चांद्रयान मोहीम - दिवाळी 2019
लहानपणापासूनच माणसावर चंद्रानं एक वेगळीच मोहिनी घातली आहे. साहित्यामध्ये तर चंद्राचं स्थान अढळ आहे. कथा, कादंबर्या, कविता यात चंद्राची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. वसंत बापट, शांता शेळके, ना. सि. फडके, आचार्य अत्रे, बालकवी आणि नारायण सुर्वे या सगळ्यांनीच चंद्राला एका वेगळ्या रुपात वाचकांसमोर पेश केलं. कधी अंगाईगीतामधून, तर कधी विरहगीतामधून, कधी प्रेमगीतामधून, तर कधी बालगीतामधून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चंद्र डोकावत राहतोच. ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ पासून जी सुरुवात होते, ती मग ‘आई, मला चंद्रावर जायचं’ या कवितेपर्यंत मुलं हट्ट करू पाहतात. तरुणपणात तर आपली प्रेयसी म्हणजे जणू चंद्रच अशाही कल्पना माणसानं केल्या.
चंद्राला सर करण्यासाठी मात्र माणसाचा कारणीभूत ठरली ती महायुद्धं! दोन दोन महायुद्धं करूनही माणसाला समाधान लाभलं नव्हतं. 70 वर्षांपूर्वी रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध छेडलं गेलं होतं. साम्यवाद आणि भांडवलशाही हे दोन तट निर्माण झाले होते. प्रत्येक गोष्टीत दोन्ही देश आपसांत प्रचंड स्पर्धा करायला लागले. दोन्ही देशांनी अवकाश क्षेत्रातही स्पर्धा करायचं ठरवलं आणि 12 एप्रिल 1961 या दिवशी रशियानं (त्या वेळचं सोव्हिएट युनियन) अंतराळात आपला पहिला माणूस पाठवला, त्याचं नाव होतं युरी गागारीन! या गोष्टीमुळे अमेरिकेला जास्तच धक्का बसला. 23 दिवसांनी अमेरिकेनं आपला अंतराळयात्री अॅलेन शेफर्ड याला अवकाशात पाठवला. पण तरीही तो अंतराळात प्रवेश करणारा दुसरा माणूस ठरला होता. त्यामुळे आता अमेरिकेचं सगळं लक्ष्य चंद्रावर केंद्रित झालं.
6 जुलै 1969 या दिवशी म्हणजे जवळजवळ 50 वर्षांपूर्वी तीन अमेरिकन कमांडर नील ऑर्मस्ट्राँग, ल्यूनार मॉड्यूल पायलट बज एल्ड्रिन, कमांडर मॉड्यूल पायलट मायकेल कॉलिन्स यांना अपोलो एलेवन या यानाद्वारे चंद्रावर जायचं निश्चित झालं होतं. सॅटन-फाईव्ह या रॉकेट द्वारा त्याचं उड्डाण होणार होतं. तीन पायर्यांवर हे रॉकेट विभाजित झालं आणि त्यानं अपोलो इलेवनला चंद्रावर पोहोचवलं. चंद्रावर पोहोचताच अपोलो दोन हिश्यात विलग होणार होतं. पहिला हिस्सा होता, कमांड मॉड्यूल कोलंबिया! कोलंबिया मॉड्यूलचं काम चंद्राला प्रदक्षिणा घालणं असं होतं. याची जबाबदारी कमांड पायलट मायकेल कॉलिन्स याची होती. दुसरा हिस्सा होता ल्यूनार मॉड्यूल! ल्यूनार मॉड्यूलचं नाव होतं इगल! इगलला चंद्रावर पोहोचायचं होतं. यात होते नील ऑर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन! उड्डाण केल्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 20 जुलैला अपोलो चंद्रावर उतरलं. त्याप्रमाणे चंद्रावर पोहोचताच अपोलेचं दोन भागात विभाजन झालं. दुसरा हिस्सा लुनार मॉड्यूल याचं नाव होतं - 20 जुलैला यान चंद्रावर पोहोचलं. चंद्रावर पहिलं पाऊल कमांडर नील ऑर्मस्ट्राँगनं ठेवलं. त्यानं चंद्रावरचे अनेक नमुने गोळा केले. चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा जगातला माणूस हा नील ऑर्मस्ट्राँग ठरला आणि दुसरा माणूस बज एल्ड्रिन! संपूर्ण जगाच्या दृष्टीनं हा एक विलक्षण रोमांचकारी अनुभव होता.
चंद्रावर यशस्वीरीत्या पोहोचण्याचं, चंद्राला स्पशर्र् करण्याचं माणसाचं शतकानुशतकं बघितलेलं स्वप्न अशा रीतीनं पूर्ण झालं होतं. तसंच अमेरिका आणि रशिया यांच्या शीतयुद्धात चंद्राच्या बाबतीत अमेरिकेनं बाजी मारली होती आणि आपलं अंतराळ स्पर्धेतलं वर्चस्वही सिद्ध केलं होतं.
त्यानंतर भारतानं देखील अवकाशातल्या मोहिमांनामध्ये यशस्वी सहभाग घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी अंतराळ संशोधनाला आणि अभ्यासाला खूप प्रोत्साहन दिलं. यातूनच इस्त्रो ही संस्था अस्तित्वात आली. खरं तर 1957 साली रशियानं अवकाशात आपलं यान पाठवलं आणि त्यांच्या या प्रयत्नाचं जगभर कौतुक झालं. त्याच वेळी भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्याशी चर्चा करून भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना केली. 1966 साली होमी भाभा यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संस्थेची संपूर्ण जबाबदारी विक्रम साराभाई यांच्यावर सोपवली गेली. विक्रम साराभाई यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीनं संस्थेला नवीन रूप दिलं आणि खर्या अर्थानं 15 ऑगस्ट 1969 या दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था या नावानं ही संस्था रीतसर स्थापन करण्यात आली. अंतराळ संशोधन करण्यामागे विक्रम साराभाई यांचा द़ृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. जे काही करायचं ते माणसाच्या कल्याणासाठीच! त्यामुळेच गेल्या 50 वर्षांमध्ये संस्थेनं खूप प्रगती केली. 100 पेक्षा जास्त उपग्रह प्रक्षेपण करण्याचं तंत्र, अनुभवी आणि कष्टाळू शास्त्रज्ञ, क्रायोजेनिक इंजिन निर्मिती, अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे इस्त्रोची मान भारतातच नव्हे तर जगभरात उंचावली आहे.
भारतातली इस्त्रो ही संशोधन संस्था यावर्षी आपला सुवर्णमहोत्सव म्हणजेच 50 वं वर्ष साजरं करत आहे. इस्त्रोनं आजपर्यंत 104 उपग्रह अवकाशात पाठवले असून पहिल्याच वेळी मंगळ मोहीम यशस्वी केली. चंद्राच्या धु्रवीय भागावर पाणी असू शकतं हा अंदाजही इस्त्रोनंच जगाला प्रथम सांगितला. इस्त्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही 1920 साली कलकत्ता इथले शास्त्रज्ञ एस. के. मिश्रा यांच्या पुढाकारानं स्थापन झाली. पुढे या संशोधनात नोबेल पारितोषिकांनी गौरवलेले सी. व्ही. रामन आणि साहा समीकरणानं प्रसिद्धी पावलेले शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांनी त्यात आणखीन भर टाकली. पुढे या संस्थेची जबाबदारी विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांच्यावर टाकण्यात आली. गुजरामधल्या अहमदाबाद इथं विक्रम साराभाई यांनी आपलं संशोधन सुरू ठेवलं, तर होमी भाभांनी अणुऊर्जेवर काम सुरू केलं. या दोघांनी अंतराळ क्षेत्रातले अनेक प्रयोग एकत्रितपणे केले. त्यातूनच 1950 साली भारतीय अणुऊर्जा संशोधनाची स्वतंत्र शाखा दोघांच्या अथक प्रयत्नांमधून सुरू झाली. सरकारनंही अवकाश संशोधनाला आर्थिक साहाय्य करत प्रोत्साहन दिलं.
इस्त्रोनं 2008 साली चांद्रयान-1 तयार करून चंद्राभोवतीच्या कक्षेत यशस्वीरीत्या पाठवलं होतं. या चांद्रयानानं भारताला चंद्रावरची माहिती पाठवायला सुरुवात केली होती. सगळ्यात महत्वाची माहिती होती, ती म्हणजे चंद्रावर असलेल्या पाण्याच्या बातमीची! या यानानं चद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या हायड्रॉक्सिल्सची माहिती घेतली. तसंच या यानाच्या साहाय्यानं चंद्रावरच्या धु्रवीय प्रदेशात पाण्याचा बर्फ असण्याचेही अंदाज वर्तवले होते. तसंच चंद्राच्या पृष्ठभागाखाली पाणी असू शकेल असाही अंदाज सांगितला होता. चंद्रावरच्या मातीमध्ये मॅग्नेशिअम, अॅल्यूमिनियम आणि सिलिकॉन असल्याचीही माहिती त्यानं दिली होती. अर्थात चांद्रयान-1 प्रत्यक्ष चंद्रावर उतरलं नाही. प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याच्या दृष्टीनं भारतीय शास्त्रज्ञांचे आता पुढले प्रयत्न सुरू झाले होते.
12 नोव्हेंबर 2007 या दिवशी इस्त्रो आणि रशियातली अवकाश संस्था यांच्या सहकार्यातून चांद्रयान-2 या प्रकल्पावर काम करण्याचा करार करण्यात आला. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात भारत सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली. 2009 पर्यंतच्या कालावधीत चांद्रयान कसं असावं पासून अनेक गोष्टींचा आराखडा तयार करण्याचं काम झालं. ही मोहीम लांबत जाऊन अखेर 2016 साल उजाडलं, पण तरीही रशियाकडून लँडर निर्मितीला वेळ लागत होता. त्यामुळे इस्त्रोनं आपणच आता हा प्रकल्प स्वतंत्रपणे पूर्णत्वाला न्यायचा निर्णय घेतला. सगळ्या तांत्रिक बाबींवर काम करून, त्यातले अडथळे दूर करून अखेर 22 जुलै 2019 हा दिवस चांद्रयानासाठी निश्चित करण्यात आला.
मात्र त्याआधी 24 सप्टेंबर 2014 या दिवशी इस्त्रोनं मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याचा मान मिळवला. मंगळाच्या कक्षेत दाखल होणारा जगातला पहिला आशियायी देश म्हणूनही भारतानं नोंद केली. गेली 5 वर्षं यशस्वीरीत्या मॉम ऑर्बिटर मंगळाच्या कक्षेची परिक्रमा करत आहे. या काळात त्यानं मंगळाची हजारो छायाचित्रं इस्त्रोला पाठवली. मंगळावरच्या अनेक बारीकसारीक नोंदी करून त्यानं पाठवल्या आहेत. मॉमनं पाठवलेल्या छायाचित्रांच्या रुपात एक मोठ्या महत्वपूर्ण माहितीचा खजिनाच इस्त्रोच्या हाती लागला आहे.
या सगळ्या मोहिमा सुरू असतानाच भारतात चंद्रावर मानवरहित यान पाठवून चंद्रावरचा अभ्यास करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे 22 जुलै 2019 या दिवशी भारतातून इस्त्रोच्या चांद्रयान जीएसएलव्ही एमके थ्री - एमवन या अग्निबाणानं श्रीहरीकोटा इथून दुपारी पावणेतीन वाजता अवकाशात झेप घेतली. पृथ्वीभोवतीच्या कक्षेत काहीच वेळात हे चांद्रयान स्थिर झालं. हळूहळू पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरत चांद्रयान 20 ऑगस्टला चंद्राभोवतीच्या कक्षेत प्रवेश करणार होतं. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवरून हे यान चंद्राभोवती वर्षभर फिरत राहणार होतं. 7 सप्टेंबरला चांद्रयानातलं लँडर विक्रम हे चंद्रावरच्या उंच पठारी भागावर उतरून चंद्राच्या मातीचं आणि खनिजांचं परीक्षण करून पाण्याचं अस्तित्व शोधण्याचं काम करणार होतं. चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्याचं कामही ते या दिवसांत करणार होतं. भारतातल्या सर्वच लोकांचे या मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. कथा कादंबर्यातला, कवितेतला चंद्र आता दूर राहणार नव्हता. त्याला भेटण्याची इच्छा पूर्ण होणार होती. चांद्रयानातली दोन उपकरणं पृथ्वीवरचे 14 दिवस इतका कालावधी चंद्रावर राहून वेळोवेळी माहिती पाठवणार होती. तसंच चांद्रयान चंद्राभोवती फिरत राहून चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्याचं काम करणार होतं. चंद्रावर असलेलं पाणी, तिथली खनिजं, तिथलं वातावरण यांचा अभ्यास चांद्रयान-2 करणार होतं. या मोहिमेचं नेतृत्व के. सिवन हे शास्त्रज्ञ करणार होते. तसंच विक्रम लँडर याचं नाव भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं होतं.
