नग्नता

नग्नता

तारीख

काल आणि परवा दोन दिवस खूपच धावपळीत गेले आणि त्यामुळे आज थकवा काढण्यासाठी मी खूप वेळ अंथरूणातच लोळत राहिले. मोबाईलचं 'टुंग टुंग' चालू होतंच. अखेर हातात घेतला. एका आवडत्या मित्रानं त्याचे चार-पाच फोटो पाठवले होते. ते फोटो न्याहाळत असतानाच त्याचा 'टुंग' करत सहावा मेसेज आला, 'तुला अश्‍लील वाटले तर फोटो डिलीट कर....' त्याच्या सूचनेबरहुकूम मी ते फोटो अश्‍लील वाटताहेत का याची तपासणी सुरू केली. हे सगळे फोटो सलमान खानसारखे शर्ट न घातलेले होते. पण ते तसेच असणार होते. याचं कारण तो समुद्रात, समुद्राकाठी पाण्याबरोबर मस्ती करत होता. मनसोक्त पोहूनही झालं असावं. त्याचे ते फोटो आणि त्या फोटोमागचं निळंशार पाणी, डोक्यावरचं तसंच निरभ्र आकाश, दुसर्‍या फोटोतला महाकाय वृक्ष - त्याच्याच व्यक्तिमत्त्वात जणू काही भर टाकत होतं. 
मित्राच्या त्या मेसेजनं मला या फोटोंबरोबरच ग्रीक पुरुषांचे पुतळे डोळ्यासमोर यायला लागले. किती सुंदर! संपूर्ण शरीर आखीव रेखीव.....कितीही वेळ बघितलं तरी बघतच राहावं. त्यांचे पिळदार स्नायू, चेहर्‍यावरचे भाव, सगळं काही आपल्याशी संवादासाठी आतुर! ते सगळेच नग्न असूनही त्यात कधीच अश्‍लीलता दिसत नाही हेही तितकंच खर!

मग अचानक माझ्या डोळ्यासमोर वेरूळ, अजिंठा, खजुराहो इथलीही शिल्पं आली.....भारतीय स्त्री-पुरुषांचं भरलेपण त्या शिल्पातून डोकावत होतं. नग्न शरीरंही अलंकारांनी सजवलेली....त्यांच्या प्रणयमुद्रा, नृत्यमुद्रा आणि बरंच काही.....त्यातून अश्‍लीलता डोकावत होती का, छे....मुळीच नाही....तीन-तीन पिढ्यातल्या कलावंतांनी हे काम कसं केलं असेल यानं स्तिमित व्हायला झालं. मग माझं अत्यंत आवडतं रोदँ या शिल्पकाराचं 'द किस' हे शिल्प डोळ्यासमोर आलं. या शिल्पाला बघून तर मी त्याच्या प्रेमातच पडले. चुंबन ही स्त्री-पुरुष यांचं प्रेम व्यक्त करण्यातली किती सुंदर गोष्ट असू शकते.....ते किती उत्कट असू शकतं हे सांगणारं ते शिल्प! मग मायकेलअँजेलोचा 'डेविड'ही समोर येऊन ठाकला. रोद्यांचा 'थिंकर' समोर आला ....त्यांचं धीरगंभीर असणं खूप काही सांगून गेलं. ... ती विचारी मुद्रा आणि बसण्याची ढब बघून त्या शिल्पाची नग्नता तर दिसतही नाही. 

मग समोर आले, भारतातले आणि महाराष्ट्रातले अनेक नग्न बाबा लोक....लाखो लोकांची श्रद्धास्थानं....अनेकांच्या घरात भिंतीवर त्यांचे लावलेले फोटो दिसायला लागले....काही लुकडे, ढेबरपोटे, तर काही जाडेजुडे, अजागळ, डोळ्यात संन्यस्तव दिसण्याऐवजी समस्त जगभरातल्या वासनांचा सुळसुळाट असलेले....ही नग्नता मात्र शिसारी आणणारी....अश्‍लीलतेलाही लाज वाटायला लावणारी! या किळसवाण्या बुवांना बघून मात्र माझ्या समोर आलेली रोदँ, मायकेलअँजेलो, वेरुळ, अजिंठा, खजुराहो इथली सगळी शिल्पं आणि मित्राचे फोटो एक एक करत चक्क अदृश्यच झाले! 

दीपा

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.