स्‍वाईन फ्ल्‍यू ते डेंग्‍यू....

स्‍वाईन फ्ल्‍यू ते डेंग्‍यू....

1 स्‍वाईन फ्ल्‍यू ते डेंग्‍यू....

30 ऑगस्‍टचा रविवार, विद्याताईं (बाळ) कडे अपूर्व आणि मी चार वाजता भुरभु-या पावसात पोहोचलो. आधी खूप दिवसांच्‍या साठलेल्‍या गप्‍पा फास्‍ट फॉरवर्डमध्‍ये ऐकून आणि ऐकवून झाल्‍या आणि मग त्‍यांना युनिकोडचा वापर, इंटरनेट कसं वापरायचं, जी मेल आयडी हे सारं समजवून सांगितलं. त्‍या माझ्या आज्ञाधारक विद्यार्थिनी बनल्या होत्‍या आणि मी चांगली शिक्षक होण्‍याचा कसोशीनं प्रयत्‍न करत होते. विद्यार्थिनीकडून पुन्‍हा पुन्‍हा कृतीद्वारेही झालेलं सगळं करवून घेतलं आणि अपूर्व आणि मी परत घराकडे निघालो. निघताना अपूर्व म्‍हणाला,’ममा, अचानक मला गळून गेल्‍यासारखं वाटतंय, चल पटकन घरी जाऊया..'

पावसात सारखा भिजतोय त्‍यामुळे जरा त्रास होतोय असं समजून आम्‍ही घरी आलो. तोपर्यंत तो तापानं फणफणला होता. थंडी वाजतेय म्‍हणाला. मग क्रोसिन देत त्‍याला दोन तीन ब्‍लँकेट अंगावर टाकून झोपवलं. सकाळी सोमवार असल्‍यामुळे ऑफीसचे वेध लागलेले होते. अनियतकालिक प्रकाशित करायचं होतं. सकाळीही अपूर्वचा ताप होताच. आणखी एक क्रोसिन देत त्‍याला दुपारीही क्रोसिन घे असं सांगून ऑफीसला गेले. पीडी, मी आणि सचिन अंकाच्‍या नादाला लागलो. प्रेरणानं मला लवकर घरी जायची आठवण करुन दिली. पण उशीर होत गेलाच. घरी आले तर अपूर्वचा ताप उतरुन परत चढल्‍याचं लक्षात आलं. पुन्‍हा एक क्रोसिन देत मी त्‍याची समजूत काढली. मंगळवारी सकाळी मात्र पुण्‍यातलं वातावरण, स्‍वाईन फ्ल्‍यूची भीती आणि आपल्‍याही घरात त्‍याचा प्रवेश होऊ शकतो या जाणीवेनं माधवी, आसावरी, यमाजी, टाकळकरसर प्रत्‍येकाला फोन करत राहिले. यमाजीनं काही डॉक्‍टरांचे फोन नंबर्स आणि पत्ते कळवले, आसावरीनंही शनिपार जवळील डॉक्‍टरांचा पत्ता दिला. हे सगळे डॉक्‍टर्स 10 वाजता आपापल्‍या क्लिनिकमध्‍ये पोहोचवणार होते. तितका वेळ मी धीर धरु शकत नव्‍हते. टाकळकर सरांचा फोन आला, ‘फर्ग्‍युसन रोडवर चोवीस तास सुरु असलेली दोन हॉस्पिटल्‍स आहेत. मी येतो’. हॉस्पिटलमध्‍ये अपूर्वच्‍या युरिन आणि ब्‍लड टेस्‍ट केल्‍या. सायंकाळी रिपोर्ट मिळणार होता. अपूर्वला घरी झोपवून औषधं देत मी ऑफीसला पोहोचले. लंच टाईमला फोन करताच त्‍याची तब्‍येत आणखी वाईट झाल्‍याचं कळालं. ऑफीसमधून डायरेक्‍ट हॉस्पिटलमध्‍ये पोहोचले. रिपोर्टमध्‍ये प्‍लेटलेट काउंट कमी झाल्‍याचं समजलं. नॉमर्ल व्‍यक्‍तीच्‍या शरीरातला प्‍लेटलेट काउंट दीड लाख ते साडेचार लाख असा असतो. डॉक्‍टरांनी सांगितलं, बघूया सकाळपर्यंत....काही औषधंही दिली.

रात्री अपूर्वला भयंकर त्रास सुरु झाला. तो उठून उभा राहिला तरी त्‍याचे तोल जात होते. तो दार समजून भिंतीवर धडकत होता. त्‍याला काहीही सूचत नव्‍हत. इतक्‍या रात्री काय करावं मलाही कळत नव्‍हतं. त्‍यानं थोडा धीर धरावा, इतका त्रास करुन घेऊ नये असं मला वाटत होतं. त्‍याला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करायचं झाल्‍यास आर्थिक प्रश्‍न आ वासून समोर होताच. दहा हजारात घरभाडं निम्‍मं, लाईटबील, मोबाईल रिचार्ज, किराणा सामान, कॉलेज खर्च, पेट्रोल, औषधं याची कसरत सांभाळतानाच आता डॉक्‍टरसाठी पैसे म्‍हणजे ....रात्र खूपच कठीण गेली. सकाळी ठरवलं घरीच थांबूया आणि घरुन काम करुयात. निर्माणचा दिवाळी अंकासाठी लेख लिहायला घेतला. मात्र दुपारनंतर अपूर्व पार गळून गेला. त्‍याच्‍यात बोलायचंही त्राण शिल्‍लक राहिलं नव्‍हतं. धुळयाच्‍या डॉक्‍टर मित्राला फोन करताच त्‍यानं अपूर्वची लक्षणं समजून घेतली, त्‍याची मळमळ, वाढता ताप, झालेली उलटी ऐकताच त्‍यानं सरळ हॉस्पिटलला जावं असं सुचवलं. दोन दिवसांपासून आता कमी होईल या वाटण्‍यावर विसंबून असलेली मी दवाखान्‍याचा खर्च टाळू पहात होते. अच्‍युत गोडबोले यांचा फोन आला. त्‍यांनी मला सांगितलं, ‘अजिबात पैशांचा विचार करु नकोस. आधी ताबडतोब हॉस्पिटलला जा'. टाकळकर सर, पीडी आणि सचिन ऑफीसमधून घरी आले. अपूर्वला ससून हॉस्पिटलमध्‍ये घेऊन गेलो.

ससून हॉस्पिटल- माझ्यासाठी धक्‍कादायक चित्र.. सगळीकडे गर्दीच गर्दी...त्‍याच गर्दीचा भाग बनून वाट बघत राहिलो. काहीच वेळात अपूर्वला अतिशय घाणीत एका गंजलेल्‍या गादी फाटक्‍या कॉटवर बसायला सांगण्‍यात आलं. सगळीकडे लोक मास्‍क किंवा तोंडावर रुमाल लावून फिरत होते. डॉक्‍टरांनी अपूर्वला बघितलं आणि अॅडमिट करुन घ्‍यावंच लागेल असं सांगितलं. दुस-या मजल्‍यावर आम्‍ही गेलो. तिथंही खालच्‍या मजल्‍याइतकीच घाण होती. डॉक्‍टर धरव, वैभव दोघंही लगेच वार्डात पोहोचले. निर्माणच्‍या युवांमुळे एकटं कुठेही धावाधाव करावी लागत नव्‍हती. एक मोठा सपोर्ट सोबत घेऊन मी होते. हसत डॉक्‍टरांनी सांगितलं, ‘इथं पुण्‍यात कुठेही मिळणार नाही इतकी चांगली डॉक्‍टरांची सर्व्हिस मिळेल. थोडा टॉयलेटचा प्रश्‍न सोडला तर बाकी सर्व ठीक आहे'.

वार्ड नम्‍बर 15 कॉट न. 3 वर आमची रवानगी झाली. गंजलेले कॉट, फाटक्‍या गाद्या, कुठूनतरी चुरगाळलेली घाणेरडी चादर नर्सनं आणून टाकली. समोरच्‍या कॉटवर सलाईन लावलेला एक हमाल पेशंट नर्सशी हुज्‍जत घालत होता. त्‍याच्‍या कॉटवर ती रक्‍ताचे डाग असलेली अशीच मळकट चादर टाकत होती. आणि ती चादर त्‍याला नको होती. ‘या घाणीनं मी आणखीन आजारी पडेन’ असं तो म्‍हणत ‘मी तसाच गादीवर झोपतो पण मला ती चादर नको’ असं पुन्‍हा पुन्‍हा सांगत होता..अर्थातच त्‍याचा जोर कमी पडला आणि तीच चादर टाकून नर्सने त्‍याला झोपवलं.

2 स्‍वाईन फ्ल्‍यूच्‍या कचाट्यातून डेंग्यूकडे....

ससून हॉस्पिटलमधलं वातावरण...आपण अगदी किडा मुंगीसारखे...का जगतो आहोत असले काय काय विचार मनात येत होते. बुध्‍दाला असंच सगळं दुःख, दारिद्र्य दिसलं असेल का ? नाही नाही ते वाटून मन भरकटत होतं. येणा-या पेशंटकडे नातेवाईक जास्‍त दिसले की नर्स त्‍यांना आठवण करुन बाहेर पाठवत होती. डॉक्‍टर्स आणि ससूनच्‍या स्‍टाफवर कामाचा लोड किती आहे याची एकीकडे जाणीव होत होती. तर एकीकडे प्रशासनाला ही सगळी अस्‍वच्‍छता, यावरचे उपाय सापडत नसावेत का हा ही प्रश्‍न पडत होता.

अपूर्वजवळ डॉ. वैभव झोपतो म्‍हणाला, मी डॉ. धरवच्‍या रुमवर पोहोचले. इवलीशी स्‍टाफ डॉक्‍टर्ससाठीची ती रुम, धरव आणि त्‍याची डॉक्‍टर बायको दोघांनी ती सजवलेली...दोघं खूपच चांगली, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी...एकमेकांबद्दल आदर असणारी...त्‍यांच्‍या छोटछोट्या हालचालीतून इतकं सुंदर वाटत होतं..त्‍यांनी दाखवलेल्‍या आतिथ्‍यमय वागणुकीनं मी झोपेच्‍या स्‍वाधीन झाले. पहाटे जाग आली. अपूर्वजवळ जाऊन पोहोचले. सचिननं नाश्‍ता आणून दिला. पण हा पठ्ठया त्‍या अस्‍वच्‍छ वातावरणात एकही घास खाण्‍यास तयार नव्‍हता. सारखा उलटी होईल या पवित्र्यात असायचा. टॉयलेटकडे तर जायलाही तयार होईना. रात्रीचे ब्‍लड रिपोर्टस आले होते. डॉक्‍टरांना डेंग्‍यू वाटत होता. प्‍लेटलेट काउंट सत्तर हजार झाला होता.

मध्‍येच साफसफाई करणा-यानं फिनेल आणून शिंपडलं. त्‍याचे शिंतोडे कुठे कुठे उडतील याची तमा न बाळगता तो सडा टाकल्‍यागत फिनेल शिंपडत वार्डभर फिरत राहिला. त्‍यानंतर एकजण फरशी साफ करण्‍याचा ब्रश घेऊन त्‍या फिनेलवरुन ब्रश फिरवत राहिला. ब्रश फिरवताना खालचा कचरा, कापूस, जे काय असेल तेही तो आनंदात उडवत होता. नॉट विदाऊट माय डॉटरमधली परिस्थिती मला काय असेल ही कल्‍पना येऊ लागली. प्रत्‍यक्ष अनुभव घेतानाची असहायता वाढत चालली होती. अपूर्व म्‍हणत होता, पैसे दुसरीकडे लागतील आणि ते आपल्‍याकडे नाहीत यामुळे आपण इथं आलो आहोत तू काळजी करु नकोस मी सहन करीन. आता प्रश्‍न त्‍याचाही राहिला नव्‍हता. स्‍वाईन फ्ल्यू नाही या उत्तरानं मी जरा निश्चिंत झाले होते. आरोग्‍य की अस्‍वच्‍छतेला शरण जाणं या विचारानं कोणालाही विचारण्‍यापेक्षा माझा निर्णय झाला होता. बघूया पुढचं पुढे पण इथून आता जायला हवं. डॉक्‍टरांशी बोलले. ते म्‍हणाले, ‘आज अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. तुम्‍हाला डिसचार्ज मिळणार नाही. जायचं असेल तर लिहून द्या'. म्‍हटलं 'मी माझ्या जबाबदारीवर नेतेय मला जायचंच आहे'. निर्माणच्‍या डॉक्‍टर मुलांनी सांगितलं,’ताई, अपूर्वला घरी नेऊ नका, त्‍याला दुसरीकडे कुठे अॅडमिट करण्‍याची गरज आहे’ मी हो म्‍हणत माधवीला फोन करत दीनानाथची व्‍यवस्‍था केली. यमाजीनं खूप मदत केली. निर्माणची पोरं विशेषतः पीडी, सचिन आणि किर्तीसुधा सावलीसारखे सोबत करीत होते. सगळा ताफा दीनानाथला. तिथे त्‍याची पुनश्‍च तपासणी, फॉर्म भरुन घेणे वगैरे फॉमॅलिटीज...शास्‍त्री तिथे आमची वाट पहात होताच. माझा जणूकाही पालकच बनून आला असावा. अॅडमिट करण्‍यासाठी त्‍यानं घरुन सोबत पैसे आणले होते. पैशांची तिथे गरज पडली नाही. पण त्‍याचं मला कौतुक वाटलं. अशा प्रसंगी काय काय लागू शकतं हे ओळखून न बोलता तो किती तयारीनं आला होता. नो वर्डज्..

जवळपास दोन तासांनंतर आमची रवानगी सेमी प्रायव्‍हेट रुममध्‍ये झाली. एकदम आल्‍हाददायक वाटलं..रुम एकदम स्‍वच्‍छ होती. अपूर्वची चिंता आता डॉक्‍टरांवर सोपवण्‍याइतकी डॉक्‍टर गोड आणि चांगली होती. मी त्‍याच्‍याजवळ थांबू शकत होते. खाली कँटिनची व्‍यवस्‍था होती. हॉस्पिटलमध्‍येच काय खरं तर एकूणच कुठेही गेलं की मी रस्‍ता चुकते. माझा भूगोल कच्‍चा असल्‍यामुळे इथंही मी कॅंटिनमध्‍ये पोहोचले की येताना हमखास चुकत शोधत पुनश्‍च रुमपर्यंत पोहोचायची.

सायंकाळी घरी येऊन अपूर्वसाठी कपडे, मला कामासाठी लॅपटॉप घेऊन हॉस्पिटलला पोहोचले. गणपती मिरवणूक..रस्‍ते ब्‍लॉक...मग काय फुटेल त्‍या रस्‍त्‍यानं अगदी रॉंग साईडनंही जात हॉस्पिटल गाठलं. आपणच नियम कसे मोडतो आहोत हे विचार जराही मनाला शिवले नाहीत.

रात्री लॅपटॉवर कामही केलं. बारा-साडेबारानंतर केंव्‍हातरी गाढ झोपून गेले...

सकाळी साडेसहा वाजता पुन्‍हा अपूर्वच्‍या ब्‍लड टेस्‍ट..रिपोर्ट..ब्‍लड काउंट पंचावन्‍न हजारांवर आलेला...सलाईन आणि इतर औषधं चालू..तो गळून गळून चाललेला...प्रियदर्शन, किर्तीसुधा, टाकळकर सर, सचिन, वैभव, ज्‍योती, वैभव, शास्‍त्री, यमाजी सगळे सोबत होतेच. निर्माणची अपूर्वसारखीच असणारी मुलं मला मी निर्माणमध्‍ये आल्‍यापासून माझीच मुलं वाटतात. आहेतही ती चांगली. त्‍यांच्‍यामुळे तर मी हॉस्पिटलमध्‍ये जास्‍त ताण न घेता राहू शकत होते. पण या प्‍लेटलेट काउंटच्‍या कमी होण्‍यानं आता पुढं काय होणार याची चिंता मनाला पोखरत होती. वरनं मी एकदम आनंदी, छान रहाण्‍याचा प्रयत्‍न करीत होते. पण पुन्‍हा पुन्‍हा माझ्या वाटेवर त्‍याला चालवताना त्‍याची हेळसांड बघून आपण त्‍याच्‍यावर अन्‍याय करतोय ही भावना त्रास देत होती. आत्तापर्यंत त्‍यानं मला फक्‍त समजूनच घेतलंय, त्‍यानं कधीही हट्ट केला नाही, काही मागतही नाही...खूप वाईट वाटत होतं...त्‍याला असं सारखं ग्‍लानीत बघवत नव्‍हतं..

3 डेंग्‍यूच्‍या तावडीत....

अपूर्व सतत ग्‍लानीत आणि झोपून असायचा. मोसंबी ज्‍यूस आणि थोडंसं खातही असे. नाही त्‍यानं खाल्‍लं तर मग मी ते संपवून टाकायची. त्‍यामुळे माझ्यासाठी काही वेगळं आणायची गरजच पडायची नाही. आणि माझ्यासाठी काही आणायचं म्‍हटलं की पुन्‍हा तो कँटिनचा चक्रव्‍युह...त्‍यात शिरायला नको वाटायचं. मी जर चुकून परदेशी गेले आणि तिथले अवाढव्‍य एअरपोर्ट किंवा ते मॉल्‍स बघून मी नक्‍कीच सात जन्‍म पुन्‍हा मूळ जागी पोहचू शकणार नाही हे नक्‍की.

यमाजी (मालकर) कधी सकाळी तर कधी संध्‍याकाळी येऊन जात असे. कमी बोलणारा, गंभीर... त्‍याचे सध्‍याचे प्रश्‍न बाजूला सारुन तो हा वेळ काढत होता. (नुकताच त्‍यानं सकाळमध्‍ये 20 वर्ष ज्‍या पदावर काम केलं त्‍या सकाळचा राजीनामा दिला होता) एक दिवस संध्‍याकाळी घरुन अपूर्वचे कपडे परत घेऊन येताना, यमाजीनं मला पिकअप् केलं आणि आग्रहानं मी काहीतरी खावं म्‍हणून त्‍यानं मला दीनानाथजवळील मनोहर मंगल कार्यालयाच्‍या हॉटेलमध्‍ये जेवायला नेलं. तो एका कार्यक्रमातून जेवून आला होता. पण मी एकटी जेवणार नाही बघून आपणही थोडं खाऊ असं त्‍यानं सांगितलं. भाकरी, मटकीची उसळ, ठेचा, आणि कढी असं ताट समोर आलं. गरमागरम भाकरी बघून मी मोहात पडले. यमाजी किती कमी जेवतोय याकडे लक्ष न देता मी त्‍या भाकरी, ठेचा आणि मटकीवर तुटून पडले. आपल्‍याला खूप भूक लागली होती हेही लक्षात आलं. पण इथं येईपर्यंत ते लक्षातही आलं नव्‍हतं याचं आश्‍चर्यही वाटून गेलं. मनातल्‍या मनात यमाजीचे शंभरवेळा आभार मानून टाकले. ‘तू खूप हट्टी आहेस, जरा खाण्‍यापिण्‍याकडे लक्ष देत जा’ असं सांगून यमाजीनं मला दीनानाथला सोडून निरोप घेतला.

