सायलीचा स्नेह

सायलीचा स्नेह

तारीख

माझे मित्र किशोर दिक्षित हे आकस्मिकपणे हे जग सोडून गेले आणि ती बातमी मी त्यांच्या संपर्कात नसल्यामुळे मला कळायला उशीर लागला. खूप वाईट वाटत होतं. ‘दीपा आता मुंबईला आलीस की माझ्याकडेच राहायला ये’, तर कधी अपूर्व आवडल्यामुळे त्याला ‘काय म्हणतो आमचा राजेंद्रकुमार’ असं म्हणत आपुलकीनं चौकशी करणारा आवाज आता कानावर पडणार नाही या विचारानं मन बेचैन झालं होतं. सहा फुटी, धिप्पाड शरीराचा हा माणूस एकदम मृदू, कवीमनाचा होता. खरं तर होता म्हणायला अजूनही मन धजावत नाही. अशा वेळी एफ बी वरची माझी पोस्ट वाचून सायलीचा मला मेसेज आला आणि तिनंच सांत्वनही केलं. 
सायलीनं दिक्षितांचा वारसा पुढे नेला आहे. आजच्या कोरोनाच्या भीतिदायी वातावरणात ती कोरोना रुग्णांसाठी डबे पुरवण्याचं काम करते आहे. घरचं, रूचकर तयार केलेलं जेवण रुग्ण विलगीकरणात असेल तर त्या त्या ठिकाणापर्यंत ती पोहोचवते आहे. ते काम करत असतानाच मला ती घाईघाईत येऊन भेटली. तिने बनवलेलं कैरीचं तिखट-गोड लोणचं आणि अंजिराचा मुरांबा आणला होता. ज्या वेळी मी या दोन्ही पदार्थांची चव बघितली, तेव्‍हा एकच उद्गगार ओठांतून बाहेर पडले, ‘गेल्या दहा हजार वर्षांत मी असं लोणचं चाखलं नाही.’ मलाच नव्‍हे तर इतरांनाही ते चव घेण्यासाठी मिळावं या स्वार्थी भावनेनं मी तिला विचारलं, तेव्‍हा तिनं सहजपणे मी इतरांनाही विकत देते आहे, असं सांगितलं. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित, त्रिगुणित आणि शेकडो गुणित झाला. जरूर मागवा आणि या उन्हाच्या काहिलीत त्या चवीनं तृप्ती अनुभवा. 
सायली, तू करत असलेल्या कामाबद्दल तुझा अभिमान आहेच. त्यामुळे इतकंच म्हणावं वाटतं, अन्नदाता सुखी भव ! 

दीपा देशमुख, पुणे.
 

Add new comment

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.