कोसंबी - भारतीय जीनियस
ए. आर. जी. ओवेन या प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञानं, 'कोसंबीसारखे विद्वान 'कोसंबी फॉर्म्युला' करून उंच भरारी तर घेतात, पण भरकटत नाहीत.’ असं गौरवानं म्हटलं होतं. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख - आम्ही आपल्यासाठी आणत आहोत, १२ भारतीय जीनियसपैकी डी. डी. कोसंबी यांची अनमोल भेट!!!! दामोदर धर्मानंद कोसंबी! स्वतंत्र भारतातल्या वैज्ञानिक संशोधनाची मुहूर्तमेढ रोवणारा एक वैज्ञानिक, गणिती आणि पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांना अख्खं जग ओळखतं. विशुद्ध (प्युअर) गणितातलं त्यांचं योगदान खूपच महत्त्वाचं असून सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स) यातही त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. आर्थिक आणि सामाजिक गोष्टींतलं नियोजन करण्यासाठी सांख्यिकी या शाखेचा फार मोठा उपयोग होतो. स्टॅटिस्टिक्सचा फार मोठा उपयोग त्यांनी सांख्यिकी आणि गुणसूत्रं यांच्या संशोधनात करून ‘कोसंबी फॉर्म्युला’ तयार केला. आजही या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थी कोसंबी फार्म्युल्याचा वापर करतात. कोसंबींची सामाजिक जाणीव तीव्र असल्यानं त्यांना अर्थव्यवस्थेतलं नियोजन करण्यासाठी सांख्यिकी शाखा किती उपयोगी आहे हेही ठाऊक होतं. टेलिपथी किंवा फलज्योतिष अशा माणसाला भ्रमात पाडणार्या आणि स्वतःकडे आकर्षित करणार्या शास्त्रांचं पितळ उघडं पाडण्यासाठीही सांख्यिकीचा उपयोग होतो असं कोसंबी म्हणत.
आनुवंशशास्त्रातही त्यांनी संशोधन केलं. जुन्या नाण्यांचा (नाणकशास्त्र) सांख्यिकी दृष्टिकोनातून त्यांनी खोलवर अभ्यास केला. इंडॉलॉजी (भारताचा प्राचीन इतिहास) आणि संस्कृत ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यांनी लिहिलेलं ‘मिथ अँड रिऍलिटी’ हे पुस्तक आजही कुतूहल जपणार्या जिज्ञासू वाचकांना प्रचंड समाधान देतं. १९३० ते १९६६ या कालावधीत दामोदर कोसंबींचे दीडशे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. त्यातले ६० हे गणित आणि सांख्यिकी आणि ६० हे इतिहास, नाणकशास्त्र आणि प्राचीन संस्कृत साहित्य यावरचे होते. तसंच आनुवंशशास्त्र, विज्ञान आणि समाज यांच्या परस्परसंबंधांवरही त्यांनी लेख लिहिले. कोसंबीनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या १४ पुस्तकांचा दुर्मिळ ठेवा आज आपल्याजवळ आहे. आज आपल्याला माहीत असलेल्या अतिशय नामांकित ‘टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’ची उभारणी करण्यात या वैज्ञानिकाचा मोलाचा वाटा होता.
अवघ्या ५९ वर्षांच्या आयुष्यात कोसंबींनी प्रचंड असं संशोधनपर कार्य केलं. गणितातल्या सुस्पष्टतेचं आकर्षण कोसंबी यांना वाटायला लागलं. गणितातून जो बौद्धिक आनंद मिळतो तो दुसर्या कशातूनही नाही हे त्यांच्या लक्षात आलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना १९३४ साली कोसंबींना पहिलं ‘रामानुजन स्मृति पारितोषिक’ देऊन गौरवण्यात आलं. तसंच सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या भारतीय विज्ञान अकादमीमध्ये ‘संस्थापक फेलो’ म्हणूनही कोसंबींच्या नावाचा समावेश करण्यात आला. इतक्या कमी कालावधीत त्यांचं गणितातलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेण्याजोगं झालं हेातं. गणितावर त्यांनी जवळजवळ ४८ संशोधनपर लेख लिहिले.
अमेरिकेला गेल्यावर कोसंबींनी अल्बर्ट आईन्स्टाईनची आवर्जून भेट घेऊन प्रदीर्घ चर्चाही केली होती. मात्र त्यांच्या या भेटीबद्दलही पुण्यातले विद्वान त्यांची खिल्ली उडवत. ‘‘कोसंबी दिसत नाहीत, कुठे गेले?'' असा कोणी प्रश्न विचारला की ही मंडळी सांगत, ''कोसंबी सध्या अमेरिकेत आईन्स्टाईनला सापेक्षतावाद शिकवायला गेलेत.’’ एका आयुष्यात इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात खोलवर काम करणारा संशोधक पुन्हा होऊ शकेल असा विश्वास बसत नाही. कोसंबी एक सच्चे संशोधक होते. त्यांच्या अंतर्मनातून त्यांना जे जे स्फुरलं, ते ते करण्यासाठी त्यांनी स्वतःला कुठलाही विचार न करता झोकून दिलं. कोसंबी ज्या विषयावर संशोधन करत, त्या त्या विषयाची पार्श्वभूमी आणि इतिहास यांनाही समोर ठेवत.
म्हणूनच तर विज्ञानावरच्या त्यांच्या एका लेखात गॅलिलिओ-न्यूटनपासून त्यांनी अनेक वैज्ञानिकांच्या कामगिरीचं अचूक विश्लेषण करत त्या वेळच्या त्या त्या देशांतल्या सामाजिक परिस्थितीचंही वर्णन केलं. संशोधनाकडे करिअर म्हणून न बघता ध्यास घेऊन त्यात बुडून जाण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांच्या संशोधनात हिशोबीपणा नव्हता. त्यांचं सगळं संशोधन अस्वस्थपणाच्या प्रेरणेतून एक झपाटलेपण घेऊन झालेलं दिसतं. 'संशोधकांनी एका बंदिस्त जागेत स्वतःभोवती कोश न विणता लोकांपर्यंत पोहोचून संशोधन करायला हवं' हा विचार कोसंबींनी आपल्या कार्यातून जगाला दिला. प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी या विलक्षण प्रतिभा असलेल्या संशोधकानं आयुष्यभर विज्ञानाचा उपयोग माणसाचं आयुष्य जास्त सुखकर, स्वतंत्र आणि स्वावलंबी कसं होईल हे सांगण्यासाठीच केला हे मात्र खरं!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment