भारतीय जीनियस - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
विसाव्या शतकातला नोबेल पारितोषिक विजेता महान शास्त्रज्ञ, जो जिवंतपणी दंतकथा बनला होता तो म्हणजे सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांनी तार्यांच्या अस्तित्वाबद्दलचं जे संशोधन केलं, त्यालाच ‘चंद्रशेखर लिमिट’ असं संबोधलं जातं. त्यांच्या या शोधामुळेच विश्वातल्या अनेक रहस्यांची उकल होण्यास पुढे मदतच झाली.
चंद्रशेखर यांना एन्रिको फर्मी यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना काही काळासाठी भौतिकशास्त्रातलं गणित शिकवण्याची विनंती केली. चंद्रशेखर यांची लेक्चर्स इतकी अप्रतिम झाली की विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवायला कायमसाठी चंद्रशेखरच हवेत असा हट्ट धरला. मग फर्मी यांनी चंद्रशेखरना भौतिकशास्त्र विभागात येण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. चंद्रशेखर यांनीही तो आनंदानं स्वीकारला. चंद्रशेखर जेव्हा व्याख्यान देण्यासाठी उभे राहत, तेव्हा भिंतीवर सरळ रांगेत असलेले मोठमोठे तीन फळे ते त्यांच्या समीकरणांनी भरून टाकत. त्यांचं अक्षर आणि मांडणी इतकी नेटकी असे, की जणू काही त्या फळ्यावर तो छापलेलाच मजकूर आहे असा भास होत असे. एकदा तर त्यांनी फळ्यांवर शिकवत शिकवत तिन्ही रकाने पूर्ण भरून टाकले. शिकवून संपतं न संपतं तोच एका विद्यार्थ्यानं उभं राहून म्हटलं, 'सर, तुम्ही फळ्यावर लिहिलेल्या पहिल्या रकान्यातल्या आठव्या ओळीतलं चिन्ह चुकलं आहे.’ तेव्हा आपल्या संपूर्ण शिकवण्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास असलेले चंद्रशेखर त्याच्याकडे आणि फळ्याकडे जराही वळून न बघता म्हणाले, 'माझ्याकडून काहीही चूक झाली नाही, तुझ्याच बघण्यात काहीतरी चूक झाली असेल. तू नीट बघ.’ इतके ते स्वतःबद्दल ठाम होते. त्यांनी सापेक्षतावादाचा, कृष्णविवरांचा आणि त्यातल्या गणितांचा सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तकं लिहिली.
आपल्या गाडीतून व्याख्यान द्यायला जाताना रस्त्यात एखादा विद्यार्थी दिसला तर चंद्रशेखर थांबून त्याला लिफ्ट देत असत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या चंद्रशेखरांना विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह निर्माण करण्याची विलक्षण हातोटी होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांशी त्यांचे संबंध अतिशय प्रेमाचे आणि घरगुती स्वरूपाचे होते. आपले विद्यार्थी निर्भीडपणे स्वतंत्र विचार कसे करतील याकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असे. संपूर्ण आयुष्यातला बराच काळ त्यांनी युवावर्गात घालवला. त्यांना ते मनापासून आवडायचं. ते म्हणत, 'फर्मी, न्यूमन, एडिंग्टन, डिरॅक आणि हायझेनबर्ग यांच्याबरोबर काम करायला मिळणं माझ्यासाठी खूपच रोमांचकारी गोष्ट होती, पण त्याहीपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मला जो आनंद मिळाला, त्या अनुभवानं मी सर्वात जास्त श्रीमंत आणि समाधानी झालो असं मला वाटतं.’
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment