इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस महेश भागवत

इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस महेश भागवत

तारीख

इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस महेश भागवत - दुर्दम्य उत्साह कधीही मावळू देऊ नका!

आर्याबाग सांस्कृतिक ग्रुप नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप काहीच महिन्यांपूर्वी तयार झाला. या ग्रुपमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा व्हाव्यात असा उद्देश होता आणि आहे. या कट्टयावर राजकीय, धार्मिक विषयांना बंदीच आहे म्हटलं तरी चालेल. ग्रुपमध्ये अमेरिका, युरोप, दुबई, पुणे, मुंबई, मराठवाडा अशा अनेक वेगळवेगळ्या ठिकाणची मंडळी एकत्र आली असून २४ तास अखंडपणे अनेक विषयांवर चर्चा चालत असते. या ग्रुपमधली मंडळी एकाहून एक अशी झपाटलेली ‘नग’ (ठार वेडी) मंडळी आहेत. यात साहित्यिक आहेत, कवी आहेत, गायक आहेत, कलावंत आहेत, चित्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, बंडखोर विचारांचे विद्यार्थी आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, सरकारी अधिकारी आहेत, संशोधक आहेत, इतिहास अभ्यासक आहेत.....कोण नाहीयेत? या गटाच्या वतीनं प्रत्येक महिन्यात बारामतीमधल्या काटेवाडी इथल्या कल्याण तावरे यांच्या पुढाकारानं आर्याबागमध्ये एक छानसा कार्यक्रम आयोजित केला जाऊ लागला.

पहिल्या कार्यक्रमात संगणकतज्ज्ञ आणि आता लेखक म्हणून प्रसिद्धा असलेले अच्युत गोडबोले आणि तुमचे आमचे सुपर हिरो, जीनियस आणि कॅनव्हासच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांनी आपला लेखनप्रवास बारामतीकरांसमोर उलगडला. त्यानंतर विख्यात लेखक आणि निवेदक सुधीर गाडगीळ हे बारामतीकरांशी संवाद साधायला काटेवाडीत आले. नंतर आला तो अनिल अवचट सारखा मनस्वी चित्रकार, लेखक, पत्रकार! पुस्तकातून अनुभवलेल्या या मनस्वी कलाकाराला भेटायला मोठयांनी गर्दी केली होतीच, पण बच्चे कंपनीही ओरिगामीच्या टिप्स घेण्यासाठी घोटाळत होती. पानिपतकार विश्‍वास पाटील यांनीही या ग्रुपशी संवाद साधायला आर्याबागला भेट दिली. याच ग्रुपच्या वतीनं बारामतीत फिल्म क्लब सुरू असून फिल्मविषयी संजय भास्कर जोशी यांनी सिनेमावेड्या गटाशी संवाद साधला. सामाजिक कार्यात तंत्रज्ञानाची जोड घेत काम करणारे प्रदीप लोखंडे यांनीही आर्याबागला भेट दिली. आर्याबागचं वातावरण इतकं निसर्गरम्य आणि मनोरम आहे की तिथून परत येताना पावलं जड होतात.

