शब्दांचे जादूगार महाश्वेता देवी
एका छोट्याशा गावात मैना नावाची एक मुलगी राहायची. मैनेची आई खिरी ही पायानं अधू असल्यामुळे तिला फार कामं करता यायची नाहीत. मैनेचे वडील काम शोधण्यासाठी शहरात गेलेले होते आणि तिचा भाऊ जंगलात लाकडं तोडायला जायचा. मैनाही गावातल्या श्रीमंत लोकांच्या बकर्या चरायला रानात घेऊन जायची. लोकांच्या जनावरांचे गोठे साफसूफ करणं वगैरे कामंही ती करत असे.
छोट्याशा मैनेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आणि मग ती ते प्रश्न तिच्या आईला विचारून भंडावून सोडत असे. नागाला का नाही पकडायचं? आपल्याला कोणी काही मदत केली तर आपण त्याचे आभार मानायचे आणि आपण कोणाचं काम केलं तर ते लोक मात्र आपले आभार मानत नाहीत ते का? नदीचं पाणी आणायला लांबच लांब का चालत जावं लागतं? आपण पाल्याच्या झोपडीत का राहतो? आपल्याला दोन्ही वेळ भात खायला का नाही मिळत? मासे बोलत का नाहीत? सूर्य मोठा की तारे मोठे? मैनेच्या प्रत्येक प्रश्नात हा ‘का बरं?’ नेहमीच असायचा.
मैना खूपच निरागस मुलगी असल्यानं तिला कधी श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा फरक कळायचा नाही. तिला सगळे लोक सारखेच वाटायचे आणि म्हणूनच ती स्वतःलाही कधी कमी लेखायची नाही. तिला शिकायचं होतं, तिच्या प्रत्येक का? च्या प्रश्नांची उत्तरं तिला शाळेत गेल्यावर मिळणार होती. ती शाळेत जायला लागली आणि तिथेही आपल्या शिक्षकांना का बरं? असा प्रश्न सतत विचारायला लागली. त्यानंतर काही वर्षांनी मोठी झालेली मैना प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कामही करायला लागली. धु्रव तारा उत्तरेलाच का असतो, झाडं का तोडू नयेत, डासांचा नायनाट का करायचा, जेवणाआधी हात का धुवायचे असे अनेक प्रश्न आता तिचे विद्यार्थी तिला विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती मुलांना देताना, तिचं ‘का बरं’ हे आता त्या मुलांमध्ये रुजलं गेलं.
मनातलं कुतूहल जागं असलेल्या मैनेची ही गोष्ट लिहिली महाश्वेता देवी या विख्यात बंगाली लेखिकेनं. महाश्वेता देवी या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. महाश्वेता देवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 या दिवशी ढाका या शहरात झाला. त्यांचे वडील मनीष घटक एक सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक होते, तर आई धारित्रीदेवी या देखील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. महाश्वेता देवी यांची लहानपणची एक गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांना लहानपणी समोरचा ज्या नावानं हाक मारत असे, त्यालाही त्या त्याच नावानं हाक मारत. त्यांचे वडील मनीष घटक त्यांना तुतुल या नावानं हाक मारत. महाश्वेता देवी देखील आपल्या वडिलांना तुतुल असंच म्हणत. आय्ाुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी आपल्या वडिलांना तुतुल या नावानंच संबोधलं! लहानपणापासून महाश्वेता देवी आपली आई धरित्रीदेवी यांच्या निस्सिम भक्त होत्या.
वडिलांची सतत बदली होत असल्यानं वयाच्या दहाव्या वर्षीच महाश्वेता देवी यांची रवानगी शांतिनिकेतनमध्ये करण्यात आली. शांतिनिेकेतनच्या नियमाप्रमाणे त्यांच्यासाठी लाल रंगाच्या किनारीची साडी, अंथरूण-पांघरूण, तांब्या-पेला वगैरे सामान खरेदी करावं लागलं. शांतिनिकेतनमध्ये जाताना आई-वडिलांपासून दूर राहावं लागणार म्हणून महाश्वेता देवींना खूप रडू आलं. मात्र काहीच दिवसांत महाश्वेता देवी शांतिनिकेतनच्या त्या सुरेख परिसरात रमून गेल्या. शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषेबरोबरच इंग्रजी भाषा येणं अनिवार्य होतं. सकाळपासून रात्री झोपेर्यंतच्या वेळा आणि दिनक्रम निश्चित केलेला असे. संगीत, चित्रकला, नाटक अशा अनेक गोष्टींमध्ये रस जागा होईल अशा गोष्टी इथे घडत. त्याचबरोबर वाचन, लेखनही करावं लागे. निसर्गावर प्रेम मुख्यत्वे इथे शिकवलं जात असे. त्यांना आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी हिंदी विषय शिकवत. सगळे आश्रमवासी त्यांना छोटा पंडित म्हणत असत. रवींद्रनाथ टागोर यांनी देखिल महाश्वेतादेवी यांना बंगाली भाषा शिकवली होती. टागोरांची अनेक भाषणंही महाश्वेता देवी यांनी ऐकली होती. त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. तीन वर्षांनी जेव्हा शांतिनिकेतन सोडायची वेळ आली, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं होतं.
महाश्वेता देवी यांनी आपलं शालेय शिक्षण संपल्यानंतर एक शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कलकत्ता विश्वविद्यालयात देखील काही काळ नोकरी केली. तसंच शांतिनिकेतन कलकत्ता इथे इंग्रजी साहित्यात पुढलं शिक्षण घेतलं.
महाश्वेता देवींनी अतिशय लहान वयात लिहायला सुरुवात केली. त्यांच्या लघुकथा त्या वेळी अनेक वेगवेगळ्या साहित्यिक पत्रिकांमध्ये प्रसिद्ध होत असत. ‘झाँसी की रानी’ ही त्यांची पहिली गद्यरचना प्रसिद्ध झाली, तेव्हा लेखन हाच आपला पिंड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याच क्षेत्रात काम करायचं असं ठरवलं. महाश्वेता देवी यांनी झाँसीच्या राणीच्या जीवनावर लिहायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी राणींचे भाचे गोविंद चिंतामणी यांच्याशी पत्रव्यवहार केला. चारशे पानं लिहून झाल्यावरही महाश्वेता देवींचं समाधान होत नव्हतं. त्यांनी ती पानं फाडून फेकून दिली आणि आपण झॉसीला गेल्याशिवाय आपल्या लिखाणात जिवंतपणा उतरणार नाही हे त्यांना कळून चुकलं. झाँसीला जाऊन बुंदलेखंडातला एक एक परिसर त्यांनी पालथा घातला. तिथल्या लोकगीतांचा अभ्यास केला आणि आणि त्यानंतर त्यांनी जे लिहिलं त्याचं समाधान त्यांना मिळालं. 1956 साली त्यांचं ‘झाँसी की रानी’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. आदिवासी आणि वंचित घटकांसाठी काम केल्यामुळे त्यांच्या लिखाणात याच वर्गाचे प्रश्न डोकावतात.
त्यानंतर महाश्वेता देवी यांनी ‘नटी’ आणि ‘जली थी अग्निशिखा’ ही पुस्तकं लिहिली. ही दोन्ही पुस्तकं 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित आहेत. ‘अरण्येर अधिकार’ या पुस्तकात त्यांनी आदिवासींच्या विद्रोहाची गाथा लिहिली आहे. यात आदिवासींचा नेता बिरसा मुंडा यांचा सामंती व्यवस्थेच्या विरोधातला लढा चितारला होता. अग्निगर्भ, श्री श्री गणेश महिमा या पुस्तकात माणसावर अन्याय लादणार्या कुप्रथा, हिंसक व्यवस्था यांच्यावर भाष्य केलं आहे. महाश्वेता देवी यांच्या द्रोपदी या कादंबरीमध्ये हिमालयातल्या गुज्जर जमातीतल्या प्रचलित परंपरा यावर लिहिलं आहे. त्यांच्या प्रथेप्रमाणे एक स्त्रीचं लग्न एकाच वेळी एका घरातल्या तीन ते चार भावांशी लावण्यात येतं. यातून त्या स्त्रीच्या वाटयाला येणारी घुसमट त्यांनी व्यक्त केली होती. रुदाली या कादंबरीमध्ये राजस्थानमधल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांची कहाणी अधोरेखित केली आहे. कोणाच्याही घरी दुःखद प्रसंग घडला तर इथल्या स्त्रियांना जबरदस्तीनं बोलावून रडण्यास भाग पाडलं जातं. हे सगळं लिखाण करताना महाश्वेता देवी प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन आल्या. त्यांनी स्वतः त्या प्रथांचं, त्या चळवळींचं जवळून निरीक्षण केलं. इतकंच नाही तर अनेक चळवळींत, आंदोलनांत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या वैयक्तिक आय्ाुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग येऊनही त्यांनी आपल्या कामाशी कधीच तडजोड केली नाही.
1979 साली महाश्वेता देवी यांना त्यांच्या ‘अरण्येर अधिकार’ या बिरसा मुंडा या आदिवासींच्या नेत्यावर लिहिलेल्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1986 साली महाश्वेता देवी यांना भारत सरकारनं पद्मश्री देऊन त्यांना गौरवलं. 1997 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. हा पुरस्कार त्यांना नेल्सन मंडेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची 5 लाखांची मिळालेली रक्कम महाश्वेता देवी यांनी बंगाल पुरूलिया आदिवासी समितीला दिली होती. याशिवाय मॅगेसेसे पुरस्कार, यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या अनेक कादंबर्यांवर चित्रपट निघाले असून रुदाली, हजार चौरासी की माँ हे चित्रपट विशेष गाजले. 14 जानेवारी 2018 या दिवशी महाश्वेता देवींच्या 92 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून गूगलनं त्यांचं गूगल डूडल बनवलं होतं.
28 जुलै 2016 या दिवशी वयाच्या 90 व्या वर्षी कोलकता इथे महाश्वेता देवी यांनी आपलं अनमोल असं साहित्य मागे ठेवत या जगाचा कायमचा निरोप घेतला.
दीपा देशमुख
Add new comment