वेध कट्टा-पल्लवी आणि प्राची गोडबोले
'वेध' हा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने सुरु झालेला उपक्रम गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातल्या १० जिल्ह्यांमध्ये सुरू असून पुण्यातही गेली १० वर्षं सातत्यानं संपन्न होतो आहे. वर्षभरानंतर होणार्या भेटीपेक्षा सातत्यानं सगळ्यांशी जोडलेलं राहावं, परस्परांत संवाद व्हावा या हेतूनं वेध कट्टयाची पुण्यात सुरूवात झाली. प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पहिल्या कट्टयापासूनच हा संवाद रंगत गेला.
कालच्या वेध कट्टयात पावसाळी वातावरण असल्यामुळे पावसाळी कविता, गाणी, किस्से ऐकण्यासाठी वेध कट्टयावर अनेक रसिक वेळेत येऊन पोहोचले होते. ब्रह्मे सभागृह सहा वाजता पूर्ण भरून गेलं होतं. व्यासपीठावर तरूण मंडळी लगबग करताना दिसली. कार्यक्रम सुरू झाला.
पल्लवी आणि प्राची गोडबोले या दोघी बहिणी, हर्षद आणि हर्षल हे त्यांना हार्मोनियम आणि तबला/ढोलकी यांची साथ देणारे दोघं तरूण आणि निवेदन करणारे शिल्पा चौधरी आणि प्रदीप कुलकर्णी असे सहा जण व्यासपीठावर होते. प्राची ही कम्प्युटर इंजिनिअर असूनही तिची शास्त्रीय आणि सुगम संगीतातली गाण्याची तयारी लाजबाब! कालचं गाणं लोकांना खुश करण्यासाठी, स्पर्धेत पळापळ करून यश पटकवण्यासाठीचं नव्हतं. हे गाणं आनंदासाठी होतं आणि म्हणूनच कार्यक्रम रंगतच गेला. मल्हार असो, मिया मल्हार असो रागांनी आपलं वातावरण तयार केलं होतं. बोले रे पपिहरा, ये रे घना, ऋतू हिरवा ऋतू बरवा सह अनेक रचना....केवळ अप्रतिम! त्यातच शिल्पा आणि प्रदीप यांनी मधून मधून केलेली इतर कवितांची पेरणी आणि किस्से हे देखील तितकीच रंगत वाढवणारे होते. यात दासू वैद्यची फेसबुकी पावसाची कविता आणि गुरू ठाकूरच्या कवितेतला पाऊस अंतर्मुख करून गेला.
मध्यंतरात वेध कट्टयावर गरमागरम भजी, चटणी आणि वाफाळलेला चहा असा फक्कडसा बेत रसिकांसाठी होता. लोकांनी आस्वाद घेतला मात्र कार्यक्रम वेळेत सुरू व्हावा यासाठी बरोबर १५ मिनिटांत आपापल्या जागा पटकावल्या. मध्यंतरांनंतरही कार्यक्रमाची उंची वाढतच गेली. पल्लवीनं गायलेली विदूषक चित्रपटातली आनंद मोडक यांनी संगीतबध्द केलेली 'श्रावणातलं ऊन मला झेपेना' ही लावणी आणि प्राचीनं गायलेलं सलिल चौधरींनी संगीतबद्ध केलेलं शैलेंदचं गीत 'ओ, सजना बरखा बहार आयी' या गाण्यांनी वन्स मोअर मिळवला. खरं तर प्रत्येक गाण्यानंतर वाजणार्या टाळ्या वन्समोअरचीच मागणी करणार्या होत्या. पण कार्यक्रम वेळेत सुरू करणं आणि वेळेत संपवणं याबाबतीत वेध कट्टा टीम काटेकोर असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शेवटची ठुमरी (भैरवीतली) मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम कसा संपला कळलंच नाही.
कार्यक्रमात वेध कट्टयामागची भूमिका आणि सप्टेंबरमध्ये साजरा होणारा वेधचा १०० वा कार्यक्रम याविषयी डॉ. ज्योती शिरोडकर हिनं लोकांशी संवाद साधला. हिचं वैशिष्ट्य असं की, कार्यक्रम संपल्यानंतर खरं तर लोक पटकन निघायला बघतात. पण ज्योती जेव्हा तिच्या मधाळ आवाजात बोलायला सुरू करते, तेव्हा लोक जागेवरून उठत नाहीत. कालही हाच अनुभव आला. पावसाविषयी, कालच्या कार्यक्रमाविषयी तिनं जे भाष्य केलं, केवळ लाजवाब! हास्याचा पाऊस, दुःखाचा पाऊस, विरहाचा पाऊस, आनंदाचा पाऊस......जिवात्म्याची घडलेला संवाद.....क्या बात है!
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की ही चारही मुलं जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदा व्यासपीठावर आली होती (अर्थातच, उद्या त्यांना प्रचंड यश मिळणार यात शंकाच नाही!) तसंच पल्लवी, प्राची, हर्षद, हर्षल ही चौघंही वेधचे संयोजक दीपक पळशीकर यांचे विद्यार्थी आहेत. निवेदन करणारी शिल्पा, आभार व्यक्त करणारी डॉ. ज्योती शिरोडकर या देखील पळशीकर सरांच्या विद्यार्थिनी! असे गुरू लाभल्यावर माणूस समृद्ध तर होणारच आणि त्याच वाटेवरून चालणार याची साक्ष ही मंडळी देत होती!
देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुण्याला म्हटलं जातं ते उगाच नाही. एकाच दिवशी इथं वेगवेगळ्या भागात एक से एक अनेक कार्यक्रम होत असतात, ज्यांना जिथे जमेल तिथे रसिक जाऊन पोहोचतात. वैयक्तिक आमंत्रणाची गरज भासते, ना आग्रहाची! तरुणाई पासून ते ७५ पार केलेले रसिकही जेव्हा तैय्यार होऊन येतात आणि दाद देतात तेव्हा खरंच पुण्यात राहत असल्याचा अभिमान वाटतो. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, रोजच्या ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी, वेध कट्टा आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे.
आता वेध - पुढल्या वेधचे!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment