प्रिय,
प्रिय,
तू लिहितेस, माझ्याबद्दल
तू सांगतेस, माझ्या लिखाणाबद्दल
भरभरून...
तुझा आवाज आनंदामुळे मोठा झालेला असतो
जणू काही जगात फक्त आपणच दोघी आहोत
मी मात्र गृहीत धरते आणि
तुला कधीच काही सांगत नाही
तुला ते सारं समजलंय हे ठाऊक असतं मला
पण खरंय,
सांगायला हवं, लिहायला हवं आणि बोलायलाही हवं
कारण ती त्या त्या क्षणांची मागणी असते
आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर आल्यावर
अचानकपणे भेटलीस
आपल्या या नात्यात,
ना कुठला व्यवहार, ना कुठल्या अपेक्षा
मैत्रीचं एक हळुवार नातं फक्त
हे नातं २४ तासही माझ्याबरोबर असतं,
प्रत्येक श्वासागणिक
दोन श्वासांमधल्या अंतरातही ते असतं.....
जाणिवेतही असतं आणि नेणिवेतही असतं....
आज तू आणि शेखर - तुमच्या लग्नाचा वाढदिवस
वेगळे असूनही किती एकरूप आहात.....
खूप वेगळे असूनही एक आहात
तू अखंड बोलत राहतेस आणि तो शांतपणे वावरत असतो
तुझ्या अवतीभवती,
घरात असतानाही आणि नसतानाही
तुझा सगळा गोतावळा त्यानं आपला म्हटलेला असतो
नात्यांवरचा विश्वास उडत असणार्यांनी,
तुमच्या जोडीकडे बघावं एकदा
जोडीदार काय असतो,
एकत्र वाटचाल का आणि कशी करायची असते
हे उमगेल त्यांना.....तुम्हाला भेटून
आजच्या चंगळवादी जगात,
वस्तूंना जसे पर्याय आहेत
तसेच व्यक्तींनाही आहेत,
म्हणूनच तू सही, और भी सही
ही वृत्ती जोर धरत आहे,
तिला मैत्रीचं गोंडस नावही दिलं जातं...
पण ही मैत्री, हे प्रेम उभं असतं
विश्वासाच्या नात्यावर
पारदर्शी वागण्यावर, न बोलताही
जोडीदाराची सुखदुःख समजून घेण्यावर
सुवर्णा, तू आणि शेखर तसेच आहात
माझ्या स्वप्नांना अबाधित ठेवणारे
माझ्या स्वप्नांवरचा विश्वास दृढ करणारे
म्हणूनच
वास्तवाचे भरभक्कम पंख स्वप्नांना देऊन
भरारी घेते आहे .....
समोर तुम्ही दोघं आहात, असेच राहा
सुवर्णा-शेखर, सगळी सुखं, खूप आनंद, समाधान
पुढली शेकडो, हजारो, करोडो वर्षं तुम्हाला लाभो
हीच सदिच्छा!!! आणि याच शुभेच्छा !!!
दीपा, 21 मार्च २०२१
deepadeshmukh7@gmail.com
Add new comment