सखी
मी शाळेत असताना आमच्याकडे लिंबाबाई नावाची मोलकरीण घरकामाला होती. काळी, उंच, सडसडीत बांध्याची, वयानं पन्नाशी पार केलेली, दात जरा पुढे असलेले, नऊवारी साडी आणि डोक्यावरून पदर घेणारी, चेहर्यावर कायम सोशिकपणाचे भाव असलेली लिंबाबाई! कॉलनीतल्या जवळपास सगळ्याच घरी ती काम करायची. शेजारच्या झोपडपट्टीत तिचं वास्तव्य, त्यामुळे भल्या पहाटे पाचलाच ती आमच्या घरी यायची. आल्यावर अंगण झाडणं, शेणाचा सडा टाकणं, राखेनं भांडी घासून चकचकित करणं अशी कामं करून ती निघून जायची. आम्ही झोपेतून उठायच्या आत तर आमची सकाळ सजवून ठेवलेली असायची. उठल्यावर तो शेणाच्या सड्याचा गंध नाकात शिरायचा. त्यावर आईनं काढलेली सुबक रांगोळी स्वागताला सज्ज असायचीच.
दुपारी जेव्हा मी शाळेतून घरी यायची, तेव्हा लिंबाबाई आलेली असायची. दुपारची भांडी घासणं, कपडे धुणं ही कामं तिच्यासाठी वाट बघत असायची. माझं जेवण संपायची (माझं ताट घासण्यासाठी) ती कधी कधी वाट बघत आईशी गप्पा मारत बसायची. मला त्या दोघींच्या गप्पांत फारसा रस नसे, पण त्या कानावर पडलेल्या गप्पांमधून एवढंच कळायचं, की लिंबाबाईचा नवरा रोजच दारू पितो. दोन मुली आणि एक मुलगा. साहेबराव या मुलाला छोटंसं टपरीवजा किराणा दुकान काढून द्यायचं तिचं स्वप्न होतं वगैरे वगैरे.
एके दिवशी तिच्या आणि आईच्या गप्पा भलत्याच रंगल्या होत्या. माझं जेवण आटेापून मी सोफ्यावर लोळत होते. तेव्हा ती स्वतःहून मला म्हणाली, 'ताईसाहेब, माझ्या सायबाचं लग्न ठरवलंय. म्या आता सासू व्हनार.’ मी तिच्याकडे हसून बघितलं. जन्मभर कष्टच नशिबी. अंगावर नेहमीच ठिगळ लावलेलं पातळ, दोन घास सुखानं जेवायचं म्हटलं तरी दारूड्या नवर्याच्या शिव्या आणि मारझोडच वाट्याला जास्त. दिवसभर अशी नॉनस्टॉप कामं करत असते ही. हिच्या आयुष्यात सुखाचे क्षण असतील, त्यातला एक तिच्या सायबाचा लग्न ठरल्याचा असावा.
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना निरनिराळ्या असतील, पण त्या सुखाचा चेहर्यावर पसरणारा आनंद मात्र एकच असतो हे मला तिच्याकडे बघून कळलं. ८-१५ दिवसांत तिच्या सायबाचं लग्न आटोपताच एके दिवशी सुट्टीच्या दिवशी ती तिच्या सायबाला आणि सुनेला घेऊन आमच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी आली. आईने मला हाक मारली. लिंबाबाईने तिच्या सुनेची आणि माझी ओळख करून दिली. मी तिच्याकडे बघतच राहिले. साधारणपणे माझ्याच वयाची. दिसायला ठेंगणी, ठुसकी, काळी कुळकुळीत, तेलानं घट्ट बांधलेला अंबाडा आणि तिच्या त्वचेवर चमकणारी हळदीची छाया, तिच्यापेक्षा तिच्या साडीचा घोळच जास्त होता. लहान मुली पहिल्यांदा साडी नेसण्याचा प्रयत्न करतात तशी ती साडी तिनं गुंडाळली होती. डोक्यावर पदर आणि मान खाली. मी तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघितलं, लांबसडक पापण्या. गोल टपोरे बोलके डोळे. माझ्याकडे बघत तिनं हलकेच स्मित केलं. हिच लिंबाबाईची सून - चंद्रकला. माझ्या कळू लागलेल्या वयातली पहिली सखी!
आपल्या सासूच्या कामात चंद्रकला रोज हातभार लावायला यायची. त्यामुळे सासूची कामंही आता भराभरा आटोपत होती. दुपारची सगळी कामं तर लिंबाबाईनं आता चंद्रकलावरच टाकली होती आणि ती मस्तपैकी घरी आराम करत होती. आता माझ्या जेवणाची वाट बघत लिंबाबाईऐवजी चंद्रकला बसून राहू लागली. आईने दिलेली पालेभाजी निवडत एका कोपर्यात बसून ती माझ्याशी गप्पाही मारायला लागली होती.
माझ्या आणि तिच्या वयात तसा फरक फारसा नव्हताच. मी शाळेतून घरी येताच, भूकेची ऑर्डर आईजवळ सोडत होते. माझ्या आवडीनिवडीवरून आईवर चिडतही होते. जेवण होताच माझ्या आवडीची गाणी ऐकत तासदोन तास आरामात लोळत होते. पण ही माझ्याएवढी, माझ्यासारखी चंद्रकला मात्र सकाळपासून कामाला जुंपलेली असायची. तिचं वय होतं का लग्नाचं? तिचं वय तर शिकायचं, खेळायचं होतं. पण परिस्थितीनं तिला जे दिलं ते स्वीकारून ती हसतमुखानं चालत होती. त्या दिवसांत मला समजलं, हा साोशिकपणा, हा समजंसपणा येतो कुठून? लहान वयात पडलेल्या जबाबदार्या, त्यांची ओझी तुम्हाला वाकवतात आणि अकाली प्रौढही करतात.
कधी ती मला म्हणे, ताईसाहेब, काल माझ्या मालकानं मला काठीनं मारलं. मी विचारायची, का? त्यावर ती म्हणायची, अहो, बायकोवर हात उगारायला काय कारण थोडी लागतं? आणि बायकोला मारलं नाही तर आमच्यात बायकुच्या ऐकन्यातला हाय, त्याचा काय रुबाबच नाय असं म्हणत्यात. तिचं हे तत्वज्ञान अजबच होतं. तिच्या हातावरचे, पाठीवरचे माराचे वळ बघून मन कळवळायचं. पण तिची मात्र त्याबद्दल जराही तक्रार नसायची. होतं ते कौतुकच. माझा नवरा मला मारतो याचं कौतुक!
एके दिवशी ती आली आणि मला म्हणाली, 'ताईसाहेब, काल मी आमच्या मालकासंग सिनेमा बघितला.' ती खूप लाजत होती. खुललेली दिसत होती. मी तिला चिडवलं,'काय ग, एवढं लाजायला काय झालं? हातात हात घेऊन संपूर्ण सिनेमा बघितलास की काय?' अंगावर झुरळ पडल्यासारखा चेहरा करत ती म्हणाली, 'या बया, काहीतरीच काय बोलता तुमी तायसायब? एवढ्या लोकांमंदी बसून, हातात हात घ्यायचा? अहो, काल आम्ही जत्रंला गेलतो ना, तिथं तंबुतल्या टाकीमधी आम्ही सिनेमा बघितला. म्या बसले होते, बायकांच्या घोळक्यामंदी आणि आमचे मालक तिकडं पुरुषांमंदी.'
मी माझ्या डोक्यावर हात मारून घेतला. असं वेगळं वेगळं बसून सिनेमा बघितल्यावर ही बया मला लाजत सांगत होती की आम्ही संग सिनेमा बघितला म्हणून. मी तिला म्हटलं, 'अंग त्या जत्रंतल्या टाकीत कशाला, तू आपल्या इथल्या चांगल्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघ की नवर्याबरोबर.' त्यावर ती म्हणाली, 'तायसायब, तुमच्यावानी आमच्यात वागणं चालत नाय. आवो नवर्यासंगट सारखं सिनेमाला जाणं बरं दिसतं काय? लोक काय म्हणत्याल?' माझे विचार तिला न समजणारे होते आणि तिचं तत्वज्ञान मला न कळणारं होतं.
आज या टप्प्यावर मात्र मला जाणवंय, त्या वेळेसचा तिचा एक स्त्री म्हणून तिनं केलेला प्रवास, तिचं स्थान, तिच्या वेदना ज्या तिलाही जाणवत नव्हत्या ना कधी जाणवल्या असतील. कारण ती ज्या प्रकारच्या लोकांमध्ये राहत होती, जे तिचं जग होतं, तिथं हे असंच असतं हे वर्षानुवर्षं मनावर ठसल्यामुळे तिला ते सगळंच मान्य होतं. मनाने एकदा एखादी गोष्ट मान्य केली की मग कसला न्याय आणि कसला अन्याय?
एके दिवशी चंद्रकलाच्या सासूने - लिंबाबाईने आपल्या सुनेला दिवस गेल्याची बातमी आम्हाला दिली. नवव्या महिन्यापर्यंत वाकलेल्या शरीरानं चंद्रकला कामं करतच होती. तिला मुलगा झाला. लिंबाबाईच्या खुशीला पारावार राहिला नाही. त्यानंतर वर्षभरातच दुसरा मुलगा झाला. आणि बघता बघता पोरगेल्या चंद्रकलाची पोक्त चंद्रकला कधी आणि कशी झाली मलाही समजलं नाही. मी तीच होते, पण ती मात्र या सगळ्या काळात पूर्ण बदलून गेली होती. परिस्थितीशी झगडताना ती कधी कमी पडत होती. पण तिचं चालणं तसंच सुरू होतं. संसाराचा गाडा ओढण्याच्या नादात तिचे माझे गपांचे जे क्षण होते ते मात्र हरवले होते. माझी जेवायची वेळ तीच असली तरी तिला आता थांबायला वेळ नसायचा. 'चंद्रकला थांब ना थोडा वेळ' असा आग्रह करताच तिच्या चेहर्यावर वेदना उमटायची. 'नको ना तायसायब. एकदा बसलं तर उठावं वाटत नाय वो. पुना घरी जाऊन पोरांकडे बघावं लागतंय. सासूबी आजकाल कावतीया आणि नवर्याला काही सांगायला जावं तर तोही झोडपतो आणि तीही मारती. नगा थांबवू मला....'
मी तिच्याकडे बघतच राहिले. हीच होती का ती बाहुलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी नवीकोरी साडी नेसून आलेली चंद्रकला. तिच्या डोळ्यातला निरागसपणा कुठेच हरवून गेला होता. नवर्याचं नाव घेताना लाजणारी, त्याचा मार खाल्ला हे अभिमानानं सांगणारी, माझ्याकडून नवं काही ऐकताना आश्चर्यानं डोळे आणखी मोठे करणारी, मी तिचं बोलणं ऐकावं म्हणून आसुसलेली...ती चंद्रकला गेली कुठे? ही चंद्रकला ती नव्हतीच, ही कोणी वेगळी चंद्रकला होती. संसाराचा गाडा ओढण्यासाठी तिनं तिच्या अनेक सुखद क्षणांकडे पाठ फिरवली होती. आता पूर्वीसारखे तिचे डोळे भरून येतानाही दिसत नव्हते.
मजबूत होणं म्हणजे काय, खंबीर होणं म्हणजे काय? असं आतून खूप मारावं लागतं? तिचे माझे मार्ग वेगळे झाले. पण माझी पहिली सखी म्हणून तीच सावळी चंद्रकला माझ्या डोळ्यांसमोर आजही येते.
पुढे कॉलेजचं जग, नव्या मैत्रिणी, अभ्यास, छंद....मी हळूहळू चंद्रकलाला विसरत गेले. चंद्रकलाचं लग्न बालवयात झालं होतं. माझं लग्न मात्र कायद्याचे नियम पाळून, मी सज्ञान झाल्यावर, माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर झालं. लग्नानंतर आम्ही दोघं नोकरीच्या ठिकाणी राहणार होते. त्या वेळी आईनं अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. जावईबापू ऑफिसला गेले की तू घरात एकटी असशील. अशा वेळी समोरचं दार उघडं टाकू नकोस. अनोळखी लोकांना गेटच्या आत घेऊ नकोस. झोपताना गॅसचा रेग्युलेटर आठवणीनं बंद करून झोपत जा. कामवाल्या बायकांशी फार संबंध ठेवू नकोस. कोण कसं असेल ते सांगता येत नाही. वगैरे वगैरे. मी मान डोलावण्याचं काम करत राहिले.
नवीन घर लावताना घराच्या वॉचमनने बरीच मदत केली. कामाला बाई लावायची म्हटल्यावर तो म्हणाला, 'माझी बायको आहे. पण तिला मोठ्या माणसांबरोबर कसं बोलावं कसं वागावं कळत नाही. पण मनानं चांगली आहे. तुम्ही सांभाळून घेतलं तर ती यडी सुधरलं.' मी होकार देताच दुसर्या दिवशी माझ्या या नव्या मैत्रिणीचं आगमन झालं. हिचं नाव सुनिता!
उंचीला खूप कमी असलेली सुनिता तरतरीत होती. तिचा चेहरा खूप हसरा होता. राहणी नीटनेटकी होती. तिला बघून वॉचमन म्हणाला, 'अग ये, अशी खुळयागत काय उभी राहिलीस. नमस्ते कर की बाईसाहेबांना.' तिने हसतच मला 'नमस्ते' म्हटलं. तिच्या गोड आवाजातल्या 'नमस्ते'नं मला जिंकून घेतलं, पण दुसर्याच दिवशी तिनं माझं मैत्रीप्रेमाचं भूत उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. काम करणार्या बायका ज्या मर्यादेने राहतात तशी सुनिता नव्हती. मी सोफ्यावर बसताच, तिनं खाली बसावं अशी माझी अपेक्षा असे. पण ही पठ्ठी दुसर्या सोफ्यावर बसून माझ्याबरोबर गप्पा मारत बसे. संस्कारांमुळे ही बरोबरी मनाला थोडी डाचत होती. अर्थात शिक्षित मन मलाच समजवत असायचं, 'अग, तुमची परिस्थिती जरी वेगळी असली तरी माणूस म्हणून तिच्यात आणि तुझ्यात फरक काय आहे? मग हा भेदभाव कशाला? ती तुझ्याकडे काम करते, त्याचा मोबदला तू दिला देतेस. तो व्यवहार संपला. पण माणूस म्हणून गोष्टी शिल्लक राहतातच की. तिकडे कसं बघणार आहेस? तुझी सांपत्तिक स्थिती तिच्यापेक्षा चांगली म्हणून तू माणुसकी सोडून तिला वागवणार आहेस का?' बुद्धीला हा विचार पटायचा, पण तिचा अजागळपणा बघून मन मात्र नाराजी व्यक्त करायचं.
तेल न लावल्यामुळे पिवळट पडलेले केस, तेही गडबडीत कसेतरी बांधलेले, साडी चांगल्या किमतीची, कोणीतरी दिलेली. पण त्यावर मळाचे थर बसलेले. चेहरा उललेला आणि हातपाय धुळीनं माखल्यासारखे. आणि ही अशी ऐसपैस सोफ्यावर बसलेली बघताच माझा जीव खालीवर व्हायचा. अशा वेळी बाहेरचं ओळखीचं कोणी घरी आलं तर? त्यांना काय वाटेल आणि हिला तरी त्या वेळी उठ कसं सांगायचं? असे प्रश्न मनाला पडत.
एके दिवशी आदल्या दिवशीची शिळी भाजी फ्रीजमधून काढून मी तिला म्हटलं, 'सुनिता, ही भाजी घरी घेऊन जा. चांगली आहे.' त्यावर ती म्हणाली, 'घरी कशाला? मी माझा डबा बरोबर आणला आहे. इथंच खाईन.' भाजीचा डबा हातात घेताच मला म्हणाली, 'किती थंड भाजी आहे. गरम करून द्या. नाहीतर तुम्हाला कशाला त्रास? मीच गरम करून घेते.' मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघत राहिले. तोपर्यंत तिने गॅसवर भाजी गरम करून घेतली देखील. माठातून पाणी घेऊन ती मागच्या अंगणात जेवायलाही निघून गेली. मला तिच्या नवर्याचं बोलणं आठवलं, 'बाई, ती मनानं चांगली आहे. पण मोठ्या लोकांशी कसं वागावं ते तिला कळत नाही.' मग मी विचार करत बसले. समजावून सांगता येईल तिला. तोच बाईसाहेब आत आल्या आणि म्हणाल्या, 'बाईसाहेब, काय मिळमिळीत भाजी केली हो?' मला तिच्या चोंबडेपणाचा जरा रागच आला. पण गप्प बसले.
खरं तर अनेक ठिकाणी मी नोकरांवर डाफरणार्या मालकिणी आणि निमूटपणे ऐकून घेणार्या कामवाल्या अशी दृश्यं बघितली होती, पण प्रत्यक्षात मला मात्र ते अनुकरणात आणता येईना. ४ वाजता तिची घरी जायची वेळ झाली तशी ती म्हणाली, 'बाईसाहेब, मी चालले. तुम्हाला चारचा चहा घ्यायचा की नाही?' मी चहा घेत नसल्याचं सांगताच ती म्हणाली, 'सायबाची बचत करता की काय? पण मला चहाचा चहा लागतोच हं. मी करून घेते. तुम्ही करा आराम.' आणि ती लगेचच फ्रिज उघडून त्यातलं दूध काढून चहा करायला लागली. कपबशीत चहा घेऊन माझ्यासमोर येऊन भुरके मारत चहा पित बसली. चहा पिऊन होताच, कपबशी विसळून ती निघून गेली. उद्या सुनिता आल्यावर तिला जरा समज द्यायला हवी असा मी विचार करून ठेवला. तिच्या मनाला येईल तसं वागू द्यायचं नाही असंही ठरवलं.
दुसर्या दिवशी सुनिता जेव्हा कामावर हजर झाली, तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिले. सुरवंटाचं फूल व्हावं तशी दिसत होती. नीटनेटकी, गालावर पावडर, कमरेला स्वच्छ रुमाल खोचलेला, केस नीट विंचरून बांधलेले, केसांमध्ये गुलाबाचं फूल माळलेलं. मी तिच्याकडे हसत बघितलं, तशी ती म्हणाली, 'नमस्ते बाईसाहेब, कशी दिसते मी? काल माझं चुकलंच बघा. मी स्वच्छ होऊन कामाला यायला हवं होतं ना. पण काय करणार? चार चार दिवस पाणी येत नाही. म्हणून मग अंघोळ नाही आणि कपडे पण धुता येत नाहीत. बरं कपडे धुतले तरी त्या कपड्यांना साबण मिळलंच असं नाही. पण आमचे अभिमान आहेत ना'....मी तिच्याकडे आश्चर्यानं बघत होते. ती तिच्या नवर्याला चंद्रकलाप्रमाणे 'मालक' वगैरे म्हणत नव्हती. ती त्याला चक्क नावानं संबोधत होती. माझ्या चेहर्यावरचा गोंधळ पाहून ती हसत म्हणाली 'अहो, बाईसाहेब, अभिमान म्हणजे माझे मिस्टर.' तिचं जनरल नॉलेज बरंच होतं की. काल अभिमानने मला चांगलं स्वच्छ होऊन कामाला जात जा असं समजावून सांगितलं बघा. सुनिता कामाला लागली. हळूहळू घरातल्या अनेक गोष्टी ती शिकली.
सुनिताला परिस्थितीमुळे गांगरणं वगैरे गोष्टी ठाऊकच नव्हत्या. तिचा जो उद्धटपणा वाटत होता, तो तिच्या स्वभावातला सहजपणा होता. तशी ती जात्याच हुशारही होती. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, 'अग, ती आपली बरोबरी करू पाहातेय. या लोकांनी अशी स्वप्नं बघावीत का?' तिचं बोलणं सुनिता आतून ऐकत असेल, तिला त्या बोलण्याचं वाईट वाटेल हे सगळं माझ्या मैत्रिणींच्या गावीही नसायचं.
सुनिताला मात्र मी कधी अपसेट, नाराज झालेलं बघितलंच नाही. एवढ्याशा सुनिताला तीन मुलं होती. त्यांची नावं तिनं पराग, विपूल आणि प्राजक्ता अशी ठेवली होती. सुनिता अगदी शहरी स्टाईलने त्यांना हाक मारायची. मुलांच्या नावाचा तिला खूपच अभिमान वाटायचा. मला म्हणायची, 'सासूबाई देवाधर्माची नावं सुचवत होत्या, पण मी मात्र माझ्या आवडीची नावं माझ्या मुलांना ठेवली. चांगली आहेत की नाहीत?' (अशा वेळी होकारार्थी उत्तर तिने गृहीतच धरलेलं असायचं.) आजकाल मलाही हाक मारताना बाईसाहेब ऐवजी 'बाईसाब' असं म्हणायला लागली होती. एके दिवशी मला म्हणाली, 'बाईसाब, माझी मुलं मला मम्मी म्हणून हाक मारतात आणि अभिमानला पप्पा! आता मी माझ्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकणार आहे बघा. त्यांना एबीसीडी सगळं आलं पाहिजे बघा.'
इंग्रजी शाळेत तिनं मुलांना टाकू नये म्हणून मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण 'माझी मुलं तुमच्या मुलांसारखी हुशार निघाली पाहिजेत' असं तिचं त्यावर उत्तर असायचं. त्यासाठी इंग्रजी शाळेत मुलांना घातलं तरच ती हुशार होतील असा तिचा समज होता. तो समज दूर करण्यात मला खूपच प्रयत्न करावे लागले.
हळूहळू ती घरात रुळली. माझे नातेवाईक, माझी माहेरची आणि सासरची मंडळी यांना तिचा घरातला मोकळा वावर आणि तिचं सलगी करणारं बोलणं आवडत नसे. ते मला बारीक आवाजात उपदेशही करत. पण अर्थातच मी त्यांची फारशी पर्वा केलीच नाही.
कधी कधी सुनिता नवर्याबद्दल माझ्याजवळ तक्रारही करत असे. 'बाईसाब तुम्ही अभिमानला समजावून सांगा. ते मला फिरायला नेतच नाहीत. सारखं आपलं काम न काम'....दसर्याच्या दिवशी ती आपल्या चिटुकल्या तिन्ही मुलांना घेऊन सोनं द्यायला माझ्याकडे आली. नवे कोरे कपडे अंगावर, हातात कागदी खेळणी, काळीसावळी मुलं, पण तिच्यासारखीच तरतरीत आणि हसतमुख. मुलांना खाऊ देताच ती म्हणाली, 'खाली बसा रे.' त्यांच्या समोर वर्तमानपत्र टाकत तिनं तो खाऊ प्लेटमध्ये समोर ठेवला. एका रांगेत बसून मुलं खाऊ खाऊ लागली. ती म्हणाली, 'बाईसाब, आम्ही गरीब माणसं, मुलांना कपडे घेताना नेहमीच वाढत्या अंगाचे घेतो, पण मला ते आवडत नाही बघा. त्या वाढत्या अंगाच्या कपड्यांमुळे मुलं गबाळी तर दिसतातच, पण जेव्हा कपडे अंगामापाचे होतात, तेव्हा ते फाटायला आलेले असतात बघा. मी नेहमीच पोरांच्या मापाचे कपडे विकत घेते. छान आहेत ना माझी पोरं?' मी 'हो' म्हटलं तशी ती मुलांना म्हणाली, 'मावशीला थँक्यू' म्हणा. मी पुन्हा चकित होऊन तिच्याकडे बघतच राहिले. ती मला 'बाईसाब' म्हणत होती. पण तिच्या मुलांची 'मावशी' तिनं मला केलं होतं. कुठून कुठून काय काय शिकून येते ही बया कोणास ठाऊक! मी तिच्याकडे बघतेय हे लक्षात येताच ती म्हणाली, 'अहो, तुम्ही आमच्या मुलांच्या मावशीच कीनई आणि आँटीपेक्षा मावशी जवळची वाटते ना?' मी नकळत मान डोलावली.
त्या काळात चित्रपटांच्या कथानकांपासून ते नवर्याचं कौतुक, तक्रार, स्वतःची स्वप्नं या सगळ्या विषयांवर सुनिता भरभरून बोलायची. नवनवीन शिकण्यासाठी धडपड करायची. मला तिच्यातली एक गोष्ट आवडली, ती म्हणजे तिच्यात असलेला आत्मविश्वास. ती स्वतःला कुठेही कमी समजत नव्हती. किंवा आपण करत असलेल्या कामाबद्दल तिच्या मनात न्यूनगंड नव्हता. इतरांच्या नजरेत तिला तिची पायरी ओळखता येत नाही असा भाव असला तरी मला मात्र तसं वाटलं नाही. मोठी स्वप्नं बघणं आणि त्यासाठी धडपड करणं यात तिचं कुठेच चुकत नव्हतं.
मला ती म्हणायची, 'बाईसाब, दुपारची झोप घेत जाऊ नका बरं. लठ्ठ व्हाल आणि लठ्ठ होणं म्हणजे रोगाला आमंत्रण बरं का.'
पगारातले निम्मे पैसे ती बचत करी. माझ्याबरोबर खरेदीला गेल्यावर तिला काही आवडलं तर ती स्वतः ती खरेदी करे. त्या वेळी आपण गरीब, आपण गाडीवरचा सस्तेका माल खरेदी केला पाहिजे असा विचार तिच्या डोक्यातही येत नसे. गरीब असलो तर आपण चांगली वस्तू घेऊच नये का, आपण कष्ट करतो, त्या कष्टामधून मिळालेल्या पैशांमधून हवं ते घेण्याचा आपला अधिकार आहे असं तिला वाटायचं. राहिला प्रश्न बरोबरी करण्याचा. तर चांगल्या गोष्टींसाठी कोणाबरोबरही ती बरोबरी केली तर बिघडलं कुठे असं ती म्हणे. अशिक्षित असली तरी सुशिक्षित तरुणींपेक्षा जास्त जिद्द आणि स्वप्नं बघण्याची, ती खरी करण्यासाठीची धडपड करण्याची ताकद तिच्यात होती.
पुढे आमची तिथून बदली झाली आणि माझी ही मैत्रीण माझ्यापासून थोडी दूर गेली. आठवणींच्या राज्यात मात्र आजही तिचा हसताखेळता वावर अद्यापही तसाच आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आयुष्यही पुढे पुढे सरकत असताना ‘ती’ चोरपावलांनी घरात आली. तिचं नाव अफजुली!
नव्या घरात सामान लावताना माझी उडालेली तारांबळ आणि त्यातच पाठदुखी, सांधेदुखी आणि डोकेदुखी. यांनी आवराआवरीपेक्षा घरभर पसाराच पसारा झालेला. ती आली. गोरीपान, कुरळ्या केसांची, टपोर्या डोळ्यांची, जास्वंदी ओठांची, सडसडीत बांध्याची. अफजुली! दोन्ही हातात काचेच्या, लाखेच्या हातभरून बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र. जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातली हिरॉईन दिसावी तशी! मला बघताच तिनं सुरू केलं, 'आपको कामवाली बाई चाहिये? कॉलनीमे मै चार लोगोंके यहाँ काम करती हूँ.' मी तिच्याकडे बघत होते, ही मुस्लिम दिसतेय. अर्थात माझ्या मनात जातिधर्माविषयी कुठलाही आकस आणि भेद नसल्यामुळे तो प्रश्न येतच नव्हता. पण मी तिचं निरीक्षण करतेय ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती. ती मिश्कीलपणे हसत म्हणाली, 'ताई कित्ता सोचते तुम. महिनाभर रखके देखलो. नही तो दुसरी बाई देखलो.' माझा प्रश्न तिनंच चुटकीसरशी सोडवला होता.
माझी संमती मिळताच तिनं ताबडतोब घराचा ताबा घेतला. गरीब लोक अस्वच्छ असतात हा माझा गैरसमज तिनं दूर केला होता. आपण हिन्दी चित्रपटांत एखादी हिरॉईन हिरोच्या घरात येते आणि त्याचं पसार्यानं भरलेलं घर काहीच सेकंदात लखलखीत करून सोडते असं दृश्य जे बघतो. ते समोर घडताना मी बघत होते. अफजुलीनं काहीच मिनिटांत माझा पसारा भराभर आवरला होता. ती एक सुपरवूमन होती हे मात्र नक्की.
मी कधी गप्प, शांत दिसले की ती म्हणायची, 'ताई क्या बात है? ऐसे मुहँ लटकाके कभी नही बैठनेका. तुम्हारे मर्हाठी लोगोंमे बोलते है ना, मुहँ लटकानेसे घरमे लक्ष्मी नही आती.' मी हसत तिला म्हणायची, 'मराठी लोकांबद्दल तुला बरीच माहिती दिसते ग.' त्यावर ती म्हणायची, 'ताई बचपनसे तुम्हारे लोगोंके साथही रही हूँ. तो सब बाते अपने आपही सिखी जाती है ना.'
इतर कामवाल्यांना किती महिना द्यायचा, ती घासाघीस ...ठरलेल्या कामांपेक्षा एकही जादा काम करणारी नाही...महिन्यातले खाडे पकडायचे नाहीत...असे कोणतेही नियम आणि वाटाघाटी अफजुली आणि माझ्यात झाल्या नाहीत. अफजुली खूपच हसतमुख आणि उत्साही होती. थुई थुई कारंजं उडावं तसा तिचा सहवास वाटायचा. कामाला ८ दिवस झाले असतील आणि माझ्याही नकळत मी तिच्याशी खूप जवळच्या, आपुलकीच्या नात्यानं बांधली गेले.
एके दिवशी जोराचा पाऊस सुरू होता. ती भिजतच घरात आली. म्हणाली, 'ताई, मिट्टीकी खोली है हमारी. पुरा पानी घरमे आया है. बच्चोंको थोडी देर आपके घर मे जगह देंगे? बोलून ती घाईघाईत निघूनही गेली. अर्धवट भिजलेल्या अवस्थेत तिची मुलं आली. मी बघत राहिले...एक..दोन...तीन...चार...पाच....बापरे. खरोखरंच चढत्या भाजणीतली फलटणच माझ्यासमोर उभी होती. मोठा नासीर १५ वर्ष, नंतर आसिफ १२ वर्षं, इम्रान १० वर्षं आणि जुलेखा ८ वर्षं त्यानंतरचा फिरोज ५ वर्षं!
सगळी मुलं मला दबकून संकोचून कोपर्यात उभी होती. मी त्यांना टीव्ही लावून दिला. सगळ्यांची विचारपूस केली. मला वाटलं या लोकांची पोरं, लहानपणापासून गाडीवर काहीतरी विक, हॉटेलमध्ये वेटरचं काम कर, गाड्यांची दुरुस्ती कर अशी काही सटरफटर कामं करत मोठी होतात. पण या मुलांशी बोलताना मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण मोठा नासीर १० वीची परीक्षा देत होता. आणि कुठल्याशा गॅरेजमध्ये कामालाही होता. त्या खालोखाल सगळीच फौज मराठी शाळेमध्ये आनंदात जात होती. आईप्रमाणेच मुलं खूपच देखणी होती. अंगावरचे कपडे काहीसे ढगळ होते. पण तरीही त्यांचा स्मार्टनेस झाकला जात नव्हता. ८ वर्षांची जुलेखा तर एखाद्या राजकन्येसारखीच मला भासली.
