किशोरची 'किरणं' वेध कट्टयावर !

किशोरची 'किरणं' वेध कट्टयावर !

पुणे वेध कट्टयावरची सायंकाळ काल चांगलीच रंगली. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. आम्ही पोहोचताच काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला. 
किरण नावाचा एक मुलगा किनवटसारख्या नक्षलवादी, मागासलेल्या भागात राहतो. अनेक वेळा निरपराध तरूणांच्या नक्षलवादी या शंकेने झालेल्या हत्याही बघतो.  मध्येच काही कारणानं शिक्षण थांबतं आणि त्या वेळी तो जीप, ट्रक सह वेगवेगळी वाहनं चालवायला लागतो. तेच आपलं काम असंही काही काळ त्याला वाटायला लागतं. या काळात मारामारी, थोडीफार दादागिरी त्यानं केली आणि त्याचा परिणाम १० ते ११ केसेस त्याच्याविरोधात कोर्टात दाखल झाल्या. या सगळ्या केसेसमधून त्याची निदोर्ष मुक्तता झाली. इथून आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. थांबलेलं शिक्षण पुन्हा सुरू झालं. 
वडिलांनी दिलेला वाचनाचा वारसा, आईनं मुलासाठी ‘त्यानं खूप शिकावं’ हे बघितलेलं स्वप्न, त्याचे प्रोत्साहन देणारे शिक्षक, किनवट चा सुंदर निसर्ग आणि मिळालेले अनुभव यातून किरण खूप शिकला. अपेक्षित प्रश्नसंच विकत घेऊन द्यावा म्हणून  किरणनं आपल्या आईजवळ हट्ट धरला. तिनं ती पुस्तकं दिली नाही तर मी नापास होईल असं किरणनं म्हटल्याबरोबर किरणची आई चपापली. हा खर्च अशक्य असतानाही तिनं एका बांधकामाच्या साईटवर जाऊन मजुरी करायला सुरुवात केली. किरणनं हे दृश्य बघितलं तेव्हा आपल्यासाठी तिला झालेला त्रास त्याला अस्वस्थ करून गेला. 

बाबा आमटे यांच्या श्रमछावणी संस्काराचा परिणामही किरणवर मोठ्या प्रमाणात झाला. किरण पुण्यात आला. इथल्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात आणि रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकला. आपला पहिला क्रमांक त्यानं कधी सोडला नाही. स्पर्धा परीक्षेतल्या यशानंतर मंत्रालयात माहिती विभागात साहाय्यक संचालक (गॅझिटेड ऑफिसर) म्हणून कामाच अनुभव घेतला. तिथे असताना लोकराज्य या नियतकालिकाचं काम अतिशय उत्तमरीत्या सांभाळलं. वाई इथे विश्वकोष निर्मितीत काम केलं. 

मुलं हीच भविष्य घडवणारी आणि राष्ट्राला भक्कम बनवणारी असल्यानं त्यांचं वाचन, त्यांचं शिक्षण, त्यांची मानसिकता यावर खूप खोलवर विचार किरण करत असायचा. यातूनच त्याच्या मनानं ओढ घेतली आणि तो किशोरचा संपादक झाला. किशोर मासिकाचं महत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. किरणनं किशोरला आणखी सक्षम आणि सुंदर केलं. आबालवृध्द साऱ्यांनाच कल्पनेची सैर करून आणली पण त्याचबरोबर वास्तवाचं भानही दिलं. आज खेडयापाड्यातली मुलंच नव्हे तर शेतमजूर असो की एखादा अर्धशिक्षित प्लंबर - तो आवडीनं किशोर वाचतो. 

ड्रायव्हर ते डायरेक्टर या प्रवासात किरणला पावलोपावली संकटं आली. पण त्याचा बाऊ त्यानं केला नाही. ड्रायव्हर म्हणून फिरताना त्यानं लाज बाळगली नाही, उलट त्या प्रवासाचा, प्रवासात भेटलेल्या माणसांचा आणि दिसलेल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना भाषेवरून, उच्चारांवरून, राहण्यावरून, पायात घातलेल्या स्लीपरवरून त्याला न्यूनगंडाची भावना निर्माण व्हावी असं वातावरणही काही काळ निर्माण झालं. पण किरणनं आपली मुळं सोडली नाहीत. ती घट्ट धरून ठेवली आणि तो जसा आहे तसा लोकांना त्याला स्वीकारावंच लागलं.  जाईल तिथे त्याच्या रंगावरून त्याच्या जातीबद्दल कुतूहलानं विचारलं जाई आणि मानवता हा एकच धर्म मानणारा किरण वाट्टेल त्या जातीचा आणि धर्माचा उल्लेख करत असे. याचा परिणाम म्हणजे त्याला घर द्यायला कोणी तयार नसायचं. अशा वेळी वाईमध्ये तर किरणनं आपल्या शिपायाच्या घरी भाड्यानं राहायला सुरुवात केली आणि तिथल्या झोपडपट्टीतल्या १०० मुलांना शिकवायला सुरुवात केली. 

किरणनं आपल्या मुलांची नावं निसर्ग आणि बेनझिर अशी ठेवली आहेत. तसंच शाळेमध्ये मुलांच्या फॉर्ममध्ये जात आणि धर्म यात मानवता एवढंच लिहिलं आहे. ते लिहितानाही त्याला संघर्ष करावा लागला. पण तो मागे हटला नाही. 

'किशोर'ला आणखी समृद्ध करण्यासाठी, मुलांच्या जाणिवांना नवीन पंख देण्यासाठी किरण सातत्यानं काम करतो आहे. त्याच्या कामाचा आनंद त्याला आणखी पुढे जायचं बळ देतो आहे. 
मी मुलाखत संपवताना उपस्थितांच्या वतीनं आणि पुणे वेध कट्टाच्या वतीनं किरणला शुभेच्छा दिल्या. पुणे वेध कट्टा विषयी प्रदीप कुलकर्णी यांनी माहिती दिली, तर डॉ. ज्योती शिरोडकर हिने आभार मानले. आभार प्रदर्शन हा एक अतिशय कंटाळवाणा आणि रूक्ष पण तरीही आवश्यक कार्यक्रम असताना ज्योतीच्या तोंडून आभार ऐकणं हा नितांत सुंदर अनुभव असतो, जो कालही मी पुन्हा एकदा अनुभवला. 
कालच्या कार्यक्रमात बेरीज-वजाबाकी या चित्रपटाचं प्रमोशन करायला शर्व कुलकर्णी हा अभिनेता आला होता. या प्रसंगी श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या राजीव तांबेनं गमतीनं म्हटलं, मी बेरीज-वजाबाकी हा चित्रपट मुळीच बघणार नाही. कारण माझं गणित चांगलं नाही. मी जर हा चित्रपट बघितला तर उद्या तुम्ही भागाकार-गुणाकार असा चित्रपट काढाल आणि मग तीही गणितं मला येत नाहीत, अशा वेळी मी काय करायचं? राजीव तांबे याला वेळेवर असं बोलायला कसं सुचतं याचं मला नेहमीच कुतूहल वाटतं. 

काल कल्याण तावरे, मधुरा-विप्रा, अर्चना जाना, महावीर-इंदुमती जोंधळे, जयश्री-विश्वास काळे, लेखिका रमा नाडगौडा, धनंजय सरदेशपांडे, रेणुका माडीवाले, आसावरी कुलकर्णी आणि ऐश्वर्या या सगळ्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमात जास्तच बहार आली. नेहमीप्रमाणेच दीपक पळशीकर/प्रतिमा पळशीकर, वृंदा असे सर्वच कार्यक्रमासाठी झटत होते. धनंजय भावलेकर आणि त्याची टीम खास करून व्हिडीओ शूट करण्यासाठी आली होती. कितीतरी वर्षांनी जोंधळे पतीपत्नीला भेटून इतकं छान वाटलं की शब्दच नाहीत.

वेध टीमच्या वतीनं गरमागरम वडापाव आणि चहा दिल्यामुळे तर सगळ्यांची कळी आणखीनच खुलली. मला स्वतःला अनन्या या गोड मुलीला भेटून छान वाटलं. अनन्याचं खेळातलं प्रावीण्य ऐकून अभिमान आणि आनंद वाटला. 
घरी परतताना माझ्या डोळ्यासमोर काळ्या-सावळ्या रंगाचा, अंगात भडक रंगाचा शर्ट घातलेला, गळ्यात लाल रंगाचा रुमाल असलेला, हातात कडे आणि गळ्यात साखळ्या अडकवलेला आणि खिशात चाकू बाळगणारा एक तरूण दिसला. याच तरुणात बदल होत होत तो काहीच क्षणात मला वेगळाच दिसू लागला. हा तरूण पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरच्या बालभारतीच्या इमारतीत एका पॉश केबिनमध्ये पुस्तकांच्या गराड्यात टापटीप रुपात बसला होता आणि मला बघताच हसत ‘दीपाताय, या’ म्हणत स्वागत करत होता! 

दीपा देशमुख, पुणे. 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.