वरवर पाहता चांद्रयान-2चा चंद्रापर्यंतचा प्रवास सोपा वाटत असला तरी त्यात अनेक अडथळे होते, शास्त्रज्ञ ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते. या चांद्रयानाचं इंजिन क्रायोजेनिक आणि ताकदीचं हवं होतं. क्रायोजेनिक इंजिन म्हणजे नेमकं काय ही गोष्ट समजवून घेऊ.
अवकाशात उड्डाण करणार्या रॉकेटमध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य वापरलं जातं. कारण हायड्रोजनचा वापर करून कमी इंधनात मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करण्याचं काम हायड्रोजन करू शकतो. खरं तर हायड्रोजन मूलतः वायू स्वरूपात असतो. अशा अवस्थेत तो धोकादायकही असतो. तसंच या स्वरूपात त्याला इंजिनामध्ये वापरताही येत नाही. त्यामुळे हायड्रोजन द्रवरूपात साठवण्यासाठी आणि वापरात आणण्याच्या दृष्टीनं सोयीचं व्हावं यासाठी त्याचं तपमान मायनस 253 अंश ठेवावं लागतं. तसंच हायड्रोजनच्या ज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन देखील द्रवरूपात असणं गरजेचं असतं. यासाठी मायनस 187 अंशाची आवश्यकता असते. असं तपमान तयार करणं आणि ते मेंटेन करणं खूप कठीण काम असतं. कारण तपमान बदललं की त्या पदार्थाचे गुणधर्म बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून यासाठी शााज्ञांनी प्रयत्न केले आणि अखेर ते बाहुबली इंजिन बनवण्यात यशस्वी झाले. खरं तर बाहुबली तयार करतानाही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अनेक वेळा अपयशाशी सामना करावा लागला, अनेक अडथळे दूर करावे लागले.
तसंच या क्रायोजेनिक इंजिनाचं वजन कमी असणंही आवश्यक होतं. कारण जास्त उंचीवर न्यायचं असेल तर वजन कमी असण्याची आवश्यकता होती. या तयारीसाठीचे अथक प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ गेली 25 वर्षं रात्रंदिवस करत होते. 3 ते 4 टन वजन वाहून नेता येईल आणि 34 हजार उंचीपर्यंतचं अंतर पार करू शकेल असं इंजिन तयार करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करत होते. त्यासाठी प्रगत असलेल्या अमेरिका, रशिया, जपान आणि फ्रान्स देशांकडे याबाबत शास्त्रज्ञांनी मदतही मागितली होती, पण फक्त रशियाची इच्छा भारताला मदत करण्याची होती. मात्र पुढे काहीच झालं नाही. आता आपल्यालाच आपलं तंत्रज्ञान वापरून ही इंजिन तयार करावी लागणार हे उघड होतं आणि ते आव्हान भारतीय शास्त्रज्ञांनी स्वीकारायचं ठरवलं. 1990 नंतर बाहुबली हे अत्यंत ताकदवान इंजिन भारतानं तयार करण्यात यश मिळवलं.
त्यानंतर बाहुबली या क्रायोजेनिक इंजिनानं अपेक्षित उंचीपेक्षाही जास्त म्हणजे 6 हजार किमी उंचींचं अंतर पार करू शकण्याची क्षमता सिद्ध केली. बाहुबलीनं यशस्वी उड्डाण केलं. यामुळे चांद्रयानातल्या ऑर्बिटरजवळ जास्त इंधन शिल्लक राहणार होतं आणि त्याचाच फायदा म्हणजे ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी त्याला चंद्राभोवती फिरण्याचा लाभ होणार होता.