या नामवंतांच्या भेटीनंतर आर्याबागला शिक्षणावरती एक सुंदर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. रंजना बाजी आणि जिना यांच्या पुढाकारानं ही कार्यशाळा संपन्न झाली. आर्याबाग इथे जमल्यावर चांदण्या रात्री आर्याबागचं वातावरण सगळ्यांनाच मोहवून टाकतं. गप्पांचा फड जमतो आणि प्रत्येकाच्या कहाणीतून आणि कामातून नव्यानं पुन्हा काहीतरी गवसत जातं. मध्यरात्री हिरवळीवर उभारलेल्या टेन्ट (तंबू)मध्येच चांदण्या मोजत मोजत झोपणं हा आनंद तर काही औरच अनुभवायला मिळतो. सगळ्यांच्या सातत्यानं होणार्‍या संवादातून आणि भेटीतून एके दिवशी ग्रुपचे एक सदस्य कवी हनुमान चांदगुडे यांनी त्यांच्या बारामतीजवळच्या शेर्‍याची वाडी या गावातली पाण्याची बिकट परिस्थिती सगळ्यांना सांगितली. ग्रुपमधल्या मंडळींनी एकत्र येऊन आपण काय करू शकतो यावर चर्चा करायला सुरुवात केली आणि ग्रुपचे उत्साही खंदे कार्यकर्ते ऍडव्होकेट श्रीनिवास वायकर यांनी पुढाकार घेतला आणि प्रत्येकानं स्वेच्छेनं काही रक्कम उभी केली आणि त्यातून हनुमान चांदगुडे यांच्या गावाला टँकरनं पाणी पुरवठा सुरु झाला. पाऊस पडेपर्यंत हे काम करायचं असं ग्रुपच्या सदस्यांनी ठरवलं. या कामात तर आता तहान नावाची संस्था उतरली आहे. या संस्थेचं कामकाज बघणारा गट रविना मोरे सारख्या तरूण मुलामुलींचा असून त्यांनी आणखी काही गावं निवडून त्यांचाही पाण्याचा प्रश्‍न सोडवायचा ‘पण’ केला आहे आणि ही मंडळीही कामाला लागली आहे. बघता बघता एका गावापासून सुरू झालेलं पाणी पुरवठा करण्याचं काम आज एकूण १० गावांना तहान आणि आर्या बाग सांस्कृतिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

या वेळेस ३० एप्रिलला काटेवाडी आर्याबागला जायचं ठरलं. खरं तर मनाची अवस्था द्विधा झालेली होती. एकीकडे रेंगाळत मागे पडलेली कामं दिसत होती, तर दुसरीकडे महेश भागवत (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस- आयजी, हैद्राबाद) या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व्यासंगी अशा पोलीस अधिकार्‍याचं मनोगत ऐकण्यासाठी मन ओढ घेत होतं. इंजिनियर असलेली ही व्यक्ती युपीएससी आणि आयपीएस परीक्षा पास होते आणि प्रशिक्षणानंतर थेट मणिपूर राज्यात जाऊन पोहोचते आणि तिथल्या समस्यांना कशी तोंड देते याबद्दल थोडंफार ऐकलं होतं. अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा कळत नव्हतं. मग सरळ एका मित्राला फोन केला आणि मनाची ही द्विधा अवस्था सांगितली. त्यानं क्षणभरही विचार न करता आर्याबागला जा असं सांगितलं आणि मीही कधी नाही ते ताबडतोब त्याचं ऐकलं. सकाळी डॉ. सुचेताबरोबर प्रवास सुरू झाला. अनेक वर्षांपासूनच्या जिवलग मैत्रिणी आहोत अशाच साठलेल्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पांमध्ये बारामती कधी आलं आम्हाला कळालंही नाही.

बारामतीला डॉ. कल्पना देशपांडे आणि शिक्षण विषयात काम करणार्‍या रंजना बाजी आणि नंतर नीता शेंबेकर यांच्याकडे आम्ही पोहोचलो. बरोबर महेश भागवत, कल्याण तावरे, सीमा तावरे, श्रीनिवास वायकर होते. गप्पा मारत भरपूर नाश्ता झाला आणि तिथून पावलं बारामतीत सुरू असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या शिल्प कार्यशाळेकडे वळली. शिल्पकारांशी बोलत, त्या शिल्पांना स्पर्श करत, त्यातला जिवंतपणा टिपत आम्ही आर्याबागला जाऊन पोहोचलो. पुन्हा गप्पा रंगत गेल्या. बघता बघता कार्यक्रमाची वेळ झाली. एक एक मंडळी यायला सुरुवात झाली. अनौपचारिक गप्पांना उधाण आलं. महेश भागवतांनी हैद्राबादहून आणलेला खाऊ आणि बारामतीच्या डॉ. साधना कोल्हटकर यांची स्पेशालिटी असलेला केक, नीता शेंबेकरची कैरीची वाटली डाळ खात आणि कैरीचं थंडगार पन्हं पित कार्यक्रमाला केव्हा सुरुवात झाली कळलंच नाही. कार्यक्रम सुरू होतानाच पुण्याहून आर्याबागला १३ वर्षांनंतर आलेली डॉ. सुचेता उन्निथन, डॉ. माधवी मेहेंदळे आणि आसावरी कुलकर्णी यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ हिनं महेश भागवत यांचा परिचय अतिशय ओघवत्या भाषेत करून दिला.

महेश भागवत यांना ऐकण्यासाठी सगळ्याच वयोगटातली माणसं एकत्र जमली होती. महेश भागवत सध्या हैद्राबाद इथं आयजी म्हणून कार्यरत आहेत. ते एक कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. याचं कारण त्यांनी लोकांसाठी केलेली कामं! कॉलेज जीवनात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पाणी पंचायत आणि नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये काम केल्यानं आजही त्यांच्यातला हाडाचा कार्यकर्ता सदोदित जागा असतो. चळवळीनं काय दिलं तर सर्वसामान्य लोकांमध्ये राहून नम्रता अंगी बाळगून काम कसं करायचं हे शिकलो असं त्यांनी सांगितलं. काम करताना संयम, वैज्ञानिक दृष्टिकोन यांची जोड बरोबर असते. काम करताना आपल्या सहकार्‍यांचा विश्‍वास संपादन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ते मानतात. त्यांनी हाती घेतलेलं काम ते यशस्वी करून सोडतात. नक्षलवाद्यांची संख्या कमी करता येईल यावर सतत मनन आणि चिंतन करून त्यांनी त्यावर अनेक उपाय योजले. तसंच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी, पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. ज्या भागात विकास पोहोचला नाही तिथे विकासाची कामं पोहोचली पाहिजेत हे ध्येय समोर ठेवलं. (पिण्याचं पाणी, रस्ते, वीज, बस वाहतूक वगैरे) विकासाच्या कामांमुळे लोक नक्षलवादी होण्यापासून परावृत करण्यात यश मिळालं. नक्षलवादी बनण्यापासून अनेक तरूणांना परावृत करण्यात अयश आलं. संख्या २०० पासून २० वर आणता आली. तिथल्या एका गावात धरणाखाली गाव गेल्यानं गावात जायला रस्ताच नव्हता. पाण्यातून जावं लागायचं. नक्षलवादी त्रास द्यायचे. पोलिसात तक्रार करायची असेल, डॉक्टर कडे जायचं असेल तरी इतर ठिकाणी संपर्क करायला त्या लोकांना त्रास व्हायचा. अशा वेळी महेश भागवतांनी मनावर घेतलं आणि गावातल्या लोकांशी बोलून रस्ता तयार करायचं ठरवलं. कुठलाही कंत्राटदार नक्षलवाद्यांच्या भीतीनं काम करायला तयार होईना. अशा वेळी महेश भागवत यांनी लोकांना विश्‍वासात घेऊन त्यांचा श्रमसहभाग घेऊन त्यांच्या बरोबरीनं काही पोलीसही साहाय्याला दिले आणि १२ किमीचा रस्ता दीड महिन्यात तयार केला.

रस्ता तयार झाल्यावर गावात बदलाचे वारे वाहू लागले. त्यानंतर जेव्हा नक्षलवाद्यांनी जेव्हा हल्ला केला, तेव्हा तिथे असलेल्या लंबाडी आणि गोंड लोकांनी प्रतिकार केला आणि त्यातल्या एकाची बंदूक हिसकावून घेतली आणि नक्षलवाद्यांना पळवून लावलं. सगळा गाव नाचत ती बंदूक घेऊन पोलीस स्टेशनात ते हत्यार पोलिसांना द्यायला पोहोचला. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी गावकर्‍यांचं कौतुक केलं आणि गावाच्या विकासासाठी आणखी १ कोटीची मदत जाहीर केली. गाव आता सगळीकडे जोडलं गेलं. या गावापासून प्रेरणा घेऊन नंतर २६ गावांमध्ये नक्षलवाद्यांविरूद्ध उठाव झाले. ३६० गावातल्या लोकांनी नक्षलवाद्यांना आपल्या गावात येऊ देणार नाही अशी शपथ घेतली. नक्षलवादापासून सुटका ही भावना लोकांच्या मनात विकासाची कामं व्हायला लागताच जोर धरू लागली! अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेनं दखल घेतली आणि आदिलाबाद पोलिसांची निवड झाली आणि लॉस एंजेलिसला महेश भागवत यांनी आपल्या सहकार्‍यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला. हैद्राबाद इथं त्यांनी नंतर काम सुरू केलं. चारमिनार भागात नेहमी हिंदू-मुस्लिम दंगे होत. लोक पोलिसांवर हल्ला करत आणि पोलीसांचे बळी जात. महेश भागवत यांनी मूळ प्रश्‍नावर अभ्यास केला. इमाम मज्जिदीच्या नेत्यांशी चर्चा केली. मुस्लिम समाजाचा विश्‍वास मिळवला आणि हे दर शुक्रवारी होणारे दंगे थांबण्यात यश मिळालं. पोलिसांची प्रतिमा बदलवण्यातही त्यांना यश मिळालं.

मानवी तस्करीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या भयंकर गुन्हयांना रोखण्यासाठी त्यांनी आसरा नावाचा एक प्रकल्प उभा केला आणि त्यांचं हे मॉडेल अनेक देशांनी स्वीकारलं. त्यांच्या अनोख्या कार्याची दखल भारतातच नव्हे तर इतर देशांनी घेऊन त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान मिळाले. आठ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. तसंच साधनापासून ते अनेक साप्ताहिकं, वर्तमानपत्रं यातूनही ते लोकांसाठी सातत्यानं लिखाण करत असतात. खरं तर महेश भागवत यांचं वेगळेपण यात आहे की हा माणूस इतका मोठा पोलीस अधिकारी असूनही तो सर्वसामान्य माणसांपासून तुटलेला नाही. आपला कोणी आप्त, स्नेही असावा असा हा माणूस पहिल्याच भेटीत कोणालाही भावतो. म्हणूनच आर्याबागमध्ये जमलेले ज्येष्ठ नागरिक असतील, गृहिणी असतील किंवा विद्यार्थी सगळेच त्यांच्याशी मनमोकळं बोलू शकले. आपल्या मनातल्या शंका त्यांनी विचारल्या. न कंटाळता, प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरं दिली. अहंकाराचा लवलेश नसलेला हा माणूस प्रत्येकाला जोडत चालला आहे याचं कारण त्याच्यात जागा असलेला कार्यकर्ता! महेश भागवत यांच्याच बरोबर बारामतीचे सुपुत्र आणि आयपीएस झालेले अधिकारी विक्रम खलाटे हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महेश भागवत यांनी श्रोत्यांसमोर आपला प्रवास उलगडला. त्यात त्यांच्या अहमदरनगर जिल्हयातल्या पाथर्डीसारख्या लहान गावातून सुरू झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कसा पोहोचला याची उकल त्यांनी केली. आई ही शाळेत शिक्षिका असल्यानं गुरू म्हणून खूप फायदा झाला. आई हीच पहिली गुरू. तिनं कधीच आपल्या आणि दुसर्‍या मुलांमध्ये फरक केला नाही. शाळेत असताना पहिलीत असताना चौथीच्या कविता पाठ असत. शालेय जीवनापासून भाषेवर घेतलेली मेहनत, यातून केंद्रातून दहावीत पहिला कसा आलो, नंतर पुण्यातल्या सीओईपीला इंजिनियरिंग केलं या आठवणी सांगताना ते भूतकाळात रमून गेले. आंध्र प्रदेशातल्या प. गोदावरी या जिहयात काम करताना निवडणुकीच्या काळात तेलगु भाषा येत नसताना ती परिस्थिती कशी हाताळली याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. प्रत्येक वेळी आपल्या सहकार्‍यांशी आपलं नातं किती दृढ असलं पाहिजे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. मणिपूरमध्ये काम करतानाचे तिथल्या नागरिकांचे प्रश्‍न आणि भारताबद्दलचं त्यांचं दुरावलेपण व्यक्त करणारी भावना त्यांनी सांगितली. अनेक ठिकाणी काम केल्यानं अनेक भाषा आपल्याला थोड्याबहूत शिकता आल्याचंही त्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या चळवळीचा इतिहास महेश भागवत यांनी सांगितला.

नक्षलबारी या गावातून सुरू झालेली चळवळ कुठल्याकुठल्या टप्प्यातून गेली आणि आजंचं तिचं स्वरूप त्यांनी दाखवलं. १०-१० वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्हयांच्या शोधाच्या कहाण्या त्यांनी सांगितल्या. काम करताना कधी कधी येणारे संकटांचे प्रसंग, नैराश्य अशा अनेक गोष्टीही त्यांनी सांगितल्या. पण या कशालाही न घाबरता कसं पुढे गेलं पाहिजे याबद्दलही त्यांनी सांगितलं. सामाजिक भान आणि प्रत्येक गोष्टीत मुळापर्यंत जाण्याची तयारी या गोष्टी त्यांना पुढे गुन्हेगारांना पकडताना झाल्या. गुन्हेगारांना पकडलं की काम संपलं असं करून चालत नाही ही गोष्ट महेश भागवांमधला कार्यकर्ता जाणतो. त्यांच्या या कामात सर्वसामान्यांशी संपर्क आणि संवाद ठेवल्यामुळे लोकही त्यांना माहीत असलेल्या गोष्टी निःसंकोचपणे सांगू लागले आणि यातून अनेक गुन्हयांची उकल होण्यास मदत होऊ लागली. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा कुठल्या परिस्थितीत आणि का केला याचा अभ्यास करून त्यांना पुन्हा सन्मानानं जगता येईल का याचा विचार महेश भागवत नेहमीच करत असतात. एका नक्षलवाद्यानं तर समर्पण केल्यावर त्याच्याशी बोलताना त्यानं त्याचं इंजिनियरिंगचं शिक्षण अर्धवट सुटल्याची खंत व्यक्त केली, तेव्हा महेश भागवत यांनी त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली आणि आज त्याची शिक्षा संपल्यानंतर या व्यक्तीचं इंजिनियरिंग पूर्ण करून तीच व्यक्ती एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सन्मानानं जगतो आहे. असे अनेक उदाहरणं त्यांच्या कामाबद्दल सांगता येतील.

महेश भागवत यांच्यातला मीश्किल स्वभावही या निमित्तानं बघायला मिळाला. त्यांनी पोलीस अधिकार्‍यांवरही काही विनोद केले. त्यांनी म्हटलं पोलिसांच्या डोक्यात २४ तास कामाचेच विचार सुरू असतात. त्यामुळे एकदा जेव्हा एका पोलिसाला लग्नाचं निमंत्रण आलं, तेव्हा सहजपणे बोलताना त्यानं समोरच्याला विवाहस्थळ कुठे आहे असं विचारायच्या ऐवजी घटनास्थळ कुठे आहे असा प्रश्‍न केला. पोलीस विभागात आपल्या वरिष्ठांना नेहमी ‘यस्स सर’ असंच म्हणायचं असतं असं ठसल्यामुळे एकदा एका अधिकार्‍यानं एका पोलीस कॉन्स्टेबलची फिरकी घेण्यासाठी त्याला जा हिमालय घेऊन ये असा आदेश दिला. तेव्हा त्यानं ‘यस्स सर’ म्हणत कामगिरीवर निघाला. अर्ध्याच तासात एका आईसफॅक्टरीतून त्यानं एक बर्फाची लादी डोक्यावर वाहत पोलीसस्टेशनला आणली आणि आपल्या अधिकार्‍याला तो म्हणाला, सध्या मी हिमालयातून इतकाच बर्फ आणू शकलो आहे. बाकीचा नंतर आणतो. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या अनेक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी काय वाचावं, कशी तयारी करावी याविषयी महेश भागवतांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी काय वाचावं हे सांगताना त्यांनी हिंदू पेपर नियमित वाचावा आणि त्यातलं संपादकीय आवर्जून वाचावं असं सांगितलं. जे वाचन करू, त्याची संक्षिप्त टिपणं काढून ठेवावीत, खेळ (विम्बल्डन स्पर्धा, आंतरराष्ट्रीय परिषदा, देशांतले परस्पर संबंध, देशांमधले करार यांचा अभ्यास) महेश भागवत यांनी पुण्यातल्या सिओईपी मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने काही मित्रांच्या मदतीने उपक्रम सुरु केलाय. यात अनेक अधिकारी मार्गदर्शन करतील आणि तिथेच उपयुक्त अशा पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्यात आलं आहे. बारामतीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताना आपण नक्कीच मदत करू असं आश्‍वासन दिलं. इंग्रजी भाषा उत्तम कशी करता येईल याचाही अभ्यास करावा. बारामतीत आर्याबाग ग्रुपच्या वतीनं अशी पुस्तकं उपलब्ध करून एक चांगली लायब्ररी सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली आणि कल्याण तावरे त्यांनी लगेचंच त्याला संमती दिली.

महेश भागवत यांना आर्याबागच्या सदस्यांच्या वतीनं प्रेमाची भेट म्हणून जीनियस आणि कॅनव्हास ही पुस्तकं भेट देण्यात आली. याच प्रसंगी डॉ. माधवी मेहेंदळे हिची मायकेल अँजेलो, आरएक्स, दृष्टीपटल आणि चेक पॉइंट चार्ली ही पुस्तकंही त्यांना दीपा देशमुख आणि माधवी मेहेंदळे यांच्या हस्ते भेट देण्यात आली. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन गप्पांमध्ये पार पडलं. नंतर आलेली मंडळी एक एक करत निरोप घेती झाली. सगळ्यांची पांगापांग झाल्यावर आर्याबागला मुक्कामी असलेल्यांचं पुढलं सत्र नव्यानं सुरू झालं. या रंगलेल्या गप्पांमध्ये रविना आणि प्राची या दोन युवतींचा सामाजिक कामासाठी असलेला ओढा आणि त्यांनी दुष्काळी गावांमधला पाणी प्रश्‍न त्यांच्या परीनं सोडवण्यासाठी उचललेलं पाऊल त्यांच्याकडूनच ऐकता आलं.

त्यानंतर सुधीर सप्रे या एका प्रचंड वेड्या माणसाला जाणून घेण्याची संधी मिळाली. आर्याबागचं सुंदर निसर्गरम्य वातावरण, अंधारातही आपलं अस्तित्व दाखवणारी आणि संवाद ऐकायला उत्सुक असणारी झाडं, त्यातून डोकावणारं पिठूर चांदणं आणि थंड गार वार्‍याची वाहणारी झुळूक यात सुधीर सप्रेसारख्या माणसाची गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटाला मागे टाकेल इतकी वेगळी! मुंबईतल्या गोरेगावसारख्या भागात राहणारा हा सुखवस्तू माणूस एके दिवशी त्याच त्या चाकोरीबद्ध जीवनाचा कंटाळा आल्यानं सरळ आपला फ्लॅट विकतो काय आणि विंचुर्णीसारख्या ८ तास लोडशेडिंग असलेल्या गावात पोहोचतो काय आणि तिथे शेळ्या मेंढ्यांच्या संगतीत राहतो काय सगळंच अजब! या माणसाचं वय ६२ असून आजही त्याची भारतभर आणि जगभर चाललेली भटकंती त्याच्याच शब्दात अनुभवण्यासारखी आहे. त्यानंतर नियमाप्रमाणे गाणी झालीच पाहिजेत असा जणूकाही अलिखित करार झाल्याप्रमाणे अस्मादिक म्हणजे दीपा देशमुख, कल्याण तावरे आणि आसावरी कुलकर्णी यांनी कविता गायल्या, गाणी गायली. आसावरीचं वातावरणाला अनुकूल असं आजा सनम मधुर चांदणी मे हम... धुंद करून गेलं. तर दीपा आणि कल्याण यांनी ये राते ये मोसम नदी का किनारा या गाण्यानं त्यात आणखीनच भर टाकली. रात्रीचे दोन वाजले तरी गप्पां संपत नव्हत्या, पण अखेर आवरत्या घेत सगळी मंडळी हिरवळीवर असलेल्या तंबूंमघ्ये झोपण्यासाठी हलली. मात्र तंबूमधूनही वर पाहताच आकाशातला चंद्र आणि चांदण्या पहाटेपर्यंत हितगुज करतच राहिल्या.

रविवारी सकाळी डॉ. शेखर आणि सुवर्णसंध्या धुमाळ यांच्याकडे नाश्त्यासाठी पोहोचताच शेतात राहणार्‍या या डॉक्टर जोडप्याचा प्रवासही ऐकायला मिळाला. एकत्र कुटुंब, शेती आणि प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी एकाच वेळी लीलया पेलणारं हे कुटुंब प्रसन्नपणे आपली गोष्ट सांगत होतं. याच वेळी तिथे आणखी एक व्यक्ती भेटली आणि ती म्हणजे नुकताच झालेल्या 'हवा येऊ द्या' या कार्यक्रमात भाग घेतलेली डॉ. महेश गायकवाड ही व्यक्ती! वटवाघळावर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड हे आज धुमाळ दांम्पत्याबरोबर पर्यावरणावर काम करत असून विद्यार्थी दशेपासूनच जागृती आणण्यासाठी प्रयत्न करताहेत. अनेक मोठमोठ्या नोकर्‍यांचं अमिष समोर असतानाही हा माणूस निसर्गाचा दिवसेंदिवस होत चाललेला र्‍हास रोखण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करतोय. धुमाळ दांम्प्यत्याकडून निघतानाच सुवर्णसंध्यानं चिमण्यांची संख्या कमी होत असतानाच जिथे दोन चिमण्या येत नसत, त्या आपल्या घरात/शेतात आज १५० चिमण्यांना राहायला निमंत्रित केलंय आणि आज १५० चिमण्यांनी आपली घरटी इथं उभारली आहेत. त्यांची आता ऐकायलाही न मिळणारी चिवचिव इथं मात्र जरूर ऐकायला मिळतेय. शेखर, सुवर्णसंध्या, योगिता आणि डॉ. महेश गायकवाड यांच्याबरोबर तिथे शेतावर काम करणाऱ्या शबाना आणि रेहाना यांच्यासह चिवचिवणार्‍या चिमण्यांचा निरोप घेत आम्ही पुण्याच्या परतीच्या प्रवासाला निघालो. खरंच आर्याबागमधलं वास्तव्य हा एक समृद्ध करणारा प्रवास असतो हे मात्र खरं! 

-  दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.