आनंदांक किंवा हॅपिनेस! - अर्थपूर्ण दिवाळी २०१७

आनंदांक किंवा हॅपिनेस! - अर्थपूर्ण दिवाळी २०१७

प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्युरस यांच्यासारख्या अनेक तत्वज्ञांनी ‘चांगलं आयुष्य म्हणजे काय?’ हा स्वत:ला एक प्रश्न विचारला होता. सुख (प्लेझर) आणि आनंद (हॅपिनेस) या एकच गोष्टी आहेत का? हाही प्रश्न ते स्वतःला विचारत. त्यानंतर कँट, शॉपेनहॉव्हर, मिल, नीच्छे आणि नंतर लॅरी डेव्हिड या सगळ्या विचारवंतांनीही ‘हॅपिनेस’ यावर चिंतन केलं. जेरेमी बेंथम या ब्रिटिश बॅरिस्टर तत्वज्ञानं ‘सर्वात जास्त जणांचा सर्वात जास्त आनंद (ग्रेटेस्ट हॅपिनेस ऑफ ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल)’ हे उपयुक्ततावादी तत्व मांडलं. 

 अलीकडेच अमेरिकेतल्या आयोवा विद्यापीठातल्या संशोधकांनी अनेकांवर प्रयोग केले. अशा प्रयुक्तांना त्यांनी उल्हसित किंवा आनंदी करणारी आणि उदास किंवा दु:खी करणारी अशी दोन्ही तर्‍हेची द़ृष्यं दाखवली आणि या दोन्ही परिस्थितीत त्या प्रयुक्तांच्या मेंदूंचे एमआरआय (MRI) स्कॅनिंग करुन फोटो काढले. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मेंदूतला उत्क्रांतीत अलिकडेच निर्माण/प्रगत झालेला प्रीफ्रॉन्टल लोब हा भाग उत्तेजित होतो आणि जेव्हा आपण उदास असतो तेव्हा मेंदूतले उत्क्रांतीत पूर्वीपासून टिकलेले भाग उत्तेजित होतात, असं त्यांना आढळून आलं. याचा अर्थ उत्क्रांतीबरोबर आपण जास्त आनंदी होत चालले आहोत की काय असं अनेकांना वाटतं. ‘आनंदी’पणावर इतरही अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केलंय. आपण आनंदी असतो, तेव्हा डोपमाईन, ऑक्सिटोसिन, सीरोटोनिन, अ‍ॅड्रनलीन, गाबा आणि एन्डोफिन अशा मेंदूमधल्या अनेक रसायनांचं प्रमाण बदलतं असं अढळून आलंय. तसंच औषधांनी मेंदूतल्या यातल्या काही रसायनांचं प्रमाण बदललं तर नैराश्य आणि उदासी कमी होऊन माणसाला जास्त उत्साही आणि आनंदी राहण्यास थोडीफार मदत होते असंही मानलं जातं.

 आनंदी ही वृत्ती अनुवंशिक आहे का यावरही बरंच संशोधन झालंय. यासाठी जुळ्या मुलांचं अनेक वर्षं निरीक्षण करावं लागतं. विशेषत: जुळ्यांपैकी दोघं वेगवेगळ्या वातावरणात वाढले असले तर त्यांच्यापैकी कोण जास्त आनंदी आहे आणि असेल तर का यावर निराक्षण आणि विचार केला जातो. यामध्ये आनंदी वृत्तीला आनुवांशिकतेबरोबरच बाहेरचं वातावरण आणि सामाजिक परिस्थितीही कारणीभूत असते (नर्चर आणि नर्चर) असं लक्षात आलंय.

आनंदी असणं का महत्त्वाचं आहे? आनंदी असणारी माणसं चांगली टीम-वर्कर्स असतात; ती जास्त यशस्वीही होतात; आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिल, नवरा/बायको आणि कामातले सहकारी या सगळ्यांबरोबर त्यांचे जास्त चांगले संबंध राहतात; ते संकटाचा सामना जास्त चांगल्या प्रकारे करु शकतात; ते जास्त योग्य निर्णय घेऊ शकतात, ते जास्त सृजनशील असतात आणि त्यांची रोगातिकारशक्तीही जास्त चांगली असते असं आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन दिसून आलंय. रुट व्हीन्होव्हेन (Ruut Veenhoven) या डच माणसानं आनंदीपणावर आणि सुखावर (हॅपिनेस) बरंच संशोधन केलंय. त्याला ‘हॅपिनेस रिसर्च’मधला गॉडफादर म्हणतात. तो ‘वर्ल्ड डेटाबेस ऑफ हॅपिनेस’ (WDH) चालवतो. आज ‘हॅपिनेस’ या विषयावर जगभर अनेक कॉन्फरसेन्स भरतात आणि या विषयावर शेकडो संशोधनाबंध प्रकाशित होतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये तर आता या विषयावर पीएचडी करता येते. 

आजपर्यंतच्या संशोधनात अनेक ऑब्वियस वाटणार्‍या गोष्टी दिसून आल्या आहेत. उदाहरणार्थ लोकात मिसळणारा, (एक्स्ट्रोव्हर्ट) माणसं एकलकोंड्या (इन्ट्रोव्हर्ट) माणसांपेक्षा जास्त आनंदी असतात; आशावादी (ऑप्टिमिस्टिक) माणसं निराश (पेसिसिस्टिक) माणसांपेक्षा जास्त आनंदी असतात; लग्न झालेली माणसं अविवाहित माणसांपेक्षा जास्त आनंदी असतात; निरोगी माणसं आजारी माणसांपेक्षा जास्त आनंदी असतात; अ‍ॅक्टिव्ह सेक्स लाईफ असणारी माणसं सेक्स लाईफ नसणार्‍यांपेक्षा जास्त आनंदी असतात; स्त्री आणि पुरुष दोघंही तितकेच आनंदी किंवा दु:खी असतात; कामात व्यस्त किंवा व्यग्र असणारी माणसं जास्त आनंदी असतात; वगैरे.  

 आपला आनंदी स्वभाव हा संस्कृतीवरही अवलंबून असतो. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर आपण आनंदी राहू शकतो यावर आतापर्यंत लोकांचा विवासच नव्हता. त्यामुळे मानसशास्त्रातही या विषयावर फारसं लेखन आणि विचार झालेच नव्हते. पण १९८० च्या दशकात मात्र यावर विचार सुरु झाले. आपण आनंदी कसं रहावं याच विचारांच्या पायावर ‘सकारात्मक मानसशास्त्र (पॉझिटिव्ह सायकॉलॉजी)’ ही मानसशास्त्राची चक्क एक शाखा निघाली! यात आनंदी राहण्याबरोबरच सकारात्मक विचार असणं, चांगलं आणि गुणवंत आयुष्य काढणं अशाही काही गोष्टी ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’मध्ये जोडण्यात आल्या. १९८० च्या दशकानंतर आलेल्या ग्लोबलायझेशनमुळे एकूणच भराभर बदलणारं तंत्रज्ञान, प्रचंड स्पर्धा, नोकरी आणि धंदा यातली असुरक्षितता, वाढती विषमता, आर्थिक तेजी-मंदीचे वारंवार येत असलेले बुडबुडे आणि आरिष्टं पैशाच्या मागे पिसाटल्यासारखं धावणारं चंगळवादी जग, वाढणारा टोकाचा व्यक्तिवाद, आजूबाजूला वाढणारा धर्मांधपणा आणि युद्धं, दंगली आणि दहशतवाद या सगळ्या गोष्टींमुळे जगभर लाखो लोकांना प्रचंड एकाकीपणा आणि नैराश्य जाणवत होतं. आतून कुठेतरी भीती वाटत होती. यावर उपाय म्हणून जसे ‘अध्यात्मिक’ बाबा निर्माण झाले, तशीच या परिस्थितीतही (त्या परिस्थितीवर फारशी टीका न करता, उलट तडजोड करत) आनंदी राहावं हे शिकवणारी ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’ही फोफावली आणि मग ताण निर्माण करणार्‍या व्यवस्थेला विरोध न करता ताणयुक्त कसं व्हावं, आनंदी कसं राहावं याविषयी अनेक पुस्तकं अमेरिकेत निघाली. त्यांच्या झेरॉक्स कॉपीज भारतातल्या शहरांत पायरेटेड तर्‍हेनं विकली जायला लागली. मग त्यांची लोकप्रियता बघून काही भारतीय लेखकही अशी ‘सेल्फ-हेल्प’ पुस्तकं लिहायला सरसावले. पण मूळ व्यवस्था तशीच असल्यामुळे समाजामध्ये नैराश्य मात्र वाढतच गेलं. 

पॉझिटिव्ह सायकॉलॉजी या शाखेत अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरंही शोधली जातात. एक म्हणजे आनंदी असणं (हॅपिनेस) याची व्याख्या काय? दुसरा प्रश्न म्हणजे हॅपिनेसचं मोजमाप करता येतं का? तिसरा प्रश्न म्हणजे जगात काही गट (देश, प्रांत, आर्थिक-सामाजिक-वर्गीय गट) हे इतरांपेक्षा का आनंदी असतात? आणि चौथा प्रश्न म्हणजे आनंदी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? 

 यालाच जोडून मानसशास्त्रामध्ये ‘ट्रॅन्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस’ हीही शाखा निघाली. १९६१ साली एरिक बर्ननं याचा पाया घातला. त्याचं ‘गेम्स पीपल प्ले’ हे पुस्तक खूपच गाजलं. बर्नला गुरु मानणार्‍या थॉमस हॅरिस याचं ‘आय अ‍ॅम ओके, यू आर ओके’ हे पुस्तक तर प्रचंडच गाजलं. त्यानं माणसाचे स्वभावाच्या किंवा प्रवृत्तीचे चार प्रकार मानले. यातला फक्त ‘आय अ‍ॅम ओके, यू आर ओके’ हा चौथा गट किंवा प्रकार आनंदी आणि समाधानी असतो. ‘आय अ‍ॅम ओके, यू आर ओके’ प्रवृत्तीचा माणूस कुठल्याही गोष्टीसाठी किंवा घटनेसाठी स्वत:ला विनाकारण दोषी धरत नाही किंवा दुसर्‍यावर अविचारानं, रागानं आगपाखडही करत नाही. तो परिस्थितीचं शांतपणे विश्लेषण करुन कुणाचं काय चुकतंय हे जाणून ते कसं सुधारता येईल, पुन्हा अशी परिस्थिती कशी टाळता येईल, त्यातून काय शिकता येईल हे बघतो आणि दुसर्‍यांनाही सांगतो. यामुळे तो कठीण परिस्थितीतही हसतमुखानं सामोरं जाऊ शकतो. दुसर्‍यांना प्रेरित करू शकतो आणि नेतृत्व करायलाही पात्र ठरतो. 

आता एखादं राष्ट्र आनंदी आहे की नाही हे कसं ठरवायचं? त्यासाठी त्या राष्ट्रातल्या अनेक प्रांतातल्या, वर्गातल्या, जाती/वर्णातल्या, वेगवेगळ्या आर्थिक स्थरातल्या निवडक स्त्री-पुरुषांचं सर्वेक्षण करावं लागतं. त्यासाठी अनेक पद्धती वापरतात. एक म्हणजे तिथल्या निवडक लोकांना काही प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ, ‘तू आनंदी आहेस का?’ हा प्रश्न त्यातल्या प्रत्येकाला विचारुन त्यानं दिलेल्या उत्तरावरुन तो माणूस आनंदी आहे की नाही ते आपण ठरवू शकतो. पण यात एक प्रश्न हा की तो माणूस आपल्याला चुकीचंही उत्तर देऊ शकतो. यात गोची ही की एकवेळ लेखी उत्तरात काही जण प्रामाणिकपणे उत्तर देतीलही, पण प्रत्यक्ष भेटीत मात्र बहुतेक वेळा आपण कसे आनंदी आणि सुखात आहोत हेच चित्र सगळ्यांसमोर अनेकांना उभं करून आपल्यावर छाप पाडायची असते. त्यामुळेच प्रश्नांद्वारे केलेल्या सर्वेक्षणापेक्षा प्रत्यक्ष भेटून केलेल्या सर्वेक्षणात जास्त लोक आनंदी असल्याचं सापडतं. यासाठी फेसबुकवरच्या पोस्ट वाचून सहज लक्षात येईल. आम्ही पिकनिकला कुठे गेलो, हॉटेलमध्ये कशी मजा केली, माझ्या आयुष्यात माझ्या बायकोचं/नवर्‍याचं कसं महत्त्वाचं स्थान आहे हे सगळं दाखवण्यासाठी मग आनंदी असण्याचे अनेक फोटो टाकले जातात. त्यामुळे खरं आनंदी असणं हे झाकलं जातं. यावर उपाय म्हणजे मित्र, नवरा/बायको, मुलं/मुली, आई-वडील आणि इतर नातेवाईक, तसंच त्याचे सहकारी यांनाही त्याच्याविषयी प्रश्न विचारुन आपण तो माणूस आनंदी आहे की नाही याविषयीचं आपलं मत पक्क करु शकतो. ही सगळी तंत्रं पुढच्या काळात इतकी प्रगत होतील, की डॉक्टर जसं थमॉमीटरनं आपलं तापमान मोजतात, तसंच ते आपल्याला आपला आनंदीपणाचा आकडाही (हॅपिनेस इंडेक्स) सांगू शकतील!

  १९७२ साली भूतानच्या राजानं ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस (GNH)’ची कल्पना मांडली. त्यानंतर २००५ साली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या मेड जोन्स (Med Jones) यानं ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस इंडेक्स’ची कल्पना आणि त्यासाठी करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाची कल्पना मांडली. २००७ साली थायलंडनं ‘ग्रीन अँड हॅपिनेस इंडेक्स (GHI)’ची कल्पना मांडली. २००८ साली निकोलस सार्कोझी या फ्रेंच अध्यक्षानं GNH च्या धर्तीवर ‘हॅपिनेस इनिशिएटिव्ह’ची कल्पना मांडली. यावर विचार करुन त्यासंबंधी एक प्रबंध लिहिण्यासाठी त्यानं जोसेफ स्टिगलिटझ्, अमर्त्य सेन आणि ज्याँ पॉल फिटूसी (Jean-Paul Fitoussi) या तीन जगासिद्ध अर्थतज्ज्ञांची नेमणूक केली. २००९ साली अमेरिकेत ‘गॅलप पोल’ पद्धतीत हॅपिनेसचंही मोजमाप करायला सुरुवात केली. यानंतर २०१० साली मायकेल आणि मार्था पेनॉक या दोन कॅनेडियन मंडळींनी भूतानचा हॅपिनेस सर्व्हे केला. यानंतर आतापर्यंत यावर अनेक प्रबंध लिहिण्यात आले; अनेक पुस्तकं लिहिली गेली आणि अनेक देशांनी हॅपिनेस मोजायला सुरुवातही केली. निदान यावर चर्चा तरी करायला सुरुवात केली. नाहीतर आतापर्यंत फक्त जीडीपीवरच चर्चा होत असे. आता ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स (एचडीआय)बरोबरच हॅपिनेस इंडेक्सही खूप महत्त्वाचा समजला जातो. 

आज जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून भूतान ओळखला जातो. आपल्या देशातल्या लोकांनी आनंदी राहावं यासाठी भूताननं काय केलं हे बघायला हवं. ‘बदलत्या काळाप्रमाणे अनेक आव्हानं माणसाच्या समोर येऊन ठाकली असली तरी शांती आणि आनंद हाच मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. म्हणून आपल्या देशाचं सगळ्याचं मोठं उद्दिष्ट म्हणजे शांती आणि आनंद डोळ्यासमोर ठेवून ग्रॉस नॅशनल हॅपिनेस साकारणं होय’ असं भूतानच्या पाचव्या राजानं म्हटलंय. हा देश आनंदी असण्याची कारणं काय असावीत? भूतानमधल्या लोकांनी स्पिरिच्युअ‍ॅलिटी आणि भौतिक सुखसाधनं यांचा उत्तम समतोल साधला आहे. पाश्चात्य जगात सुखाची व्याख्या म्हणजे ज्याच्याकडे जास्त भौतिक साधनसंपदा आहे तो सुखी! पण भूतानमध्ये मात्र लोक असा विचार करत नाहीत. ज्याच्याकडे आयफोन आहे तोही सुखी आहे आणि ज्याच्याकडे तो नाही तोही सुखी आहे. याचं कारण आपण आयफोन घेऊ शकत नसू तर ते लोक विनाकारण त्याचा ताण घेत नाहीत. टीव्ही, रेडिओ आणि इंटरनेट या गोष्टी नसल्या तरी तिथल्या लोकांना फारसा फरक पडत नाही. उलट अशा गोष्टींच्या मागे लागल्यामुळे स्पर्धा, असूया, वेळेचा अपव्यय अशाच गोष्टी वाढतात असं त्यांचं मत आहे. 

जगातल्या जीडीपीचा दर वेगानं वाढलेल्या देशांमध्येही देखील भूतान हॅपिनेस इंडेक्सच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. पर्यावरणीय दृष्टीनं देशाचा निम्मा म्हणजे ५० टक्वे भाग त्यांनी राष्ट्रीय उद्यानांसाठी सुरक्षित ठेवला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूतानमध्ये बहुतांशी लोक बौद्ध धर्मीय असून त्यांचा कर्म म्हणजेच कृतीवर विश्वास आहे. वेगळं पर्यटन करण्याची इथल्या लोकांना गरजच पडत नाही. शांततेचा सतत अनुभव घेतल्यानं त्यांचं मन स्थिर आणि शांत आहे. हे वातावरण त्यांच्या आनंदासाठी पोषक आहे. भूतानमध्ये गरीब-श्रीमंत विषमतेचं प्रमाण कमी आहे. गमतीची गोष्ट म्हणजे तिथला राजपुत्र आणि सर्वसामान्य नागरिक, मुलं एकत्र येऊन बास्केटबॉल किंवा त्यांना आवडणारे खेळ खेळतात. ना सर्वसामान्यांना राजपुत्राचं टेन्शन असतं ना राजपुत्राला मी कोणीतरी खास असामी आहे असा आव असतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहणं, एकमेकांना समजून घेणं भूतानमध्ये अशा प्रसंगांमुळे सहजगत्या घडतं. 

भूतानमधले लोक रोज आठ तास झोपतात. पुरेशा झोपेमुळे ते कायम ताजेतवाने असतात, त्यांची कार्यशैली वाढलेली असते. या देशाची लोकसंख्या कमी आहे. इथं प्रदूषण कमी आहे कारण नको त्या चंगळवादी वस्तूंचं भरमसाठ उत्पादन करणार्‍या कारखान्यांना उभं करून त्यांनी पर्यावरणाची वाट लावली नाही. चंगळवादी वस्तूंच्या उत्पादनावर रोख असल्यानं तशा कारखान्यांना इथं परवानगी नाही. तसंच दहाव्या पंचवार्षिक योजनेतली भूतानची उद्दिष्टं म्हणजे शिक्षण, आरोग्य, कामाचे तास, जगण्याचा दर्जा, पर्यावरणाचं आणि सांस्कृतिक वैविध्य आणि त्यातली लवचिकता जपणं, गुड गव्हर्नन्स (सुशासन), मानसिक आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि कम्युनिटी व्हायटॅलिटी (समुदाय चेतना) हे वाढवणं. या सगळ्या मुद्दयांवर भर असल्यानं जागतिकीकरणाचा समतोल साधल्यामुळे भूतानसारखा छोटासा देश आनंदी देश आहे. 

भूतानप्रमाणेच १९४८ साली लोकशाही स्वीकारलेला नेदरलँंड हा देशही आनंदी लोकांचा देश म्हणून जगात चवथ्या क्रमांकावर आपलं नाव दिमाखानं कोरून आहे. तो भौगोलिकदृष्ट्या समुद्रसपाटीपासून खाली आहे. इथे वर्षभर पाऊस पडतो. मात्र पाण्याचा प्रश्न वेगळ्या तर्‍हेनं भेडसावणारा आहे. अ‍ॅमस्टरडॅम समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे पाण्याची नेहमीच एक विशिष्ट पातळी राखावी लागते. इथे पवनचक्वयांच्या साहाय्यानं पाणी बाहेर खेचलं जातं आणि जमीन कोरडी करून शेती केली जाते. प्रयत्नपूर्वक हे तंत्र तिथल्या लोकांनी आत्मसात केलंय आणि ती काळजी ते घेतात. जागा खूपच कमी असल्यामुळे जागेचं महत्व इथल्या लोकांना खूप आहे. इथलं एक वाक्य खूपच सुप्रसिद्ध आहे. ते म्हणतात, ‘गॉड क्रिएटेड वर्ल्ड, डच क्रिएटेड हॉलंड’ या देशात शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना खूप महत्व दिलं गेलंय. इथे आरोग्यसेवा मोफत आहे. तसंच शिक्षण सक्तीचं आणि तेही अनेक सुविधांसह मोफत आहे. इथे शिक्षण सम्राट नाहीत, अवाढव्या फिया नाहीत. त्यामुळे पालकांवर शिक्षणाचं अकारण ताणाचं ओझंही नाही आणि विद्यार्थ्यांवर कर्जाचा बोजाही नाही. नोकरीची जबाबदारीही शासनाची असते आणि ती देऊ न शकल्यास तोपर्यंत बेकारभत्ता तोही त्याचा उदरनिर्वाह तो करू शकेल इतका त्याला देण्यात येतो. 

आज युरोपमधली अनेक राष्ट्रं फक्त जीडीपी वाढीपेक्षा लोक कसे सुखी होतील त्यावरच्या उपायांमध्ये रस घेताहेत. थोडं मागे वळून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की १९७०च्या दशकापर्यंत कल्याणकारी राज्य आणि अर्थव्यवस्था (वेल्फेअर स्टेट्स) आणि अर्थव्यवस्था निर्माण झाल्या. शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यावर जास्त भर दिला गेला. या काळात कुठलंही मोठं आर्थिक अरिष्ट युरोप किंवा अमेरिका इथे आलं नाही. या काळात भांडवलशाही होती पण तिला माणुसकीची झालर होती. उद्योगात नफा होता, पण तो वाजवीपेक्षा जास्त नव्हता. या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदरही चांगला होता. बेकारी आटोक्यात होती आणि गरीब-श्रीमंत दरीही प्रचंड वाढलेली नव्हती. लोक खाऊनपिऊन सुखी होते; तेजीमंदीचे बुडबुडेही या काळात आले नाहीत. दहशतवादाचा जन्म झालेला नव्हता. एकूणच आयुष्यात बर्‍यापैकी स्थैर्य होतं.

१९८०च्या दशकात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वहायला लागले. उद्योगात आता नफा फारसा मिळत नसल्यामुळे तो पैसा सट्टेबाजीकडे वळायला लागला. यातूनच वित्तभांडवलाचं जगावर राज्य सुरु झालं. यालाच ‘फायनान्शियलायझेशन’ म्हणतात. याच काळात इंटरनेटच्या वाढीमुळे हे वित्तभांडवल जगात कुठेही फिरु लागलं. भारतासारख्या देशात आता शेअरबाजारात पैसे गुंतवले तर चिकार नफा मिळेल या उद्देशानं भरपूर पैसा भारतात यायला लागला आणि इथलंही शेअरमार्केट वाढायला लागलं. भारतातही सट्टेबाजी सुरु झाली आणि झटपट श्रीमंत होण्याची स्वप्नं भारतातही लोक बघायला लागले.

१९८०च्या दशकापासून नवउदारमतवाद बोकाळला. त्याच्यामुळे गेल्या ३० वर्षांत गरीब राष्ट्रं आणि श्रीमंत राष्ट्रं यांच्यातलीच दरी प्रचंड वाढली. पॉल व्रुगमनच्या मते १९८०च्या दशकात उत्पन्नात जी वाढ झाली, त्यातली ७०% फक्त १% श्रीमंत कुटुंबानाच मिळाली. १९८० नंतर हे जास्तच वेगानं चालू राहिलं. १९९०च्या दशकात अमेरिकेत सगळ्यात श्रीमंत १% लोकांकडे सगळ्या शेअर्सपैकी ४२.२% शेअर्स, सगळ्या बाँड्जपैकी ५५.७% बाँड्ज, सगळ्या ट्रस्ट्सपैकी ४४.२% आणि सगळ्या लहानमोठ्या उद्योगांपैकी ७१.४% उद्योग होते. ब्रँको मिलानोव्हिक या वर्ल्ड बँंकेच्या अर्थतज्ज्ञांच्या मते, जगातल्या १% लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी जगातल्या सगळ्यात खालच्या ५७% लोकांकडे आहे! ज्यांना या वस्तू परवडत नाहीत आणि ज्यांना या उद्योगात, सेवांमध्ये नोकर्‍याही मिळत नाहीत असे ६०-७०% लोक या अर्थव्यवस्थेच्या बाहेरच असतात आणि त्याच्या कडेकडेनं, परिघावरून तिच्या वैभवाकडे बघत असतात.  आज भारताचा विचार केला तर भारतामध्ये ग्लोबलायझेशन आल्यानंतर विषमता ाचंड ामाणात वाढली. २००४-२००५ सालच्या अर्जुन सेनगुप्ता अहवालाप्रमाणे भारतातले ७७% लोक दरडोई दररोज २० रुपयांखाली जगतात. हे महाभयानक आहे! १९८२ सालामध्ये वरच्या १% श्रीमंत लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा ६.५% भाग होता.  तो २००८ साली १३% झाला. जागतिक पातळीवर सर्वात श्रीमंत २०% आणि सर्वात गरीब २०%  यांच्या उत्पन्नाचं प्रमाण १९६० साली १:३ होतं, ते १९९० साली १:६० तर १९९७ साली १:७४ झालं. २००० सालानंतर तर ते आणखीनच प्रचंड वाढलं! याउलट १९७०च्या नंतर अमेरिकेत जरी उत्पादकता वाढत गेली असली तरी बहुतांशी जनतेचं-विशेषकरुन तळाच्या ५0% लोकांचं खरं उत्पन्न (महागाई लक्षात घेऊन) तेवढंच राहिलं किंवा कमीच झालं. याच काळात श्रीमंतांचं उत्पन्न प्रचंड वाढलं; अनेक अब्जाधीश तयार झाले; पण कर्मचार्‍यांचे कामाचे तास वाढले आणि कामाचं स्वरुप जास्त एकसुरी, कंटाळवाणं आणि अस्थिर झालं. गेल्या तीन वर्षात ही विषमता आणखीनच वाढली. जानेवारी २०१७ मध्ये ऑक्सफॅमनं केलेल्या अभ्यासाामाणे भारतातल्या १% लोकांकडे देशातली ५८% संपत्ती आहे. हाच आकडा २०१४ साली ४९%होता! फोर्बज् मॅगेझीन हे भारतातल्या अब्जाधीशांकडे खूप बारकाईनं लक्ष ठेऊन असतं. ‘भारतातल्या अब्जाधीशांना आजच्याइतके चांगले दिवस कधीच आले नव्हते; भारतातल्या डॉलर बिलियेनिअर्सची संख्या फक्त गेल्या २ वर्षांत ५०% नं वाढली आणि ती २०१४ मधल्या ५६ वरुन २०१६ मध्ये ८४ झाली; त्यांच्याकडे मिळून २४८ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ १६.६ लाख कोटी रु. म्हणजेच देशातल्या संपूर्ण संपत्तीच्या ८% एव्हढी संपत्ती आहे; ही संपत्ती देशाच्या २०१६-१७ च्या जीडीपीच्या ११% आहे; देशातल्या ५७ लोकांकडे खालच्या ७०% जनतेएवढी संपत्ती आहे’ अशी माहिती मार्च ४, २०१४ रोजी आणि मार्च २, २०१६ रोजी ाकाशित झालेल्या फोर्बज्च्या अंकात दिली आहे. ही माहिती <http://forbesindia.com/&gt; वर मिळते.

याच वेळी मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढणार्‍या आयटी, बँंकिंग वगैरे सेक्टरमुळे भारतातही एक सधन ‘चमको’ वर्ग तयार झाला. तो श्रीमंत तर होताच, पण तो आणखी श्रीमंतीची स्वप्नं बघायला लागला आणि प्रचंड चंगळवादी बनला. हा श्रीमंत वर्ग जगभर तयार होत होता. ‘यूज अँड थ्रो’ची संस्क्ती वाढत चालली होती. चैनीच्या किंवा विनाशाच्या गोष्टींवरच प्रचंड पैसा खर्च व्हायला लागला. आणि त्यालाच आपण प्रगती म्हणायला लागलो. याच काळात शिक्षण, आरोग्य आणि इतर कल्याणकारी गोष्टींवर खर्च गरजेच्या मानानं कमी होत गेला. 

या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गाच्या गरजा प्रचंड जाहिरातबाजीनं या व्यवस्थेनं वाढवून ठेवल्या आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं उत्पादनही सुरु झालं. प्रचंड चैनीच्या किंवा विनाशकारी गोष्टींची फारशी गरज नव्हतीच. पण त्या तयार करण्यासाठी प्रचंड रिसोर्सेस खर्च झाले, प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालं, अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण झालं आणि रोजगार फारसा निर्माण झालाच नाही आणि हे सगळ्या जगभर झालं. 

खरं तर सर्वांना संतुष्ट आणि सुखी करण्यासाठी आर्थिक वाढ होण्याची गरज असते. पण निओलिबरल अर्थव्यवस्थेत लोक असंतुष्ट आणि असमाधानी असले तरच ते जास्त वस्तू विकत घेतात आणि त्यामुळे आर्थिक वाढ होऊ शकते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे सध्या जे आहे त्याविषयी असंतुष्ट कसे रहातील यासाठीच अनेक कंपन्यांचं मार्केटिंगचं खातं आणि जाहिरातींच्या कंपन्या झटत असतात. खरंतर वेड्यासारखं वस्तूंच्या मागे धावणारा चंगळवाद आपण नाकारला तर जगातले सर्वजणं सुखात राहू शकतात इतके रिर्सोसेस आणि इतकं तंत्रज्ञान आपणाकडे असतानाच जगात एवढं दारिद्र्य, बेकारी, प्रदूषण, युध्दं, गुन्हे आणि मनोविकार या सगळ्या गोष्टी असाव्यात हाच या निओलिबरल व्यवस्थेमधला सगळ्यात मोठा परस्परविरोध आहे आणि त्यामुळेच ही एक ‘फेल्ड सिस्टिम’ आहे.

या मुक्त अर्थव्यवस्थेचा शिक्षणावरही परिणाम झालाय. पूर्वी शिक्षणाचा उद्देश हाच मुळी एकूण ज्ञान मिळवण्यासाठी, माणसाच्या आणि निसर्गाच्या संबंधात जे जे काही आहे ते शोधण्यासाठी असायचा. या विश्वाची उत्पत्ती कशी झाली?, बिग बँग, ब्लॅकहोल्स, डार्क एनर्जी, उत्क्रांतिवाद आणि अशा अनेक गोष्टी असायच्या. कित्येक गोष्टी केवळ कुतूहलापायी माणसं शिकत आणि त्यात संशोधन करत. पण आता या सगळ्याचा बाजारपेठेला आणि नफ्याला काय फायदा? जर शिकून नोकरी मिळत नसेल तर त्या कुतूहलाचा आणि ज्ञानाचा काय फायदा? असे विचार डोकं वर काढायला लागले. शिक्षणाचंही भराभर खाजगीकरण होत गेल्यामुळे तर शिक्षणात ‘व्यवहार’ प्रचंडच प्रमाणात शिरला. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरच भारतातही ते झपाट्यानं बदललं. त्यामुळेच सगळी मुलं इंजिनियरिंग आणि कॉमर्स, फायनान्स शिकायला लागली. मूलभूत विज्ञान, साहित्य, संगीत, कला या गोष्टी अतिशय नगण्य मानल्या जायला लागल्या आणि बाजारपेठेत त्यांची किंमत खूप घटली. 

या नव्या मुक्त अर्थव्यवस्थेचा, शिक्षणावर, आरोग्यावर, लोकांच्या मानसिकतेवर आणि पर्यावरणावर प्रचंड परिणाम झाला. त्यामुळे व्यसनाधीनता वाढली, मनोविकार वाढले आणि सुख कोसो दूर पळालं. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम या विचारवंतानं चंगळवादानं माणसाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतील हे ५० वर्षांपूर्वीच आपल्या लिखाणातून सांगितलं होतं. एरिक फ्रॉमनं चंगळवादाचं विश्लेषण १९५५ साली आपल्या ‘सेन सोसायटी’ या पुस्तकात केलं. मानवी सुखांच्या/आनंदाच्या संकल्पनांचं फ्रॉमनं सुंदर विश्लेषण केलंय, ‘माणसाच्या आयुष्यातल्या सुखाच्या कल्पना आजकाल बदलत चालल्या आहेत. परिपूर्ण माणूस बनण्याची आता तो स्वप्नही बघत नाही. आता फक्त टीव्ही, मोटारगाड्या, घरं आणि वेगवेगळ्या क्रयवस्तू (कमॉडिटीज) गोळा करणं आणि त्यांचा जास्तीत जास्त साठा करणं यातच तो सुख आणि आयुष्याची परिपूर्णता मानायला लागला आहे. त्यामुळे त्याला कितीही त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याची हाव काही कमी होत नाही. त्याची सतत कुणाशीतरी स्पर्धा चालू असते. यामुळे त्याला सुख तर मिळत नाहीच, पण प्रचंड मानसिक असुरक्षितता, एकाकीपणा आणि नैराश्य यांना त्याला सामोरं जावं लागतंय.’ 

पण एवढं असूनही गेल्या ३० वर्षात अमेरिकाच नव्हे तर सगळं जग पैसा, प्रसिद्धी आणि चंगळवाद यांच्यामागे प्रचंड वेगानं आणि वेड लागल्यासारखा धावायला लागलंय आणि सध्याच्या मुक्त अर्थव्यवस्थेला तेच हवंय. सतत लोक जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या घ्यायला लागले नाही, आपल्याकडे नवी मोठी गाडी, घर, टीव्ही, फ्रीज वगैरे असण्यामध्ये जर अभिमान मानायला लागले नाहीत तर बाजारातला माल खपणार कसा? आणि उद्योजक वर्गाचा नफा वाढणार कसा? त्यामुळे हीच संस्कृती आपल्याला त्या वस्तूंच्या मागे धावायला शिकवते. त्या वस्तूंवरच्या मालकीतच आयुष्याची परिपूर्णता मानायला शिकवते. आपण काय किंवा कसे आहोत (दयाळू, सुसंस्कृत, मदत करणारा, संगीत, साहित्य यात रस घेणारा, विवेकवादी, शांततावादी, समानतावादी) यापेक्षा आपल्याकडे काय आहे (गाडी, बंगला, सोनं....) यावरून जेव्हा समाजात आपली ओळख व्हायला लागते, तेव्हा त्या समाजाला कीड लागली आहे असं समजावं आणि तो समाज नैराश्याकडे झुकायला लागेल असं फ्रॉम म्हणतो. 

खंर तर प्रत्येकानं आज गांधीवादी व्हायचं ठरवलं आणि फक्त टिकावू, मजबूतच वस्तू घेतल्या; तसंच गरजेइतक्याच वस्तू घेतल्या; फक्त दिखाव्यासाठीच्या गोष्टी विकत घेणं नाकारलं तर ही चंगळवादी, फक्त काही मूठभर लोकांच्या नफ्यावर आधारलेली ही अर्थ-समाजव्यवस्था चक्क ५ दिवसांत कोसळेल! पण तसं होत नाही. खरंतर स्वयंपूर्ण खेडं, साधी राहणी आणि इतर अनेक गांधीवादी मूल्यांचा सगळ्यात मोठा जर कुठला शत्रू असेल तर ती आजची चंगळवादी ‘यूज अँड थ्रो’ची संस्कृती आहे. गांधीजींना अमान्य असलेली गरीब-श्रीमंतीमधली दरी प्रचंड वाढवणार्‍या, फक्त मूठभर लोकांना अतिप्रचंड श्रीमंत (बिलिओनियर्स) आणि त्यापुढच्या १०-२०% लोकांना खूप श्रीमंत बनवून इतर ६०-७०% लोकांना दुःख-दारिद्र्याच्या खाईत लोटणार्‍या संस्कृतीविषयी खरंतर दोन हात करायची चळवळ गांधीवाद्यांनीच नव्हे, तर इतरही सगळ्या प्रगतिशील लोकांनी उभी केली पाहिजे. 

आज पाश्चिमात्य जगातल्या अनेकांनी स्वतःहून पैशाच्या मागे न धावणं, विनाकारण वस्तू न खरेदी करणं, कुटुंबाबरेाबर आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं हे सुरु केलंय. याला ‘डाऊनशिफ्टिंग’ असं म्हणतात. थोडक्यात या चंगळवादाच्या ट्रेडमिलवरुन खाली उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियातल्या ३० ते ६० वयोगटातल्या २३% लोकांनी डाऊनशिफ्टिंगला सुरुवात केली आहे असं ‘दी ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्युट’नं म्हटलंय. हे एका तर्‍हेनं नवउदारमतवाद आणि चंगळवाद यांच्याविरुद्धचं एक शांतपणे केलेलं बंडच आहे. पण लोकांमध्ये चंगळवादी मूल्य वाढून त्यांनी जास्तीत जास्त खरेदी करत रहावं यासाठी बड्या कंपन्या आटोकाट प्रयत्न करतच आहेत. जीडीपीइझमचं - म्हणजे वितरणाकडे, रोजगाराकडे, पर्यावरणाकडे लक्ष न देता फक्त उत्पादनाकडे म्हणजेच आर्थिक वाढीकडे लक्ष देणं- याचं वेड लागलेली नवउदारमतवादी सरकारं चंगळवादाचाच पाठपुरावा करताहेत.

याचा अर्थ ग्लोबलायझेशन हे संपूर्णपणे वाईट आहे असं मात्र आपण समजू नये. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे थांबवून फक्त स्वदेशी वापरावं, इतकंच काय तर देशांतर्गत व्यापारही कमी करुन प्रत्येक खेडं स्वावलंबी व्हावं हे आजच्या युगात शक्यही नाही आणि योग्यही नाही. सुख, समाधान, सोयी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हवंच आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही हवाच. प्रश्न जागतिकीकरणाच्या जाचक अटींविरुद्ध चळवळी निर्माण करण्याचा आहे. प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण करुन कोणीही, काहीही उत्पादन करावं यापेक्षा त्या उत्पादनाची खरंच गरज आहे का, ती आत्ता आहे का? का पुढे ढकलता येईल? गरज असेलच तर त्या उत्पादनाचं विकेंद्रीकरण करता येईल का? प्रदूषण कमी करणं, रोजगार वाढवणं आणि कामातला आनंद वाढवणं हा आणि हाच उद्देश समोर ठेवून उद्योगांचं आणि त्यात वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानांचं नियोजन करणं, त्यात निर्माण होणार्‍या वेस्टचा निचरा चांगल्या तर्‍हेनं करणं अशा तर्‍हेच्या पर्यायी विकासनीतीसाठी आपण एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे. ती चळवळ आणि हे डाऊनशिाफ्टिंग या दोघांमुळेच या निओलिबरल, चंगळवादी राक्षसाला आळा बसेल आणि तेव्हाच मन:स्वास्थ्य लाभलेली एरिक फ्रॉमनं वर्तवलेली ‘सेन सोसायटी’ निर्माण व्हायला मदत होईल. असं झालं तर लोक खरंखुरं आनंदी जीवन जगू लागतील हे मात्र नक्की!  
 

Comments

Submitted by Anonymous Mon, 02/26/2024 - 08:15

ok

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.