साल्वादोर दाली - पुरुष उवाच दिवाळी 2015 

साल्वादोर दाली - पुरुष उवाच दिवाळी 2015 

विसाव्या शतकातला साल्वादोर दाली हा अत्यंत प्रभावशाली, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेला विचित्र आणि विक्षिप्त असा स्पॅनिश कलावंत होऊन गेला. त्याची सररिअ‍ॅलिझम शैलीत काढलेली चित्रं खूपच प्रसिद्ध आहेत. दालीनं आपल्या आयुष्यात 1500 वर चित्रं रंगवली आणि शेकडो चित्रं रेखाटली. चित्रकारितेबरोबरच त्यानं शिल्पकला, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, फॅशन, जाहिरातक्षेत्र, लिखाण, फिल्ममेकिंग या सगळ्याच क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला. दालीचं काम सररिअ‍ॅलिस्टिक शैलीत जरी जास्त करून ओळखलं जात असलं तरी त्याची अनेक चित्रं ही अभिजात शैलीतली आणि रेनेसान्स काळाचा प्रभाव असलेली आहेत. दालीला पिकासो हा जगप्रसिद्ध चित्रकार खूप आवडायचा. 

साल्वादोर दालीबद्दल जाणून घेतानाच सररिअ‍ॅलिझम म्हणजे काय हेही समजून घ्यावं लागेल.
पहिल्या महायुद्धानंतर कलेतलं पुढचं पाऊल म्हणून पॅरिसमध्ये सररिअ‍ॅलिझम शैलीचा (अतिवास्तववाद) उदय झाला. अँड्री बर्टान, लुईस आगॅन आणि फिलीपी साउपाउल्ट या तिघांच्या पुढाकारानं ती एक मोठी साहित्यिक चळवळच बनली. ‘सररिअ‍ॅलिस्टिक कलाकारांच्या जाणिवा या तर्कमुक्त असल्या पाहिजेत किंवा त्या कार्यकारणभावावर देखील आधारित असायला नकोत’ असं त्यांचं म्हणणं होतं. 
सररिअ‍ॅलिझम हा मुख्यतः स्वप्नावर आधारलेला असून स्वप्नाइतकीच लवचिक असणारी कल्पनाशक्ती हा सररिअ‍ॅलिझमचा पाया आहे. मनाच्या सबकॉन्शस (अर्धजागृत) पातळीवर ज्या गोष्टी घडतात त्या लवचीक आणि स्वैर असतात आणि त्या सगळ्या नैतिक कल्पनांपासून मुक्तही असतात. त्या गोष्टी काळाच्या मर्यादाही मानत नाहीत. त्या काळातले सररिअ‍ॅलिस्टिक चित्रकार स्वतःला सुप्त अवस्थेत उमटणारा ध्वनी टिपून घेणारी यंत्रं समजत असत. स्वप्नं ही मनाच्या पुष्कळशा समस्या सोडवू शकतात असं त्यांना मनापासून वाटे. त्यामुळेच या चित्रकारांनी काल्पनिक जगातल्या वस्तू गोळा करून मांडाव्यात तशी चित्रं रंगवायला सुरुवात केली. साल्वादोर दाली, मार्क शॅगाल, जुऑन मिरो आणि मॅक्स एर्न्स्ट हे कलाकार सररिअ‍ॅलिझमचे खंदे पुरस्कर्ते होते.

दालीवर सिग्मंड फ्रॉईडच्या विचारांचा अतिशय मोठा प्रभाव होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की फॉईडनं आपल्या अंतर्मनातल्या विचारांचं जे स्पष्टीकरण दिलंय, त्या अर्थानं माणसाच्या मनात खोलवर रुजलेल्या विचारांना व्यक्त करणं हे चित्रांचं आणि लिखाणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. 1899 मध्ये फ्रॉईडनं ‘इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम’ नावाचं पुस्तक लिहिलं. ‘आपल्या आठवणी, आपल्या अंतःप्रेरणा आणि आपल्या मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) या मानवी मनाचेच अविभाज्य भाग आहेत किंवा हिस्सा आहेत. या सगळ्या प्रेरणा आपल्या नेणिवेत (अबोध मनात किंवा सबकॉन्शस पातळीवर) असतात आणि त्या आपल्या स्वप्नांमधून बर्‍याच वेळेला व्यक्त होतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांचं चिकित्सक विश्लेषण केलं, तर आपल्याला मनाच्या तळाशी असलेल्या भावनांचा वेध घेता येतो’ असं फ्रॉईडचं म्हणणं होतं. तसंच आपल्या मनाच्या कारभाराची गुंतागुंतीची जी पद्धत आहे, ती पद्धत समजून घेण्याच्या आणि मनाच्या तळाशी दडलेल्या भावना शोधण्याच्या काही पद्धती असू शकतात. त्यातली एक पद्धत म्हणजे ‘प्रीअ‍ॅसोशिएशन’ होय. त्यात माणूस फार विवेकवादानं विचार करत नाही, तर तो अंतःप्रेरणेवर भर देऊन विचार करतो. मग असंख्य लेखक, शिल्पकार आणि चित्रकार सरिअ‍ॅलिस्टिक ग्रुपला येऊन जॉईन झाले. या सगळ्या चित्रकारांनी आणि साहित्यिकांनी जाणीवपूर्वक विचार करण्याचं सोडूनच दिलं आणि त्यांचे पेन्स, पेन्सिली आणि त्यांचे ब्रश हे कागदावर शब्दांमधून, रेषांमधून किंवा आकारांमधून जे जे उमटतील ते ते त्यांनी मोकळेपणानं होऊ दिलं. असं केल्यामुळे आपल्या अंतर्मनातलं सगळं आपोआप कॅनव्हासवर उतरायला लागेल असं त्यांना वाटे. आपल्या नेणीवेत कल्पनांचा खरा स्त्रोत आहे आणि तिथेच सगळ्या नवनवीन कल्पना आकाराला येतात. त्यामुळे उच्चतम सर्जनशीलता गाठायची असेल, तर तुम्हाला तुमच्या जाणिवा नेणिवेमध्ये वितळून टाकाव्या लागतील आणि तसं करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या स्वप्नात जे जे येतं, ज्या ज्या फॅन्टसीज येतात त्या सगळ्या रोजच्या जीवनाशी जोडता आल्या पाहिजेत. या दोन्हीच्या मिलाफातून जास्तीत जास्त सर्जनाचा उच्चतम आविष्कार साधता येतो असं सररिअ‍ॅलिस्टिक मंडळींचं म्हणणं होतं.

या महान प्रतिभाशाली, प्रचंड सर्जनशील पण प्रचंड विक्षीप्त अशा चित्रकाराचा जन्म 11 मे 1904 ला फ़िगारेस या स्पेन मधल्या एका छोट्याश्या निसर्गरम्य शहरात झाला. आपल्या जन्माच्या या घटनेला दाली मोठा झाल्यावर ‘द मोस्ट सिग्निफिकंट इव्हेंट’ असं  म्हणत असे आणि वर ‘मला जन्माला येतानाच्या वेदना अजूनही स्प्ष्ट आठवतात’ असंही तितकाच गंभीर चेहरा करून म्हणत असे. त्याचे वडील वकील आणि नोटरी म्हणून काम करत. दालीची आई फीलिपा ही कलेची भोक्ती होती आणि तिच्याचमुळे दालीला कलेची आवड निर्माण झाली. दालीचे वडील कडक शिस्तीचे आणि अतिशय नास्तिक, तर आई प्रचंड धार्मिक असल्यामुळे दाली नेहमीच कात्रीत सापडलेला असे.  त्याचं घरातलं टोपणनाव अ‍ॅविदा डॉलर्स असं होतं. त्याचा अर्थ ‘डॉलर्ससाठी आतुर असलेला’ असा होतो. 
दाली विचित्र असण्याचं कारण त्याच्या बालपणात सापडतं. दालीच्या जन्मापूर्वी त्याच्या आईनं एका मुलाला जन्म दिला होता आणि त्याचं नाव साल्वादोरच ठेवलं  होतं. पण तो पोटाचं (गॅस्ट्रोएन्टरायटिस) इन्फेक्शन झाल्यानं 22 महिन्यांचा असतानाच मृत्यूमुखी पडला. त्यानंतर बरोबर नऊच महिन्यात दाली जन्मला. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना आपला गेलेला मुलगाच परत जन्म घेऊन आला असं वाटायला लागलं आणि त्यांनी या दुसर्‍या मुलाचं नावही साल्वादोर दालीच ठेवलं. दालीचे खूपच लाड व्हायला लागले आणि त्याचा प्रत्येक शब्द झेलला जायला लागला. 

साल्वादोर दाली पाच वर्षांचा असताना त्याचे आई-वडील त्याला आपल्या पहिल्या मुलाच्या समाधीजवळ घेऊन गेले आणि त्यांनी त्याला त्याच्या पुनर्जन्माची गोष्ट ठामपणे सांगितली. या प्रसंगाचा पाच वर्षांच्या दालीवर आणि त्याच्या पुढच्या कामावर प्रचंड मोठा परिणाम झाला. या प्रसंगामुळे ‘आपण आणि आपला मृत भाऊ म्हणजे जणू काही पाण्याचे दोन थेंब असून आपली रिफ्लेक्शन्स ही वेगळी आहेत.’ असं तो म्हणायला लागला. तसंच आपल्या मृत भावाचं नाव आपल्याला देऊन आई-वडिलांनी खरं पाहता मोठा अपराधच केला आहे असंही त्याला वाटायचं.  पुढे 1963 साली वयाच्या 59 व्या वर्षी त्यानं ‘माय डेड ब्रदर’ नावाचं चित्रही तैलरंगात रंगवलं. गडद आणि फिक्या रंगातल्या चेरी स्वर्गातून पडताना या चित्रात दाखवल्या आहेत. तसंच हे चित्र वर्तमानपत्र आणि पॉप आर्ट यांचीही आठवण देणारं वाटतं. दालीच्या मते हे चित्र केवळ त्याच्या गेलेल्या भावाचं नसून ते दोघां भावांचं प्रतिनिधीत्व करतं. कोसळणार्‍या चेरीची कल्पना दालीच्या सर्जनशीलतेचं द्योतक आहे. ‘मी माझ्या गरीब भावाच्या प्रतिमेचा रोजच खून करतो’ असंही दाली म्हणत असे.

लहानपणी एकदा एका जखमी वटवाघुळाची दया येऊन दालीनं त्याला घरी आणलं आणि बादलीत ठेवलं. दाली त्याची खूप काळजी घेत असे. ते वटवाघुळ जिवंत राहावं यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत असे. एके दिवशी दालीच्या डोळ्यासमोर मुंग्यांनी त्या जिवंत वटवाघुळावर हल्ला करून त्याला खाऊन टाकलं. या घटनेचाही छोट्या दालीच्या मनावर खूपच परिणाम झाला आणि त्यामुळेच तेव्हापासून दालीला मुंग्या आणि नाकतोडा यांची प्रचंड भीती वाटायला लागली. त्याच्या अनेक चित्रांमधून भीतीचं प्रतीक म्हणून सातत्यानं त्यानं ते रंगवलं. दालीच्या अनेक चित्रांमध्ये त्याच्या वडिलांच्या धाकाचा आणि शिस्तीचा झालेला परिणाम दिसतो असं अनेक अभ्यासक म्हणतात.

दालीला लहानपणापासूनच सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायला खूप आवडत असे. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला मागे पुढे बघत नसे. कधी कधी आईची फेसपावडर घेऊन तोंडाला भरपूर लाव, तर कधी राजासारखा ड्रेस घालून फिर, कधी केस लांब वाढव, तर कधी लांब काडी हाता घेऊन फिर असे नाना प्रकार तो करत असे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी आपल्याकडे बघावं आणि आपणच केंद्रभागी असावं यासाठी तो विनाकारण उड्या तरी मारे किंवा काहीतरी चित्रविचित्र पेहराव करून आपोआपच लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेत असे आणि या गोष्टीचा त्याला आनंदही होत असे.  हातात छोटी स्टिक घेऊन फिरायची त्याची सवय मात्र पुढेही शेवटपर्यंत टिकून राहिली.

दालीचं आपल्या आईवर खूप प्रेम असल्यामुळे तो तिला ‘हनी इन द फॅमिली’ असं म्हणत असे. दालीचे वडील लहानपणी त्याला चार्ली चॅप्लीनचे सिनेमे बघायला आवडीनं नेत. तसंच ते त्याला बार्सिलोनालाही घेऊन जात. तिथे ‘फोर कॅट’ नावाच्या कॅफेत ते त्याला आवर्जून नेत. त्या कॅफेत पिकासो, मिरो असे चित्रकार आणि अनेक लेखक, बुद्धिवंत यांच्या वादचर्चा रंगलेल्या असत. कॅटोलोनिया या शहरात असलेले अतिशय सुंदर असे कॅथेड्रल्स बघायला देखील दालीचे वडील त्याला घेऊन जात. याच कारणामुळे दाली ही दोन शहरं कधीच विसरू शकला नाही. पुढे कॅटोलोनियापासून स्पेन वेगळा झाला पाहिजे या आंदोलनाला दालीनं पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम असा झाला की त्याला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला. 

 दालीला अ‍ॅना मारिया नावाची एक लहान बहीणही होती. पुढे दालीनं तिची खूप सुंदर अशी चित्रं काढली.  पुढे 1949 साली अ‍ॅना मारियानं दालीवर ‘दाली अ‍ॅज सीन बाय हिज सिस्टर’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. दालीला खूप लहान वयातच चित्रं काढण्याचा नाद जडला. खरं तर त्याला चित्रं काढताना पाहून त्याच्या वडिलांनी मोठ्या कौतुकानं दालीला चित्रकारांची चित्रं असलेलं ‘गोवन्स आर्ट बुक’ हे 52 भाग असलेलं महागडं  पुस्तक त्याला आणून दिलं. मग काय दाली दिवसभर त्या पुस्तकातली चित्रं बघण्यात गुंग होऊन जात असे. सुरुवातीला दाली शेत आणि फॅक्टरीची चिमणी अशी साधी, सोपी चित्रं काढत असे. 

सुट्टी लागली की दाली आपल्या आई-वडिलांबरोबर कॅडाक्वेस या समुद्रकिनारी वसलेल्या सुंदर गावात सुटी घालवायला जात असे. तिथे रॅमन पिचोट हा दालीच्या वडिलांचा इंप्रेशनिस्ट चित्रकार मित्र राहत होता. त्याची आणि पिकासोचीही चांगलीच ओळख होती आणि पिकासो कॅडाक्वेसला आल्यावर त्यांच्याच घरी राहून चित्रं काढत असे असं रॅमन अभिमानानं सगळ्यांना सांगायचा. दाली आणि अ‍ॅना समुद्रकिनार्‍यावर तासन्तास बागडत असत. तिथल्या दगडांचं निरीक्षण करत. लहानपणी जे बघितलं, तेच दालीच्या मनात रुजलं. कारण पुढे समुद्र, समुद्रातले खडक हेही त्याच्या चित्रांचा महत्त्वाचा हिस्सा बनले. त्यातच रॅमनची चित्रं त्याच्या घरभर लावलेली असत. दाली ती चित्रं भान हरपून बघत बसे. दालीला फूटबॉल खेळायलाही खूप आवडे.

पिचोट कुटुंबातले लोक सगळे कलाकारच होते. कोणी व्हायोलिनमधला एक्स्पर्ट तर कोणी ऑपेरा सिंगर! दालीला त्यांच्या सहवासात खूपच मजा येत असे. रॅमनकडून त्याला चित्रकलेमधल्या अनेक गोष्टी कळल्या. खरं तर मॉडर्न आर्टचा शोध त्याला पिचोट कुटुंबामुळेच लागला. ते गाव आणि ते कुटूंब दालीसाठी अविस्मरणीय आठवण होती.
1916 मध्ये दाली ला फिगारेसच्या म्युनिसिपल स्कूल ऑफ आर्ट मध्ये जायला लागला. तिथे जुऑन न्युनेझ फर्नाडिंस या गुरूनं दालीमधली प्रतिभाशक्ती ओळखली आणि तो दालीला वारंवार आपल्या घरी बोलावत असे. रेम्ब्राँ या चित्रकाराचे रंगाचे स्टोक्स आणि त्याची शैली याविषयी त्याच्याबरोबर चर्चा करत असे. दालीवर न्युनेझचा खूपच प्रभाव पडला. खरं तर न्युनेझनं दालीच्या मनात महत्त्वाकांक्षेचं बीज पेरलं. दालीला न्युनेझबद्दल नेहमीच कृतज्ञभाव वाटत राहिला. 1918 साली फिगारेसच्या लोकल आर्ट शोमध्ये दालीनं आपली दोन चित्रं ठेवली. गंमत म्हणजे तेव्हाच्या एम्पोरडिया या वर्तमानत्रात दालीचं खूपच कौतुक केलं गेलं होतं. ‘दाली हा असा माणूस आहे की तो प्रकाश अनुभवतो आणि याच मुळे भविष्यात तो एक थोर चित्रकार बनेल अशी आमची खात्री आहे’ असं त्या वर्तमान पत्रात छापून आलं होतं. पहिल्याच जाहीर प्रदर्शनातल्या चित्रांबद्दल असं लिहून येणं हे दालीसाठी खूपच प्रशंसनीय होतं.

पण 1921 मध्ये दालीची आई स्तनाच्या कर्करोगानं वारली आणि दालीसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्याच्या आईवर त्याची खूप भक्ती होती. दालीच्या वडिलांनी काहीच दिवसांत फीलिपाच्या कॅटरिना नावाच्या बहिणीशीच दुसरं लग्न केलं. दालीला आपल्या मावशीविषयी देखील तितकंच प्रेम आणि आदर वाटे.

दालीला पुढे त्याच्या वडिलांनी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ फर्नांडो माद्रिद या प्रतिष्ठित अशा आर्ट स्कूलमध्ये टाकलं. हे आर्ट स्कूल त्या काळी एवढं नावाजलेलं होतं की तिथे गेस्ट लेक्चर देण्यासाठी आईन्स्टाईन, एच.जी.वेल्स, अर्थतज्ज्ञ केन्स यासारखे दिग्गज येत असत. दालीची प्रतिभा याच वातावरणात फुलली. त्याला इथेच अनेक नवीन मित्र मिळाले. फेड्रिको, गारसिया लोर्का हा त्याचा मित्र खूप मोठा कवी होता. लोर्का हा गे होता. पण दाली आणि लोर्का यांची खूपच घनिष्ठ मैत्री होती. दोघांनाही तेव्हाच्या सर्वसामान्य लोकांच्या कलेच्या आवडीबद्दल आश्चर्य वाटायचं. खरं तर त्यांना मध्यमवर्गीय वृत्तीचा रागच येत असे. अशा लोकांसाठी त्यांनी प्युटरेफॅक्टोज असं नावच ठेवलं होतं. अशा प्युटरेफॅक्टोज लोकांची खिल्ली उडवण्यासाठी दालीनं अनेक चित्रं काढली होती, तर लोर्कानं अशा वर्गावर खच्चून कविता केल्या होत्या. त्या वेळच्या रोमँटिसिझमची शैली त्यांना आवडत नसे. 
1925 साली दालीनं लोर्काला आपल्या घरी सुटी घालवण्यासाठी निमंत्रण दिलं. दालीचं घर समुद्रकिनारी होतं.  या दिवसांत लोर्कानं दालीवर एक कविता लिहिली.  ‘तुझी चित्रं आणि तुझं आयुष्य फुलून येवो आणि तार्‍यांसारखा तू चमकत राहोस’ अशा अर्थाची ती कविता होती. लोर्काबरोबर दालीची मैत्री शेवटपर्यंत टिकली. फक्त विरोधाभास असा की 1936 च्या स्पेनच्या यादवी युद्धात लोर्काला जनरल फ्रँको यानं मारलं. पण तरीही दालीचं मात्र फ्रँकोच्या विचारसरणीला आणि कृतीला समर्थन होतं ही आश्चर्य वाटावी अशीच गोष्ट होती. 

1926 मध्ये ‘ द बास्केट ऑफ ब्रेड’ हे रिअ‍ॅलिस्टिक शैलीत दालीनं चित्र काढलं. त्यानंतर तो पॅरिसला गेला असताना त्यानं पिकासोची भेट घेतली. जोआन मिरो या कलाकाराकडून आधीच दालीबद्दल खूप काही पिकासोनं ऐकलं होतंच. त्यामुळे पिकासोनं दालीचं चांगल्या तर्‍हेनं स्वागत केलं. पिकासो आणि मिरो यांच्या प्रभावामुळे दालीनं क्युबिस्ट शैलीची अनेक चित्रं काढली असली, तरी ती काढत असताना त्यानं स्वतःची देखील एक स्वतंत्र शैली त्यातून विकसित केली. क्लासिकल आणि मॉडर्न अशी दोन्हीही तंत्रं आपल्या चित्रांमधून दाखवायला दालीला आवडत. म्हणून पिकासो आणि मिरो यांच्याबरोबरच राफाएल, ब्रॉन्झिनो, फ्रान्सिस्को द जरबरान, दिएगो व्हेलाक्वेझ आणि वर्मिर यांचीही चित्रंशैली त्याला खूप आवडत असे. 

दाली आपल्या विचित्र चित्रांनी लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेई, त्याच्या या अटेंशन सिकिंगमुळे त्या काळचे समीक्षक आणि टीकाकार तर त्याच्यावर पार वैतागून जात. कधी चित्रांशिवाय देखील आपल्या वागणुकीनं लोकांना आपल्याकडे खेचून घेई. दाली एक सेलेब्रिटीच झाल्यानं त्याला हॉलिवूडपासून अनेक बड्याबड्या पार्ट्यांचं निमंत्रण असे. तो हौाशीनं अशा पार्ट्यांना आवर्जून जात असे आणि तिथे जाताना काहीतरी चित्रविचित्र पोशाख कर, कुठे मिशांमध्ये फूल ओवून जा, तर कधी चेहर्‍यावर पेटिंग कर असे प्रयोग करून जात असे. दालीनं क्युबिस्ट प्रकारातली चित्रं काढायला सुरुवात केली. तो इतका व्हर्सटाईल होता की त्यानं नवनवीन प्रकार शोधून काढले. त्यानं शरीरावरही आपली चित्रकारिता दाखवली. फक्त शरीरच नाही, तर हाडांनाही त्यानं माध्यम बनवलं. दालीनं क्युबिझम आणि दादाइझम या दोन्ही शैलीत खूप प्रयोग केले. इतकंच नाही तर त्यानं त्यावर पुस्तकही लिहिलं. 

 दालीचा दुसरा मित्र लुई   ब्युन्युएल याचं अतिशय अप्रतिम असं व्यक्तिचित्र दालीनं रंगवलं. लुई  नंतर खूप मोठा सरिअ‍ॅलिस्टिक शैलीचे चित्रपट बनवणारा निर्माता बनला. दाली, लोर्का आणि लुई  हे तिघं मित्र खूपच मौजमजा करत. अगदी माद्रिदमधल्या नाईट क्लबमध्ये जाऊन दारू पीत. दाली तर दारूच्या ग्लासमध्ये नोट टाकायचा. ती नोट दारूत भिजून भिजट झाली की मग ती दारू एका दमात पिऊन टाकायचा. असं काही करताना पुन्हा आजूबाजूचे अनेक लोक बघत आणि दालीला हे सगळं हवं असायचंच. आपले पाय उघडे दाखवणं त्याला सहसा आवडत नसे. तसंच त्याला सूक्ष्म जंतूंची खूप भीती वाटे. त्यामुळे तो प्यायचं पाणी असो वा खाद्यपदार्थ, बराच वेळ निरीक्षण करून, पुन्हा एकदा स्वच्छ करून मगच तो खात असे. त्याला अचूक पैसे मोजता येत नसत. त्यामुळे तो स्वतःवरच वैतागत असे.

दाली आणि लुई  यांनी 1929 साली मिळून एक भयंकर अशी सरिअ‍ॅलिस्टिक फिल्म बनवली होती. ‘अ‍ॅन अनडल्यूशियन डॉग’ असं त्या 17 मीनिटाच्या फिल्मचं  नाव होतं. त्यात एका प्रसंगात एका माणसाच्या हातातून मुंग्या येत असतात आणि एका पियानोवर एक मेलेलं गाढव असतं. त्याहीपेक्षा कहर म्हणजे एका बाईचा डोळा एका ब्लेडनं चिरला जातोय... वगैरे. हा प्रसंग शूट करताना चक्क एका बैलाच्या डोळ्याचा जवळून शॉट घेण्यात आला होता. या फिल्मचा फायदा असा झाला की दालीचं नाव सरिअ‍ॅलिस्टिक वर्तुळात खूपच आदरानं घेतलं जायला लागलं. या फिल्मला कसलीच कथा किंवा सूत्र नव्हतं. मनाला येईल ते शूट केलंय असा प्रश्न बघणार्‍याला पडत असे. पण या फिल्ममुळे संपूर्ण पॅरिसमध्ये प्रचंड सनसनाटी माजली होती. 

 त्यातच लुई  हा तर सरिअ‍ॅलिस्टिक सिनेमांचा संस्थापकच होता. या छोट्या फिल्मनंतर लुई आणि दाली यांनी ‘गोल्डन एज’ नावाचा आणखी एक सिनेमा बनवला. पण इथे मात्र दोघा मित्रांचं आपसात चांगलंच वाजलं. या चित्रपटात येशू ख्रिस्ताचं चित्रण मार्क्विस दा साड या लेखकाच्या लेखनावर आधारित होतं. ते लिखाण इतकं उग्र आणि भडक होतं की दालीला ते आवडलं नाही. त्यातच लुई हा स्वतः कट्टर नास्तिक अणि कॅथेलिक धर्माचा तिटकारा असणारा होता. लुईला त्याच्या आयुष्याच्या शेवटी प्रश्न विचारला गेला होता की तो अजूनही तितकाच नास्तिक आहे का? त्यावर त्यानं उत्तर दिलं होतं, जे खूपच गाजलं. तो म्हणाला, “परमेश्वराचे आभार! मी अजूनही नास्तिकच आहे.” या चित्रपटानंतर मात्र दोघांनी एकत्रितपणे कधीच काम केलं नाही. लु ईशी ज्या कारणावरून दालीचं बिनसलं, तोच मार्क्विस दा साड या लेखकाचा प्रभाव मात्र नंतरच्या काळात दालीवर पडला. मग पुन्हा काही दिवसांनी दालीनं लुईला एक तार पाठवली आणि पुन्हा आपण दोघं मिळून एक चित्रपट काढूया असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला. तेव्हा लुईनं पिकासोला नम्रपणे लिहिलं, “छोट्या राक्षसा, तुझा प्रस्ताव खूपच चांगला आहे. पण सांगायला अत्यंत वाईट वाटतं की मी 5 वर्षांपूर्वीच सिनेमासृष्टीतून अंग काढून घेतलंय.”

1929 साली दालीला गाला नावाची एक अत्यंत बुद्धिमान रशियन तरुणी भेटली. गंमत म्हणजे गाला ही दालीचा फ्रेंच कवी मित्र पॉल एदुवर्द नावाच्या एका मित्राचीच बायको होती. पॉल एदुवर्दशी तिचं वयाच्या 17 व्या वर्षीच प्रेमविवाह झाला होता. ती सररिअ‍ॅलिस्टिक चळवळीतही सक्रिय झाली होती. दालीच्या प्रेमात पडल्यावर गाला आणि दालीनं काहीच दिवसांत लग्नाचा निर्णय घेतला आणि गंमत म्हणजे आपल्याच बायकोच्या लग्नाला साक्षीदार म्हणून पॉल एदुवर्द उपस्थित राहिला! त्यानंतरही गाला, पॉल एदुवर्द आणि दाली यांचे संबंध बिघडले नाहीत! दालीच्या आईवडिलांना मात्र दालीचा लग्नाचा हा निर्णय अजिबात पसंत नव्हता. विरोध करताना त्यांनी गाला ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे असं सांगितलं. त्यांनी त्याच्याबरोबरचे संबंधही तोडलेच. पण तरीही त्यांच्या विरोधाला न जुमानता आयुष्याची 50 वर्षं या जोडीनं एकमेकांना उत्तम साथ दिली. त्यांच्या सहजीवनावर ‘आय दाली’ नावाची एक सांगितिकाही केली गेली. दालीशिवाय गालाचे अनेक ‘जवळचे’ मित्र होते, पण दालीनं त्याबद्दल कधी आक्षेपही घेतला नाही किंवा त्रागाही केला नाही. आपल्या दोघांचं चांगलं पटतंय ना, मग ही गोष्ट त्याच्यासमोर फारच क्षुल्लक आहे असं त्याला वाटे. 

गालानं दालीची आणि संसाराची आर्थिक बाजू खूप चांगल्या रीतीनं सांभाळली. गाला ही त्या वेळच्या अनेक कलाकारांसाठी आणि साहित्यिकांसाठी प्रेरणा होती. तसंच ती दालीसाठी मॉडेल म्हणूनही आनंदानं काम करायची. दाली आणि गाला यांचं परस्परांवरचं प्रेम बघून या जोडीबद्दल अनेकांना कुतूहल वाटे. मग अनेकदा त्याला मुलाखतीत किंवा एकांतात मित्र प्रश्न विचारत, ‘तुला तुझी बायको - गाला का आवडते?’ त्यावर तोही तितकाच गंभीर चेहरा करून उत्तर देई. तो म्हणे, ‘गाला दिवसातून तीन वेळा कपडे बदलत असल्यामुळे मला ती फार आवडते!’ त्याच्या अशा उत्तरांनी समोरचा पुढचा प्रश्न विचारायचाच विसरून जात असे!

1931 साली दालीनं ‘द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ हे चित्र चितारलं. साल्वादोर दाली यानं मानसशाा या विषयातल्या अनेक कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यास सुरूवात केली. तो काहीही चित्रं काढत असे. या चित्रात मागे पसरलेला समुद्र आणि समोर एक चबुतरा असून त्यावर एक वठलेलं झाड आणि झाडावर, त्या चबुतर्‍यावर वितळलेली घड्याळं दिसतात. एका घड्याळाला लागलेल्या मुंग्या आणि समोर जमिनीवर पडलेली एक विचित्र अशी आकृती असं सगळं असंबंद्ध आकारांचं संयोजन दालीनं या चित्रात केलं. या चित्रामध्ये स्वप्न आणि स्वप्नमय सृष्टी यांचं विचित्र मिश्रण बघायला मिळतं. अ‍ॅकॅडमिक तंत्रपद्धती आणि अद्भभुत कल्पनाविलास आणि त्यांच्या प्रतिमा अशा मिलाफ दालीच्या चित्रात दिसतो. त्याच्या अशा चित्रांनी तत्कालीन समाजाची झोप उडवली होती हे मात्र निश्चित!
1936 साली लंडनमध्ये इंटरनॅशनल सररिअ‍ॅलिस्ट एक्झिब्युशन आयोजित केलं गेलं. 

साल्वादोर दालीची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती की या ठिकाणी त्यानं चिफ गेस्ट म्हणून यावं आणि व्याख्यान द्यावं अशी विनंती त्याला करण्यात आली होती. दालीनं ते निमंत्रण आनंदानं स्वीकारलं आणि तो जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा बघणारे चकितच झाले. दालीनं चक्क पाणबुड्याचा वेष परिधान केला होता. चेहर्‍यावर हेलमेट होतं. तशा वेषात तो ऐटीत स्टेजवर पोहोचला आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यानाचा विषय देखील साधासुधा नव्हताच. आभासी की खरीखुरी भुतं असा काहीसा विचित्र विषयावर तो बोलत राहिला. व्याख्यान संपताच मात्र दालीला हेल्मेटमुळे गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. त्यानं डोक्यातून हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या निघेना. मग त्याच्या मित्रानं स्क्रू ड्रायव्हर आणि तत्सम अवजारं पळापळ करून आणली आणि खटपट करून एकदाचं ते हेल्मेट दालीच्या डोक्यातून काढलं. त्या क्षणी दालीनं मोकळा श्वास घेत आणि उपस्थितांनी मनावरचा ताण दूर करत एकाच वेळी हुश्श केलं! एवढ्यावर दालीनं गप्प बसावं तर तो दाली कसला? हेल्मेट हातात घेऊन उपस्थितांना तो हसत म्हणाला, “ज्या प्रमाणे पाणबुड्या समुद्राचा तळ गाठतो, त्याचप्रमाणे मीही माझ्या सररिअ‍ॅलिस्टिक चित्रांमधून माणसाच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करतो” एकूणच दालीवर बेतलेला हा प्रसंग आणि व्याख्यान इतकं गाजलं की टाइम्स या मॅगझिननं कव्हर फोटोवर दालीचीच छबी झळकवली!

1942 साली दालीनं ‘द सिक्रेट लाईफ ऑफ साल्वादोर दाली’ नावानं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. यात त्यानं खूप चित्रविचित्र गोष्टींचा उल्लेख केलाय. काय तर दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हिटलर ही एक स्त्री असल्याची स्वप्नं दाली बघायचा. दालीनं ‘द एनिग्मा ऑफ हिटलर’ असं चित्रही काढलं होतं. एवढंच काय पण त्याला त्याच्या चित्रांमध्ये आणि समोरच्याच्या शरीरावर (खांद्यावर) स्वस्तिक काढावं वाटे.  हिटलरचं समर्थन आपल्या कलेतून दाली करतोय असं वाटल्यानं 1934 साली सररिअ‍ॅलिस्टिक ग्रुपमधून त्याला सर्वसमंतीनं काढून टाकण्यात आलं. 

1944 साली दालीनं आपलं ‘डायरी ऑफ जिनियस’ नावाची एक कादंबरीही प्रसिद्ध केली. तसंच चित्रांचा एक संग्रह देखील प्रकाशित केला. दालीला नॅचरल सायन्स आणि गणित या विषयांमध्येही खूपच रस होता. दालीनं सररिअ‍ॅलिझमबरेाबरच क्युबिझम, एक्स्प्रेशनिझम, मॉडर्न आर्ट आणि फॉविझम या शैलीतही काम केलं. त्यानं अनेक शॉर्टफिल्म्स केल्या, पुस्तकं लिहिली आणि लिथोग्राफीवरही काम केलं. सररिअ‍ॅलिझमची धुरा समर्थपणे खांद्यावर घेतलेल्या  साल्वादोर दालीनं त्याच्या चित्रांमधून जनमानसात प्रचंड खळबळ उडवली. त्यानं डझनावारी शिल्पं केली. त्यातलं आयझॅक न्यूटन हे शिल्प खूपच प्रसिद्ध आहे. ‘द ग्रेट मॅस्ट्रुबेटर’, ‘ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट ऑफ अ बी’, ‘द घोस्ट ऑफ वर्मिर ऑफ डेल्फ’, ‘द मेडिटेटिव्ह रोज ’, ‘द स्वॅलोज टेल’, ‘द फेस ऑफ वॉर’, ‘लँडस्केप निअर फिग्यूराज’ आणि ‘मेटॅमॉर्फोसिस ऑफ नार्सिसस’ दालीची चित्रं प्रचंड गाजली. 

दालीला प्राणी पाळायला खूपच आवडायचं. आपल्या बाबाऊ नावाच्या मांजराला घेऊन तो कुठेही बिनधास्त जात असे. एकदा मॅनहटनमधल्या एका उंची रेस्टांटरंटमध्ये जातानाही त्यानं बाबाऊला बरोबर नेलं होतं. तिथली वेट्रेस बाबाऊकडे विचित्र नजरेनं बघायला लागली, तेव्हा दालीनं बाबाऊ इतर सगळ्या मांजरांसारखंच मांजर असून त्याच्या अंगावर फक्त मी ओप आर्टचं चित्र रंगवलं आहे असं नम्रपणे सांगितलं. माणसांनाच नाही, तर दाली प्राण्यांनाही मॉडेल म्हणून कामाला लावतो हे बघून ती वेट्रेस चकितच झाली. 

गालाचं 10 जून 1982 साली वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. दालीचं गालावर इतकं प्रेम होतं की त्यानं तिला दहा वर्षांपूर्वीच तिच्या वाढदिवसानिमित्त एक छोटंसं गाव (ज्याला स्पेनमध्ये पाऊल म्हणतात) ते विकत घेऊन भेट दिलं हेातं. तिनं जवळ जवळ 10 वर्षं तिथं वास्तव्य केलं होतं. तिथे जाण्यासाठी दालीनं तिची लेखी परवानगी घेतली पाहिजे अशी तिची अट होती आणि ती अट दालीनं तिच्या मृत्यूपर्यंत पाळली. तिच्या मृत्यूनंतर मात्र त्याला त्या ठिकाणीही जावं वाटेना. त्यामुळे त्यानं त्याच जागी ‘गाला-दाली कॅस्टल हाऊस म्युझियम’ या नावानं संग्रहालय  उभारलं. जगातलं सगळ्यात मोठं सररिअ‍ॅलिस्टि म्युझियम म्हणून जगभरातल्या लोकांच्या ते कुतूहलाचा विषय ठरलं. तिथे येणार्‍या पर्यटकांना सररिअ‍ॅलिस्टिक चित्रांबरोबरच मॉडर्न आर्टमधली सगळी चित्रं त्यांच्या इतिहासासहित बघायला मिळतात आणि ते स्तिमित होतात. खरं तर दाली 14 वर्षाचा असताना त्याचं चित्र त्याच्या गावी एका प्रदर्शनात झळकलं होतं, तेव्हा त्यानं आपणही पुढे याच ठिकाणी एक मोठ्ठं संग्रहालय उभारू असं स्वप्न बघितलं होतं. त्याचं स्वप्न साकार व्हावं या हेतूनं गालानं पुढाकार घेऊन ‘दाली मित्रमंडळ’ नावाचा एक ग्रुप तयार केला आणि त्यातून तिनं निधी उभारणीचं काम हाती घेतलं होतं.

गालाच्या मृत्यूनंतर मात्र दालीलाही जगण्यात काही रस वाटेनासा झाला. त्यानं जाणीवपूर्वक ठरवून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. 1983च्या मे महिन्यात दालीनं ‘द स्वॅलोज टेल’ नावाचं शेवटचं चित्र  काढलं. हे चित्र रेने थॉम या गणिताच्या थिअरीवर आधारलेलं होतं. 1984 साली दालीच्या बेडरूममधून आगीचा धूर येताना दिसला. कदाचित दालीचा स्वतःचाच आत्महत्येचा तो प्रयत्न असावा किंवा त्याचं घरकाम करणार्‍यांचा हलगर्जीपणा! 1989 साली मात्र दालीचं हृदय काम करेनासं झालं आणि त्यातच 23 जानेवारी 1989 या दिवशी वयाच्या 86 व्या वर्षी त्याचा मृत्यू  झाला आणि सररिअ‍ॅलिझमच्या कलाविश्वातला एक देदीप्यमान तारा निखळला! 

(आगामी ‘कॅनव्हास-2’ मधून)
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.