पुन्हा एक सिद्धार्थ - संत गाडगेबाबा

पुन्हा एक सिद्धार्थ - संत गाडगेबाबा

प्रल्हाद केशव अत्रें गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज या दोघांना राष्ट्रसंत मानत. ‘सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं रानात आणि गाडगेबाबांना पहावं कीर्तनात’ असं आचार्य अत्रे अभिमानानं म्हणत. ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी गाडगेबाबांची प्रकृती चांगली नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कायदेमंत्री होते आणि ते काही कामानिमित्त मुंबईला आले होते. सायंकाळच्या रेल्वेनं ते परत दिल्लीला जाणार होते. बाबासाहेबांना गाडगेबाबांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी कळताच त्यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवली आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते त्यांना भेटायला तातडीनं हॉस्पिटलमध्ये गेले. गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडे बघितलं आणि इतका मोठा माणूस आपल्या भेटीसाठी आलाय या विचारानं ते संकोचून गेले. कधीही कोणाकडून काहीही न स्वीकारणारे गाडगेबाबा, पण बाबासाहेबांनी प्रेमानं आणलेल्या घोंगड्या त्यांनी स्वीकारल्या आणि म्हणाले, ‘डॉक्टर, तुम्ही कशाला आलात, अहो मी फकीर माणूस. तुमचा मात्र एक एक मिनीट किमती आहे. तुमचा अधिकार खूप मोठा आहे.’

बाबासाहेब उत्तरले, ‘गाडगेबाबा, माझा अधिकार दोन दिवसांचा आहे. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. खरा अधिकार तुमचा आहे.’ बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. गाडगेबाबांचा हात त्यांनी आपल्या हाती घट्ट धरला होता. यानंतर पुन्हा आपली दोघांची भेट कदाचित कधीच होणार नाही हे दोघंही जाणत होते. 

आपल्या वागण्यातून, आपल्या कीर्तनातून ज्यांनी समाजातल्या मागासवर्गीयांमधल्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला, शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवण्याचं काम केलं, आयुष्यभर गरिबांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा उभारून त्यांच्यासाठी निवासाची सोय केली अशा गाडगेबाबांचा म्हणजेच डेबुजी झिंगराजी जाणोरकर यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ या दिवशी अमरावती जिल्ह्यातल्या शेंडगाव इथे झाला. आयुष्यभर अंगात घोंगडीचा अंगरखा आणि एका हातात मातीचं गाडगं तर दुसर्‍या हातात खराटा असलेले गाडगेबाबा गोधडीबाबा किंवा गाडगेबाबा म्हणून ओळखले जायचे. 

चांगल्या सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डेबुजीचे वडील ते लहान असतानाच वारले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आजोबा हंबीरराव आणि मामा चंद्रभानजी यांनी त्यांचा सांभाळ केला. विदर्भातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या दापुरा या गावी डेबुजीचा दिनक्रम सुरू झाला. रोज पहाटे लवकर उठून गाई-म्हशींचा गोठा साफ करणं, जनावरांना नदीवर नेऊन आंघोळ घालणं, त्यांना वैरण घालणं, चरायला नेणं अशी सगळी कामं डेबुजी आनंदानं करायला लागला. सकाळी आपल्या मामीच्या तोंडून जात्यावरच्या ओव्या ऐकून डेबुजीच्या मनात गाण्याची आवड निर्माण झाली. लहान असतानाच ते आपल्या सवंगड्यांबरोबर नदीकाठी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम करत. हे कीर्तन त्यांनी अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यातल्या अनिष्ट गोष्टींवर हल्ला बोलण्यासाठी तयार केलेलं असायचं. समाजातल्या अनेक वाईट रुढी त्यांना सतावत. देवाला नवस बोलून देवासमोर एखाद्या दुर्बळ प्राण्याचा बळी देणं, दारू पिणं, जातिभेद करणं, शिक्षणाला महत्व नसणं अशा अनेक गोष्टी त्यांना खटकत. महाराष्ट्र, गुजराथ आणि कर्नाटक अशा अनेक राज्यात भ्रमंती करून त्यांनी आपल्या कीर्तनातून सोप्या भाषेत लोकांचं प्रबोधन केलं. हुंडा घेऊ नका, कर्ज काढून लग्न साजरं करू नका, सावकाराच्या नादी लागू नका अशा अनेक गोष्टी ते लोकांना समजावून सांगत. 

गाडगेबाबाचं कुतांबाई नावाच्या मुलीशी त्या काळच्या प्रथेप्रमाणे बालवयातच लग्न झालं, त्यांना एक मुलगा आणि दोन मुलीही झाल्या. पण संसारात त्यांचं मन रमलं नाही. त्यांचं मन सतत समाजातल्या जाचणार्‍या गोष्टींवर केंद्रित झालं होतं. एके दिवशी ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. त्यांना जगाच्या संसाराची काळजी वाटत होती. पुन्हा एक सिद्धार्थ जनकल्याणाची आस घेऊन बाहेर पडला होता. ठिकठिकाणी कीर्तन करत स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायला त्यांनी सुरुवात केली. स्वच्छता आणि आरोग्य यांचा किती जवळचा संबंध आहे हे ते सोदाहरण लोकांना समजवून सांगायचे. एकदा कीर्तन सुरू असताना त्यांना कोणीतरी त्यांचा मुलगा वारल्याची बातमी दिली, क्षणभर शांत झालेल्या बाबांनी लगेचच, 
मेले एैसे कोटयानु कोटी
काय रडू एकासाठी
असं म्हणत पुढलं कीर्तन सुरू केलं. आपलं कीर्तन ते वर्‍हाडी भाषेतून लोकांना समजेल असं करत. त्यांचं कीर्तन सुरू झालं की लोक त्यात गुंगून जात. ‘त्यांच्या कीर्तनाचं शब्दचित्र उभं करणं माझ्या ताकदीबाहेरचं काम आहे’ असं प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे. 

गाडगेबाबांनी आपल्या प्रवासात जाईल तिथे आपल्या हातातला खराटा सोडला नाही. दिसली अस्वच्छता की ते साफ करायला लागत. त्यांना आपला परिसर झाडताना बघून लोक खजील होत आणि आपणही स्वच्छतेच्या कामी लागत. आपल्या कीर्तनामध्ये देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, पोथी-पुराणं, मंत्र-तंत्र यावर विश्‍वास ठेवू नका, माणसात देव शोधा असं सांगत. रंजले-गांजले, अपंग-अनाथ आणि दीन-दुबळे यातच देव शोधा असं ते म्हणत. मी कोणाचा गुरू नाही आणि मला कोणी शिष्य नाही असं ते म्हणत. 'गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा' हे त्यांचं आवडतं भजन होतं. एकदा गाडगेबाबा रस्त्यानं जात असताना एक माणूस दगडाची पूजा करताना त्यांना दिसला. त्यानं त्या दगडाला हार घातला, दुधाने आंघोळ घातली. तो हे काम करत असताना कुठूनतरी एक कुत्रा आला आणि त्यानं मागचा पाय वर करून त्या दगडावर चक्क मूत्रविसर्जन केलं. त्या माणसाला इतका राग आला की त्यानं हातात दगड घेतला आणि कुत्र्याला फेकून मारणार, तेवढ्यात गाडगेबाबा त्याला म्हणाले, 'अरे, त्या गरीब मुक्या जनावराला त्रास देऊन काय मिळवणार आहेस? त्याला कुठं माहीत आहे की माणसांचा देव दगड असतो म्हणून?'

संत तुकाराम यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. गाडगेबाबांनी लोकांना दशसूत्री संदेश दिला होता. ते म्हणत, भुकेलेल्यांना -अन्न, तहानलेल्यांना- पाणी, उघड्यानागड्यांना - वस्त्र, गरीब मुलामुलीना- शिक्षण, बेघरांना - आसरा, अंध, अपंग, रुग्ण यांना -औषधोपचार, बेकारांना - रोजगार, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना - अभय, गरीब तरुण-तरुणींचं - लग्न, दुःखी आणि निराशांना - हिम्मत आणि गरिबांना - शिक्षण. ही दशसूत्री आचरणात आणणं म्हणजेच धर्माचं पालन करणं असं ते म्हणत. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या शिक्षण उभारणीच्या कार्यात गाडगेबाबांनी मदत केली होती. 

एकदा ते अत्रेंच्या आग्रहाखातर खंडाळ्याला त्यांच्या बंगल्यावर रात्री मुक्कामी गेले. पहाटे अत्रेंना जाग आली, तर गाडगेबाबा त्यांना कुठेच दिसेनात. त्यांना शोधत ते अंगणात आले. त्यांनी बघितलं, बंगल्याभोवतीचा सगळा परिसर झाडून लखलखीत केलेला त्यांना दिसला. अत्रेंच्या परिसराची स्वच्छता करून गाडगेबाबा आपल्या पुढल्या प्रवासाला केव्हाच लागले होते. अत्रेंना काहीच सुचेना. त्यांनी ते गेलेल्या वाटेकडे हात जोडले.

आपल्या संपूर्ण आयुष्यात गाडगेबाबांनी भौतिक सुखाचा त्यागच केला होता. श्रीमंत लोकांकडून देणगी ते स्वीकारत आणि जमवलेल्या लाखो रुपयांमधून त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू, अमरावती अशा अनेक ठिकाणी यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, अनाथालयं, पूल बांधले. ज्या वेळी गाडगेबाबांची बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली, तेव्हा त्यांनी काही रक्कम बाबासाहेबांच्या हाती सुपूर्त केली आणि म्हणाले, ‘तुम्ही मला आधी भेटला असता तर धर्मशाळांऐवजी मी शाळाच बांधल्या असत्या. खरंच आज शाळांची जास्त गरज आहे.’ 

महात्मा गांधी आणि गाडगेबाबा यांची वर्ध्याच्या आश्रमात भेट झाली असताना गाडगेबाबांचे विचार ऐकून गांधीजी प्रभावित झाले. त्यांनी सहजपणे विचारलं, तुमच्याकडे किती संपत्ती आहे?’ त्यावर बाबा म्हणाले, ‘काठी, गाडगं आणि गोधडी एवढीच संपत्ती माझ्याकडे आहे आणि माझ्या मृत्यूनंतर तीही लोकांची असेल.’ गांधीजी थक्क झाले. गांधीजी म्हणाले, ‘आजपर्यंत मी इतका निर्मोही सच्चा संत बघितला नाही.’ एवढंच नव्हे तर गांधीजींनी गाडगेबाबांच्या पायावर आपला माथा टेकवला. 

‘समतेचा विचार म्हणजे पूजा, श्रमाची उपासना म्हणजे पूजा’ असं मानणार्‍या गाडगेबाबांनी २० डिसेंबर १९५६ या दिवशी अमरावतीत या जगाचा कायमचा निरोप घेतला! आजही त्यांनी काढलेल्या ट्रस्टतर्फे सगळी कामं बघितली जातात. आपल्या मृत्यूपुर्वी गाडगेबाबांनी मृत्यूपत्र तयार केलं. त्याचं मृत्यूपत्र म्हणजे मानवता आणि लोकसेवेचा जाहिरनामा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. त्यांच्या कार्यावर  देवकीनंदन गोपाला चित्रपटही काढण्यात आला. या चित्रपटात गाडगेबाबांची भूमिका प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी केली. गाडगेबाबांच्या लोकोत्तर कार्यानं ते दिपून गेले. ‘ही भूमिका मला कलावंत म्हणून, एक माणूस म्हणून खूप काही शिकवून गेली’ असे उद्गार त्यांनी काढले. नागपूरला गाडगेबाबांचा पुतळा उभारण्यात आला. ‘महाराष्ट्रातल्या समाजवादाचं प्रचंड मोठं व्यासपीठ’ असे अत्रेंनी उद्गार काढून त्यांच्याबद्दलचे कृतज्ञभावच व्यक्त केले आहेत. 

ज्या समाजात ढोंगी साधूंची बुवांची संख्या वाढते, ज्या समाजात गरिबांची सेवा करण्याऐवजी हे लोक स्वतः भोगासक्त आयुष्य जगतात आणि भोळ्याभाबड्या लोकांचं शोषण करतात. ज्या समाजात विलासी जीवन जगणारे महाराज तयार होतात, ते कधीच खेड्यात जात नाहीत, स्वच्छतेसाठी हातात खराटा घेत नाहीत, अपंग आणि अनाथांना आधार देत नाहीत उलट सामान्य माणसाला कर्मकांडात आणखीन जखडून टाकतात. अशा वेळी आयुष्यभर चिंध्या पांघरणार्‍या, स्वच्छतेचा वसा घेतलेल्या, तळहातावर भाकरी घेऊन खाणार्‍या, सगळा पैसा गोरगरिबांसाठी लावणार्‍या, श्रमाचं महत्त्व पटवणार्‍या गाडगेबाबांसारख्या समाजसुधारकाची आजही तितकीच नितांत आवश्यकता आहे!

ग.दि. माडगूळकर यांनी गाडगेबाबांच्या मृत्यूनंतर त्यांना या शब्दांत श्रद्धांजली वाहिली ः

संत माळेतील, मणि शेवटला
आज ओघळला, एकाएकी

दीपा देशमुख 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.