शब्दांचे जादूगार रवींद्रनाथ टागोर
एक छोटीशी मुलगी घराच्या खिडकीत बसून बाहेर चाललेली मिरवणूक बघत असते. त्या नगरीचा राजकुमार लवकरच तिच्या दारावरून पुढे जाणार असतो. एकाही कामात तिचं लक्ष लागत नसतं. छानसं तयार होऊन, गळ्यात माळ, कानात डूल घालून तिला खिडकीतून राजकुमाराला बघायचं असतं. खरं तर राजकुमाराला ती चिटुकली मुलगी दिसणार देखील नसते तरीही तिला मात्र सगळं दृश्य बघायचं असतं. इतकंच नाही तर तिच्या गळ्यातली माळही तिला राजकुमाराला द्यायची असते. जेव्हा राजकुमाराचा रथ तिच्या दारावरून जातो, तेव्हा खिडकीतून आनंदानं ती माळ खाली फेकते. क्षणार्धात तिची माळ रथाखाली चिरडली जाते. त्या माळेचं काय झालं कोणालाही कळत नाही. मुलगी मात्र खुश होते. आपल्या गळ्यातल्या मोत्यांच्या पायघड्या जणूकाही आपण राजकुमारासाठी अंथरल्या असं तिला वाटतं.
कुठल्याही आनंदाचा उत्सव आपण अपेक्षेविना केला पाहिजे असंच काहीसं या कवितेतून टागोर सांगतात. आपल्याकडे जे जे सर्वोत्तम आहे ते ते देण्याची वृत्ती आपल्यात असायला हवी. या जगाचा निर्माता सृष्टीत नेहमीच अनेक उत्सवाचं आयोजन करत असतो. तेव्हा या उत्सवात सामीलकीच्या वृत्तीनं सामील व्हायलहा हवं असंही टागोर म्हणत. एका कवितेतून ही गोष्ट सांगितली आहे भारताचेच नव्हे तर आशियाचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी! बंगाली साहित्य, बंगाली संगीत, नृत्यकला, चित्रकला, नाटक, कादंबरी, कविता, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णनं, तत्वज्ञान, बालकथा, शिक्षण अशा सगळ्या क्षेत्रात लीलया मुसाफिरी करणारे रवींद्रनाथ टागोर आपल्याला आपल्या ‘जन, गण, मन‘ या राष्ट्रगीताच्या निर्मितीमुळे ठाऊक आहेत. ब्रिटिश सरकारनं त्यांना ‘सर’ ही पदवी बहाल केली. त्या वेळी भारत देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांचा अतोनात छळ करत. याच वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं आणि भारतातल्या प्रत्येकाला खूप दुःख झालं. तेच दुःख रवींद्रनाथ टागोरांना झालं आणि त्यांनी इंग्रज सरकारचा निषेध म्हणून इंग्रज सरकारला ‘सर’ ही पदवी परत केली.
महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेले साहित्यिक पु.ल. देशपांडे, नोबेल विजेते आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, पाब्लो नेरुदा, सलमान रश्दी, विख्यात ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे या सगळ्यांवर रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव होता. टागोर आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा दोघांनीही प्रेम, सौंदर्य आणि सत्य या विषयांवर भरभरून चर्चा केली. टागोरांना विश्वकवी म्हटलं जातं. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या आयुष्यात 2000 पेक्षांही जास्त कविता लिहिल्या. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. त्यानी रचलेल्या रचना रवींद्र संगीत म्हणून प्रसिद्ध आहेत. रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. त्यांचं साहित्य जगासमोर पहिल्यांदा आणलं असेल ते भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी! जगदीशचंद्र बोस हे रवींद्रनाथ यांच्या लिखाणाचे चाहते होते, त्याप्रमाणेच टागोरांना देखील जगदीशचंद्र बोस यांचं लिखाण आवडायचं. टागोरांच्या सगळ्या लिखाणातून स्वातंत्र्य, मानवता आणि प्रेम ही मूल्यं सापडतात. टागोर यांनी एकूण 70 ते 80 लघुकथा लिहिल्या. त्यांच्या बहुतांश कथा 1901 च्या काळापूर्वीच्या आहेत. त्या काळची परिस्थिती, सरंजामशाही, स्त्री-पुरुष समानता, समाजात काय काय सुरू आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या कथांमधून डोकावत.
7 मे 1861 या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म देवेंद्रनाथ आणि शारदादेवी या दांपत्याच्या पोटी कोलकता इथं झाला. पंधरा भावंडांपैकी चौदावा क्रमांक रवींद्रनाथांचा! देवेंद्रनाथांची सगळीच मुलं खूप हुशार होती. कोणी नाटककार, तर कोणी संगीतकार, कोणी अधिकारी, तर कोणी साहित्यिक! त्यामुळे घरातच काव्य, नाट्य, संगीत आणि विनोद यांचे संस्कार रवींद्रनाथांवर आपोआप होत गेले. रवींद्रनाथांचं घर लक्ष्मी, सरस्वती आणि प्रतिभा यांचा वरदहस्त लाभलेलं! टागोरांच्या घरी नेहमी मोठमोठे साहित्यिक आणि कवी येत असत. घरातलं वातावरण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं. घरातल्या स्त्रियांना नृत्य-नाटक यात भाग घेण्याची मोकळीक होती. घरातली मुलं बंगालीशिवाय इतरही भाषा शिकत. व्यायाम, मल्लखांब, तट्टूवरून फिरणं हे सगळं मुलांकडून करवून घेतलं जात असे. अशा वातावरणात टागोर वाढत असल्यानं त्यांना शाळेतलं रूक्ष आणि कोरडं वातावरण अजिबात आवडत नसे. त्यांनी शाळेत गेलंच पाहिजे अशी जबरदस्ती कधीही त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर केली नाही. पुढे रवींद्रनाथ टागोर इंग्लंडला गेले. त्यांना तिथलं संगीत आवडलं. त्या संगीताचा त्यांनी तिथल्या वास्तव्यात अभ्यास केला.
भारतात आल्यावर 1881 साली टागोरांनी वाल्मिकी प्रतिभा हे संगीत नाटक लिहिलं. पहिले प्रायोगिक नाटकककार म्हणून टागोरांनाच मान द्यायला हवा. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी मॅक्बेथचा अनुवाद केला होता. वाल्मिकी प्रतिभा या नाटकामध्ये दरोडेखोरांचा एक गट असतो. देवीला प्रसन्न करण्यासाठी हे दरोडेखोर एकदा बळी देण्यासाठी एका लहान मुलीला पकडतात. त्या दरोडेखोरांच्या टोळीमधल्या एका दरोडेखोराला ही गोष्ट पटत नाही. तो त्या मुलीला तिचं रक्षण करत इतरांपासून दूर घेऊन जातो. ती मुलगी सर्वसामान्य मुलगी नसून प्रत्यक्ष सरस्वती असते. ती त्या दरोडेखोरावर प्रसन्न होते आणि त्याला वर देते. त्यानंतर तो दरोडेखोर जे काही बोलतो, त्यातून सरस्वतीच प्रकट होत राहते. त्यालाही या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. वाल्मिकी प्रतिभा या नाटकांत टागोरांनी पाश्चात्य संगीताचा वापर केला होता.
असामान्य प्रतिभा लाभलेल्या टागोरांवर त्यांच्या वडिलांनी जमीनदारी सोपवली. जमीनदार म्हणून काम बघताना टागोर आपल्या परिसरात फिरायचे. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून जायचे, त्यांची सुखदुःखं जाणून घ्यायचे. या शेतकर्यांची नदीकाठची जमीन पावसाळा आला की मातीसह वाहून जात असे. अशा वेळी ते हवालदील होत. टागोर त्यांना पावसाळा आणि इतर ऋतूंमध्ये काय पिकवता येईल हे सांगत, तसंच शेतीबरोबरच आणखी जोडधंदे काय करता येतील याचंही मार्गदर्शन करत. गावातले लोक सारखे आजारी पडतात हे लक्षात आल्यावर तर त्यांनी स्वतःच होमिओपॅथीचं शिक्षण घेतलं आणि लोकांना औषधं द्यायला सुरूवात केली. शेतकर्यांची आर्थिक स्थिती कशी उंचावता येईल याचाही टागोर नेहमीच विचार करत. शेतसार्यामध्ये कशी सूट देता येईल, त्यांच्या अडीअडचणीत साहाय्यभूत ठरावा यासाठी त्यांनी सहकारी संघाची स्थापना केली. शेतकर्यांना शेतीतलं उत्पन्न कमी कष्टात आणि जास्त काढता यावं यासाठी नवीन अवजारं उपलब्ध करून दिली आणि ती कशी वापरायची याचंही मार्गदर्शन केलं.
टागोरांची काबुलीवाला ही हृदयाला भिडणारी आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी कथा आहे. या कथेवर आधारित चित्रपटही निघाला. यात काबुलीवाल्याची ह्दयस्पर्शी भूमिका बलराज साहनी या अभिनेत्यानं समर्थपणे केली होती. टागोरांच्या समाप्ती या कथेवर अनेक भाषांमध्ये चित्रपट निघाले. टागोरांच्या कथा-कवितांमधून मानवी विचारांतला उदात्तपणा दिसतो. आयुष्याचं तत्वज्ञान अनेक लहान लहान गोष्टींमधून टागोरांनी मांडलं. रवींद्रनाथांचं संगीत रवींद्र संगीत म्हणून लोकप्रिय झालं. लोकांशी संवाद साधणारं संगीत असल्यानं ते घरोघर पोहोचलं. घराघरात गायली जाणारी गाणी रवींद्रनाथांची आहेत याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही इतकी ती जनमानसात रुजली आहेत.
स्वातंत्र्याबद्दलही टागोरांचे विचार खूपच व्यापक आहेत. स्वातंत्र्य ही काही दुसर्यांनी देण्याची गोष्ट नाही. आपण लायक होण्याची ती गोष्ट आहे. स्वातंत्र्य आपल्याला निर्भयता देतं. कोलकता इथं त्यांनी शांतिनिकेतन या संस्थेची स्थापना केली आणि शिक्षण किती आनंददायी असू शकतं हे दाखवून दिलं. माणूस घडवण्यासाठी त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढल्या. विश्वविद्यालयाची स्थापना करताना आपला देश, आपली अस्मिता, आपली भाषा, आपली संस्कृती असं संकुचितत्व टागोरांना मान्य नव्हतं. कामकाजासाठी आणि सोयीसाठी देश, नागरिकत्व या गोष्टी ठीक, पण तुकडे तुकडे करून सगळे देश जगणार असतील तर जगात शांतता कशी नांदेल असा प्रश्न ते करत. ‘आयुष्यात नेहमीच सत्याला प्राधान्यक्रम असला पाहिजे. आपल्या मनातली आशा आणि विश्वास अढळ असला पाहिजे’ असं टागोर म्हणत. 80 वर्षांचं समृद्ध आयुष्य लाभलेलं असताना त्यांनी कामही तसंच प्रचंड केलं. जगभरातल्या लाखो/करोडो लोकांचंही आयुष्य त्यांनी आपल्या लेखणीनं समृद्ध करून सोडलं.
Add new comment