डोंगराला हिरवा फेटा बांधणारा माणूस - वसंत टाकळकर सर

डोंगराला हिरवा फेटा बांधणारा माणूस - वसंत टाकळकर सर

तारीख

मुंबईत रमलेल्या मला पुण्यात येण्याची इच्छाच नव्हती. पण पुण्यात आले. शिवाजीनगरला घर आणि मॉडेल कॉलनीत ऑफीस...सगळं काही हाकेच्या अंतरावर असलं तरी मला मात्र कुठलीच गोष्ट सुरुवातीला रुचत नव्हती. ऑफीसमध्ये माझ्याबरोबर काम करणारे सगळेच बुद्धिमान लोक होते. निवृत्तीनंतरही एमकेसीएलमध्ये सल्लागार म्हणून काम करणारे यशोधन काळे सर, चंद्रशेखर देसाई सर, मिलिंद गंभीर सर, पोळ सर आणि वसंत टाकळकर सर....सगळ्यांची ओळख झाली पण जास्त स्नेह वाढला तो टाकळकर सरांबरोबर!

टाकळकर सर निवृत्त वनाधिकारी (फॉरेस्ट ऑफिसर) एमकेसीएलमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होते. आमच्या दोघांच्या ऑफिसमधल्या बसायच्या जागा अगदीच शेजारी. त्यामुळे अनेक गोष्टींचं शेअरिंग व्हायचं. मी जेवणाचा कंटाळा  करत असल्याचं लक्षात येताच, टाकळकर सर जास्तीचा डबा घेऊन येत आणि ‘बघा तर भाजी कशी झालीये मॅडम’ असं म्हणून डबा खायला लावत. घरी जाताना मी पायी चालत जात असे. अशा वेळी रोज आपल्या गाडीतून मला ते घरापर्यंत सोडत. नको म्हटलं तरी ऐकत नसत. माझ्याकडे येणार्‍या प्रत्येक मुलामुलीशी त्यांचं नातं दृढ होत गेलं होतं. त्या त्या मुलांच्या समस्या त्यांच्याच व्हायच्या. मग माझ्या बरोबरीनं ते सोडवण्याचा प्रयत्न करायचे. आमच्यापेक्षा वयानं खूप ज्येष्ठ असूनही ते आमच्याच वयाचे होऊन आमच्यात रमायचे. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी प्रेरणा सासवडची, रूम करून राहायची. आंब्याचे दिवस आले की तिला आणि मला आमरसाचं जेवण करण्यासाठी आग्रहानं घरी बोलवायचे. 

आमच्या प्रत्येक कार्यक्रमात टाकळकर सर असायचेच. इतकंच काय, पण पुण्यात कुठला चांगला कार्यक्रम असला आणि त्यांना विचारलं की लगेचच 'हो, जाऊया' म्हणून तयार असायचे. मी कुठला लेख लिहिला की सगळ्यात पहिला वाचक ते असायचे. ते आकाशवाणीवर कार्यक्रम करत. त्यांचेही लेख अनेक मासिकं आणि वर्तमानपत्रं यात प्रसिद्ध व्हायचे. मी लहान असूनही ते माझं मत ऐकायचे आणि त्यांच्या लेखात काही दुरुस्ती करायची का असं विनयानं विचारायचे. 

ऑफिसमधून अनेकदा मी पत्रकार नगर जवळच असल्यामुळे बाबाकडे (अनिल अवचट) जायची, तेव्हा तेही ‘थांबा मॅडम मीही येतो’ असं म्हणून गाडी काढायचे आणि माझ्यासोबत यायचे. चतुश्रृंगीच्या उघड्याओसाड डोंगरावर हिरवा साज चढवण्यासाठी त्यांनी काही तरुणांना हाताशी धरून वृक्षारोपण करायला सुरुवात केली. सकाळी चतुश्रृंगीवर जाणं हा नीत्यक्रमच ठरला होता. मी दमते असं म्हटलं की ते म्हणायचे, इतका चांगला व्यायाम दुसरा नाही. काही होत नाही येत चला.

टाकळकर सरांमुळे हिवरेबाजार असो की मसवंडी गाव ही ठिकाणं जी कधीकाळी पाण्यावाचून ओस पडली होती, केवळ टाकळकर सरांमुळे तिथं पाणी आलं. त्यांच्या समतलचर उपक्रमामुळे डोंगरच्या डोंगर हिरवे झाले. गावातले दूधदुभत्यापासून अनेक व्यवसाय वाढले. एवढं सगळं करून टाकळकर सर कधीच श्रेयासाठी भुकेले दिसले नाही. ते फक्त काम करत राहिले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. पण त्यांच्या वागण्यात कधीच अहंकार नव्हता.

टाकळकर सर आम्ही सुरू केलेल्या फिल्म क्लबच्या उपक्रमातही अत्यंत उत्साहानं सहभागी व्हायचे. दुसर्‍या दिवशी आमचा फिल्म क्लब असल्यानं आम्ही तयारीत गुंतलो होतो. टाकळकर सरांबरोबर बोलणं झालं. मला होणारा उशीर पाहून ते एकटेच घरी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी पीडी (प्रियदर्शन)चा चतुश्रृंगी टेकडीवरून फोन, ‘टाकळकर सर काम करतानाच चक्कर येऊन कोसळलेत....लवकर ये.’ धावत पोहोचले. तोपर्यंत मुलांनी त्यांना फुलासारखं रत्ना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. पण मातीशी काम करताना तीच माती अंगाला लागलेल्या अवस्थेत त्यांनी तिथेच शेवटचा श्‍वास घेतला होता. 

टाकळकर सर, तुम्ही अचानक गेलात, कल्पनाही  न देता......आजही नव्यानं काही लिहिलं, कुठला कार्यक्रम असला, आनंद झाला, दुःख झालं की ओठांवर शब्द येतात, ‘सर, वेळ आहे का, काही सांगायचं होतं.......’

-दीपा देशमुख २९ मे २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.