रात्री अपूर्वला भेटायला शास्‍त्री, डॉ. वैभव त्‍याची होणारी बायको ज्‍योती (जी दक्षिण भारतीय आहे), किर्तीसुधा रात्री अकरा वाजेपर्यंत अपूर्वला सोबत करीत होते. सगळे अगदी हलकंफुलकं बोलत होते. विनोद करत होते. अपूर्वच्‍या चेह-यावर स्मित उमटलं होतं. नकळत तो या चर्चेत सामील झाला. त्‍याच्‍यात हा बदल बघून मलाही एकदम छान वाटलं. मी वैभव आणि ज्‍योतीकडे बघत होते. खूप कौतुक वाटलं, दोघांचंही. विशेषतः वैभव तापानं आजारी असतानाही आला होता. आजकालची ही शहाणी मुलं जात,धर्म, वय, प्रांत या सगळ्या अडसरांना दूर करुन किती छानपैकी हातात हात घेऊन वाटचाल करीत आहेत या दृश्‍यानं एकदम उत्‍साहित वाटलं. वैभव सडपातळ, गोरा तर ज्‍योती सावळी, जरा जाडपणाकडे झुकणारी तिच्‍या म्‍हणण्‍यानुसार...मला म्‍हणाली, ‘यानं आता तब्‍येतीकडे लक्ष देऊन जरा जाड व्‍हायला हवं की नाही’. मी म्‍हटलं, ‘अगं राहू दे त्‍याला तसंच. आणि तूही रोड होण्‍याचा प्रयत्‍न करु नकोस. छान आहेस जशी आहेस तशी’. तिचे टपोरे, बोलके डोळे मला खूप भावून गेले. खूप आवडून गेली मला ती.

मुलं गेल्‍यावर अपूर्व औषधं घेऊन लगेच झोपला. मी लॅपटॉप घेऊन बसले. बारा-साडेबाराला आपण काय काम करतो आहोत काहीही कळेना. अपूर्व झोपेत बडबडत होता, चेह-याला हिसके देत होता. मी काही क्षण घाबरले. त्‍याच्‍या कपाळावरनं हात फिरवला. तो हळूहळू शांत झाला. आणि मी विचार करीत झोपी गेले.

दुस-या दिवशी सकाळी निर्माणचा दिवाळी अंकाचा लेख सोलापूरला पाठवायचा म्‍हणून इंटरनेट कॅफेवर गेले. प्रियदर्शन अपूर्वजवळ होताच. नेमक्‍या त्‍याच वेळेत डॉक्‍टर येऊन गेल्‍या. मी आल्‍यावर मला चुटपूट लागून राहिली. मला खूप काही डॉक्‍टरांना विचारायचं होतं. मग डॉक्‍टर रात्री आल्‍यावर विचारु असं ठरवलं. रात्री सारखी वाट बघत राहिले. पण डॉक्‍टर आल्‍याच नाहीत. अपूर्व आता जास्‍त गळून गेल्‍यासारखा वाटत होता. सकाळी साडेआठपर्यंत डॉक्‍टर येतील असं कळालं. साडेआठचे दहा वाजले तेंव्‍हा तीन वाजता डॉक्‍टर येतील असं रिसेप्‍शनवरुन कळालं. तीनचे चार, पाचही वाजले. काय करावं कळत नव्‍हतं. किर्तीसुधा सांगत होती, प्‍लेटलेटस् द्यायच्‍या असतील तर मी सांगून ठेवते. तशी व्‍यवस्‍था आपल्‍याला करता येईल. तेवढ्यात यमाजीही आला. त्‍यानं दीनानाथच्‍या व्‍यवस्‍थापकीय विभागात फोन केला. तातडीनं दोघं रुममध्‍ये आली. काय तक्रार आहे असं गोड आवाजात विचारलं. मी त्‍यांना सांगितलं, तक्रार काहीच नाही. पण डॉक्‍टरांची भेट नाही आणि सध्‍या अपूर्वची काय स्थिती आहे हे जाणून घ्‍यायचंय बस्‍स ! ती दोघं आश्‍वासन देऊन गेली. आणि लगेचंच एक युवा डॉक्‍टर आला. त्‍यानं पुनश्‍च अपूर्वला तपासलं. अपूर्वला डॉक्‍टर बघण्‍यासाठी आल्‍या होत्‍या मात्र इमरजन्‍सीमुळे त्‍यांना परतावं लागलं असं सांगून त्‍यानं अपूर्वचा प्‍लेटलेट काउंट सांगितला. त्‍याचा प्‍लेटलेट काउंट आता आणखी खाली आला होता. पंचावन्‍न हजार ! तो चाळीस हजाराच्‍या खाली येताच वरनं प्‍लेटलेटस द्याव्‍या लागणार होत्‍या.

..आणि डेंग्‍यू पळाला दूर्रर्रर्र...

सकाळी डॉक्‍टर आल्‍या (डॉ. सुचेता अय्यर). त्‍यांनी त्‍यांचा मोबाईल नम्‍बर दिला. कधीही काहीही वाटलं तर फोन करण्‍यास सांगितलं. प्‍लेटलेट कमी झाल्‍यानं घाबरु नका, एका विशिष्‍ट टप्‍प्‍यानंतर त्‍या एकदम वाढण्‍यास सुरुवात होते असंही सांगितलं. खरं तर त्‍यांच्‍या बोलण्‍यानं त्‍या म्‍हणतात तसंच सगळं होईल असा विश्‍वास वाटू लागला. प्‍लेटलेटस् द्याव्‍या लागल्‍या तरी आपण तशी तयारी ठेवलीय असंही त्‍यांनी सांगितलं. प्‍लेटलेट काउंट साठ हजारच्‍या वर गेला की आपला धोका टळला असं सांगत त्‍या गेल्‍या.

शनिवार रविवार तरी डिसचार्ज मिळून घरी जाईल आणि अपूर्वला एकदम छान वाटेल असं वाटलं होतं. पण...शनिवारी सुहासिनीला फोन करुन अपूर्व दीनानाथमध्‍ये डेंग्‍यूनं त्रस्‍त असल्‍याचं सांगितलं. रविवारी सुहासिनी सकाळी डबा घेऊन आली. अपूर्वनं तिने करुन आणलेली नाचणीची पेज पित पुन्‍हा झोपेच्‍या स्‍वाधीन झाला. खूप वेळ सुहासिनीनं सोबत केली. उद्याही मी डबा घेऊन येईन सांगत ती गेली. मलाही आता थकवा आल्‍यासारखं वाटत होतं. अपूर्वच्‍या मित्र-मैत्रिणींचे सतत येणारे काळजीयुक्‍त फोन आणि येणा-या प्रत्‍येकाशी बोलून एक वेगळाच थकवा आला होता. खूप झोपावसं वाटत होतं. निर्माणचा लेख पूर्ण करुन झाला होता. किर्तीसुधाचा फोन आला ती हॉस्पिटलच्‍या वाटेवर होती. ती येताच ती म्‍हणाली, ताई तुम्‍ही झोपा मी बघते अपूर्वकडे... तिला मी लेख वाचायला दिला. तेवढ्यात टाकळकर सर आले. त्‍यांच्‍या मित्राच्‍या मुलीला डेंग्‍यू झाला तेंव्‍हा त्‍यांनी काय दक्षता घेतली होती याची चौकशी करुन ते आले होते. भाज्‍यांचं सूप सारखं द्यायला हवं म्‍हणजे प्‍लेटलेटस काउंट वाढेल असंही त्‍यांनी सांगितलं. ते सांगत होते, माझ्या मिसेसनं देवाजवळ प्रार्थना केलीय. तो लवकरच बरा होईल. त्‍यांच्‍या बोलण्‍यानं माणसांमाणसांमधलं स्‍नेहाचं नातं किती आधार देतं याचा विचार मनात आला. अपूर्वही आज ब-यापैकी चांगला वाटत होता. आम्‍ही बोलत असतानाच डॉक्‍टर आल्‍या त्‍यांनी अपूर्वचा प्‍लेटलेट काउंट सत्तर हजार झाल्‍याचं सांगितलं. त्‍या म्‍हणाल्‍या, आता काळजीचं कारण नाही. आपण उद्या अगदी सकाळीच पुन्‍हा ब्‍लड टेस्‍ट करु. त्‍याचा रिपोर्ट मी दहाच्‍या आत मागवलाय. तो बघून आपण लाखाच्‍या वर काउंट गेला असेल तर लगेच डिसचार्ज देऊया.

सोमवारी सकाळी सजल आला. सजल मला खूप अबोल वाटायचा. आजकाल त्‍याच्‍याशी बराच संवाद होतो. खूप छान वाटतं. त्‍यानं अपूर्वशी गप्‍पा मारल्‍या. अपूर्वला ज्‍यूस आणायचा होताच. सुहासिनीचा डबा येण्‍यास अवकाश होता. मग सजल आणि मी खाली कॅटिनमध्‍ये गेलो. सजलला निरोप देत अपूर्वला वर येऊन ज्‍यूस दिला. अपूर्व सत्तर हजार प्‍लेटलेट काउंटच्‍या जोरावर आता बराच विनोद करत होता. उद्या घरी गेलो की मी परवा परीक्षा देतो असं म्‍हणत होता. आणि परीक्षेसाठी टूव्‍हीलरचा वापर करायची भाषाही त्‍याच्‍या तोंडी बघून मी त्‍याला तुझ्या येणा-या गरगरण्‍याचा आणि चक्‍कर येण्‍याचा विचार कर असं सुचवलं. त्‍यावर तो गाडीच चक्‍कर मारत असते आपल्‍याला कसली चक्‍कर येणार असा विनोद करीत हसत होता.

सकाळी साडेदहाच्‍या सुमारास डॉक्‍टर आल्‍या. अपूर्वचा प्‍लेटलेट काउंट आता एक लाख तेरा हजार झाला होता. जरा वेळात औपचारिकता पूर्ण होऊन डिसचार्ज मिळेल असं त्‍यांनी सांगितलं.

डेंग्‍यू महाशयांनी आपला गाशा गुंडाळला होता. आता आम्‍हालाही दीनानाथमधली आवराआवरी करायला हवी होती. विखुरलेलं सामान गोळा करुन हॉस्पिटलमधून येणा-या (बिलाची) निरोपाची वाट बघत होते. टाकळकर सरांनी आणि यमाजीनं दोघांनीही डिसचार्ज मिळताच कळवण्‍याविषयी सांगितलं होतंच. प्रियदर्शनला बोलावलं. त्‍यांनं उरलेली औषधं मेडिकल स्‍टोअर्समध्‍ये परत करण्‍याचं काम केलं. यमाजीही आला. आणि आम्‍ही आपली गाठोडी आणि डिसचार्ज पेपर्स आणि सर्टिफिकेट घेऊन दीनानाथला टाटा केला.

आभार !

अपूर्वला पाच वर्षांपूर्वी कावीळ झाला होता. आणि तो माझ्या हलगर्जीपणामुळं टोकाच्‍या स्थितीत जाऊन पोहोचला होता. म्‍हणजे मी त्‍याचा ताप, त्‍याला जेवण न जाणं हे सगळं किरकोळ समजून माझे घरगुती आणि निसर्गोपचाराचे उपाय करीत राहिले. माझ्या आवाक्‍याबाहेर गोष्‍ट गेल्‍यावर मी डॉक्‍टरांकडे गेल्‍यावर त्‍यांनी मला खूप सुनावलं. ‘मी एक बेजबाबदार पालक आहे' इथंपासून त्‍याचा कावीळ आता कुठपर्यंत पोहोचलाय याची जाणीव करुन दिली. त्‍याचं सगळं रक्‍त दूषित होत चाललं होतं..अंगावर सगळं लाल पित्त आल्‍यागत उमटलं होतं..तापानं तो फणफणून गेला होता. आणि मी कुणासोबतही शेअर करु शकत नव्‍हते. त्‍यामुळे आज जेव्‍हा ‘डेंग्‍यू' झाला तेंव्‍हा मला सोबत करणा-या या सा-यांबद्दलची कृतज्ञता मला व्‍यक्‍त करावी वाटते. ही सा-यांची साथ-सोबत माझ्यासाठी किती मोलाची आहे हेच मला व्‍यक्‍त करायचं आहे!

या आठ दिवसांत काही क्षण मनावर कायमचे कोरले गेले...सिध्‍दूचा (मुंबईतला मित्र आणि मुंबई पुढारीचा उपसंपादक) मुंबईहून त्‍याचा सहज आलेला फोन .. अपूर्वबद्दल सांगताच त्‍याला एकदम भरुन आलं..त्‍याला बोलता येईना, मग त्‍यानं एसएमएस केला,’ताई, काळजी करु नका, खर्चाची आणि कुठलीच’ शेवटी फोन करुन त्‍याला समजवावं लागलं..विजय कसबेंचा (यशवंतराव चव्‍हान प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते आणि मित्र) फोन,’दीपा, तुझी आणि अपूर्वची नीट काळजी घे’ विजयाताईंचा (चौहान) तसाच फोन’ मी अहमदाबादला जातेय पण कुठलाही संकोच करु नकोस काही लागलं तर कळव'. विजयाताईं खरं तर मासवणला माझ्या बॉस पण त्‍या नेहमीच मैत्रीच्‍या नात्‍यानं माझ्यासोबत राहिल्‍या. त्‍यांनी कधीही बॉसगिरी केली नाही. कधी कामातलं राजकारण अस्‍वस्‍थ करी त्‍यावेळी त्‍या धीर देत एकच मंत्र देत,बी पॉझिटिव्‍ह ! कामातल्‍या अडचणीत मार्ग काढायला मदत करीत, तर छान काही घडलं की भरभरुन कौतुकही करीत. न बोलता प्रत्‍येकवेळी येताना माहितीचा खूप मोठा खजिना सोबत घेऊन येत. त्‍यात पुस्‍तकं, डाय-या, भेटीदाखल वस्‍तू, खाद्यपदार्थ यांची रेलचेल असे. प्रत्‍येकाची आवड आणि गरज यांची त्‍यांना अचूक जाणीव असे.

सुहासिनीला कळवताच ती हॉस्पिटलमध्‍ये डबा घेऊन आली. नाश्‍ता, जेवण सगळंच.. तिचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. माझं पुण्‍यात एक घरं आहे याची जाणीव तिनं दिली. औरंगाबाद ते पुणे, मासवण ते पुणे, विरार ते पुणे, मुंबई ते पुणे, वाशी ते पुणे या प्रत्‍येक प्रवासात मी रात्री, पहाटे, कधीही तिच्‍याकडे जाते. आणि हक्‍कानं वावर करते. तिच्‍या हातचं सुग्रास, चविष्‍ट जेवते. जगभरातल्‍या चांगल्‍या फिल्‍मसबद्दल तिच्‍याकडून ऐकते. अपूर्वला पुण्‍यात रहायचं ठरताच तो काही दिवस तिच्‍याकडेच राहिला. त्‍याला रुम मिळताच सुहासिनीनं त्‍याला गादी, चादरीपासून सगळं लागणारं आवश्‍यक सामान देऊ केलं. हे सगळं करताना आपण काही विशेष करतोय हेही तिच्‍या गावी नसतं. इतकं सहजपणे ती करुन जाते आणि कधीही त्‍याचा उल्‍लेखही तिच्‍या बोलण्‍यात येत नाही.

शास्‍त्रीचं (सिध्‍दार्थ प्रभुणे) एक वेगळं रुप या आठ दिवसात दिसलं. बाबाच्‍या (अनिल अवचट) ओरिगामीचा यालाही लळा. ऑफीसमध्‍येही आला तर शर्ट कर, बेडूक कर, गणपती कर असं चाललेलं असतं. एखादा निरागस, लहान मुलगा असावा तसा. हॉस्पिटलमध्‍ये येताना, कॉफी, कप, ग्‍लास, बिस्किटं (खारी आणि गोडी) अशी जय्यत तयारीनिशी तो यायचा. गप्‍पा मारताना म्‍हणायचा, ‘आपण कशासाठी कोण कसं आहे यावर चर्चा करत वेळ घालवायचा ? तो कसाही असू दे ना. आपल्‍याला कसं वागायचं हे ठरवून आपण वागावं.. ज्‍याचं त्‍याच्‍या जवळ !’. एक दिवस हॉस्पिटलमधून किर्तीसुधा आणि वैभवला (वैभवला बरं नव्‍हतं म्‍हणून) तो आपल्‍या घरीच झोपायला घेऊन गेला. त्‍याच्‍या आईवडिलांनाही त्‍याच्‍याबद्दल अभिमान वाटावा असाच आहे तो ! घरची सांपत्तिक स्थिती चांगली असतानाही हा पठ्ठ्या सायकलवरच प्रवास करतो. ‘इथंच तर आहे माझं कॉलेज, कशाला गाडी पाहिजे?” असं त्‍याचं म्‍हणणं. अनावश्‍यक खर्च कधीही करत नाही. पण कोणाच्‍याही मदतीला धावून जाताना मग गडी खर्चाला मागंपुढं बघणार नाही. खूप कपडेही विकत घेणार नाही. मोबाईलचं एकदा रिचार्ज केलं की तेवढंच महिनाभर चालवणार. मध्‍येच पैसे संपले तर हा पठ्ठया पुन्‍हा रिचार्ज करणार नाही. तेवढे दिवस विनामोबाईल काढेल.

डॉक्‍टर मंदार म्‍हसकर, धुळे...माझे ऑनलाईन मित्र. आणि अर्थातच नंतर भेटही झालेली. माझ्या कुठल्‍याही (फुटकळ) लिखाणाचे वाचक आणि अपूर्वला बरं नसताना पहिल्‍या दिवसांपासून त्‍याची चौकशी करणे, सल्‍ला देणे आणि धीरही या गोष्‍टी एका चांगल्‍या मित्राच्‍या नात्‍यानं तो करीत होता. डॉक्‍टर माधवी मेहेंदळे, जिच्‍यामुळं ससून ते दीनानाथ असा सुसह्य प्रवास करता आला. ती तिच्‍या वडिलांना भेटायला नागपूरला गेली तरी तिनं दीनानाथमध्‍ये फोनवर संपर्क साधून सगळी व्‍यवस्‍था केली. माझ्याशीही सतत संपर्क ठेवत मला धीर दिला. वसंत टाकळकर सर यांनीही पहिल्‍या दिवसापासून नंदादीप हॉस्पिटलमध्‍ये जाण्‍यास, ससूनमध्‍ये दाखल करताना आपले सगळे व्‍याप सांभाळत गाडीनं अपूर्वला सोबत केली. ‘कधीही , कोणत्‍याही वेळी मला फोन करा, मी आहे' असा धीर त्‍यांनी दिला. यमाजी मालकर माझा खूप जुना मित्र...पुण्‍यात आल्‍यावर कित्‍येक वर्षांनी भेटला. अर्थातच फोनवर जास्‍त. अपूर्वच्‍या डेंग्‍यूत मात्र आपले सगळे व्‍याप, आपले प्रश्‍न सोडून तो आम्‍हाला सोबत करीत होता. नव्‍हे ‘डेंग्‍यूला निरोप देणं' जणू त्‍याची जबाबदारी झाली असावी. माझ्या विस्‍तारलेल्‍या कुटुंबात नकळत तो सामील झाला होता. आसावरी, उमेश, सागर, जयश्री, पंत, धनंजय, अमृता, ईशा, प्रेरणा यांचा संपर्क आधार देत होताच.

अपूर्वचे बैचेन झालेले मित्र-मैत्रिणी...आणि प्रियदर्शन, सचिन, किर्तीसुधा यांनी न बोलता केलेली शब्‍दातीत सोबत...ज्‍याची खरंच गरज होती. कदाचित मी देखील अशाप्रसंगी त्‍यांनी जे केलं तितकं करु शकणार नाही. पीडी (प्रियदर्शन) आणि सचिन खरोखरंच सावलीसारखे बरोबर होते. मला वाटतं ही दोघं नसती तर हे सगळं मला इतकं सहजपणे घेता आलं असतं ? नक्‍कीच नाही. किर्तीसुधा तर माझ्यासोबत घरी येऊन मला भराभरा स्‍वंयपाकापासून मदत करण्‍यास सज्‍ज होती. इतके दिवस ‘चिवचिवणारी चिमणी' इतकीच मला तिची ओळख होती. मध्‍यंतरी फिनिशिंग स्‍कूलला ती आली आणि तिच्‍या कनेक्टिंग आणि मुक्‍तांगण कामाविषयी ती भरभरुन बोलली आणि खूप छान वाटलं होतं. तिच्‍यात पुरेपूर भरलेला सेवाभाव मला जाणवला.

ससूनमध्‍ये मदतीला धावून आलेल्‍या डॉक्‍टर्सच्‍या जोड्या- डॉक्‍टर धरव आणि तरु, डॉक्‍टर सुह-त आणि त्‍याची मैत्रीण, डॉ. वैभव आणि ज्‍योती...आणि दीनानाथचे डॉक्‍टर्स डॉ. सुचेता अय्यर, इतर स्‍टाफ यांनी दिलेली उत्‍कृष्‍ट सेवा...यांचेही आभार..

आभार दत्ताचे...तसा तो मित्र असला तरी बॉसच्‍याही भूमिकेत असतो..माझी उडणारी तारांबळ समजून घेत त्‍यानं त्‍या दिवसांत मी निर्माणचा दिवाळीअंकाचा लेख पूर्ण करुन पाठवावा असं सहजपणे जमेल असं काम सोपवलं. त्‍यामुळे हॉस्पिटलमध्‍ये लॅपटॉप घेऊन मला, अपूर्वचं सगळं बघत लेख पूर्ण करता आला आणि संपादकांना पाठवताही आला.

अच्‍युत आणि शोभा गोडबोले यांनी ‘कसलंही टेन्‍शन घेऊ नकोस. आम्‍ही तुझ्यासोबत आहोत' ही भावना अधिक घट्ट केली. बाबा (अनिल अवचट)ला कळाल्‍यावर खूप लांब असूनही त्‍याला वाटणारी काळजी त्‍यानं इथपर्यंत पोहोचवली. त्‍याच्‍यातलं लहान मूल एकदम पालकाच्‍या फ्रेममध्‍ये जाऊन बसलं. अक्षय आणि चंदू (चंद्रकांत कुलकर्णी) यांनी काळजीनं चौकशी केली. विद्याताई (विद्या बाळ), आशाताई (आशा साठे-लेखिका) यांचेही आभार !

अखेरचे आभार त्‍या डेंग्‍यूचे.... जो या सगळ्यांच्‍या सातत्‍यानं असलेल्‍या संपर्कामुळे किंवा गुणगुणीमुळं वैतागला आणि पळाला दुर्रर्रर्र..........

देशमुख जाधव भाई-भाई...

पाण्‍याच्‍या आवाजानं सकाळी पाचलाच जाग आली. थंडी पडलेली.. कम्‍प्‍युटरचा खूप मोह होत असूनही घरातल्‍या कामाला लागले. संध्‍याकाळी आणलेलं किराणा सामान भरुन ठेवायचं होतं. अपूर्वला उठवलं. भराभर आवरलं. ऑफीसला जाण्‍यासाठी दार उघडणार तोच दारावरची बेल वाजली. डेंग्‍यू पेशंट अपूर्व परीक्षेसाठी कॉलेजला गेलेला, कोण असू शकतं यावेळी? जरा आश्‍चर्य वाटून दार उघडताच समोर एक अधिकारी आणि दुसरा त्‍याचा मदतनीस अशी जोडी दिसताच मी ओळखलं ते कोण असावेत. मी त्‍यांना ‘आत या’ म्‍हणत सोफ्याकडे निर्देश केला. दीनानाथ हॉस्पिटलमधून अपूर्वला डिसचार्ज मिळताना डॉक्‍टरांनी सांगितलं होतं की, ‘आठ दिवसाच्‍या आत मनपाचं पथक तुमच्‍या घरी येऊन जाईल. तुमच्‍याकडून सगळी हिस्‍ट्री ते घेतील आणि फवारणी करतील. हॉस्पिटलकडून अशा पेशंटबद्दल त्‍यांना कळवावं लागतं आम्‍ही ते कळवलंय’. मला डॉक्‍टरांनी सांगितलेलं सगळं आठवत होतंच.

मी त्‍यांच्‍यासमोर ऑफीसला उशीर होत असूनही बसले. मनपाचे डेंग्‍यू पथकाचे मुख्‍य कर्मचारी जाधव म्‍हणून होते.

त्‍यांनी मला आपुलकीनं विचारलं,’पेशंट कोण ?’

मी म्‍हटलं,’ माझा मुलगा’

ते म्‍हणाले, “किती वर्षाचा ?”

मी- “19 वं चालू आहे”.

“आता कसा आहे ?”,

मी सांगितलं “आता चांगला आहे. परीक्षा देण्‍यासाठी गेलाय”.

मग त्‍यांनी विचारलं,’ कधी त्रास सुरु झाला?”,

मला 30 ऑगस्‍ट आठवला. त्‍याची थंडी वाजून चढणारा ताप, दुखणारं डोक,अंग, लालेलाल झालेला चेहरा आणि तळहात...ससून हॉस्पिटल...दीनानाथ हॉस्पिटल.. सगळं तारीख आणि वेळेनुसार आठवलं. मी त्‍यांना आवश्‍यक ते सांगत गेले....तो आत्मियतेनं ऐकत होता.

“घरात किती लोकं असता ?”

मी म्‍हटलं, “आम्‍ही दोघंच”,

तो म्‍हणाला, “इथं कधीपासून आहात”.

मी म्‍हटलं, “दोन-तीन महिने झालेत, याआधी मी मुंबईला होते”.

तो म्‍हणाला, “मिस्‍टरांचं नाव?”,

मी सांगितलं. तो म्‍हणाला, “काय करतात ते, मुंबईला असतात ?”

मी म्‍हटलं, “ते नाहीत आता. आम्‍ही दोघंच असतो”.

तो म्‍हणाला, “सॉरी मॅडम”.

Its ok म्‍हणत मीच त्‍याला समजावलं.

“घर सोडून आणखी कुठे कुठे गेला होता तो ?”

मला ऑफीसला घेण्‍यास येत असे बस्‍स. पण एकूणच मला इतकं छान वाटत होतं. त्‍याचं विचारणं एक गंभीर कोरा चेहरा ठेवून यांत्रिकपणे नव्‍हतं तर इतक्‍या आपुलकीनं तो विचारत होता की तो माझा कुणी नातलग असावा असं मला वाटत होतं. त्‍याला सगळं घर पहायचं होतं. घरात फ्रीज, कुंड्या आहेत का, कुठे पाणी साठलंय का..खूप व्‍यवस्थित काळजीपूर्वक तो सारं पहात होता. बोलत बोलत आम्‍ही बाल्‍कनीत आलो.

तो म्‍हणाला, “तुमच्‍या नावाचा खाली सोसायटीत बोर्डही नाही. तुम्‍ही हा फ्लॅट आत्ताचं विकत घेतलाय का ?”

त्‍याच्‍या या प्रश्‍नानं “चला घेऊनच टाकूया आता” असा फील मला आला. मी मनाला दटावत आनंदीत झालेला चेहरा जाणीवपूर्वक गंभीर करत “मी इथं रेन्‍टनं, किरायानं रहाते” असं सांगितलं.

तो म्‍हणाला, “मॅडम, तुमचा हा फ्लॅट खूप छान आहे !” मी मान डोलावली. खरंच तर सांगत होता तो. माझ्या बाल्‍कनीच्‍या समोरच्‍या झाडावरचे पक्षीदेखील बहुदा हेच सांगत असावेत एकमेकांना. त्‍याच्‍यासाठी कांदेपोहे आणि चहा करावा असं मला तीव्रतेने वाटू लागलं. पण ऑफीसला होत जाणारा उशीर बघून मी मनाला पुन्‍हा आवरलं.

त्‍यानं एक डेंग्‍यूविषयचीचं माहितीपत्रक मला दिलं. तो स्‍वतःही नागरिकांनी काय काय काळजी घ्‍यावी याबद्दल मला सविस्‍तर सांगू लागला. त्‍याचं पथकही तितकंच प्रेमळ आणि गुणी होतं. घरात परवानगी घेऊन (जसं शाळेत मुलं “बाई आत येऊ ?”, किंवा “मे आय कमइन?” विचारतात तसंच विचारत ते आत आलं.) सगळीकडे फवारणी करु लागलं. मला या सगळ्यांमुळे ‘घर भरल्‍यासारखं वाटतं’ म्‍हणजे काय याचा प्रत्‍यय येऊ लागला. दिवाळी किंवा दसरा साजरा करावा असंही वाटू लागलं. या धावणा-या मनाला काबूत ठेवता ठेवता माझ्या नाकी नऊ (किंवा दहा) येऊ लागले.

माझ्या शेजारी कोण रहातं याची त्‍यांनी चौकशी केली. मग प्रत्‍येक फ्लॅटमध्‍ये जाऊन फवारणी करत ते माहितीपत्रक देत माहिती देऊ लागले. काय करावं याबद्दल सांगू लागले. घरात ज्‍या बारकाईनं ते त्‍या डेंग्‍यूला शोधत होते. मलाही कुतूहल वाटू लागलं. यांना तो ‘डेंग्‍यू डास' कसा सापडणार, कळत नव्‍हतंच. मी विचारताच ते म्‍हणाले, “सापडेल. फ्रीजमागं, कुठंही कोप-यात..” मग ते टेरेसवरही गेले. तिथे त्‍यांना एका अर्धवट पाण्‍यानं भरलेल्‍या बादलीत डासांची अंडी दिसली. ती गील नावाच्‍या आमच्‍या फ्लॅटधारकाची होती. विजयी मुद्रेनं त्‍याचा नायनाट करीत ते फ्लॅटच्‍या खाली लिफ्टचा वापर न करता पाय-यानं उतरले. मला आठवलं. काहीच म्‍हणजे पंधरा दिवसांपूर्वी मी आणि अपूर्व लिफ्टमध्‍ये अडकलो होतो. म्‍हणजे लिफ्टचं दार उघडतच नव्‍हतं. मग खालीवर करत टेरेसवर पोहोचून ते शटर उघडण्‍याचा आटोकाट प्रयत्‍नही केला होता. आणि लाईट गेल्‍यामुळे आता लिफ्ट खालीदेखील जाऊ शकत नव्‍हती. टेरेसवरुन ओरडूनही कोणालाही आवाज ऐकू जाणं शक्‍य नव्‍हतं. त्‍यावेळी चावला असेल का हा डेंग्‍यू डास ? त्‍यावेळी त्‍या गील महोदयांनीच अनेक क्‍लुप्‍त्‍या करीत आम्‍हाला लिफ्टच्‍या बाहेर काढण्‍यास मदत केली होती. मी जाधवांना ही माहितीही पुरवली. ते म्‍हणाले, “लिफ्टमध्‍ये अडकण्‍याची भीती मलाही फार वाटते त्‍यामुळे मी आपला पाय-या चढत उतरतच कामं करतो”.

खाली येताच निरीक्षण करणारे इतर कर्मचारी बघून मी त्‍यांच्‍याशी बोलती झाले. ते कर्मचारी मला सांगत होते. “सोसायटीचं चेअरमन कोण आहे ?” अर्थातच माझ्या स्‍मरणशक्‍तीनं याही वेळेस मला दगा दिला. मला आठवेचना. खरं तर मेन्‍टेनन्‍स द्यायला मी त्‍यांच्‍याकडे गेले होते. मग मला जरावेळानं एकदम नाव आठवलं. “कुर्तकोटी..”.मी ओरडले. तो म्‍हणाला, “बघा ना, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी आणि झाकणं तुटलेलं, किती कचरा आत जात असणार, डासांची अंडीही या उघड्या पाण्‍यात होणार...शिकलेल्‍या लोकांनी ही काळजी घेऊ नये का ? तुम्‍ही बघाच. म्‍हणजे तुम्‍ही काळजीनं त्‍यांना सांगू शकाल. एक झाकण करुन घ्‍या ताबडतोब”. तो अतिशय मृदू आवाजात मला सांगत होता. सरकारी किंवा कुठलेली कर्मचारी ज्‍या दमदाटीच्‍या आवाजात गुरकावतात आणि आपण गुन्‍हेगार आहोत असं वाटण्‍याचा न्‍यूनगंड आपल्‍याला देतात त्‍यापेक्षा हे सगळं उलटंच चित्र होतं.

तो म्‍हणाला, “तुम्‍हाला उशीर होतोय का, तुम्‍ही जाऊ शकता ऑफीसला..आमचं काम चालू राहील. आम्‍ही उद्याही येऊ”. आसपासही ते फवारणी करत होतेच. मला त्‍या सगळ्या पथकाचाच अभिमान वाटला. इतकी जागरुकता, आणि कामाला दिलेला माणुसकीचा चेहरा मला थक्‍क करुन गेला. काम काम न रहाता किती सहजपणे त्‍यांनी हे सगळं पार पाडलं होतं.

मी अक्षरशः तरंगतच आफीसला येऊन पोहोचले. या आनंदाचं काय करावं हे कळत नव्‍हतंच. मग मी जरबेराची छानशी केशरी रंगाची दोन फुलं घेतली. जरबेरासारख्‍याच असणा-या पॅट्रिशा मॅडमच्‍या केबिनचं दार ठोठावत त्‍यांना दिली. त्‍यांनीही “Thank you, how is your son ?” म्‍हणत ती स्‍वीकारली. मी तशीच तरंगत माझ्या जागेवर आले. सागर जोशी प्रसन्‍न चेह-यानं माझ्याजवळ आला होता. त्‍याच्‍या हातात माझ्यासाठी आणलेली दोन जरबेराची टवटवीत फुलं होती. मी ती हातात घेतली. असं वाटलं जोरदार आवाजात म्‍हणावं,

देशमुख जाधव भाई भाई....

दीपा देशमुख,

adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.