अशा रीतीनं चांद्रयान-2 हे पृथ्वीभोवती असलेल्या कक्षेत स्थिर झालं. 7 सप्टेंबर 2019 या दिवशी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर विक्रम लँडर पुढले 14 दिवस चंद्रावरच्या 500 मीटर अंतरात फिरून तिथली, माती, वातावरण, धूळ यांचे नमुने गोळा करणं, त्यांचं परीक्षण करणं अशी कामं पार पाडणार होतं. चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारा (यंत्राच्या साहाय्यानं) भारत हा जगातला चौथा देश ठरणार होता. चांद्रयान-2 च्या साहाय्यानं चंद्रावर असलेलं पाणी शोधणं हे मुख्य काम पार पडणारं होतं. त्यासाठी ते वर्षभर चंद्राभोवती फिरत राहणार होतं. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचे नकाशे काढण्याचं कामही केलं जाणार होतं. या सगळ्यात एक खूप मोठा अडथळा होता, तो म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यातलं 3लाख 84 हजार किमी अंतर पार करताना त्याची कक्षा स्थिर ठेवणं, त्यात योग्य वेळ साधून बदल करणं याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवणं आणि हे करताना त्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असणार होती. कक्षा निश्चित करताना चंद्र आणि पृथ्वी यांच्यात असणारी असमान गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशातल्या इतर वस्तू आणि सूर्याकडून येणार्या प्रारणांचा दाब या सगळ्यांचा अभ्यास अतिशय बारकाईनं करणं खूप महत्वाचं होतं. इतक्या प्रचंड दूर अंतरावरून सगळे अडथळे पार करून चांद्रयानाशी आपला संपर्क राखणं आणि वेळोवेळी त्याला सूचना देणं हे आव्हान अत्यंत कठीण होतं. हे सगळे अडथळे पार करून चंद्राच्या कक्षेत चांद्रयान स्थिर करायचं होतं. यात सूक्ष्मशी जरी गडबड झाली तरी चांद्रयान मोहीम अयशस्वी होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात होते. चांद्रयानावर सोलार एक्स-रे मॉनिटर, लार्ज एरिया सॉफ्ट एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर यासारखी अनेक संवेदनशील उपकरणं असणार होती आणि चंद्राच्या कक्षेतल्या वातावरणातचा अंदाज घेऊन ती उपकरणं सुरक्षित कशी राहतील हे बघणं देखील एक मोठं आव्हान असणार होतं आणि हे सगळं भारतीय शास्त्रज्ञांना पेलायचं होतं. तसंच यातला आणखी एक मोठा अडथळा म्ळणजे चंद्रावरच्या पृष्ठभागावर असलेल्या धूळीचा विक्रम लँडरच्या हालचालींना अडथळा ठरू शकणार होता. तसंच इतर उपकरणांनाही या टोकदार सूक्ष्म अशा धुळीचा त्रास झाला असता. तसंच चंद्रावर लँडर उतरल्यानंतर चांद्रयान आणि लँडर यांचा संपर्क तुटणार नाही याचीही काळजी घेणं खूप मोठं काम होतं. तसंच चंद्रावर असणारं तपमान यात काही ठिकाणी ते अतिउच्च, तर काही ठिकाणी अतिथंड असं असलं तर तेही एक प्रकारचं आव्हानच असणार होतं.
भारतानं आखलेली आणि कार्यान्व्ति केलेली चांद्रयान-2 मोहीम प्रत्यक्षात चंद्राच्या दिशेनं मार्गस्थ झाली. 3 लाख 84 किमी अंतर 6 दिवसांत कापायचं होतं. 20 ऑगस्ट 2019 या दिवशी चांद्रयान-2 हे चंद्राच्या कक्षेत दाखल होणार होतं. चांद्रयानानं उड्डाण केल्यापासून सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत होत्या. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर मात्र बुस्टरचा वेग कमी करण्यात येणार होता कारण चंद्राचं गुरुत्वाकर्षण बुस्टरला आपल्या कक्षेत खेचून घेणार होतं. 7 सप्टेंबरला सकाळी लँडर रोव्हर चंद्राच्या दक्षिण धु्रवाच्या आसपास उतरणार होतं. चंद्रावर उतरण्याचा हा कालावधी भारतीयांसाठी कमालीच्या उत्कंठेचा होता. 30 ऑगस्टला चांद्रयान-2 नं चंद्रेच्या कक्षेभोवती फिरत असताना आपली कक्षा कमी करायला सुरुवात केली. 1 सप्टेंबरला चांद्रयान चंद्रावर उतरण्याच्या तयारीत असणार होतं. चांद्रयान-2 पासून विक्रम रोव्हर विलग होणार होतं आणि चंद्रावर उतरणार होतं. त्यानंतर चंद्रावर राहून त्याचा चंद्राविषयीचा अभ्यास सुरू राहणार होता. ऑर्बिटरपासून विक्रम रोव्हर विलग होताच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या सूचना त्याला मिळणार होत्या.
विक्रम रोव्हर चंद्रावर कुठे उतरणार याच्या दोन जागाही इाोनं निश्चित केल्या होत्या. या दोन्ही जागा चंद्रावरच्या दोन विवरांच्या मध्ये होत्या. आणि त्या चंद्राच्या धु्रवीय भागात असल्यानं त्या भागात बर्फाच्या रुपात पाणी असल्याचं पूर्वीच्या संशोधनातून ठाऊक झालं होतं. तसंच तिथे असलेल्या जागेचा चढ-उतार या चांद्रयानाला उतरण्यासाठी योग्य असणार होता. तसंच चांद्रयानाची बॅटरी चार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाची म्हणजे सौर ऊर्जेची गरज लागणार होती आणि ती अनुकूल परिस्थिती त्याच जागेवर होती. तसंच या भागातलं विवर खूप मोठं आणि खोल असल्यानं त्याचं संशोधन देखील खूप महत्वाचं असणार होतं.
हे सगळं यशस्वीरीत्या घडावं आणि ती बातमी आपल्याला कळावी म्हणून भारतातले सगळे लोक रात्रभर जागे होते. प्रत्येकजण टीव्ही आणि इंटरनेट यांच्या सान्निध्यात होता. कधी एकदा विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर आपलं पाऊल ठेवेल अशी उत्कंठा प्रत्येकाला लागली होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली सगळी यंत्रणा आणि तयारी झालेली असली तरी ती पूर्णत्वाला जाईपर्यंत सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते. विक्रम लँडरमधली यंत्रणा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केल्याप्रमाणे अचूकपणे काम करत होती. विक्रम लँडर आता चंद्राच्या जमिनीपासून काहीच किमी अंतरावर होता आणि त्याच वेळी म्हणजे अवघं 2 किमी उंचीइतकं अंतर बाकी असताना विक्रम लँडरचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. चंद्रावर विक्रमचं सॉफ्टलँडिग होऊ शकलं नाही. विक्रम लँडरचा वेग कुठेतरी अचूक राहिला नाही. विक्रम लँडरचं हार्ड लँडिग झाल्यानं त्याचे ट्रान्सपाँडर खराब झाले असावेत आणि त्याचा ऑबिटर आणि इस्त्रोशी तुटला असावा असा अंदाज वैज्ञानिक करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास अशा रीतीनं नाहिसा झाला होता. मात्र अशा वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इाोचे प्रमुख के. सीवन यांचं जवळ घेऊन सांत्वन केलं. तसंच 130 कोटी भारतीयांच्या वतीनं त्यांनी इस्त्रोच्या सर्व टीमला आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत ही भावना दिली. कारण गेली 11 वर्षं इस्त्रोची अख्खी टीम चांद्रयान-2 या मोहिमेसाठी अहोरात्र परिश्रम घेत होती. (या प्रकरणातही राजकारण शिजलं असंही बोललं गेलं!)
अपयशातूनच उद्याचा यशाचा मार्ग गवसणार हे नक्की आहे. तसंच विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरलं असलं तरी पुढली 7 वर्षंतरी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत परिक्रमा करणार आहे. या काळात त्याचा चंद्राचा आणखी खोलात अभ्यास होईल. हा अभ्यास पुढली मोहीम यशस्वी करण्यात साहाय्य करेल यात काही शंकाच नाही!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment