बालदिन, बालगंधर्व आणि शिल्पकार!
आज बालदिनाचं औचित्य साधून अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे तर्फे 'तंत्रज्ञ जीनियस'ला विज्ञानविभागातून रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार होता. कार्यक्रम बरोबर १२ वाजता सुरू होणार असल्यामुळे मी साडेअकरा वाजता बालगंधर्वला पोहोचले.
अर्ध्या तासाचा अवधी माझ्या हातात असल्यानं मी ओळखीचे चेहरे शोधत असतानाच समोर उमेश घेवरीकर हा तरुण दिसला. आदर्श शिक्षक, हरहुन्नरी कलाकार, पुरुषोत्तम चित्रपटातल्या सचिवाच्या भूमिकेनं माझ्यावर प्रभाव टाकणारा हा अभिनेता मला ओळखीचं हास्य देत समोरून आला. त्याच वेळी मला आणखी एक व्यक्ती येताना दिसली.
जेमतेम उंचीची, सडपातळ अंगकाठीची, वयाची पासष्टी ओलांडलेली, डोळ्यांवर चष्मा, खांद्यावर शबनमसारखी लेदरची बॅग लटकवलेली......ओळखीची वाटत राहिली, पण दुसरीच कोणी निघाली तर या भीतीनं मी समोर जाऊन बोलायचं टाळलं. ती व्यक्ती पार्किंगमधल्या कारमध्ये जाऊन बसली. त्या कारच्या बाजूला धट्टेकट्टे दोन युवक उभे होते.
उमेश जवळ येऊन बोलू लागला. आज उमेशलाही पुरस्कार मिळणार होता. मी त्याला म्हटलं, उमेश त्या कारमध्ये जाऊन बसले ते मला सूर्यकांत सराफ सर वाटताहेत. पण खात्री नाही. तो म्हणाला, त्यात काय एवढं, जाऊन विचारू.
थोडा नाही पंधरा-वीस वर्षांचा काळ मध्ये गेला होता.
उमेशनं त्या तरुणांना जाऊन विचारलं आणि त्या तरुणांनी होकारार्थी मान हलवली. मी कारच्या काचेवर टकटक केलं. सरांनी काच खाली केली, तेच ओळखीचं हासू त्यांच्या चेहर्यावर पसरलं. ते कारच्या बाहेर आले. त्यांनी देखील मला ओळखलं होतं. हो, ते सरच होते - सूर्यकांत सराफ सर!
औरंगाबादमध्ये मन जाऊन पोहोचलं. सिडको एन-फाईव्ह, एन-सिक्स च्या कोपर्यावरची 'आकाश' नावाची अतिशय सुरेख टुमदार इमारत डोळ्यासमोर आली. माझ्यासाठी तो काळ अतिशय कठीण आणि प्रतिकूल होता. सगळीकडेच अंधार होता. अशा वेळी अपूर्वला घेऊन मी आकाशमध्ये गेले होते. आकाश हे कम्युनिटी सेंटर होतं आणि तिथे सूर्यकांत सराफ बाल-कुमार वयोगटासाठी शिबिरं, कार्यशाळा आणि अनेक सांस्कृतिक उपक्रम ‘शिल्पकार’ या त्यांच्या संस्थेतर्फे राबवत असत. मी गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या अटी ऐकवल्या होत्या. आकाशमध्ये जायचं असेल तर पाल्यासोबत पालकानंही सहभागी व्हायला पाहिजे. आपलं मूल काय करतंय हे त्याच्या बरोबर राहून बघितलं पाहिजे. तिथल्या उपक्रमांमध्ये आपणही पालक म्हणून सहभाग घेतला पाहिजे वगैरे वगैरे. मी होकार दिला.
अपूर्वला घेऊन मी रोज संध्याकाळी आकाशमध्ये जाऊ लागले. त्या काळात आकाश म्हणजे माझं दुसरं घरच झालं होतं. आकाशची साफसफाई असो, की तिथल्या पुस्तकांची नीट मांडणी असो, आकाशमधलं शिबीर असो की इतर कार्यक्रम मी त्यात रमू लागले. मुलांबरोबर पालकांनी का सहभागी झालं पाहिजे त्यामागचा अर्थही मला उमगू लागला.
सूर्यकांत सराफ सर जितके प्रेमळ तितकेच फटकळ होते. ते स्पष्टपणे एखादी गोष्ट बोलत. कधी कधी त्यांच्या स्पष्ट बोलण्याचं वाईटही वाटे, पण काहीच वेळात त्यामागची त्यांची काळजी, त्यांची तळमळही समजत असे.
माझ्यातल्या लेखिकेला सरांनी नाटककारही बनवलं. त्याचं असं झालं की मुलांची नाटकं बसवायची होती. पालक आणि मुलं नृत्य, नाटक आणि इतर अनेक उपक्रमात सहभागी झाले होते. मी देखील मुलांसाठी एखादं नाटक बसवावं असं सरांनी सुचवलं. मी आकाशमधली सगळी नाटकाची पुस्तकं वाचून काढली. माझ्यासमोर पुस्तकांचा ढीग जमा झाला. पण मला सद्यःस्थिती दाखवणारं, मुलांच्या मनातली भावनिक आंदोलनं दाखवणारं आणि मुलांचे प्रश्न मांडणारं नाटक हवं होतं. मग मी सरळ कागद आणि पेन समोर घेतला आणि दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत एका दमात एक नाटक लिहूनच काढलं.
संध्याकाळी सर आले. 'हे काय मनाने केलं' म्हणत मला रागावतील असं वाटलं. पण सरांनी माझं नाटक वाचलं आणि म्हणाले, 'वा, दीपाकाकू, छान. आता हे नाटक तुम्हीच दिग्दर्शित करा.'
शिल्पकारमध्ये अगदी लग्न झालेली नवीन मुलगी असली तरी तिथे सूर्यकांत सराफ सर तिला तिचं नाव घेऊन पुढे काकू लावत. मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान असले तरी तिथे त्यांच्यासहित मी सगळ्यांचीच दीपाकाकू होते. मुलामुलींना त्यांच्या नावापुढे दादा आणि ताई लावून संबोधलं जात असे. आडनावाला फारसं महत्व दिलं जात नसे.
मी इतकं मोठं नाटक कधी दिग्दर्शित केलं नव्हतं. समोरच्याने केलेल्या चुका मी सांगू शकत होते, पण तेच काम स्वतः समोरच्याकडून कसं करून घ्यायचं हे मात्र मला ठाऊक नव्हतं. माझी मैत्रीण अॅड. ज्योती पत्की हिची मुलगी, अपूर्व, अवलगावकर या मैत्रिणीचा मुलगा, कृतार्थ आणि आणखी काही मुलं मी नाटकासाठी निवडली. रोज प्रॅक्टिस सुरू झाली. हे काम सोपं नव्हतं. मुलांना मूव्हमेंट द्यायच्या, योग्य प्रकारे त्यांच्याकडून डायलॉग डिलिव्हरी करून घ्यायची.... ये अपने बसकी बात नही हे हळूहळू माझ्या लक्षात आलं. मी सराफ सरांना 'मला जमत नाही' असं सांगितलं. सराफ सर रागावले, म्हणाले, 'असं कसं जमत नाही? अशी मध्येच माघार घेतलेली मला आवडणार नाही. येऊ नका उद्यापासून.'
मला खूप वाईट वाटलं. अगदी रडायलाच आलं. उद्यापासून जाऊच नये असं वाटलं. पण सायंकाळी पाचच्या सुमाराला सरांचा फोन आला, ते माझी वाट बघत होते. मी अपूर्वला घेऊन पोहोचले. तर त्यांनी ज्ञानेश, श्री, शार्दुल आणि काही एक्स्पर्ट मुलांना माझ्या नाटकाची प्रॅक्टिस बघण्यासाठी पाठवलं. त्या हॉलमध्ये ती मुलं आणि मी........माझ्यापेक्षा वयानं कितीतरी लहान मुलं, पण सरांच्या तालमीत तयार झालेली...त्यांनी मला जमत नाही असं कुठेही जाणवू दिलं नाही. उलट छान जमलंय की - असा अभिप्राय देत काही गोष्टी सहभागी मुलामुलींकडून सहजतेनं करून घेतल्या. 'आमची गरज असेल तेव्हा दीपाकाकू, हाक मारा, मदतीला आम्ही येऊ' असं सांगितलं. माझा उत्साह वाढला. आपल्याला येतंय ही भावना वाढीला लागली.
बघता बघता नाटक बसलं. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरमध्ये सरांनी बालनाट्यमहोत्सव आयोजित केला होता. दिवसभर होणार्या भरगच्च कार्यक्रमात त्या त्या वयोगटाप्रमाणे नाटकं होणार होती. एवढंच काय, पण नाटकाची तिकिटं देखील छापली होती. सगळी तिकिटं विकली गेली होती. संत एकनाथ रंगमंदिर मुलं आणि पालक यांनी खच्चून भरलं होतं.
माझ्या मदतीला नीलम होती. ती मुलांचा मेकअप करत होती. पहिली दोन नाटकं संपली आणि आमचं ‘आमचं कोणी ऐकेल का?’ हे दीपा देशमुख लिखित आणि दिग्दर्शित नाटक सुरू झालं. नाटकाला खूपच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांमधून येत होता. नाटक संपलं तेव्हा नाट्यक्षेत्रातले मान्यवर आणि मुलं स्टेजवर धावत आली. मला अजूनही आठवतं, जयश्री गोडसे यांनी देखील स्टेजवर येऊन मला भेटून पसंतीची पावली दिली होती. औरंगाबादमधल्या सांस्कृतिक क्षेत्रातलं त्या म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. मी खूप आनंदित झाले. सरांमुळे हे सगळं घडून आलं होतं.
शिल्पकारने मला आत्मविश्वास, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची ताकद असं खूप काही दिलं. जे आज शब्दांत सांगता येणार नाही. काहीच काळात मला औरंगाबादचा निरोप घ्यावा लागणार होता. सराफ सरांनी खूप समजवलं. मी संपूर्ण शिल्पकारची जबाबदारी घ्यावी. मी त्यांच्या घरात, त्यांच्या वरच्या मजल्यावर आपलंच घर समजून राहावं असं सगळं काही सांगून पाहिलं. पण मला औरंगाबादमध्ये राहायचंच नव्हतं. मला औरंगाबादमधल्या कटू आठवणी विसरायच्या होत्या. मी सरांना दुखवून,त्यांचं न ऐकता औरंगाबाद सोडलं.
औरंगाबाद सोडलं तेव्हा रात्रीचे नऊ वाजले असतील, जालना रोडला नव्यानं झालेल्या सेवनहिलच्या उड्डाणपुलावरून गाडी पश्चिमेकडे धावत होती, माझ्या डोळ्यांमधून अश्रूंचा पूर वाहत होता. औरंगाबाद - माझं आवडतं शहर - माझं जन्मगावं - माझी शाळा - माझं कॉलेज - माझं नाटकाचं जग - माझ्या मैत्रिणी - माझं आकाशवाणीमधलं विश्व...असं खूप काही सोडून मी निघाले होते. पुढला रस्ता धूसर होता. पण जायचं होतंच.
मग पुढला प्रवास मासवणच्या आदिवासी भागापासून ते मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत खूपच वेगात घडला.
आज सूर्यकांत सराफ माझ्यासमोर उभे होते. तसेच तेच! शिल्पकारच्या आठवणी, आकाशमधला तो सगळा काळ डोळ्यासमोरून झरझर एका क्षणात सरकून गेला. सर, आज आपण बोललो जमेल तितकं.........पण जे बोलायचं होतं....ते 'हे' सगळं सांगायचं होतं. आजचा पुरस्कार रेणुताई गावस्करांच्या हस्ते मिळाला, पण तो घेत असताना माझ्या समोरच्या खुर्चीत टाळ्या वाजवत कौतुकानं मला बघणारा एक शिल्पकार मला दिसत होता!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment