साडी प्रेम
प्रिय पल्लवी, केवळ तुझं मन राखण्यासाठी! अन्यथा, साडी मला नेहमीच आवडते. मला आठवतं, मी अगदी दुसरी-तिसरीत असेन. माझी मामेबहीण मंगल हिचं लग्न होतं. वैजापूरजवळच्या लासूर या गावी. तिच्या लग्नात मी करवली होते. त्यामुळे करवली म्हणून मला साडी हवी होती. मला लग्नात साडी मिळाली, पण ती साडी लांबीरूंदीउंचीनं खूपच मोठी होती आणि मी तर बाहुलीसारखी लहान. मग आईनं माझ्या हट्टामुळे मला एक पोपटी रंगाची त्यावर जांभल्या रंगांची मोठ्ठी फुलं असलेली लहान मुलींसाठी मिळणारी कल्पना साडी विकत आणून दिली. मी एकदम खुश झाले.
त्यानंतर पाचवीत असताना शाळेतल्या स्नेहसंमेलनात ‘गोमू माहेरला जाते नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा’ या गाण्यावर आमचं नृत्य बसवलं होतं. मला हिरव्या रंगांची साडी हवी होती. अगदी ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी वडिलांनी धावतपळत येऊन मला गावातल्या स्त्रिया नेसतात, तशीच साडी आणून दिली होती. मग काय मी पुन्हा एकदा खुश!
पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर अनेक वेळा केवळ मला आवडते म्हणून मी आईची, कधी वहिनीची तर कधी आत्याची साडी नेसलेली आहे. नंतर नंतर तर दिवाळीत ड्रेस ऐवजी मी वडिलांजवळ मला साडीच हवी असाही हट्ट केलेला आहे. वडिलांनी ठरवलेल्या बजेटमध्ये मग औरंगाबादच्या 'श्रीमान श्रीमती' या दुकानात कित्येक साड्या विकत घेतलेल्या मला आठवताहेत.
शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनच शबाना आझमी, स्मिता पाटील आणि दिप्ती नवल या आवडत्या अभिनेत्री असल्यानं त्यांचं साधं राहणं, त्यांच्या सुती साड्या यांचा प्रभाव नकळत मनावर पडला होता. त्यामुळेच की काय, पुढेही याच प्रकारच्या साड्या आवडायला लागल्या. फार चमकधमक नसलेल्या! साडी निवडीबाबत आईचाही माझ्यावर प्रभाव नक्कीच आहे. कारण तिला स्वतःला प्रवासाची, फोटोंची, चित्रपटांची, गाण्याची, कलाकुसरीच्या वस्तू करण्याची, स्वयंपाकाची आणि साड्यांची खूपच आवड होती आणि तिचा चॉईसही खूपच चांगला होता. तिनं नवीन साडी विकत आणली की मीच त्या साडीला फॉल लावून द्यायची आणि ते घडी मोडणं प्रकरणही मीच करायची. साधारणपणे सातवीत असल्यापासून मी शिवण करायला लागल्यामुळे आजही मोजून १५ मिनिटांत मी साडीला फॉल लावते आणि साडी फाटेपर्यंत तो फॉल कधीही उसवत नाही हेही विशेष!
आज अनेक ठिकाणी व्याख्यानांचे, मुलाखतींचे माझे कार्यक्रम होतात. या प्रत्येक कार्यक्रमात मी आवडीने साडीच नेसून जाते. कारण साडी हा अतिशय डिसेन्ट असा पेहराव आहे असं मला वाटतं. इतर वेळी कधीही कुठलाही ड्रेस घालून जाईन पण कार्यक्रमासाठी मग तो लहानशा गावात असो, घरगुती पद्धतीचा असो की जाहीर सभेच्या ठिकाणी असो, तिथे मात्र मला साडी आणि साडीच आवडते.
या आवडीमुळे माझ्याकडे सुती साड्या भरपूर प्रमाणात आहेत. माझ्यावर प्रेम करणार्यांकडून मला साड्या भेटीदाखल मिळतात. काही कार्यक्रमात तर आयोजक शालीऐवजी छानशी साडीच भेट देतात. मी या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. या सगळ्या साड्या मी आवडीने मनापासून नेसते आणि मला वाटणारा आनंद साजरा करते.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment