वाढदिवस माझा !!!!

वाढदिवस माझा !!!!

तारीख

२७ ऑक्टोबरची रात्र....बाराला दोन मिनिटं कमी असताना अपूर्वनं हाका मारत मला हॉलमध्ये बोलावलं. २८ ऑक्टोबर सुरु झालेला ..... अपूर्वने फ्रिजमधून छानसा अनेक रंगी लेअर असलेला केव्हातरी गुपचूप आणून ठेवलेला केक काढला. केक कापणार तोच सुवर्णसंध्याचा फोन आला, मग तिच्याशी बोलतच केक कापला. अपूर्वने केकचा तुकडा भरवला.....त्यानंतर परदेशातून येणार्‍या फोनचा सिलसिला बॉस्टनस्थित मुलगा आणि सून यांच्यापासून सुरु झाला तो मध्यरात्रीपर्यंत!!!! आणि आज पहाटे साडेपाचपासून ते आत्तापर्यंत व्हॉट्सअप, मेसेंजर, मेसेजेस, मेल्स आणि येणारे फोन कॉल्स मी घेत राहिले..... 
अनेकांचे मेसेजेस वाचून डोळे भरून आले. काहीं मेसेजेसनं ओठांवर हासू पेरलं, तर काहींनी स्तिमित करून सोडलं. अनेकांचे फोन आले, त्या फोनवरचा अनेकांचा आवाज मी कित्येक वर्षांनी ऐकत होते....तो आवाज मला भूतकाळात घेऊन गेला. आपल्या आसपास, आपली अशी इतकी आपली माणसं आहेत या भावनेनं मन हळवं झालं. 

माझी मैत्रीण सुवर्णसंध्या Suvarnasandhya C. Dhumal Dhumal हिचं आणि माझं बोलणं झालंच होतं, तरीही तिनं मेसेज पाठवला आणि तो वाचून मला काय बोलावं तेच कळेनासं झालं. सुवर्णसंध्या, खरोखरंच यावर काय उत्तर द्यावं मला कळतच नाहीये. तिनं लिहिलं होतं, 'कुठल्याही उच्च जीवनमूल्यांचा अंगीकार केल्याचा आविर्भाव न आणता ही  सदसद्विवेकबुद्धीने मानवतेच्या वाटेवर अगदी सहजपणे चालनारी दीपासारखी जिवाभावाची सखी  अगदी अनपेक्षितपणे आयुष्याच्या एका टप्प्यावर भेटली आणि माझ्या मानवतेच्या विश्वासाला बळकट करत राहिली .खरे तर काही माणसे सहजपणे सुखवस्तू जीवन  जगू शकतात परंतु ते सोडून देऊन अवघड वाटेवरून चालत स्वतःचा स्वाभिमान जपत जगणे प्रत्येकालाच जमते असे नाही परंतु दीपाला हे जमले आहे  आणि त्याही पेक्षा अवघड कसौटी म्हणजे त्या स्वाभिमानाचा आवाज म्हणून  द्वेषावर आधारीत स्त्रीवादी स्वर न व्यक्त करताही अस्मितेने जगता येते ,आनंदाने उत्साहाने खळाळत्या पाण्यासारखे वाहते  आणि ताजेतवाने राहता येते याचे आदर्श उदाहरण म्हणजे माझी मैत्रीण दीपा .
आमच्यात खूप साम्य असले तरीही खूप वेगळेपणही आहे .परंतु जीवनावरची असीम निष्ठा , दुर्दम्य आशावाद आणि माणसांच्या चांगुलपणावरचा विश्वास , टोकाची संवेदनशीलता या समान जीवन निष्ठा मुळे आम्ही एकमेकींशी अश्या रीतीने जोडल्या आहोत की विचार करतांना ती माझ्या पेक्षा वेगळी वाटतच नाही .
एक मोठी बुद्धिमान लेखिका आणि कार्यकर्ती असूनही दीपा एवढी ground zero ला असते की तिच्या लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचा कोणालाच बाऊ होत नाही .लहान मोठे सगळयांशी सहज एकेरीवर येवून ती जेव्हा संवाद साधते तेव्हा प्रत्येकाची ती सहज मैत्रीण होते .
तिला भावलेल्या सगळया गोष्टींना  सहजपणे शब्दांत बांधण्याची विलक्षण हातोटी तिच्यात आहे. अक्षरशः तिचे शब्द तिच्या दैनंदिन अनुभवांचा  चित्रमय प्रवास आपल्याला लीलया घडवतात .
आणखी एक गोष्ट तिला खूप आवडते ती म्हणजे gifts द्यायला आणि घ्यायला पण.
पण घेण्यापेक्षा देण्यावर तिचा जास्त भर असल्यामुळे आम्ही तिला सारखे कंट्रोल करत राहतो कारण तिची देण्याची उर्मी एवढी जास्त आहे की ती क्षणांत कितीही मौल्यवान गोष्ट ( व्यवहारी जगाच्या द्रुष्टीने किंमती असलेल्या वस्तू  ) 'घेऊन जा तुला' असे म्हणून देऊन टाकते आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा निरागस  आनंद असतो.
अशी ही सतत काहीं ना काही  देणारी दीपा मला काय काय देऊन गेली याचा हिशोब लावणे कठीण आहे. मला अत्यंत श्रीमंत करणारी माझी ही मैत्रीण आहे. या जगातील माझ्या सर्वात श्रीमंत मैत्रिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा ! -सुवर्णसंध्या' 

लगेचच आसावरीचा Asawari Kulkarni  मेसेज आला. तिनं मला आणखीनच श्रीमंत करून टाकलं. 
'काल अपूर्व चा कॉल आला तेव्हा ऑफिसमध्ये होते. गडबडीत तारीख स्मृतिआड गेलेली. घरी आलेले पाहुणे आणि त्यांचं आदरातिथ्य यात बुडून गेले आणि मग दमून कधी डोळा लागला ते कळलंच नाही.
आत्ता उठल्याबरोबर जाणीव झाली की आज तर दीपाचा वाढदिवस! 

तिला शुभेच्छा देऊ म्हणून मोबाईल हातात घेतला आणि सुवर्णसंध्याचा मेसेज स्क्रीनवर झळकला.
खरंच.... अशी सोन्यासारखी कितीतरी माणसं जोडलीयेस दीपा तू! स्वतः समृद्ध होतानाच इतरांनाही भरभरून ही श्रीमंती वाटते आहेस. अशीच मोजण्यापलीकडची दौलत तुला अखंड मिळत राहो, कुबेरालाही लाजवेल अशी मैत्रीची श्रीमंती तुझा खजिना भरून ओसंडून वाहो आणि तुझ्या समर्थ अन प्रत्यक्षदर्शी लेखणीने आम्हाला नवनवीन विषयांची खोली आणि उंची मापता येवो, हीच वाढदिवसाची मनःपूर्वक शुभेच्छा! हॅपीवाला बर्थ डे टू दीपा 🌹💐🌹 - आसावरी'

पाठोपाठ धनूचा Dhananjay Sardeshpandeमेसेज....धनूनं मेसेजची सुरुवात जी केलीय, त्यानं मी जागेवरून उडालेच. वाटलं, माझ्यातला आळशीपणा याला कसा काय लक्षात आला? पण वाचत गेले आणि पुन्हा डोळे भरून आले. धनू आणि मी अकरावीपासूनचे घट्ट मित्र! एकमेकांच्या मनातलं फारसं व्यक्त आम्ही कधीही केलं नाही, करतही नाही. पण तरीही एकमेकांविषयीची काळजी असते हे जाणवतं. 'धनू, माझा मोबाईल बंद पडला होता. मी पुण्याहून मुंबईला रात्री बारा वाजता एशियाड पकडली होती आणि तू धावत मला शोधत आला होतास. बस सुटली आणि बस तेवढाच निरोपाचा हात हलला. पण तुझ्या नजरेतली माझ्याविषयीची आत्यंतिक काळजी मला मुंबईत पोहोचेपर्यंत दिसत राहिली.' मध्यरात्री मी दादरला पोहोचले. श्रमिक हेच तेव्हा मुक्कामाचं ठिकाण असायचं. तिथे राहणारा विरेंद्र त्या वेळचं माझं काळजीवाहू सरकारच होतं. धनू म्हणत होता, 'दीपा, अशी कशी गं तू? काही वाचायला नको, पाहायला नको, अभ्यास म्हंटलं कि थयथयाट करतेस, लिहायला बसलं कि असंख्य कारणं पुढे करतेस पेनच नाही, कागदच संपले, मुडच नाही. फिरायचा कंटाळा, हॉटेल मध्ये गेलं की हे नको ते नको, खाण्याची बोंब. कशात इंटरेस्ट नाही अशी कशी ग तू? माणसात नको , एकटं राहायचं ह्याला काय अर्थ ? असं हिच्या बाबतीत काहीही नाही. तरुणीला लाजवेल असा उत्साह तिच्या जवळ आहे नव्हे खजिनाच आहे. जसजसे तिचं वय वाढतं तसतशी ती तरुण होत आहे. नाटकं, चित्रपट, हे चालूच आहे. एका दिवशी ती दोन सिनेमा एक नाटक आणि तीन त्यावरील प्रतिक्रिया आणि परत पुस्तक ती लिहिते. हा झपाटा, आवाका प्रचंड आहे. मित्र , मैत्रिणी जमा करून गप्पाचा फड जमवणे हा एक आवडता छंद.  तिच्या कडून घेण्या सारखे इतके गूण आहे पण एखादया व्यक्ती कडून किती घ्यावं म्हणून मी घेत नाही. असो तू अशीच वरचेवर तरुण होत रहा. असाच उत्साह कायम राहो हीच शुभेच्छा.- धनू.'
त्यानंतर सीमा Seema Dherange  या पुस्तकवेड्या फेसबुक मैत्रीणीनंही शुभेच्छा देत 'सिंफनी' आवडल्याचं कळवलं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम.....💐💐🎂🎂💐💐

सिंफनी अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यातील क्यू. आर कोडमुळे पुस्तक वाचत असताना प्रत्येक गायकाचं गाणं आणि संगीत ऐकताना खूपच मजा येते....मोत्झार्ट,बिथोवन, मायकेल जॅक्सन,एल्विहस प्रिसले बंडखोर बीटल्स यांनी निर्माण केलेलं संगीत विश्वातील गगनचुंबी कामगिरी याचा सर्व पुस्तक वाचताना होत जाणारा उलगडा अनेक वेळा हालअपेष्टा सहन करत आणि सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचा परिणाम संगीतावर कसा होतो..... याचा इतिहास अतिशय सुंदर मांडला आहे. 'जहाँ चाह, वहा राह'हे पुस्तक वाचत असताना आफ्रिकनं मीरियम मकेबा ह्या प्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास वाचत असताना अक्षरशः हृदय पिळवटून निघालं वाचत असताना डोळे पाण्याने भरले ..... खरंच संगीत ही जादू आहे. ओसाड जागेत नवंचैतन्याची सुंदर असंख्य फुलांनी बहरलेली बाग म्हणजे संगीत. एकटेपणात अलगद रेशीम फुंकर घालतं ते संगीत .....दीपा मॅडम, अच्युत गोडबोले सरांनी खरंच आमच्या वाचकांनसमोर संगीताचा खजाना 'सिंफनी' पुस्तकातून  उपलब्ध करून दिला आणि त्याचा इतिहास अतिशय सुंदर रंजक, चित्तथरारक पद्धतीने वाचकांनसमोर मांडला.... एक भन्नाट सफर...... गोडबोले सर, दीपामॅडम तुमचे खूप खूप आभार......... मॅडम, मी फोन केला होता पण लागला नाही व्यस्त येतोय. तुमची वाचक सीमा ढेरंगे...!'

जयदीप Jaydip M. Patil या विज्ञानवेड्या तरूणानं फोन तर केलाच, पण मेसेजही पाठवला. त्याच्या मेसेजनं आपण जे लिहितोय त्याचं चीज झालं असं वाटत राहिलं. जयदीप, आम्ही लिहितोय, पण खर्‍या अर्थानं विज्ञान मुलामुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही  रुजवण्याचं मोलाचं काम मात्र तू करतो आहेस. तुला मनापासून सलाम! 'आज 'दीपा देशमुख मॅडम यांचा वाढदिवस...सर्वप्रथम वाढदिवस निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा. सिद्धहस्त लेखिका आणि समाजातील जे जे चांगले आहे ते जगासमोर मांडणाऱ्या सहृदयी माता.. अच्युत गोडबोले सरांसारख्या "अवलिया" लेखकाला लेखनाची साथ देणे ही जबाबदारी अगदी सहज पार पाडताना दीपा मॅडम यांचे तासनतास लेखन, वाचन सुरूच असते. भारतीय जिनियस, कॅनव्हास, सिंफनी, सुपरहिरो सिरीज सारख्या अजरामर साहित्यकृती साकारताना माणसं जोडण्याचे काम मॅडम खूप छान करतात. त्या म्हणतात "चांगलं काम आणि चांगली माणसं एकत्र आली तर समाज बदलेल." 

महाराष्ट्र राज्यात विज्ञान साहित्याचा दुष्काळ होता, मराठीत उच्च दर्जाची विज्ञान आणि संशोधनविषयक पुस्तके फार थोडी होती, परंतु दीपा मॅडम यांनी हा दुष्काळ निवारण करून अभ्यासू व्यक्तींना तृप्त केले. तसेच आमच्या सारख्या धडपडणाऱ्या शेकडो तरुणांना आपण  उजेडात आणलं, आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली. मॅडम आम्ही आपले विचार नक्की अंगिकारू ...आपण असेच लिहीत राहा निसर्ग आपणास निरामय आरोग्य देवो ही प्रार्थना.' - जयदीप पाटील, नोबेल फाउंडेशन परिवार'

सविता, Savita Navnath Satav आपण प्रत्यक्षात एकमेकींना भेटलोही नाहीत. पण तिनं लिहिलेल्या माझ्याविषयीच्या आपुलकीच्या भावना मला समजल्या. थँक्स कसं म्हणू?  "आयुष्यात काही व्यक्ती भेटल्यावर आपल्याला त्यांच्याशी पूर्वीचे काही नाते आहे असे वाटत रहाते,खूप आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो,अस वाटत,पण एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटता ही फक्त त्या व्यक्तीशी फोनवरच झालेली ओळख आणि फोनवरच झालेले बोलणे ही मनाला भिडून जाते. आणि खूप मोठा भावानिक आधार वाटत रहातो की ती व्यक्ती आपल्यासोबत आहे.आता काहीही वाटल तरी हक्काने आपण तिच्याकडे मनमोकळ करु शकतो आणि ती व्यक्ती आहेत लेखिका "दीपाताई देशमुख". खरतर आम्ही अजून एकदाही भेटलेलो नाही. त्यांची आणि माझी ओळख झाली ती डॉ.सुवर्णसंध्या धुमाळ-जगताप यांच्या मुळे.आणि मी डॉ.सुवर्णसंध्या ताईंची मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे एवढया मोठ्या व्यक्तीमत्वाची ओळख मला झाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दिपाताई  स्नेह आहेच तो अधिक वाढावा हीच ईच्छा.🙏🏻🙏🏻- सविता"

सायंकाळी मी आणि अपूर्व भाजी, इतर सामान खरेदीसाठी बाहेर पडलो आणि आनंद शिंदे Anand Shinde या हत्तीशी संवाद साधणार्‍या तरुणाचा फोन आला. त्याचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा डोळे भरून आले. नुसते भरूनच नाही तर ते अश्रू डोळ्यातून बाहेर कधी पडले तेही कळलं नाही. तो बोलत होता, ‘दीपा मॅडम, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्यावर लिहिलेल्या लेखावरून एक खूप मोठी गोष्ट घडलीय. ती सांगायला तुम्हाला फोन केलाय. लेख वाचून एका व्यक्तीनं मला फोन केला. फोन करणारी ती व्यक्ती ढसढसा रडत होती. ती म्हणाली, तुमच्यावर लिहिलेल्या लेखानं - तो वाचून - मी भानावर आलोय. मी आणि माझी बायको आमचं पटत नव्हतं आणि आम्ही घटस्फोटासाठी कोर्टात लढत होतो. आम्हाला ८ वर्षांचा एक मुलगा आहे. लेख वाचून 'आपण वेगळे झाल्यावर आपल्या मुलावर काय ओढवेल इथंपासून ते अनेक गोष्टींवर आम्ही विचार केला आणि काहीही झालं तरी वेगळं व्हायचं नाही असं आम्ही आता ठरवलंय. तुम्ही आम्हाला वाचवलंत.’ आनंदला काय बोलावं सुचत नव्हतं. तो त्या व्यक्तीला म्हणाला, ‘तुम्ही मला कसलंच श्रेय देऊ नका. हे श्रेय द्यायचं असलंच तर ज्यांनी हा लेख लिहिलाय त्या दीपा मॅडमला द्या.’ आनंद माझ्याशी बोलत होता....यात मी काहीच केलं नव्हतं. प्राण्यांच्या भावना जाणून घेणारा, अतिशय संवेदनशील मनाचा आनंद....तो जसा आहे तसा मी त्याला चितारलं हेातं. पण तो मला म्हणत होता, ‘दीपा मॅडम, आज तुम्ही विखुरला जाणारा एक संसार वाचवला. हे काम तुमच्या एका लेखानं झालंय.’ 

आनंद, श्रेय द्यायचंच झालं तर हे आपण बुकगंगाच्या बाईट्स ऑफ इंडियाला देऊयात. ज्यांच्या आग्रहामुळे मी 'अनवट वाटेवरचे वाटसरू' या लेखमालेत गेल्या दीड वर्षांपासून सातत्यानं लिहितेय. 
स्वागतनं Swagat Thorat आभाळभर शुभेच्छा पाठवत छानशी कविता वाढदिवसानिमित्त पाठवली. स्वागतच्या ब्रेल दिवाळी अंकासाठी मी लिहावं अशा त्याच्या एका मेसेजनं आमची फेसबुकवरूनच ओळख झाली आणि ती मैत्री दृढ होत गेली. 

एक पक्षी रोज सकाळी
तुझ्या दारी येवो,
हळूच तुझ्या कानी
येऊन सुस्‍वर गीत गावो.
त्‍या गीतांच्‍या बोलांनी मग
अलगद जाग यावी,
प्रसन्‍नचित्‍ते तुझ्या दारी
फुलबाग ती फुलावी.
-स्‍वागत
दीपा, वाढदिवसाच्‍या आभाळभर शुभेच्‍छा!!!

माझे मित्र, मैत्रिणी, मुलं, वाचक, स्नेही ..... किती जणांची नावं घेऊ? आज माझ्याशी अनेक माध्यमांतून संवाद साधणार्‍या माझ्या सगळ्या सुहृदांचे मनापासून खूप खूप आणि खूप आभार! असेच माझ्यासोबत राहा!

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.