वेध परिसंवाद - ऑर्किड - १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८

वेध परिसंवाद - ऑर्किड - १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८

परिवर्तनाच्या काळातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यासपीठं कशी असावीत? वेधचं स्थान काय असावं?

'वेध' या उपक्रमानं मुलांच्या करिअरपासून सुरुवात करून हळूहळू आबालवृद्धांना आकर्षित केलं आणि वेध म्हणजे जीवन की पाठशाला असं समीकरण गेल्या काही वर्षांत वाटायला लागलं. मलाही असंच वाटतं. करियर हा त्या विशिष्ट वयातल्या मुलांच्या जीवनातला एक टप्पा आपण हाताळत होतो. आता मात्र त्यांचं जगणं, त्यांच्या जीवनाची दिशा, त्यांची मूल्यं, त्यांना आयुष्याचा अर्थ सांगण्याचं काम वेध करतंय, करत राहील. त्या दृष्टीनं जीवनकी पाठशाला हे शीर्षक खूप बोलकं आहे. 

आज वेधच्या व्यासपीठावरून अनेक क्षेत्रात धडपडणारे, यश मिळवणारे, झपाटलेले, आपल्याच पराक्रमाचे विक्रम तोडणारे, साहित्य, संगीत, कला, क्रीडा यातले दिग्गज वेधच्या व्यासपीठावर आले, येताहेत आणि त्यांचं आयुष्य, त्यांचं कार्य, त्यांचं झपाटलेपण उपस्थितांसमोर अनोख्या पद्धतीनं डॉक्टर उलगडत आहेत. वेध उपक्रमातून घरी परतताना प्रत्येकजणच भारावलेला आिाण काहीतरी सोबत घेऊन गेलेला सापडतो. अशा वेळी मनात काही विचार येतात. की हा उपक्रम राबवताना आपली पाठपुराव्याची काही यंत्रणा, काही व्यवस्था आहे का? ही हजार मुलं जाताना आपल्यासोबत नेमकं काय घेऊन गेली, काय रुजवणूक झाली कसं मोजायचं, कसं बघायचं याची काही व्यवस्था आपण केली की एक इव्हेंट म्हणून आपण तो करून पुढे गेलो?

आजची तरुण पिढी हुशार आणि तेवढीच संवेदनशील देखील आहे. अशा मुलामुलींना मानसिकदृष्ट्या सशक्त बनवणं हा त्यांच्या जडणघडणीतला एक महत्वाचा मुद्दा आहे. वेग पकडलेल्या जागतिकीकरणाच्या रेट्यात आजच्या मुलांचं जगणं खूप कठीण झालंय. इच्छा असो वा नसो त्यांना धावावं लागतंय. या गतीमध्ये त्यांच्यात आपल्याला विवेकवाद, विज्ञानवाद, समता, समानता, मानवतावाद, पर्यावरणवाद ही मूल्यं रुजवण्याचं काम करायचं आहे. या गोष्टींची जाणीव, रुजवणूक कशा प्रकारे करता येईल यावर विचार करणं आवश्यक वाटतं. 

गतीच्या या चक्रात ‘मी’ च्या पलीकडे असलेलं जग आपली मुलं बघू शकताहेत का? हा खूप मोठा प्रश्न आहे. सगळीकडे व्यक्तिमत्व विकासाचे, यश कसं मिळवावं याची पुस्तकं आणि क्लासेस यांचा सुळसुळाट असताना (तेही आवश्यक आहे) हे सगळं मिळवूनही यशाचा मार्ग पिरॅमिडसारखा आहे. काहीजण त्या टोकापर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. बाकीचे तिथे पोहोचू शकणार नाहीत. यश आणि अपयश यांचा एका मर्यादेपेक्षा जास्त परिणाम आपल्या आयुष्यावर होणार नाही याची काळजी आपण घ्यावी लागणार आहे. जसं यश मिळाल्यानंतर हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवता येणं आणि अपयशानंतर कोलमडून न जाता पुन्हा सकारात्मक पद्धतीनं चालता येणं. तेव्हा त्याची त्यांना कोणी जाणीव करून दिली आहे का? 

बेकारी का आहे, बेकारीमागचं अर्थशास्त्र आणि आकडेवारी काय आहे याविषयी आपण मुलांना प्रश्नाच्या मुळाशी नेऊ शकतो का? काही महिन्यांपूर्वी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी पी. साईनाथ या ज्येष्ठ पत्रकाराची मुलाखत घेतली होती. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार होणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. 

उदाहरण घ्यायचं झालं तर मुलांमध्ये सामाजिक जाणिवा विकसित व्हाव्या यासाठी आपण मुलांना झोपडपट्टीत जाऊन सर्व्हे करायला लावला, तिथे जाऊन तिथल्या मुलांना शिकवायला लावलं तर प्रश्नाच्या मुळापर्यंत आपण गेलो असं होईल का? मला वाटतं हे काम तर करायला हवंच आहे. यामुळे मुलांना आपल्यासारखीच मुलं कसं जगताहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे जवळून बघता येईल आणि एकमेकांत संवाद, एक माणुसकीचं नातं तयार होईल. मात्र त्याचबरोबर त्यांना ही देखील जाणीव झाली पाहिजे की हे काम खूप व्यापक स्तरावर झालं पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो त्याला योग्य प्रकारे मिळालाच पाहिजे. एकीकडे पंचतारांकित शाळा आणि दुसरीकडे कुशल शिक्षकाची वाणवा आणि शाळेची दुरावस्था हे चित्र काय सांगतं? शिक्षणावर अंदाजपत्रकात दरवर्षी घट केली जाते. शिक्षणावर दरवर्षी ६%ची गरज असताना आपण तीन-साडेतीन टक्वे खर्च करतो. आरोग्यावर ५%ची गरज असताना आपण १.३% खर्च करतो. याचे दूरगामी परिणाम काय होत राहतात हे मुलांना-युवांना ठाऊक असतं का? आपण त्यांना हे योग्य वेळी माहीत करून देणार आहोत का? त्यासाठी सरकार कुठलंही असो, आपण दबावगट तयार करणार आहोत का? व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहोत का? हा प्रश्न देखील विचारात घेण्यासारखा आहे. 

युरोप, एशियन टायगर्स म्हणून संबोधले जाणारे देश यांच्याकडे शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर त्यांनी प्रचंड पैसा ओतला. त्यांच्या प्रगतीमागचं हे खूप मोठं कारण आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेतले मूलभूत प्रश्न समजून घेत त्यात काम करावं लागेल. आपलं शिक्षण सर्वांना समान पद्धतीनं दिलं जात नसेल तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? शिक्षण पुस्तकी न राहता त्याला कृतीची जोड असणार आहे का, जगताना त्याचा उपयोग होणार आहे का याचाही विचार करणं आवश्यक वाटतं. 

आपण शहरात वावरतो आहोत. आपलं कामही शहरातच विस्तारत आहे. मात्र आपण आपला देश एकीकडे कृषिप्रधान आहे असं म्हणतो, त्या वेळी शेतीचे प्रश्न, शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रश्न, सेंद्रीय शेतीचे प्रश्न, स्वामीनाथन आयोग, हरितक्रांतीत रसायनांचा केलेला घातक वापर यामुळे जमिनीचं झालेलं वाळवंटीकरण, फळं आणि भाज्या यावरच्या रसायनांच्या अतिरेकी वापरांमुळे माणसाचं आरोग्य कसं धोक्यात येऊ पाहतंय याचीही जाणीव आपल्या मुलांना आहे का? हे प्रश्न देखील आपले आहेत हे त्यांना कळलं पाहिजे. आज अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये जाऊन पहा. तिथे शिकणारी सगळी मुलं पुढे तुम्ही काय करणार विचारलं तर ९९ % मुलं आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असं उत्तर देतात. मग शेतीत कोण राहणार? शेती केवळ ज्याच्याकडे पैसा आहे त्यांचीच असणार का? खेड्यातून शहरात येणारे बेकारांचे लोंढे कसे थोपवणार? या प्रश्नांची तीव्रता आणि यावरचे उपाय यासाठी आपण त्यातल्या तज्ज्ञांशी बोलणार का?

यानंतर येतं ते सांस्कृतिक क्षेत्र! आपल्याकडे कलेला बाजारू स्वरूप येत चाललं आहे. टीव्ही असो वा इतर माध्यमं एक प्रकारचा थिल्लरपणा, उथळपणा सर्वत्र दिसतो आहे. अशा वातावरणात लहानपणापासून मुलांना वास्तवापासून दूर नेऊन त्यांच्या वयाला मारून आपण त्यांच्यावर काही थोपतो आहोत का याचाही विचार करावा लागणार आहे. कला म्हणजे जगण्यात आनंद भरणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला कोलाहलापासून दूर नेऊन गाभार्‍यातली शांतता देणारी बाब आहे हे मुलांना कशा प्रकारे समजवता येईल? नाहीतर वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आपण बोलके पोपट तयार करणार आहोत आणि खोट्या भावना, खोटे अश्रू, खोटं वागणं त्यांना शिकवणार आहोत. सुदैवानं आपल्याकडे सांस्कृतिक ठेवा खूप चांगल्या प्रकारचा आहे. आपल्याकडे चांगलं संगीत आहे, नृत्य आहे, विविध प्रांतातली चित्रकला आहे, हे सगळं आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो का? त्यातला आनंद घेणारी प्रभाकर कोलतेंसारखी माणसं मुलांसमोर आणणार का? जगण्यातली निर्भेळ आनंद देणारी गोष्ट म्हणून त्यांच्यात रुजवू शकतो का याचा विचार होणंही खूप आवश्यक वाटतं. 

आपल्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही तर मुलं एकतर निराश होतात किंवा व्यसनांकडे झुकतात. तेव्हा त्यांची मानसिक जडणघडण पक्की, मजबूत कशी करता येईल हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. मुलांची आजोबांची पिढी आणि मुलांची पिढी यातला सुसंवाद वाढायला हवा. म्हणजेच आधीच्या पिढीला आपल्याजवळचं देता येईल आणि आजच्या तरुणांचे प्रश्नही समजतील. 

याचप्रमाणे पर्यावरण या विषयाला 'वेध'मध्ये महत्वाचं स्थान द्यायला हवं. जागतिक स्तरावर पर्यांवरणीय वातावरण का बदलतंय, शहराशहरांमधलं प्रदूषण कशानं वाढतंय, सरकारी धोरणं याबाबतीत काय आहेत याबाबत सजग करतानाच वैयक्तिक पातळीवरही सायकल चालवण्यापासून आपण काय काय करू शकतो याचा विचार करणं आणि वेधसारख्या उपक्रमांमधून पर्यावरणतज्ज्ञांबरोबर गप्पा मारणं!
आज तंत्रज्ञानही जगण्याचा फार मोठा भाग आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, आज ही आवश्यक गरज बनली असून वेधसारख्या उपक्रमात त्याचा आवश्यक वापर कसा करता येईल आणि त्याचबरोबर त्यातले धोके देखील त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून जाणून घेता आले पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे ओढवलेली बेकारी, प्रदूषण, मानसिक विकार, हिंसा यांचं वाढणारं प्रमाण लक्षात आणून द्यायला हवं. 
अशा सर्वच पातळ्यांवरचे हे प्रश्न मनाला सतावत असताना मी वेधकडे खूप मोठ्या आशेनं बघते. वेधसारखी काम करणारी खूप मोजकी लोक मला आसपास दिसतात. आज ठाण्यात सुरू झालेलं वेध ११शहरांमध्ये पसरलं. आणि त्या त्या ठिकाणी आपलं वेगळं स्थान निर्माण करून आहे. मात्र हे आणखी तळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या पातळीवर मुद्दाम ठरवून काही नियोजन करणार आहोत का? दीपक पळशीकर, वंदना अंत्रे, धनंजय कुलकर्णी सारखे लोक तयार करणार आहोत का?

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शेती, आरेाग्य, तंत्रज्ञान, पर्यावरण या सगळ्या क्षेत्रांचा विचार करून आपण वेध आणखी व्यापक पातळीवर नेला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आपण आपल्या टीमलाही प्रशिक्षित कसं करता येईल, ती कशी वाढवता येईल, या नियोजनामध्ये ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत  त्यांचेही प्रतिनिधी यात सामील करून आपण कसे पुढे जाऊ हाही विचार आपण करूयात आणि वेधला खरोखरंच जीवनकी पाठशाला बनवूयात. 

दीपा देशमुख, पुणे.

 

 

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.