत कमी एक वर्ष तरी शिकवेल रोहनला.'
चला, म्हणजे तीन गुणीले बारा वर्षाचे छत्तीस हजार ही बया त्या टीचरच्या डोंबल्यावर घालणार तर !
"हे बघ कविता, मी तुला रोहनचा टाईम-टेबलच सांगते. सकाळी आठ वाजता आपण रोहनला उठवायचं. त्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट ! त्यात चिकन फ्राय, फिश फ्राय, चिकन कंटकी, नाहीच जमलं तर बॉइल्ड एग्ज् आणि दुध! दुपारी मात्र त्याला बॉइल्ड चिकन द्यायलाच हवं. त्यांनतर त्याची दुपारची झोप. संध्याकाळी झोपेतन उठल्यावर या बॉलने आपण त्याच्यासोबत खेळायंच. खेळन झाल्यावर तो काहीतरी लाईट खाणार.'
'लाईट खाणार ?' पुन्हा एकदा मी किंचाळले. नुकतंच मी कुठल्याशा पेपर मध्ये वाचलं होतं, एक मनुष्य ट्युब खातो, बल्ब खातो. खरंच किती बाई ट्रेनिंग मिळणार रोहनला. पण मी हे बोलन दाखवताच माझा मात्र भ्रमनिरास झाला लाईट खाणं म्हणजे हलका-फुलका आहार असा अर्थ होता म्हणे ! त्यात डॉग बिस्कीट्स, ऑमलेट किंवा चोको चॉकलेट्स ! त्यानंतर टीचर येणार, एक तास त्याला टीच करणार. तो जर नाही आला तर आपणच रोहनला टीच करायचं. त्यांनतर रोहनचं जेवण आणि आ-रा-म यानेकी झोप !
'बघ, किती पॅकड् शेड्यूल आहे ना रोहनचं ?'
ती जे सांगत होती, त्यामुळे माझं जनरल नॉलेज एकाएकी बरचं वाढल्याची जाणीव मला होऊ लागली. एक म्हणजे कुत्रा हा घराची राखण करण्यासाठी नसतोच मुळी ! त्याच्या संगोपणासाठी, त्याच्या वस्तुंसाठी खास पेट शॉपी असतात म्हणे ! माझ्या डोळ्यातून ही उत्सुकता जरा जास्तच उतू जाऊ लागली. तशी पिंकी म्हणाली, 'चल, तासाभरात पेट शॉपीतनं जाऊन येऊ. या महे सगळं खरंच असतं ? बघायलाच हवं.
मी आणि पिंकी दहाच मिनिटांत एका चकचकीत काचेच्या शो-रूमजवळ पोहोंचलो. आतमध्ये प्रवेश करताच एका आदबशीर व्यक्तीने आम्हाला झुकून नमस्कार का काय केला. मलाही त्याच्यासारखंच झुकून नमस्कार असं म्हणावसं वाटलं. केवढा राजबिंडा माणूस ! पण दोन स्त्रीयांपुढे झुकतोय, मला जरा कौतुकच वाटलं. पण, 'बावळटासारखी वागू नकोस, चल निमूटपणे माझ्याबरोबर !' असा दम पिंकीने दिल्यामुळे मी तिच्यापाठोपाठ चालू लागले. पुढे एका व्यक्तीने अगदी हळू आवाजात पिंकीला काहीतरी विचारलं, एवढा बारीक आवाज की, त्या मेल्याला त्याचं त्यालाच ऐकू येत होतं की नाही कुणास ठाऊक ? 'या ! या ! मॅम एन्जॉय युवसेल्फ..' असं काहीसं पुटपुटत तो अदृश्य झाला. मी विस्फारलेल्या नजरेने बघू लागले..
सगळीकडे मोठमोठी झुंबरं, डिमलाईट वातावरण, हळू आवाजातलं पाश्चात्य संगीत, काचेची चकाचक काऊंटरस्.. समोरच्या भागात काचेची भांडी दिसत होती. क्रोकरी वगैरे काहीतरी म्हणतात त्याला, कुणास ठाऊक. मी एक डीश हातात घेतली. किंमत होती रू. ३८० ओनली. झटकन् मी ती डीश खाली ठेवली. फुटली तर नाही ना या भावनेने माझी मीच ओशाळले. पिंकीने पाण्यासाठी वेगळं, खाण्यासाठी वेगळं असं करीत जवळपास दोन अडीच हजाराची भांडी निवडली.
माझं मन पुटपुटू लागलं, 'गेली आठ वर्ष झाली, नुसतीच घोकतेय डिनरसेट घेऊ. पण या ओढाताणीत कसलं जमतयं.. कधी पोराचं आजारपण, कधी सासुबाईंची देवाधर्माची लिस्ट, तर कधी नवऱ्याची कुठल्या कुठल्या सोसायट्यांच्या कर्जाची यादी..या सगळयातनं निस्तरताना कशाचा आलाय डिनरसेट... आपल्याही स्वप्नांची एक छोटीशी यादी आहे हे मुळी विसरलोच होतो आपण... चला ! विचारातनं जरा बाहेर आले तर पिंकी रोहनसाठी टॉवेल निवडीत होती. किती सुंदर, वेगवेगळया कुत्र्यांची चित्र असलेली पांढरी शुभ्र टर्कीश टॉवेल्स ! किती रूपयाला असतील बरं ? लेबल होतं रू. ४६५ ओनली ! काय बाई किंमती ! या पेक्षा आपले सुती पंचेच बरे, धुवायला अन् वाळायला दोन्हीलाही सोपे, किंमतीलाही कमी ! मध्यमवर्गीय माणूस वस्तुंची निवड किंमत बघूनच करतो, दुकानदारही गि-हाईक कोणत्या वर्गातलं आहे हे चेहऱ्यावरचे भाव बघूनच ओळखतो. टॉवेल खाली टाकून मी निमूटपणे तिसऱ्या डिपाटमेट मध्ये शिरले. पिंकीने तिथून डॉग फूड घेतलं. वेगवेगळे पॅकबंद आकर्षक डबे ! हात लावून बघण्याचा मोह मी टाळला. जरा पुढे सरकताच होती, पेट टॉइज ! अनेक आकारातले चेंडू, रिंग, थाळीफेक थाळया, आता हा कुत्रा ऐवढे खेळ कधी खेळणार कुणास ठाऊक ? त्यानंतर कुत्र्यांचे खास शांपू, साबण, हेअर ब्रश, हेअर ड्रायर, शी शू करायच्या पॉटीज, वेगवेगळे बेल्ट आणि त्या अवाढव्य किंमती !
आता मात्र माझं डोकं चांगलंच गरगरू लागलं. मन आणि शरीर दोन्हीही बधीर झाल्यागत वाटतं होतं. ज्या देशात कित्येक (नव्हे अजून लाखातच म्हणायला हवं.) लोक अजूनही उपाशीपोटी झोपतात, त्याच देशात प्राण्यांसाठी अशी खास व्यवस्था आहे. एवढे जड विचार माझ्या बुद्धीला झेपणारे नव्हते. तरीही ते सगळ्याबाजुंनी अतिरेकी आक्रमण करू लागले. माझी ही अवस्था बघून पिंकी म्हणाली, 'अगं बाई कविता, काय होतंय तुला ? भारीच नाजुक बाई तू. एवढ्याशा खरेदीतच थकलीस ? चल आपण घरीच जाऊ. खरं तर रोहन ऊठायची वेळ झालीये. त्याचं खाणं बघायला हवं.' पिंकीचा निरोप घेत मी घराचा रस्ता पकडला. घरात शिरताच सासूबाई नजरेने ऊशीर झाल्याची नाराजी व्यक्त करीत होत्या, त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला सामोरं जाण्याची माझी तयारी नव्हती. पिंकी घरी रोहनला डब्यामधले बिस्कीटस् खाऊ घालत असेल. मी मात्र चारचा चहाही न करता ताणून दिली. त्यांनतर मात्र पिंकीचं माझ्या घरी येणं बरचं कमी झालं. कधी तिचा फोन येई, 'रोहनला रोज फिरायला न्यावं लागतं. नाहीतर तो अपसेट होतो. त्याला एकटं सोडून कुठं गेलं ना तर तो लोनली फील करतो.' मी कधी तिच्याकडे गेले की, तिथलं दृश्य, रोहनचा टीचर कधी रोहनला, 'प्लीज कम्' 'प्लीज सीट्' करताना दिसायचा. कधी रोहनचं मिरिंडा पिणं, तर कधी वामकुक्षी घेणं, तर कधी टी व्ही बघणे कार्यक्रम चाललेला असायचा.
