गझल आणि आठवणी

गझल आणि आठवणी

तारीख

मनाशी गुणगुणत होते आणि त्या वेगावर गाडीही ताल धरत धावत होती. 
पाऊस धारा अवखळ, अन् वार्‍याची सळसळ
भिजलेल्या मातीला मृदुगंधाचा दरवळ............
हो, वैभवची ही कविता मनाशी गात मी एसएम जोशी हॉलपर्यंत पोहोचले. थँक्स टू श्रुती, तिच्या व्हॉट्स अप मेसेजमुळे मी कम्प्युटरसमोरून बाजूला झाले. खरं तर दिवाळी अंकासाठीच्या शेवटच्या तीन लेखांवर काम करत होते. पण मनासारखं जमतच नव्हतं. वैतागून अखेर फोल्डर बंद केलं आणि श्रुतीला म्हटलं, जागा पकडून ठेव, मी येते. पोहोचले तेव्हा एस. एम. जोशी हॉल तरुणाईनं फुलून गेला होता. अनेक ओळखीचे चेहरे दिसत होते. काही तर फेसबुक फ्रेंड्स होते. ममता सिंधुताई, शिल्पा देशपांडे, सतीश दराडे, दगडू लोमटे, नाना लोढम, प्रमोद, जनार्दन....अनेक जण.....सुरेश वैराळकर नेहमीसारखे हसतमुख रुबाबदार ... सगळ्यांना भेटायचा मोह झाला. किती वर्षं या गझलेपासून मी लांब राहिलेय हे कळत होतं आणि दिसतही होतं. सगळ्यांशी बोलत राहिले. पण मनातल्या मनातच... छान वाटत होतं.
हाऊस फुल्ल भरलेला हॉल, सगळ्याच वयोगटातली माणसं आता हॉलमध्ये दाटीवाटीनं बसली होती आणि कितीतरी जण उभी होती. वैराळकरांच्या खास आवाजात कार्यक्रम सुरू झाला... 
२२-२३ वर्षांचा कौस्तुभ आठल्ये नावाचा एक गोंडस तरुण गझल सादर करत होता. आपणच आपली वाट शोधायची, ती शोधताना ठेच खायची आणि मग आपणच आपल्याला जवळ घेत थोपटत सांत्वन करायचं अशा अर्थांच त्याचं सादरीकरण होतं. खरं तर प्रत्येकाचं सादरीकरण खासच होतं. आजच्या यांत्रिक आणि व्यवहारी पद्धतीनं जगणार्‍या माणसाला एक तरुण गझलकार सांगत होता, या चांदण्यांना स्पर्श करून बघ तर एकदा, नंतर मग तुला हवी तितकी मोजमापं करायची ती काढ. काय व्यवहार बघायचा तो बघ. कोणी ‘कोलाहल प्यायल्यावर आतपर्यंत कशी शांतता पसरते’ सांगत होता, तर कधी प्रत्येकाचा चंद्र कसा वेगळा असतो आणि तो कसा त्याच्या वेळेनुसार उगवतो आणि मावळतो हे सांगतच काळोखाची व्याख्याही कशी काळ बदलल्यावर बदलते हे सांगत होता.
व्यासपीठावरचे गझलकार विदारक सत्य मांडताना ऐकवत नव्हतं. त्यांनी केलेलं दाहक सत्याचं सादरीकरण मनात कोलाहल निर्माण करत होतं. जेव्हा, ‘जठरात पेटल्या पणत्या आणि पोटात दिवाळी झाली’ हे ऐकताना मनाच्या ठिकर्‍या उडाल्या. जन्मलेल्या बाळाला कोवळ्या गझलेची उपमा देत शिल्पा देशपांडेसारखी तरुणी जेव्हा ते बाळ बनून म्हणते, मला कचर्‍यात फेकण्याआधी ए आई, तू माझ्या कपाळाचं चुंबन तरी घेतलं होतंस का ग? आपल्या आत वसलेल्या अशा शेकडो सैतानांची लाज वाटावी.... अस्मानीसुलतानी इतिहासात डोकावून बघितलं तर त्या वेळी शेतकरी आत्महत्या करत होता का, असा प्रश्‍नही एक कवी विचारत होता. गुरुत्वाकषर्णाचा प्रभाव असूया, स्पर्धा जागी झाली की गुरू शिष्य नात्यावर कसा होतो हेही एका कवीनं सांगितलं. त्याच वेळी शेतकरी मनाच्या कवीनं गुगलचा वापर करून दुष्काळाची आकडेमोड करणार्‍या तज्ज्ञांना सणसणीत शिवी हासडत तू कधी शेताचा बांध तरी पाहिला आहेस का असा सवाल केला. मानवतेच्या पडझडीचं वर्णंन कोणी करत होता...
एकूणच विज्ञान असो, वा सामाजिक प्रश्‍न सगळ्या विषयांना ही ताजी टवटवीत रसरशीत गझल स्पर्श करत होती. वेळ कधी आणि कसा संपला कळलंच नाही. गर्दीच्या आत बाहेर पडले. पाऊस वाट पाहत मला जणू काही रिसिव्ह करायला आला होता. अंगात रेनकोट चढवत मी गाडी स्टार्ट केली....चिंब भिजल्या मनानं रस्ता कापत होते...पावसावरचं भाष्यही आठवत होतं, 'यायचे तर येत नाहीस, जात नाहीस जायचे तर...’
खरं तर घरी परतल्यावर बेल वाजवण्याऐवजी आपोआप दार उघडलं जावं असं वाटत होतं, म्हणजे अगदी ‘तिच्या मायला’  अशी शिवीही बंद दाराला द्यावीशी वाटत होती. एस. एम. जोशी हॉलमधली ‘तिच्या मायला’ ही गझल मनातून दूर होण्यास राजीच होत नव्हती.  पण आजपर्यंतच्या आयुष्यात एकही शिवी ओठांवर न आणल्यानं सगळं काही मनातल्या मनात चाललं होतं. खरं तर पहिल्यांदाच ‘तिच्या मायला’ ही शिवी गझलेत शिरली की इतकी गोड होऊ शकते हे आज कळलं. कदाचित आज रात्रभर फक्त ‘तिच्या मायला, तिच्या मायला’ असं म्हणतच झोपेन आणि स्वप्नातही ‘तिच्या मायला’ बघेन.
आता प्रत्येक महिन्यात न चुकता कार्यक्रमाला जायचंच असंही मनाला सांगून झालंय... सुरेश भट गझल मंचाच्या वतीनं सादर होणाऱ्या ‘गझलरंग’ कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अतिकामामुळे मनाला आणि शरीराला आलेलं बधिरपण गझलेच्या शिडकाव्याबरोबरच हलकं हलकं सुगंधी झालं .... मनाला पुन्हा एकदा माझ्या आवडत्या वैभवच्या ओळी साथ देताहेत...
ओल्या झाल्या स्मृती सार्‍या, ओले झाले लोचन
हां किती किती दिसांनी आला आहे श्रावण....आला आहे श्रावण ....
दीपा

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.