Saree Speaks
काहीच दिवसांपूर्वी पल्लवी या मैत्रिणीनं, दीपाताई, तुम्ही तुमच्या साडीमागच्या आठवणी का लिहीत नाही? असा प्रश्न विचारला आणि प्रत्येक साडी माझ्याशी त्यानंतर खरंच बोलायला लागली. तिच्या माझ्यातलं नातं, तिची माझी पहिली भेट सगळं काही सांगायला लागली. नुकतीच मी औरंगाबादला जोशीकाकूंच्या अपर्णाच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी गेले होते. कार्यक्रम खूप चांगला पार पडला. मी जोशीकाकूंच्या महाजन कॉलनीतल्या घरीही जाऊन आले. जोशी काकूंनी प्रेमानं मला ही साडी भेट दिली. दसरा किंवा दिवाळीत नेस असं आग्रहानं सांगितलं. मी परत आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी साडी नेसले आणि जोशीकाकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
एमएस्सी, पीएचडी झालेली एक बुद्धिमान स्त्री! विज्ञान, कला, संगीत, साहित्य सगळ्यांमध्ये रुची आणि प्रभुत्व असलेली. आम्ही दोघींनी निसर्गोपचार (नॅचरोपॅथी)चा कोर्स करायचा ठरवलं. 'प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर' हे निसर्गोपचाराचं तत्व आम्हाला दोघींनाही भावलं होतं. हा कोर्स करताना मजा आली. या कोर्समुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार परिषद जी हृषिकेश इथं संपन्न झाली होती, त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. एकूणच तो प्रवास खूप आठवणींनी भरलेला! दिल्लीत पोहोचल्यापासून असुरक्षित वाटायला लागलं. टॅक्सीवाल्याचं अरेरावीचं वागणं, चांदणीचौकात सायंकाळी सात नंतर होणारा शुकशुकाट आणि स्त्रियांची अत्यंत कमी दिसणारी उपस्थिती, हृषिकेशला जाताना सायंकाळची बस पकडल्यानंतर बसमध्ये आमच्याशिवाय कुठल्याही स्त्रीचं नसणं, बसमध्ये इतर प्रवाशांचं उद्धटपणे वागणं असं सगळं आम्हाला अस्वस्थ करत होतं. आम्ही हृषिकेशला मध्यरात्री बारा वाजता पोहोचलो. मनातून घाबरलो होतो. पण सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्ही मथुरा-वृंदावन इथलाही प्रवास केला. या प्रवासातही चित्रविचित्र अनुभव आले.
मथुरेला आम्ही मुक्कामासाठी एका धर्मशाळेत पोहोचलो. तिथं म्हणे काहीच दिवसांपूर्वी खून झाला होता. आम्ही उतरलो त्या खोलीला जागोजागी खिडक्या होत्या. त्या बंद करताना भीतीमुळे आमची पाचावरण धारण बसली होती. आम्ही रात्रभर जाग्याच राहिलो. त्यानंतरची मंदिरातली पंडे लोकांची दादागिरी आणि धमकीवजा भाषा बघून अंगावर काटा आला. कधी एकदा इथून निघतो असंच झालं. परतीच्या प्रवासात जेव्हा महाराष्ट्राचा ओळखीचा भाग दिसायला लागला, तेव्हा एकदम सुरक्षित वाटायला लागलं. महाराष्ट्रभर कधीही, कुठेही एकट्यानं प्रवास केला तरी कधीच कुठलीच भीती वाटली नव्हती. आपण राहतो त्या राज्यातल्या सगळ्या सकारात्मक गोष्टी एकामागून एक दिसायला लागल्या. खूप बरं वाटलं. मध्ये अनेक दिवस गेले. आम्ही दोघींनी मिळून निसर्गोपचार केंद्र सुरू करायचं ठरवलं. त्यात योगाचे वर्ग, आणि इतर उपचारपद्धती सुरू करायच्या असंही ठरवलं. पण ते काही कारणांनी साध्य झालं नाही. मात्र आमची मैत्री तशीच राहिली, अनेक गोष्टींवरचा संवाद होत राहिला.
मध्यंतरीची काही वर्षं एकमेकींना दुरावलो. याचं कारण प्रवास वेगवेगळे झाले होते. मात्र फेसबुकनं ही भेट पुन्हा घडवून आणली. मग पुनश्च संवाद सुरू झाला. आज या साडीनं काही आठवणी पुन्हा समोर उभ्या केल्या आणि ते एकत्रित घालवलेले सुरेख क्षणही! खरंच साडी बोलते, आपल्याशी हितगुज करते!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment