विंदांचं चेतनामधलं राष्ट्रीय स्मारक आणि उदय प्रकाश
आनंद (करंदीकर) आणि सरिता (आवाड) यांचे मुंबईला जाण्याबद्दलचे फोन आले आणि २२ तारखेला सकाळी मुंबईला जायचं ठरलं. विंदा करंदीकर यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या चेतना महाविद्यालयाच्या परिसरात उभारलं असून प्रत्येक वर्षी तिथं विंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. या वेळी राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक/कवी उदय प्रकाश यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच विंदांच्या आणि उदय प्रकाश यांच्या काही कवितांचं वाचन किशोर कदम आणि संदीप कुलकर्णी करणार होते. हा कार्यक्रम ऐकणं म्हणजे पर्वणीच असणार होती.
चेतना कॉलेजच नव्हे तर महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रात मोलाचे बदल घडवून आणणारे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांची या निमित्तानं आठवण होणं साहजिक होतं. समोरच्याला एका क्षणात आपलंसं करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच खिरोद्याच्या, जळगावच्या, मुंबईच्या कितीतरी आठवणी मनात अजूनही तशाच ताज्या आहेत. शाळाशाळांमधून समूहगीतांचा उपक्रम मधुकरराव चौधरी यांच्याचमुळे राबवला गेला. बलसागर भारत हो हो, असो की आला आनंद आली बहार सगळी गाणं तालासुरात हावभावासह सादर करताना वेगळीच मजा येत असे. पाठ्यपुस्तक मंडळाची निर्मिती असो की किशोरसारखं मासिक यामागचा पुढाकारही मधुकरराव चौधरी यांचाच. त्यामुळे किशोरमध्ये काही लिहायचं म्हटलं की आधी ते डोळ्यासमोर येतात. खरंच असा शिक्षणमंत्री विरळाच. मुलांचा, त्यांच्या मनाचा किती खोलवर विचार केला होता या माणसानं.
मला आठवतं, मी मासवणला असताना सोमनाथ परब यांना बोलावून कितीतरी गावांमध्ये शाळांमधून समूहगीतांचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्या वेळी सोमनाथ परब ज्या प्रकारे ती गाणी मुलांकडून गाऊन घेत, एक वेगळंच चैतन्य वातावरणात संचारत असे.
आज चेतनात प्रवेश करताच समोर मधुकरराव चौधरी यांचा प्रसन्न फोटो स्वागत करत होता.
किशोर कदम आणि संदीप कुलकर्णी यांनी विंदा आणि उदय प्रकाश यांच्या काही निवडक कवितांचं वाचन करून वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर उदय प्रकाश यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेले उदय प्रकाश हे भारतीय हिंदी साहित्यातच नव्हे, तर जगभरात आपला ठसा उमटवणारं खास नाव! कवी, कथाकार, पत्रकार, फिल्मनिर्माता! त्यांच्या लिखाणाचा अनुवाद मराठीतून जयराम सावंत आणि गणेश विसपुते यांनी केलेला आहे. तर इंग्रजी, जर्मन, जपानी अशा अनेक भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. उदय प्रकाश यांनी आपल्या काही कवितांचं वाचन केलं, त्याचबरोबर त्यांनी विंदाबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या. आजच्या सद्यस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं आणि आक्रमक न होता, अधिकाधिक व्यंगात्मक रीतीनं व्यक्त करून आपलं म्हणणं मांडत राहिलं पाहिजे असंही सांगितलं. त्यांनी विदुषकाच्या भूमिकेचं महत्व सांगितलं.
चेतनाचे प्राचार्य यांनी देखील रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्यातली एक सुरेख आठवण सांगितली. विंदांची कन्या जयश्री काळे हिने देखील विंदांची कविता सादर केली. चेतनाच्या विश्वस्त मधुमिता पाटील यांनी मधुकरराव चौधरी आणि कुसुमताई चौधरी यांचं नातं, त्यांचं लिखाण आणि त्यांचं सामाजिक कार्यातलं योगदान यावर नेमक्या भाषेत मनोगत व्यक्त केलं.
अतिशय आटोपशीर, नेटका कार्यक्रम झाला. आम्ही लगेचच मुंबईहून पुण्याच्या वाटेला लागलो. आनंद-सरिता यांची छानशी सोबत असल्यानं प्रवास कधी संपला कळलंच नाही.
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Add new comment