समीर, अमित आणि भुरका
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे ......
वर्षाअखेरीची सुगंधी मैफल!
काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे होतात. समीर आणि अमित ही दोघं त्यातलीच! तसा अमित कमी बोलतो. मात्र तो सगळ्याच गोष्टींत मनापासून सहभागी असतो. गातोही छान!
समीर आणि माझ्या गप्पा फोनवर जेवढ्या रंगतात, तेवढ्याच प्रत्यक्षात भेटल्यावरही! आम्ही गेल्या १० हजार वर्षांपासूनचे मित्र आहोत असं वाटत राहतं. अर्थातच समीर आणि अमित ज्यांचे मित्र असतील, त्या सर्वांनाच हा अनुभव येत असणार.
समीरला स्वयंपाकाची प्रचंड म्हणजे प्रचंड आवड! कंटाळा म्हणून नाही आणि मी त्याच्या एकदम विरुद्ध! पण समीर भेटला की माझ्यातलीही उत्कृष्ट स्वयंपाकीण जागी होते आणि मग आमची स्वयंपाकघरातली सुगंधी मैफल रंगते.
याही वेळी आमची कामाबद्दलची एक महत्वाची मिटिंग पार पडली आणि मग आम्ही जेवायचं काय याबद्दल चर्चा केली. समीरनं ज्वारीच्या भाकरी केल्या. मी पेरूची भाजी, कोवळ्या भेंडीची परतून हिरवी छान भाजी आणि भुरका (खास मराठवाडी पदार्थ) असा बेत केला. साधारणपणे मला जे पदार्थ आवडतात, तेच समीरला आवडत असल्यानं त्यानं पेरूची भाजी बोटं चाटून चाटून फस्त केली. भुरका तर आता तो या जन्मात विसरणार नाही इतक्या त्याच्या आवडीचा पदार्थ झालाय. कारण आता आमच्या प्रत्येक भेटीत भुरका हा झालाच पाहिजे असा नियम झालाय!
संपणार नाहीत इतक्या गप्पा, चविष्ट पदार्थ असलेलं जेवण आणि ऊबदार थंडी अशा वातावरणात शांतता असतानाही एक संगीत वाजत राहिलं, ते मात्र मैफलीतल्या आम्हा तिघांनाच ऐकू आलं!
दीपा देशमुख, पुणे
मराठवाडी भुरका!
'भारत हा माझा कधी कधी देश आहे’ या रामदास फुटाणे लिखित ओळींप्रमाणे मलाही स्वयंपाक ही गोष्ट कधी कधी करावीशी वाटते. म्हणजे मी अतिशय उत्कृष्ट, चविष्ट पदार्थ - संपूर्ण स्वयंपाक अवघ्या १५ ते २० मिनिटांत बनवू शकते. पण या बाबतीत हा ‘कधी कधी’ हा शब्द मला फारच भावतो.
कधी कधी मात्र आपण स्वतःवरच नव्हे तर अपूर्ववरही अन्याय करतोय, या भावनेतून माझ्यातला कुशल स्वयंपाकी जागा होतो. आजही तो जागा झाला आणि अपूर्व येण्यापूर्वीच मी स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. मस्तपैकी आंबेमोहोर तांदळाचा भात, शेवग्याच्या शेंगाची आमटी, मेथीची कांदा घालून परतलेली भाजी आणि गरमागरम पोळ्या असं सगळं करत असतानाच अपूर्वचं घरात आगमन झालं. आपली आई कम्प्युटरसमोर नसून चक्क स्वयंपाक करतेय हे बघून त्याला गहिवरून आलं. पण त्यानंही संधीचा फायदा घ्यायचा असं मनाशी ठाम ठरवून मला विनंतीवजा आदेश सोडला, 'ममा, प्लीज एवढं सगळं केलंच आहेस तर भुरका कर ना, भाताबरोबर काय सॉलिड लागेल.’
माझ्या होकाराची वाटही न बघता अपूर्वनं लसूण, छोटी लोखंडी कढई, दाण्याचं कूट सगळं साहित्य माझ्यासमोरच आणून ठेवलं. मी नाईलाजानं त्या कढईत मोठा चमचाभर तेल ओतलं. तेल गरम होताच त्यात छोटा चमचाभर मोहरी टाकली. (गावरान बारीक मोहरी टाकावी.) मोहरी तडतडताच अपूर्वने लहान-मोठे तुकडे केलेला लसूण त्यात टाकला. लसूण गुलाबीसर होताच त्यात बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली. (कोथिंबीर टाकली नाही तरी चालतं, पण मला कुठल्याही पदार्थात कोथिंबीर ही लागतेच. तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही.) त्यानंतर शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकलं. चमच्यानं हलवल्यानंतर गॅस बंद केला. कढईत चमचाभर तिखट टाकलं. (घरीच लाल वाळलेल्या मिरच्या फार बारीक न करता मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवल्या असतील तर फारच उत्तम चव येते!) चवीसाठी मीठ टाकून पुन्हा एकदा चमच्यानं हलवलं. झाला भुरका तैय्यार! अपूर्व देखील गड जिंकल्याच्या आनंदात भुरक्याकडे बघत राहिला. मीही कृतकृत्य झाले.
'भुरका' ८ दिवस चांगला टिकतो. तुम्हीही ‘भुरका’ करून बघा. नक्कीच आवडेल.
Add new comment