नाशिक दौरा आणि मी
काल २४ नोव्हेंबर २०१६ च्या पूर्वसंध्येला नाशिक इथे यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पूण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक यांनी जग बदलणारे जीनियस या विषयावर अच्युत गोडबोले आणि मी - दीपा देशमुख -आमचं व्याख्यान आयोजित केलं होतं.
नाशिकला पोहोचताच विनायक रानडे आणि संजय पाटील यांनी आमची जेवणाची व्यवस्था त्र्यंबकरोडला असलेल्या त्यांच्या फॉर्महाऊसवर केली होती. तिकडे जाण्यासाठी आमच्याबरोबर सचिन जोशी हा तरूण बरोबर होता. हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा हा तरूण प्रचंड ऊर्जा असलेला, उत्साही आणि वेगळी स्वप्नं घेऊन ती वास्तवात आणण्यासाठी धडपडणारा असा वाटला. गेली ९ वर्ष तो नाशिकमध्ये प्रयोगशील शाळा चालवतोय. उच्चविद्याविभुषित असलेल्या सचिनला व्यवसायात पदार्पण करून खोर्यानं पैसा ओढता आला असता. पण तसं न करता त्यानं शिक्षणक्षेत्रात उडी मारली आणि त्या खडतर प्रसंगात आपल्या पत्नीची साथ घेऊन प्रसंगी कर्ज, दागिने विक असं सगळं करून मनातल्या - स्वप्नातली - शाळा उभारली. या शाळेला प्रत्येकानं भेट द्यावी. इथं मला नाटकातून, गाण्यातून अभ्यास करतात. सातवीतल्या मुलानं केलेलं शिल्प पाहून आम्ही थक्क झालो. मुलांनी रंगवलेल्या चित्रांनी शाळेच्या भिंती सजल्या आहेत. हे तर काहीच नाही सचिनची मोबाईल व्हॅन नाशिकमधल्या गरीब वस्तीत जाते आणि तिथल्या शाळेत न जाणार्या मुलांनाही तिथे जाऊन शिकवते.
सचिन हा अच्युत गोडबोले यांना आपला गुरू मानतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली असं तो म्हणतो. विद्यार्थ्यांनी केलेल्या खादीच्या रुमालांची आणि चरख्यांची भेट देऊन त्यानं आमचं स्वागत केलं. सचिनच्या पुढल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देत आम्ही तिथून निघालो.
एव्हाना पोटातल्या कावळ्यांनी भुकेची सूचना दिली होतीच. आम्ही संजय पाटील यांच्या फॉर्म हाऊसच्या जवळ जाऊन पोहोचलो. संजय पाटील हे नाशिकमधले अत्यंत नामांकित वास्तुशिल्पी असून त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून आपलं शिक्षण घेतलं आहे. त्यांचं हे फॉर्म हाऊस अतिशय देखणं एवढा एकच शब्द त्यासाठी पुरेसा आहे. त्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही चांगलेच रमलो. तिथेच बनवलेल्या चविष्ट जेवणावर आम्ही ताव मारला. आमच्या बरोबर व्याख्यानासाठी पुण्यामुंबईहून कल्याण, सुचेता, वंदना आणि सुवर्णरेहा ही मित्रंकंपनीही आली होती. जेवणानंतर अच्युत गोडबोले यांनी सद्यःस्थितीवर उपस्थितांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकाचं निरसन केलं. त्यानंतर आम्ही व्याख्यान स्थळी पोहोचण्यासाठी या देखण्या परिसराचा निरोप घेतला!
Add new comment