दीडेएक तासांनी अफजुली आली. तेव्हा पाऊस थांबला होता. मुलांना सूचना देऊन तिनं त्यांची पाठवणी केली. आणि माझ्याकडे मोर्चा वळवला, 'ताई अभी सब सामान निकालके आयी हूँ. कल दो घंटे मे अच्छी खोली बांधके, अच्छे पत्रे लगाके ठीक करती हूँ. इसलीये कल इम्रान आणि जुलेखा आपके काम के लिये आयेंगे. मै, आसिफ और मेरा नासीर खोली का काम करेंगे.'
ही तिघं खोली बांधणार? आणि यांचा बाप काय करणार? तो नाही का मदत करणार? मी तिला विचारताच ती म्हणाली, 'ताई तुम कल आके देखना मेरे बेटे कैसे काम करते है. बहोत एक्सपर्ट है मेरा बेटा नासीर. रहा सवाल उनके बाप का. मैने चार साल पहिले उसको छोड दिया.' ती निघून गेली.
मी विचार करत राहिले. इतकं सहजपणे कसं सांगू शकते ही? पाच पाच पोरं घेऊन एकटी संसाराचा गाडा कसा ओढत असेल आणि वर त्यांचं शिक्षण? कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घेऊ नये हे खरं असलं तरी....स्त्री गरीब असो की श्रीमंत, तिच्या वाट्याला येणारी दुःखं मात्र सारखीच असतात. हिच्याऐवजी कुठल्याही सधन घरातल्या स्त्रीने देखील पाच मुलं पदरात असताना असा निर्णय घेतला नसता. तसंच ही इतकी सुंदर, एकटी राहत असताना किती संकटांशी सामना करावा लागत असेल?
दुसर्या दिवशी सकाळीच इम्रान आणि जुलेखा कामावर आले. दोघंही हसतमुखानं दारात उभी होती. मी जुलेखाकडे बघताच तिनं मागे लपवलेला तिचा हात पुढे केला आणि त्या हातातलं लालचुटूक गुलाबाचं फूल माझ्या हातात ठेवलं. ती म्हणाली, 'ताई तुम्हारे लिये.' मी तिच्याकडे बघत राहिले. ते गुलाबाचं दवबिंदूनी डवरलेलं फूल आणि ती सारखेच दिसत होते. तिचं निरागस हसणं आणि हातातलं फूल यातल्या कोणाला अप्रतिम म्हणावं ते कळेचना. मी भानावर येत म्हटलं, 'अग हे फूल आणलं कुठून?चोरून तर आणलं नाहीस ना?' त्यावर ती हसत म्हणाली, 'ताई, चुराकेच लायी. वहाँ इत्ते सारे गुलाब के फूल है. माँग के लाती तो वो माली क्या देता? बस, गाली सुननेको मिलती. इसलीये मै चुराकेच लायी. इम्रान बोला, ताई को अच्छा लगेगा. ताई तुमको अच्छा लगा ना? मै जबभी आऊंगी आपके लिए एक गुलाब का फूल लेके आऊँगी.'
चोरी करणं वाईट असतं, पुन्हा असं करू नकोस असं मी तिला सांगूच शकले नाही. कारण माझ्या सांगण्याचा त्या खट्याळ मुलीवर काहीही परिणाम झाला नसता हे मला दिसत होतं. गंमत म्हणजे मी जोपर्यंत तिथे होते, तोपर्यंत तिच्या माझ्या प्रत्येक भेटीत तिनं आपला शब्द पाळला आणि मला एक टपोरं गुलाबाचं फूल देतच राहिली.
इम्रान आणि जुलेखा वयानं दोघंही अगदीच लहान, खेळण्याच्या वयात ती जेव्हा कामाला यायची, तेव्हा जीव कळवळायचा. मी कामाला नकार देताच ती म्हणाली, 'ताई, हम कुछ तोडेंगे नही. आपका कुछ भी नुकसान करेंगे नही. तुम खाली हमारा काम तो देखो. हम काम नही करेंगे तो अम्मी को डबल काम करना पडेगा. ताई, ना मत बोलो.'
एवढं बोलून इम्रान आणि जुलेखा सरळ कामाला लागली. दोघांनी मिळून पटापट भांडी घासली, विसळली आणि लावूनही टाकली. इम्राननं झाडून काढलं, तर जुलेखानं फरशी पुसली. काम करताना दोघांच्याही अंगात कुठेच पोक्तपणा औषधालाही दिसला नाही. अतिशय अवखळपणे, एकमेकांच्या खोड्या काढत, हसतखेळत त्यांनी आपली कामं आटोपली. आपलं काम म्हणजे एकप्रकारचा खेळच आहे असंच त्यांनी गृहीत धरलं असावं.
अफजुली जेव्हा कामावर आली, तेव्हा माझ्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले होते. तिची कामं झाली की मी तिला समोर बसवलं आणि विचारलं, 'इतक्या लहान मुलांना कामाला का लावतेस?' त्यावर तिचं उत्तर, 'ताई, मै गरीब हूँ. पाच बच्चोका पेट पालना है. अभीसे सर पे चढा के बिठाऊंगी तो काम कब सिखेंगे. खाली स्कूल जानेसे, चार किताबे पढनेसे कुछ नही होता. ये कामही जिन्दगीमे बहोत कुछ सिखाता है. और मेरे बच्चे ये काम राजीखुशीसे करते है. वो सब लाडप्यार आप लोगोंमे बच्चोंके प्रती होता है. फिर बडे होने के बाद आपके बच्चोंको तो काम की आदत भी होती नही और वो करना भी नही चाहते. दोष उनका नही आप लोगोंका है. जो आप बचपनसे उनको किताबी दुनियासे कभी ये दुनिया भी दिखातेही नही.' तिचं अनोखं तत्वज्ञान मी ऐकत होते, ती म्हणत होती, 'माझी मुलं, ओझं, जबरदस्ती म्हणून कामाकडे बघत नाहीत. आपल्या आईचे कष्ट, तिची परिस्थिती त्यांना कळते. आईचं काम हलकं कसं होईल याकडे त्यांचं लक्ष असतं.' माझा लगेच पुढला प्रश्न, 'पाच मुलं असताना, त्यांची जबाबदारी असताना तू नवर्याला सोडलंस. निदान तुझे आई-वडील तरी तुझ्याजवळ आहेत का? सगळे एकाच खोलीत कसे काय राहता? आणि खर्च कसा भागवतेस?'
ती हसतच म्हणाली, 'ताई, अब सब ठीक है. जब मैने मेरे आदमी को छोडा तब मेरा फिरोज बहोतही छोटा था और नासीर दस साल का था.’ नवर्याला का सोडलं विचारताच ती म्हणाली, 'दुसरी औरत को घर लेके आया, तो क्या करती? उन दोनोकी सेवा करके मेरे बच्चोको भी उसके जैसा बनाती?' मी थक्कच झाले आणि म्हणाले, 'अग, पण तुमच्यामध्ये चार लग्नांची परवानगी आहे ना?' तशी ती म्हणाली, 'मला त्याचं वागणं पसंद पडलं नाही. जो माझ्याशी विश्वासाचं नातं ठेवू शकत नाही, त्याच्याबरोबर मी का राहावं? आणि त्याचा अन्याय मी का म्हणून सहन करावा? माझे हातपाय धड आहेत. माझी सोन्यासारखी मुलं आहेत. नवर्याच्या घरातून नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडले, तेव्हा पडेल ती कामं केली. लग्नानंतर आई, वडील, बहीण, भाऊ कुठलीही नाती कामाला येत नाहीत. आणि मी त्यांची अपेक्षाही केली नाही. कळायला लागेपर्यंत आईबापांनी पोसलं हेच खूप झालं. त्यांच्यामुळेच हे जग दिसलं, जग कळलं. बास. पुढला प्रवास आपण आपलाच करायचा असतो. मुलं लहान होती. माझी तारांबळ बघत बघत मोठी झाली. आणि लवकर शहाणपणही त्यांना आलं. माझ्या नासीरनं दारू पिऊन आईला मारणारा बाप खूप लहान वयात बघितलाय. त्यामुळे तो कधीच दारूला स्पर्श करणार नाही. ही समज त्याला वयाच्या दहाव्या वर्षीच आली. ताई, परिस्थितीच आपला सगळ्यात मोठा गुरू असतो ना. जीवनाचं सगळं तत्वज्ञान परिस्थिती उलगडून सांगते. काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.’
ती बोलतच होती, 'ताई, तुम्हाला सांगते वेगवेगळ्या जातिधर्माच्या लोकांच्या घरी कामं केली. चांगल्या वाईट सगळ्या लोकांना बघितलं. दिवस वाईट होते. पण निघून गेले. आता माझा नासीर दोनचार वर्षांत मोठा होतोय आणि माझ्या हाताशी पण येईल. मुलं चांगली शाळा शिकताहेत, छोटीमोठी कामंही करताहेत. कोणत्याही कामाची लाज माझ्या मुलांना वाटत नाही. आमचं आणि तुमचं मुलांकडे बघण्याची नजर खूप वेगळी आहे. तुम्ही मुलांचे फालतू लाड करता आणि आम्हाला ते करण्याची संधी आणि सवडच नाही. आमच्या मुलांचं काम हेच त्यांचं खरं शिक्षण.’
मी तिच्याकडे बघत होते, खरंच ती सुपर वुमन होती. आज शिकलेल्या, सवरलेल्या मुलींमध्ये/स्त्रियांमध्ये निर्णयक्षमता अभावानंच आढळते. अशा वेळी ती अशिक्षित तरूणी पाच मुलांसह खंबीरपणे स्वाभीमानाने वाटचाल करत होती. मी तिला विचारलं, 'अफजुली कधी निराश झाली नाहीस का ग? तरुण आहेस, सुंदर आहेस. कधी दुसर्या लग्नाचा, जोडीदाराचा विचार मनात आला नाही?'
ती म्हणाली, 'ताई, निराश होऊन खचून काय होणार होतं? तिथेच थांबले असते, तरी काळ माझ्यासाठी थोडीच थांबणार होता? त्याच्याबरोबर जो धावतो तोच शहाणा आणि मग त्या वेगानं धावायचं तर ही निराशा कशाला? हसत का नाही? मी हसते, आनंदी राहते. त्यामुळे माझ्या कुठल्याच कामाचा ताण मला वाटत नाही. माझ्याकडे बघून माझी मुलंही तशीच हसत खेळत राहतात. ताई, एकटेपण तुम्हाला खूप काही शिकवतं. या एकटेपणाच्या प्रवासात मला चांगल्या वाईट माणसांची पारख कशी करायची ते शिकवलं. आता प्रवास कठीण वाटत नाही. राहिला प्रश्न लग्नाचा. ते मी आता करणार नाही. दोन वर्षानंतर माझ्या नवर्याला ती बाई आवडेनाशी झाली. तिच्याशी सारखी भांडणं व्हायला लागली. मग चूक कळून आला माझ्याकडे परत. पण मी आणि मुलांनी त्याला परतवून लावलं. पुन्हा परावलंबी जीवन जगण्याची आमची तयारी नाही. मी आणि माझी मुलं त्यांना त्यांचे पंख फुटेपर्यंत असेच सोबत राहणार. मी सुंदर आहे हे मला ठाऊक आहे. पण आता मी माझ्या पाच मुलांची आई म्हणून मला जास्त सुंदर आहे असं वाटतं. ताई, संध्याकाळी मी जेव्हा माझी कामं आटोपून घरी जाते, तेव्हा माझी पाचही मुलं माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात. आम्ही सगळे मिळून मग स्वयंपाक करतो आणि जेवायला बसतो. जिथे मी काम करते, तिथल्या अनेक घरांत मी घरातल्या माणसांची एकत्र तोंडं कधी बघितली नाहीत, मग एकत्र जेवण तर दूरच. कोणी कोणाची वाट बघत नाही, कोणी कोणासाठी जेवायचं थांबत नाही. कोणी आग्रहही करत नाही. माझ्या चुलीवरची गरम भाकरी करताना त्या प्रकाशात माझ्या पाचही पिल्लांचे उजळलेले चेहरे मला किती सुख देतात हे कदाचित कोणालाच कळणार नाही. पण सुख म्हणजे काय हे मला नीट कळलंय. ताई, हेच सुख!’
सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट मी वाचली होती. पण आज प्रत्यक्षात सुखासमाधानाने राहणारी, प्रचंड आत्मविश्वासाने वावरणारी अफजुली मी पाहत होते. अनुभवत होते. खरोखरंच मला तिचा खूप अभिमान वाटला. मनोमन मी तिच्यापुढे नतमस्तक झाले.
मग आमचं वास्तव्य तिथूनही संपलं आणि एके दिवशी अफजुली आणि तिच्या पाचही पिल्लांचा निरोप घेत मी पुढल्या गावाकडे वळले. तिथं वाट बघायला उभी होती ‘आशा’.
सावळी, तरतरीत, उंच, कपाळावर मोठं कुंकू. डोक्याला तेल लावून मानेवर घट्ट बांधलेला अंबाडा, काठापदराची सुती साडी. लांब बाहीचं ब्लाऊज, डोक्यावरून पदर, नजर पायाकडे झुकलेली. चेहर्यावर गंभीर उदास भाव, वयानं अगदीच तरूण अशी आशा.
माझ्या आजपर्यंत भेटलेल्या इतर सख्यांपेक्षा ही वेगळी होती. तिचं हे गंभीर रूप मला फारसं आवडलं नाही. त्यामुळे कामावर ठेवण्यासाठी मी नकार देताच ती खाली मान घालून निघून गेली. ती जाताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला, 'अग, तू तिला कामावर ठेवणार नाहीस? असं करू नकोस. तिची परिस्थिती खूप वाईट आहे. नवर्याने तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. चार-पाच वर्षांच्या मुलीला घेऊन रात्रीतून हाकलून दिलंय. बघ विचार कर. गरजूला मदत केली तर समाधान मिळेल. दुसरं काही नाही.'
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता गेटमध्ये आपल्या लहानशा मुलीसह आशा गंभीरपणे उभी दिसली. मी तिला आत बोलावलं. तिच्याकडे नीट बघितलं, तेव्हा मैत्रिणीच्या बोलण्यातली सत्यता उमगली. तिच्या गळ्यावर, चेहर्यावर, माराच्या ओळख देणार्या खुणा होत्या. कदाचित जे सोसलंय ते सगळं तिच्या डोळ्यातून, तिच्या गंभीर असण्यातून डोकावत असावं.
सकाळी सहा साडेसहा वाजता आशा रोज कामावर येऊ लागली. माझ्या घराभोवती बरीच मोकळी जागा होती. तिच्या मदतीने मी तिथे फुलबाग फुलवायचं ठरवलं. ती माझ्याहीपेक्षा या बाबतीत दोन पावलं पुढे होती. फुलझाडांसोबत तिने आंबा, पेरू, आवळा, पपई, लिंबू अशी फळझाडं आणि त्यासोबतच भेंडी, मेथी, मिरची, टोमॅटो, अशी भाजीही लावली. तिचं ते कौशल्यपूर्ण बागकाम पाहून मी प्रश्न करताच ती म्हणाली, 'बाईसाहेब, माझ्या माहेरी शेती होती. शेतात काम केल्यामुळे मला सगळी माहिती आहे.' आशा खूपच कमी बोलायची. पण तिचे डोळे सतत बोलत राहायचे. तिचं हसणं, तिच्या वेदना सगळं काही तिच्या डोळ्यांमधून प्रकट व्हायचं.
हळूहळू मला तिच्याकडून समजलं, की तिचा नवरा तिच्यापेक्षा वयानं बराच मोठा होता. त्याची पहिली बायको वारली म्हणून हिचं लग्न त्याच्याशी ठरवण्यात आलं. ही त्या वेळी शाळेत शिकत होती. शिकायचं होतं, पण घरच्यांपुढे काहीच चाललं नाही. वडिलांच्या वयाचा, न शोभणारा असा माणूस आणि त्याच्याबरोबर आयुष्य काढणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. पण आशाने लग्न होताच परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण नव्याचे नऊ दिवस संपताच नवर्याने दारू पिऊन मारहाण करायला सुरुवात केली. 'माहेरून पैसे आण'चा तगादा तो तिच्यामागे लावू लागला. नवर्याने मारलं तरी त्यात इतरांनी पडायचं नसतं असं म्हणत सासरची माणसं दुर्लक्ष करत राहिली. माहेरच्या माणसांनी तर 'आता जग की मर, मात्र तेच तुझं घर' असं सांगूनच पाठवलं होतं. नवर्याचा मार खात कामाचा गाडा ओढत आशा दिवस काढत होती. बघता बघता दिवस गेले आणि मुलगी झाली. आता आपले दिवस बदलतील ही आशा तिला वाटत होती. पण मुलगी झाली म्हणून तिच्या छळात आणखीनच भर पडली. चिमुकल्या बाळाला ठार मारण्याचे प्रयत्न घरात होऊ लागले. आशा बाळाला जिवापाड सांभाळायचा प्रयत्न करू लागली. प्रतिकार करू लागली. पण एके दिवशी अर्ध्या रात्री आशाच्या नवर्याने तिला आणि पोरीला घराबाहेर काढलं. सासर आणि माहेर दोन्ही दरवाजे बंद झाले होते. पदरात पोर असल्यानं आशानं आपलं दुःख आवरत कामं करून मुलीला वाढवायचं ठरवलं.
आशाची काम करण्याची ताकद अफाट होती. ती अजिबात थकत नसे. घरी जायची तिला मुळीच गडबड नसे. माझं घर सोडून ती कुठेही काम करत नव्हती. तिचा कामाचा उरक आणि तिची स्वच्छता बघून अजून चारपाच घरांची काम कर असा मी तिला सल्ला दिला. त्यावर ती म्हणाली, 'बाईसाहेब, तुमच्या घरून मिळणार्या पैशात माझं आणि पोरीचं भागतंय. मग जास्त हाव कशाला? बसं झालं.' भविष्यात पैसा लागेल असं सांगताच ती म्हणाली, 'भूतकाळ बदलवू शकत नाही, तसा भविष्यकाळ आपण ठरवू शकत नाही. मग जगायचा तो फक्त आजचा दिवस. आणि मी तो आनंदाने जगते आहे.'
दिवस जात होते. माझ्या घराभोवती स्वर्ग अवतरला होता. स्वर्गातलं उद्यान म्हणावं तशी दृष्ट लागण्यासारखी माझी बाग सजली होती. घरात आता घरातल्याच भाज्या शिजत होत्या आणि याचं सगळं श्रेय फक्त आशालाच होतं. आशा सगळ्याच कामात तरबेज होती. सकाळी आली की गरमागरम पातळ भाकरी करून त्यावर मिरचीचा ठेचा वाटून मला खायला भाग पाडायची. घरातली अडगळीला पडलेली तांब्यापितळेची भांडी तिनं लखलखीत करून टाकली होती. हात फिरेल तिथे लक्ष्मी ही उक्ती तिने कृतीतून दाखवली होती.
दर आठ-पंधरा दिवसाला ती कोर्टात जाई. त्या वेळी तिच्या मुलीला ती माझ्याकडे सोडून जाई. पोटगी तिला नको होती, पण कायद्याने घटस्फोटही लवकर मिळत नव्हता. चकरा मारून ती थकून जायची. या सगळ्यामुळे ती गंभीर असणं स्वाभाविकच होतं.
एके दिवशी तिच्यापेक्षा लहान असणार्या १८-१९ वर्षांच्या मुलाला ती घरी घेऊन आली आणि म्हणाली, 'बाईसाहेब, हा माझा धाकटा दीर. माझ्या प्रत्येक चांगल्यावाईट प्रसंगी हा माझ्या पाठीशी उभा राहायचा. याला कंपनीत नोकरी आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टीच्या दिवशी हा आपलं बागकाम करायला इकडे येत जाईल. चालेल ना?'
मी आनंदाने होकार दिला. तिचा दीर येऊ लागला, तशी माझी बाग जास्तच टवटवीत झाली. हितगुज केल्याप्रमाणे तो प्रत्येक झाडाची निगा राखू लागला. एके दिवशी एक अनोळखी उग्र चेहर्याचा माणूस मला गेटजवळ दिसला. त्याला बघताच आशा झटकन तिथून निघून गेली. तो गेल्यावर त्याच्याबद्दल विचारताच तो आपल्या आत्याचा नवरा असल्याचं तिने सांगितलं. काही दिवसांनी एखादा गुंड दिसावा असा एक माणूस गेटजवळ घोटाळताना मला दिसला. आशाजवळ चौकशी करताच, तो एक ट्रकड्रायव्हर असून त्याची बायको बाळंतपणात वारली असून तो मला त्याच्याशी लग्न करतेस का विचारतोय असं ती म्हणाली.
आशा वयानं खूपच तरूण होती. तिच्याही काही इच्छा असतील, स्वप्नं असतील. पण घटस्फोट मिळाल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नकोस असं मी तिला बजावून सांगितलं. तिनेही होकारार्थी मान डोलावली.
मध्ये दोन-चार दिवस आशा कामावरच आली नाही. आजारी असेल अशा समजुतीत मी माझी कामं आटोपून घेतली. सकाळी आठ-नऊची वेळ असेल, आशा धावतच घरात शिरली. चुरगळलेली साडी, विस्कटलेले केस, चेहर्यावर काळेनिळे वळ, मला काहीच समजेना. ती म्हणाली, 'बाईसाहेब टमटममधून खाली पडले आणि ही गर्दी जमली. बघा ना किती लागलंय. म्हणूनच चार दिवस कामाला येऊ शकले नाही.' मी तिला चहा पाजून घरी पाठवलं. अजून दोन-चार दिवस आराम करायला सांगितला.
ती गेली आणि तिचा दीर हजर झाला. येताच त्यानं 'आशा कुठेय' असा प्रश्न केला. मी त्याला तिच्या अपघाताबद्दल सांगितलं आणि तिच्या औषधपाण्याकडे लक्ष द्यायलाही सांगितलं. तो तसाच उभा राहिला. पैशांची चणचण असावी या विचाराने मी आत वळले. कपाटातून थोडे पैसे काढून त्याच्या हातात ठेवले आणि काळजी करू नकोस. हे तिच्या हिशोबात मी लावणार नाही. पण तिच्यावर उपचार कर. असं सांगितलं. माझं त्याच्या कानावर कितपत पडलं होतं कुणास ठाऊक. पण त्याच्या डोळ्यात तरळत असलेलं पाणी मला दिसलं. मी केलेली विचारपूस आणि काळजी त्याला हळवं करून गेली असावी.
तो तसाच उभा बघून मी त्याला खोदून खोदून कारण विचारताच तो म्हणाला, 'बाई, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या. तुमच्यापासून काय लपवू? काहीच कळत नाही हो काय करावं? बाई, आमच्यात लहानपणीच लग्न होतात. माझंही लग्न खूप लवकर झालं. मी या आशाचा दीर वगैरे कोणी नाही. मी आशाच्या शेजारी राहायचो. तिचा होणारा छळ बघून खूप वाईट वाटायचं. नकळत तिच्याकडे ओढला गेलो. तिच्या नवर्याने तिला अर्ध्या रात्री घराबाहेर काढलं, तेव्हा मीच तिला साथ दिली. माझी बायको अडाणी आहे. तिच्यापासून मी काहीही लपवलं नाही. तिला हे सगळं मनापासून पसंद नाही. पण तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती मला सोडणार नाही. आणि तिला आई-बापही नाहीत. तिला मी सोडलं तर ती जाईल कुठे? आशाचं नातं तिनं मान्य केलंय. मी आशासाठी बायकोची, समाजाची, कुणाचीही पर्वा केली नाही. पण ही? हिला काय पाहिजे तेच मला कळत नाही. भाड्याची खोली सध्या तिला घेऊन दिलीय. कंपनीतून जास्त पैसे उचलून स्वतःची खोली बांधून देण्याचं कबूलही केलंय. तिला मी काही कमी पडू देणार नाही आणि अडीअडचणीला तुमचा आधारही आहे. मला सांगा एवढं सगळं असताना तिनं नीट नको का राहायला? बाई, ती माझ्याशी प्रामाणिक नाही हे मला कळलं आणि मला फार त्रास झाला हो. परवा तर रंगेहाथ पकडलं आणि मग मारून काढलं. चुकलं असेल माझं. पण तिने असं वागावं का?'
पैसे टेबलवर तसेच ठेवून तो भरल्या डोळ्यांनी निघून गेला. मी तर सुन्न झाले. माझ्या आजपर्यंतच्या सगळ्याच सख्या वेगळ्या होत्या. पण ही? ही आपल्याशी खोटं का बोलली? हिला मी ओळखलंच नाही? का हाच तिचा दीर खोटं बोलून तिला बदनाम करत असेल? साधी सरळ आशा वासनेने अंध झाली असेल का? का याचीच वाईट नजर तिच्यावर पडली असेल आणि ही दाद देत नसेल म्हणून त्यानं हे हत्यार उपसलं असेल?
मी विचार करत असतानाच गेटची कडी जोरजोरात वाजवण्याचा आवाज आला. शांत अशा कॉलनीत सगळ्यांना त्रास होईल या जाणिवेने मी गेटजवळ गेले. तर गेटजवळ एक १८-२० वर्षांची भडक कपड्यांमधली नखरेल दिसणारी एक तरूण मुलगी समोर उभी होती. माझ्याकडे या मुलीचं काय काम म्हणून मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघताच, ती म्हणाली, 'ओ बाई, ती आशा तुमच्याकडे काम करती ना? बोलवा भाईर तिला. तिच्यासंगट हिशोब करायचाय मला.’ आशा आली नसल्याचं मी सांगताच मी खोटंच बोलतेय असं तिला वाटलं आणि तिनं आशाच्या नावानं जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. मला ती एकीकडे सांगत होती, 'बाई, या आशाला दुसरे कमी पडले की काय, म्हणून माझा नवरा पण लागतोय? आज मी हिला सोडणार नाही. तुम्ही तिला भाईर बोलवाच. आता तमाशा करते मी अन् दाखवते तिला.'
मनातून मी घाबरून गेले. पण आवाज चढवून आशा सध्या इथे येत नसल्याचं सांगून पोलिसांची धमकी देताच, ती निघून गेली. आता ही मुलगी कोण होती कुणास ठाऊक!
दुसर्या दिवशी सकाळी आशा कामावर आली. सरळ, साधी, डोक्यावरचा पदर न ढळू देणारी आशा मी बघितली होती. आशाचं हे रूप माझ्यासाठी वेगळं होतं. काय सत्य होतं आणि काय असत्य काही कळतच नव्हतं. मी आशाला कालच्या दिवसात घडलेल्या तिच्या दीराच्या, त्या मुलीच्या येण्याच्या सगळ्या घटना सांगितल्या आणि काय ते खरं बोल असं शांतपणे सांगितलं. मी तिच्याबरोबर आहे असा विश्वासही मी तिला दिला.
माझं बोलणं होताच, तिच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलले. तिच्या डोक्यावरचा पदर खाली येऊन पडला होता, पण पुन्हा डोक्यावर घेण्याची तसदी तिने घेतली नाही. ती म्हणाली, 'बाईसाहेब, आज मी सगळ्यांच्याच नजरेतून वाईट झालेय. पण जे आहे तेच खरं आहे. दोन वेळचं जेवण आणि अंगावरचा कपडा एवढीच माझी गरज नाही. तुम्हाला तो बोलला ते सगळं खरंय. तो माझा दीर नाही. माझ्या शेजारी राहणारा. माझे त्याच्याबरोबर संबंधही आहेत. त्याने मला मदतही केली. पण त्याला एक बायको आहे आणि तो आठ दिवसांतून एकदा मला भेटतो. मग बाकी दिवस मी काय करायचं? माझ्या शरीराला कसं मारायचं? तो बायकोला सोडू शकत नाही आणि मला पूर्ण मिळू शकत नाही. मग मी काय करावं? तसाही चोरून लपून वागण्याचा मला कंटाळा आला होता. आयुष्यभर मीही डोक्यावर पदर घेऊन खालमानेनं जगणार आणि एके दिवशी संपणार. पण हा वेळोवेळी जागा होणारा शरीरधर्म - त्याचं काय करू मी?'
ती रडत होती. तिला समजवणं माझ्या हातात नव्हतं. पुरुषाला त्याच्या वासना शमवायला अनेक ठिकाणं असतात, पण बाईने कुठे जावं या तिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. ती बोलत होती, 'तुम्ही म्हणता घटस्फोट झाल्यावर रीतसर लग्न कर. पण या कोर्टातून काडीमोड मिळेपर्यंत इतकी वर्षं जातील की त्यात माझी पोरगी वयात येईल. त्या वेळी तिचं तरूणपण जपू की माझ्या लग्नाचं बघू? आणि ज्याच्याशी लग्न करीन त्याचीच वाईट नजर जर माझ्या पोरीवर पडली तर काय करू? त्यापेक्षा ते लग्न नको आणि संबंधांचा गुंताही नको. जोवर सगळं राजीखुशी चाललंय चालत राहील. एकदा सुरुवात चुकली ना बाई, की सगळंच चुकत जातं बघा. तुमच्या माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा असतील बाई. पण मी तशी नाही आणि मी तुम्हाला तरी किती दिवस फसवू? उद्यापासून मी कामावर येणार नाही. कारण....तुमच्याशी सारखं खोटं बोलणं मला जमणार नाही.'
डोळयातलं पाणी न पुसता ती तशीच निघून गेली. कायमची. पुन्हा ती मला कधीच दिसली नाही.
ती गेली त्या दिशेने मी बघत होते. ती गेली तरी तिने माझ्या मनात तिचं एक वेगळं स्थान कोरून ठेवलंच होतं ना. अफजुलीसारखा स्वाभिमान, सुनितासारखा अवखळपणा, चंद्रकलाचा सोशिकपणा हिच्यात नसेल, पण ती जशी होती तशी माझ्या मनाला हुरहूर लावून गेली.
आशाचा विचार करत मी कितीतरी वेळ ती गेली त्या दिशेने बघत उभी होते. आणि एवढ्यात समोर कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. समोर बघितलं तर ‘ती’ समोर उभी होती. हिरव्या फुलाफुलांच्या साडीतली, गव्हाळ वर्णाची, थोडीशी आधुनिक, थोडीशी गाववाली. हसत मला विचारत होती, 'घरकामाला बाई पाहिजे?'
ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बघून ओळखीचं हसले. मी गेट उघडताच माझ्या नव्या सखीचा गृहप्रवेश झाला!
Add new comment