एकदा पिंकी कौतुकानं सांगत होती, 'अगं आमचा रोहन म्हणजे अगदी ऑस्सा आहे बघ. परवा काय गंमत झाली सांगू, आम्ही ना माझ्या त्या चुलत नणंदेकडे गेलो होतो. तिच्याकडे कुठला कलर टी व्ही ? रोहनला कलरची सवय गं, त्यामुळे तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही बघून इतका चिडला, लागला की ओरडायला. अगं, कोणाचचं ऐकेना. दहाच मिनिटात कशीबशी समजूत काढून त्याला घरी आणलं. कसला जातीवंत कुत्राय नाही ? आवडी निवडी सुद्धा कशा रीच् अन् रॉयल आहेत म्हटलं !' मी मान डोलावण्यापलिकडे काहीही करू शकत नव्हते. मनातलं खरं बोलण्याचं धाडसंही नव्हतं. बरेच दिवस पिंकीकडे जाण्याचं मीच टाळलं. तिलाही विशेष फरक पडला नसावा. कारण रोहनचं टाईम टेबल.. त्यानंतर जवळपास दोन तीन महिने माझी आणि रिकीची भेट नाही नि फोनवर बोलणंही नाही.
अशाच एका धावपळीच्या रविवारी पिंकीचा फोन, 'कविता आहेस 2 अगं, जिमी आलाय अमेरिकवरनं. फक्त दोन महिन्यांसाठी ! तुम्ही दोघं कटचं या बघू लंचसाठी. किती दिवस झाले आपली भेट नाही, बोलणं नाही. जिमी आणि मी वाट बघतोय हं,
'पिंकी, जिमी कसा आहे ?' मी चौकशी करताच पिंकी उत्साहात सांगू लागली, 'अगं केवढा मोठा झालाय तो ! तुला तर ओळखायला सुद्धा येणार नाही.
सकाळी आलेला पेपर ऑस्सा उचलून घरात आणतो माहित्ये ?' अमेरिकेला जाऊन जिमीची तब्येत सुधारणं ठीक होतं. पण पेपर उचलून घरात आणतो यात काय विशेष ? ही बया कशाचंही कौतुक करते. मी बोलून दाखवताच पिंकी हसत म्हणाली, 'अगं मी जिमी बद्दल नाही बोलत. जिमी
कशाला पेपर उचलून घरात आणेल ? मी रोहन बद्दल बोलतेय्' . ते ही खरचं म्हणा. जिमी म्हणजे जगदीश, पिंकीचा नवरा ! जगदीश
नावं फारच जुनाट वाटतं म्हणून पिंकीनेच जगदीशच्या जिमी केला होता. आपणच
विसरलो.
पिंकी आणि जिमीच्या आग्रहामुळे आम्ही उभयतांनी पिंकीकडे लंचसाठी जायचं ठरवलं. खरं तर तिने बारा एक ला या असं सांगितलं होतं. पण त्या रोहन मधून तिची सुटका कधी होणार ? ती स्वयंपाक कधी करणार ? या भावनेतनं मीच विचार केला, जिमीच्या आणि आपल्या नवऱ्याच्या गप्पाही होतील. आपलीही पिंकीला स्वयंपाकात मदत होईल. सासूबाईही लगेच म्हणाल्या, 'जा, तुम्हां दोघांना मिळून कधी बाहेर पडायला होतचं नाही. लौकर जा. आणि लौकर या. मी बघते घरातलं. संध्याकाळी मात्र मला भजनाला जायंचयं त्या आधी या.'
पिंकीला लवकर जाऊन सरप्राईज देऊ या उद्देशाने आम्ही सकाळी म्हणजे नऊ साडेनऊच्या सुमारास पिंकीच्या घरी निघालो.
गेटचा जराही आवाज न करता आत शिरलो. हे बेल दाबणार तोच मी खुणेनंच नको म्हटलं. हे दारावर हलक्या हातानं टकटक करणार, तोच आतून पिंकीचा, नव्हे जगदीशचा आवाज ऐकायला आला.
जिमी म्हणत होता, 'पिंकी, मला पटतं गं सगळं तुझं. पण या परिस्थितीत....
काहीही झालं तरी आईवडील आहेत. थकलेत, आता ते ! इकडं रहायला यायचंच म्हणताहेत, तर मी नाही कसा म्हणू ?'
'का? इथं का म्हणून ? त्यावेळी मला भांडतांना बरे थकत नव्हते ? कायम माझा पाणउतारा, टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हते. आणि आता इथं यायचं म्हणताहेत ? लाज कशी वाटत नाही म्हणते मी ?'
'अगं चुकले असतील ते त्यावेळी. हे घर बांधतांना पैसे कमी पडत होते तेंव्हा आपले पेन्शनचे सगळे पैसे त्यांनी आपल्याला दिले. काहीही न बोलता ! विसरलीस ? आता सगळं आपल्याला देऊन बसल्यावर त्यांनी जावं कुठे ?'
'अरे जिमी, पण इथं जागा तरी आहे का ? एवढं साधं समजू नये त्यांना ? सगळा जन्म गावाकडंच गेलाय ना त्यांचा ? मग रहा म्हणावं तिथेच. जेंव्हा आपल्याला गरज होती, त्यावेळी आले कधी ते ? इथं म्हणे त्यांना करमायचं नाही ! आता बरं करमणार आहे ? आताही त्यांनी तिथंच रहावं. हे बघ जिमी, महिन्याकाठी दोन पाचशे रुपये पाठवू आपण त्यांना. तेवढ्यात मात्र भागवा म्हणावं. पण इथं कुठल्याही परिस्थितीत नाही हं, जिमी डार्लीग ! शिवाय आता मला पहिल्यासारखं कामही होत नाही. त्या दोघांचं सगळं करणारं कोण ? तुझ्या आईला साधा कांदा लसूण चालत नाही, आणि तुझे वडील दमेकऱ्यासारखे रात्रभर खोकत रहाणार. आधीच मी दिवसभर एवढी दमते. तुझ्या वडीलांच्या खोकल्याने रात्रीची झोपही नाही म्हणजे झालच. आणि ते जर इथ आले तर ते रहाणार कुठे ? त्यांना रूमतरी आहे का आपल्याकडे ? तू कळवून टाक बघू त्यांना.... ___ 'अगं, रोहनची रूम आहे ना ! ती मागच्या साईडलाही आहे त्यामुळे तुझी रात्री झोपमोड अजिबात होणार नाही. रोहनसाठी आपण गॅरेज मध्ये काहीतरी व्यवस्था करू. पिंकी तुझ्या कुठल्या गोष्टीला कधी नाही म्हणालोय मी ? अगं, काहीही झालं तरी जन्मदाते आहेत ते, प्लिज पिंकी, माझा थोडा विचार कर...
'नाही जिमी. तुला स्पष्टच सांगते, मी रोहनला गॅरेज मध्ये ठेवू शकत नाही. त्याची रूम त्याच्याकडून काढून घ्यायची ? नो, इट इज जस्ट्र इम्पॉसिबल ! शक्यच नाही ते ! तुला जर तुझ्या म्हाताऱ्याला सांगायला जमत नसेल तर मी सांगते. आला राग तर येऊ दे. तुला जर त्यांचा फारच पुळका आला असेल ना, तर उचल त्यांना आणि टाक एखाद्या वृद्धाश्रमात ! तिथे थोडे जास्त पैसे फेकावे लागतील. पण चालेल ! कारण घर बांधतांना पैसे देऊन त्यांनी उपकारच केलेत ना ! परतफेड तर करावीच लागेल. खरं तर हे ही आपल्याला जड जाईल, पण चालेल..'
नेहमी तापट म्हणून प्रसिद्ध असलेला माझा नवरा, मी त्याला जमदग्नीचा अवतार म्हणत असते. या क्षणी मात्र माझ्या जगदग्नीचे डोळे भरून आले होते. पाणावल्या नजरेने त्याने माझा हात हाती घेतला आणि ... कायनेटिकं परतीच्या रस्त्यावरनं धावत होती. सुन्न मनाने आम्ही मार्ग कापित होतो. डोळ्यातनं आवरता न येणारे थेंब टपटप मूकपणे पडत होते. त्यांना थांबवण्याचं त्राण ना माझ्यात होतं, ना माझ्या नवऱ्यात !

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.