लग्न!
आज मुलगा बघायला येणार म्हणून घरात मावशी, आत्या आईच्या मदतीला आल्या होत्या. माझा सावळा रंग, त्यामुळे कुठलीही साडी अंगावर चांगली दिसणारच नाही अशा चेहर्यानं आत्यानं एक साडी माझ्यापुढे धरली. मी ती साडी नेसून तयार झाले. आमच्याच नात्यातलं स्थळ होतं म्हणे. मुलगा माझ्यापेक्षा वयानं थोडा मोठा, म्हणजे १०-१२ बर्षांनी! त्यानं काय फरक पडतोय. माझे कॉलेजमधले प्रताप झाकण्यासाठी असाच मॅच्युअर मुलगा (?) हवा असं सगळ्यांचं मत होतं. आलेली सगळी मंडळी जेवणं करून गेली. त्यांनी जातानाच होकार सांगितला.
माझं रूप असं असूनही होकार मिळाल्यामुळे घरातल्या सगळ्यांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. मला मात्र हे होकाराचं कोडं उलगडत नव्हतं. कारण जेवताना मी बघितलेला मुलगा (?) तर दिसायला चांगलाच देखणा होता. तरीही त्यानं माझ्यासारखीला का पसंद करावं, तसंच त्याच्या लग्नाला इतका उशीरही त्याने का केला असावा, त्याचं शिक्षण काय होतं असे अनेक प्रश्न मनात होते. पण समीर माझ्या आयुष्यात आता नाही म्हटल्यावर या प्रश्नांनी आणि उत्तरांनी मला काहीही फरक पडणार नव्हता. लग्नाचा बस्ता, तयारी यात मला उत्साह नव्हता आणि इतर कोणी मला त्यात सहभागी करूनही घेतलं नाही. एकूणच लग्न नीट पार पडणं हे त्यांचं त्या वेळचं एकमेव ध्येय असावं.
लग्नाच्या अक्षता पडल्या. मी माझ्या मैत्रिणींना बोलावलं नव्हतं, पण तरीही त्या आल्या होत्या. माझ्या प्रेमाच्या, माझ्या या अवस्थेच्या साक्षीदार - माझ्या डोळ्यातल्या विझलेल्या वेदना त्यांना दिसल्या असाव्यात, त्यांनी मूकपणे माझा हात कितीतरी वेळ हातात घेतला. पुढचं विशेष काही आठवावं असं वाटत नाही. एकामागून एक सोहळे पार पडले. माझ्या सामानासहित मी सासरच्या गाडीत बसले आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.
सासरी गेल्यावर दोन दिवस धार्मिक विधींमध्येच गेले. जो येईल त्याच्या पाया पडावं लागत होतं. डोक्यावरचा पदर सांभाळावा लागत होता. शहरातून एका लहानशा गावात माझा यापुढचा मुक्काम असणार होता. एकूण सगळा उलटाच प्रवास!
रात्र झाली, रात्री उशिरा नवरा खोलीत आला. आल्या आल्या त्यानं दार लावून दिवाही मालवला. लग्न होईपर्यंत एका शब्दानंही आमच्यात संवाद झाला नव्हता. आतातरी तो काही बोलेल असं वाटलं होतं, पण त्याऐवजी त्याचा स्पर्श त्याचं अस्तित्व दाखवू लागला. एकदम परका स्पर्श - पण बाईसाठी आसुसलेला - सराईत - मला हे सगळं हवं होतं की नको - कळत नव्हतं. पण त्या क्षणी एवढं कळालं, की बाईचं मन आणि शरीर अनेकदा वेगवेगळं असतं. हवं तसं ओरबाडून तो बाजूला झाला आणि पुटपुटला, ‘‘आई-बापानं काही सांगून शिकवून पाठवलेलं दिसत नाही. थंड साली रांड!’’ त्या शब्दांनी त्याच्याविषयी मनात फक्त घृणा शिल्लक राहिली. त्याही क्षणी समीर आठवत राहिला. त्याला मी सुंदर दिसले होते. त्यानं मला सुंदर केलं होतं आणि हा आयुष्याचा जोडीदार - त्याच्या नजरेत मी एक उपभोगाची वस्तू - जी पेटलेली नाही - शयनेषु रंभा नाही - अशी.
सकाळी इतरांसमोर त्याची चिडचिड पाहून सासू आणि ननंदेनं मी रात्री त्याच्याशी नीट वागले की नाही यावरून मला दुषणं द्यायला सुरुवात केली. शहरी पोरींचे नखरे इथे चालणार नाहीत. त्याला जसं आवडेल तसं वागावं लागेल. हे पुन्हा पुन्हा ठसवण्यात आलं. लग्न झाल्यावर स्त्री आपल्या हक्काच्या घरात येते असं म्हणतात, पण मला मात्र तुरुंगात आल्यासारखं वाटत होतं. गावातल्या आयुष्याची, दिनक्रमाची सवय नव्हती. पण हळूहळू बघून गोष्टी शिकू लागले. त्यातच नवर्याला इतर बायकांचा नाद असल्याचं लक्षात येऊ लागलं. शेतात काम करणारी, घरात काम करणारी, नात्यातली दूरची कोणीही...त्यांच्यातल्या खाणाखुणा, इशारे लक्षात येऊ लागले. एके दिवशी खोलीतून काहीतरी आणायला म्हणून निघाले असताना लोटलेल्या दाराआडून खुसखुस ऐकू आली. कोणी ती ‘‘सोडा मला, वहिनीबाई पाहील’’ असं म्हणत होती. त्यावर माझा नवरा, ‘‘तिला सगळं देतोय ना, मग तिची काय बिशाद आहे काही बोलायची. तू नखरे करू नकोस. चल ये जवळ.’’ मी आल्या पावली परत आले. माझ्या चेहर्याकडे सासूने बघितलं. तिला अंदाज आला असावा. पण ती काही बोलली नाही. तिची आपल्या मुलाच्या या गोष्टींना संमती होती की नाईलाज कोण जाणे!
लग्नाला दोन महिने होत आले आणि पाळी चुकल्याचं लक्षात आलं. सासूला सांगताच तिनं कौतुकानं दृष्ट काढली. नवराही रात्री जरा सबुरीनं गोष्टी घेऊ लागला. दिवस जाऊ लागले. आणि माझ्या सावळ्या कांतीवरचं तेज वाढू लागलं. एके दिवशी नवरा मला माहेरपणाला घेऊन गेला. आई-बाबा, सनीनं चांगलंच स्वागत केलं. तिथून आम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो. प्रेग्नन्सीच्या तपासणीसाठी इतकी जास्त फी नवरा का भरतोय हे लक्षात आलं नाही. त्या फॅार्मवर एक्स आणि वाय असं काहीसं लिहिलं होतं. सोनोग्राफीनंतर वायवर फुली मारलेला फॅार्म आमच्या हातात दिला गेला. परतताना नवरा नाखुश होता. परतल्यावर सासूकडून कारण कळालं की, अजून एक दोन वेळा डॉक्टरकडे जावं लागणार. खरं तर मला काहीच त्रास होत नव्हता. तरीही या तपासण्या का कळत नव्हतं. साधारणतः १५ दिवसांनी सासू, नवरा आणि मी पुन्हा शहरात डॉक्टरांकडे आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर इंजेक्शन देताना मी डॉक्टरांना म्हटलं, ‘‘डॉक्टर, मला काहीच त्रास होत नाहीये, मग हे इंजेक्शन कशासाठा?’’ डॉक्टर काहीतरी बोलत होते, पण त्या आधीच माझी शुद्ध हरपली.
शुद्धीवर आले, तर गळून गेल्यासारखं वाटत होतं. खूप थकवा वाटत होता. नवरा आणि सासू बाहेरच असावेत. मी माझ्या जवळच्या नर्सला विचारलं, तेव्हा मला माझं अॅबार्शन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ‘का?’ हा प्रश्न करताच ती निर्विकार चेहर्यानं उत्तरली, ‘मुलीचा गर्भ होता!’ मला न सांगता माझ्या पोटातलं मूल मारण्याचा अधिकार या सगळ्यांना कोणी दिला होता? न बघितलेल्या माझ्या मुलीसाठी डोळ्यातनं दोन आसवं बाहेर पडली. सासू आणि नवर्यासोबत घरी परतले.
एके दिवशी आई भेटायला आली. दोन दिवस राहिली. सासू आणि तिचं संभाषण कानावर पडलं. आई माझ्या डोहाळजेवणाविषयी विचारत होती आणि सासू माझं पोर पडलं असं तिला सांगत होती. जाताना मला एकटीला घेऊन आई मला हे पोर कसं पडलं विचारू लागली. मी थंडपणे या लोकांनी ते पाडल्याचं सांगताच तिलाही धक्का बसला असावा. तिनं सासूला जाब विचारताच सासूनं ‘‘आम्हाला वंशाचा दिवा हवाय. पोरींची रांग लावायची नाही. इतका पुळका असला पोरीचा तर कायमची घेऊन जा’’ असं सांगताच आई निमूट परत फिरली. जाताना तिच्या नजरेत सांत्वनाचा लवलेशही नव्हता. त्या दोन वर्षांत कितिक वेळा कधी पपई खाऊन, तर कधी आणखी काही गावरान उपायांनी पाडापाडीचे प्रयोग झाले. शरीराची जशी काही चाळणीच झाली होती. अजून किती आयुष्य बाकी होतं कुणास ठाऊक! अजून कसं आणि किती दिवस असंच ढकलत रहायचं होतं कुणास ठाऊक!
एके दिवशी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी मला भेटायला घरी आल्या. सासू आणि नवरा शेजारच्या गावी लग्नाला गेले होते. आल्या आल्या मैत्रिणी गळ्यात पडल्या. माझ्याकडे पाहून मी अकाली पोक्त झालेय, पार भकास झालेय असं त्यांना काय काय वाटत होतं. मीच माझ्या आयुष्याला जाणूनबुजून उदध्वस्ततेकडे नेतेय असं त्यांना वाटत होतं. मी त्यांच्याकडे एकटक पाहत होते. त्या म्हणतायेत त्यातलं काहीच मनापर्यंत पोचत नव्हतं. आता आयुष्यात सुंदर, छान, आशादायी शिल्लकच काय असंच वाटत होतं.
त्या मला गदागदा त्या मला गदागदा हलवून ‘‘अग, आपलं आयुष्य आपणच घडवायचं असतं.’’ कॉलेजमधले वाचलेली गौरीची, सानियाची पुस्तकं, त्या चर्चा, ते वाद त्या मला आठवण करून देत सांगू लागल्या. आयुष्य एकदाच मिळतं आणि ते सुंदर कसं करायचं हे आपल्याच हातात असतं असं काय काय त्या बोलू लागल्या. कसं शक्य होतं ते आता! माझ्यासाठी तर इथून तिथून सगळाच अंधार होता. पण मैत्रिणी आल्यामुळे कॉलेजचे मला पुन्हा ते दिवस काही क्षणांसाठी आठवले. खरंच, माझ्या एकूणच जगण्यातला तो एक रंगीत कवडसा होता.
Add new comment