भारतीय जीनियस - सर जगदीशचंद्र बोस
भारतीय जीनियस - यात भेटतील : आर्यभट, वराहमिहीर, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्ही. रामन, दामोदर कोसंबी, चंद्रशेखर, विश्वेश्वरैया, रामानुजन, स्वामीनाथन, लॉरी बेकर आणि डॉ. जयंत नारळीकर.
प्रत्येक जीनियस वेगळा, शास्त्रज्ञ म्हणूनही मोठा आणि माणूस म्हणूनही मोठा!!!!
सर जगदीशचंद्र बोस हे जातिभेद मानत नसत. केवळ मानवता आणि माणुसकी यावरच त्यांचा विश्वास होता. म्हणूनच तर लहानपणापासूनच सगळ्या जातिधर्मांचे आणि सगळ्याच स्तरातले त्यांचें मित्र होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांनी आपल्या मित्रांना भेटायला जाणं सोडलं नाही किंवा आपल्या आणि त्यांच्यात अंतर निर्माण करणं अशा गोष्टी मुळीच केल्या नाहीत. उलट त्या व्यस्त दिनक्रमातूनही ते आवर्जून आपला वेळ आपल्या मित्रांसाठी देत असत. एकदा त्यांना खेडेगावातल्या एका मुस्लीम माणसानं आपल्या घरी जेवायचं निमंत्रण दिलं. जगदीशचंद्र यांनी ते निमंत्रण स्वीकारलं, पण कुठल्या खास गोष्टीबद्दल जेवणाचा बेत आहे याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा तो खेडूत म्हणाला, 'माझ्या घरातल्या स्त्रियांना तुम्हाला बघायचं आणि भेटायचं आहे.' जगदीशचंद्र बोस यांना या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, 'अरे, तुमच्यात स्त्रिया गोषा पाळतात ना, मग माझ्यासारख्या परक्या पुरुषासमोर त्या मला बघायला आणि माझ्याशी बोलायला कशा येणार?' त्यावर तो खेडूत म्हणाला, 'गोषा परक्या माणसांसमोर पाळायचा असतो. तुम्ही आमच्यासाठी परके कुठे आहात? तुम्ही तर आमच्यातलेच एक आहात.'
'आपलं मन म्हणजेच एक प्रयोगशाळा आहे आणि त्या मनाला होणार्या आभासातून आपण सत्य जाणण्याचा प्रयत्न करत असतो’ असं म्हणणार्या आणि आपल्या मृत्यूनंतरही आपलं काम अव्याहतपणे पुढे चालावं याचा ध्यास घेतलेल्या जगदीशचंद्र बोस यांच्यासारखा रसिक दिलाचा आणि कवी मनाचा संवेदनशील शास्त्रज्ञ विरळाच!
Add new comment