बारामतीचं बारमाही वैभव - संजीवदा!

बारामतीचं बारमाही वैभव - संजीवदा!

तारीख

संजीवदाचा आदेशवजा फोन, ‘सगळी कामं बाजूला टाक आणि ख्रिसमस पार्टीसाठी ये’ मी नाही म्हणायचा प्रश्‍नच नव्हता. कालचा ख्रिसमस साजरा करता आला तो केवळ या माणुसवेड्या माणसामुळेच! 
काल दुपारी आसावरी, मी (बँडवाल्या होऊन), अपूर्व आणि मीनाक्षी बारामतीच्या ओढीनं निघालो. प्रवासात डोळ्यासमोर येत होत्या, साधनाताई! सौम्य, मृदू  व्यक्तिमत्वाची स्त्री! स्वतःच्या कुटुंबासाठी तनामनाधनानं झोकून दिलेली....स्वतः नेत्रतज्ज्ञ म्हणजे डोळ्यांची डॉक्टर असून, कायम व्यस्त असूनही पाककलेत या बाईचा हात कोणीही धरू शकणार नाही. ही कला फक्त स्वयंपाकापुरतीच मर्यादित नाही, तर केक असो, वा ढोकळा, डोनट असो वा चायनीज पदार्थ! दिवसाच्या चोवीस तासांमध्ये ही बाई आपलं काम, घरातला सगळा कारभार, मनस्वी नवर्‍याचा सांभाळ, दोन गोड मुलांशी संवाद सगळंच लीलया पार पाडत असते. काल आम्ही पोहोचलो, तेव्हा राणी कलरच्या ड्रेसमधली साधना गुलाबासारखी टवटवीत भासत होती. दिवसभर खपून केलेल्या पदार्थांची टेबलावर सजावट करण्यात ती मग्न होती. गोड हसून आमचं स्वागत करत ती कामाला लागली. 

बोटावर मोजता येणार्‍या अगदी काही निवडक जोड्यांमधली ही माझी आवडती आदर्श वाटावी अशी जोडी आहे! डॉ. संजीव आणि डॉ. साधना! मी मागे लिहिलेलं असलं, तरी पुन्हा पुन्हा सांगावं वाटावं अशी यांची प्रेमकहाणी आहे. संजीव हा नाटकवेडा तरुण! मेडिकलला जरी गेला असला, तरी डोक्यात मात्र नाटकाचं खूळ घेऊनच वावरणारा.....त्याच कॉलेजमध्ये असलेल्या साधनाबरोबर प्रेम जमलं. हे प्रेम इतकं विलक्षण, की साधनाचं खरं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं. कुठलाही मुलगा असो वा मुलगी - त्यांना साधना दिसली की ते म्हणत, 'अरे, ती बघा मिसेस कोल्हटकर येतीये.....' लग्न होऊन प्रेमाला पूर्णत्व लाभणं आणि ती साथ तितक्याच गोडीत चालू राहणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. पण संजीव आणि साधना यांचं प्रेम यशस्वी झालं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर डॉक्टर म्हणून काम आणि त्याचबरोबर नाटक आणि संगीत यांचीही साथ संजीवनं सोडली नव्हतीच. 

सगळं काही सुरळीत सुरू असतानाच संजीवची कीडनी काम करत नाही असं लक्षात आलं. सगळीकडून अंधारून आलं.....कीडनीसाठी अनेक प्रयत्न करून झाले, पण कोणाची मॅच होईना, तर कधी आणखी वेगळ्या समस्या समोर उभ्या राहू लागल्या. अशा वेळी साधनानं आपली कीडनी संजीवला देण्याचा निणर्य घेतला आणि ती कीडनी मॅचही झाली....सगळंच अदभुत! इतक्यावरच या दोघांचं मोठेपण संपत नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक वादळं आली. जन्मलेल्या बाळाचा मृत्यू पचवणं दोघांनाही तितकं सोपं नव्हतं...पण त्यातून स्वतःला सावरत एक मुलगा आणि एक मुलगी यांना दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला....आज ही दोन्ही मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. असे आई-वडील लाभल्यावर त्यांची प्रगती रोखणार तरी कोण? कुठलाही गाजावाजा न करता, न बोलता कृती करणारी ही दोघं बघितली की डोळ्यात आनंदाश्रु दाटून येतात. 

काल रात्रीचा ख्रिसमस.....संजीव आणि साधना (अवनीसह) सगळ्यांनी गच्चीवर सजावट केली होती. तिथेच मोजता येणार नाहीत इतके स्वादिष्ट पदार्थही खवैय्यांची प्रतीक्षा करत होते. आपल्या नाटकातली सगळीच प्रॉपटी संजीवदांनी मांडून ठेवली असावी अशा थाटात दोन टेबलावर पुणेरी पगडी, सरदारजींचा फेटा, सैन्यातली कॅप, गांधीटोपी, राणीचा मुकूट, प्रधानजींचा जिरेटोप, मावळयांचं मुंडासं असं काय काय खुणावत होतं....आम्ही सगळेच लहान होऊन टोप्या डोक्यावर चढवून त्या त्या भूमिकेत शिरलो. धमाल आली. सगळेच लहानमोठे एकाच वयाचे झाले होते. मंगलाभाभी तर इतक्या गोड दिसत होत्या की गळ्यात पडून गालावर एक मोहोर उमटवावी वाटत होतं. आम्ही त्यांना राजमाता केलं. त्यानंतर माझी ड्रीमगर्ल प्रतिभाताई आणि तिचे नवरोबा बापू प्रवेश करते झाले. ही एक दृष्ट लागण्यासारखी जोडी! प्रतिभाताईंना आपल्या नवर्‍याच्या रूक्षपणाविषयी अनेक तक्रारी असतात आणि त्या त्यांच्या खुसखुशीत कवितांमधून त्या व्यक्त करतात. तरीही हा नवरा इतर नवर्‍यांसारखा जमदग्नीचं रूप धारण करत नाही तर ‘जा सिमरन, जी ले अपनी जिन्दगी’ असं दिलदारपणे म्हणत प्रतिभाला आनंद लुटण्याची परवानगी तर देतोच, पण वेळ मिळेल तशी साथही देतो. 

त्यानंतर गर्दीतून एक एक चेहरे समोर आले....सगळ्यांची गळाभेट हा आवश्यक कार्यक्रम होता! संगीता ही अतिशय देखणी ....नुकताच लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केलेली....ती आणि तिचे नवरोबा कालही त्याच मूडमध्ये येऊन दाखल झाले. योगिता, सीमा, रुपाली, दीपा, दर्शना, माधुरी, श्रीनिवास, सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झाला. 

जेवताना, चकली खाऊ की करंजी, केक खाऊ का रव्या-बेसनाचा लाडू अशी मनाची अवस्था होती. व्हेज बिर्याणी, नॉन व्हेज बियार्णी, कोशिंबीर आणि अनेक पदार्थ बघून तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं होतं. जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि पावलं निघायला नकार देत असतानाही आमच्या संजीवदा - सांता आणि साधना यांसह सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो!
शेवटी - संजीवदाची ओळख होण्याला निमित्त ठरला तो आमचाच मित्र कल्याण तावरे! बांधकाम व्यावसायिक असलेला हा मित्र साहित्य, संगीत, कला यात रस असलेला माणूस आहे. मित्र परिवार प्रचंड मोठा असून हा खजिना तो उधळत असतो. तो उधळताना मालकीहक्काची भावना मनात ठेवत नाही. कल्याणमुळे अनेक मित्र-मैत्रिणी मिळाले...जगणं जास्त बहरून आलं. सगळ्यांची नावं इथं घेत नाही, पण संजीवदा आणि साधनाताई यांची भेट झाली नसती तर? काहीतरी अधुरं राहिलं असतं हे मात्र खरं. थँक्स कल्याण!

परतीच्या प्रवासात संजीवदाच डोळ्यासमोर हसत उभे होते. निर्मळ मनाचा माणूस! कुठल्याही अपेक्षा न करता भरभरून प्रेम उधळणारा! अभ्यासू, रसिक, कलासक्त! न मागता अनेक दुर्मिळ गाणी मला पाठवत राहणारा.....'सिंफनी' या आमच्या येत असलेल्या पुस्तकासाठी अनेक पाश्‍चिमात्य गाण्यांची ओळख त्यांनीच करून दिली.....मी चित्रपटांवर लिहिलं की आणखी क्लासिक चित्रपटांची नावं सुचवत यावर लिही ना म्हणून आग्रह करणारा.... सतत कौतुकाची थाप खांद्यावर मारणारा....मनाला कातर करणार्‍या कुठल्याही प्रसंगी संजीवदांकडे धावत गेलं तर आधारासाठी ते उभेच आहेत हा विश्‍वास देणारा......माणसाचा जन्म मिळालाय तर तो आनंदात जगा असं सांगणारा..........हा मित्र पुणं येईपर्यंत सोबत करत राहिला!

दीपा देशमुख

२६ डिसेंबर २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.