फार दुटप्पी आणि ढोंगी....
फार दुटप्पी आणि ढोंगी आहोत आपण. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे याप्रमाणे आपण वागतो. आम्हाला 'पुरोगामी' हा शब्द आवडतो. मात्र तो केवळ दाखवण्यापुरताच. तो अंगी रुजवण्यासाठी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आम्हाला मुळीच सवड नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यात गल्लत करतो आम्ही. श्राद्ध, मुंज, नारायण नागबळी, कालसर्पयोग आणि या प्रकारचं बरंच काही करताना आम्ही आमची संस्कृती, रीत, परंपरा, श्रद्धा यांचे दाखले देत या गोष्टी करतो. दिवसेंदिवस अशा गोष्टी वाढताना दिसतआहेत. तरीहीआम्ही म्हणे सुशिक्षितआहोत.
या गोष्टी करताना आमच्या मनात एकदाही हा विचार शिवत नाही की आम्ही हे सगळं केवळ चालत आलेल्या गोष्टी म्हणून करतोय. आमच्या मनाला एकदाही हा प्रश्न शिवत नाही किंवा विचारावा वाटत नाही की का? उलट आम्ही समर्थन करतो, की या दिवशी वडलांच्या नावानं किंवा आईच्या नावानं आम्ही जे करतोय, ते एका गरीब ब्राह्मणाला दान म्हणून वगैरे वगैरे....अरे, नेमका हाच दिवस कशासाठी? कायमच, सातत्यानं करा की गरिबासाठी काही. आमचा मेकअप, आमचा चंगळवाद, आमचा वस्तूंचा संग्रह करण्याचा अतिरेकीपणा, आमच्या घरात चार-चार वस्तू असतानाही आम्हाला त्याच प्रकारची पाचवी वस्तू आणण्याचा हव्यास....यातून आम्ही त्या गरिबासाठी व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर हळहळ व्यक्त करणार. आणि इकडे मात्र चांगलं शुद्ध तुप, बासमती वा चांगल्या प्रकारचे तांदुळ वापरून पिंडदान करणार, आणिक काय काय करणार....
आम्ही डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनिअर झालो. पण केवळ पुस्तकी शिकलो. पुस्तकातलं पुस्तकातच ठेवलं. शिक्षणानं आम्हाला स्वतंत्र विचार करायला शिकवायला हवं होतं. सक्षमपणे निर्णय घ्यायला शिकवायला हवं होतं. पण दुर्दैवानं आम्ही त्या पुस्तकातल्या वाक्यांमागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही आणि आमच्या मुलांनाही करू दिला नाही. आमचीच मुलं जेव्हा सांगतात, आज घरी वडलांचा दिवस करायचा आहे....तेव्हा हसावं का रडावं कळत नाही. काही बोलायला गेलं तर आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. बोलणारी व्यक्ती पाखंडी ठरते. बोकड कापणं, नवस बोलणं, बाबागिरी, तांत्रिकमांत्रिक इथंपासून अनेक गोष्टींसाठी दाभोळकरांसारखी माणसं आयुष्यभर झगडली आणि त्यातच संपली. पण आम्ही एक दिवस फेसबुकवर निषेधाचा काळा टॅग लावून फिरलो. बस्स! का करतो आम्ही या गोष्टी! केवळ भीतीपोटी! सत्यनारायण करा नाहीतर वाटोळ होईल, दिवस घाला, नाहीतर स्वर्गात पितरं नाराज होतील....जिवंतपणी आम्ही माणसाशी चांगलं वागू शकत नाही, मेल्यावर भीतीपोटी जे काही करतो त्याचा खरंच काही उपयोग होणार आहे का? जो ब्राह्मण ते मंत्र उच्चारतो, त्याला त्यातल्या एका तरी शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का? तोही या अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला एक बळीच. आणि दुसरी गोष्ट त्याच्या अर्थाजनाचं ते एक साधन! कमी श्रमात पैसा मिळतो. मग चला करा. हेच दिवस असतात त्यांचेही कमवायचे.
येत्या २५ तारखेला एका पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन आहे. ती लेखिका जेव्हा म्हणाली, लोक मला पितृपक्षात पुस्तक प्रकाशन करू नकोस अशी भीती घालत होते. पण सगळेच दिवस चांगले असतात ना? याल ना तुम्ही? मला तिच्या विचारांचं कौतुक आणि अभिमान वाटला. तिच्या धाडसाचं कौतुक वाटलं. मी लगेच होकार भरला.
आपण आपल्याचपासून का सुरुवात करू नये? किती दिवस, किती वर्षं झापड लावून जगणार? कसला धर्मातल्या असल्या अनिष्ट प्रथांचा वृथा अभिमान बाळगणार?
मी स्वतः कळतं तेव्हापासून मानवता हाच धर्म मानते आणि निसर्ग, माणूस, प्राणी यांच्यातच देवत्व शोधते/बघते. कर्मकांड, मूर्तीपूजा यांच्यात मला काडीचाही रस नाही. मंदिर नक्कीच बघते. केवळ त्याचं बांधकाम आणि कला म्हणून! मात्र त्या दगडाच्या मूर्तीला दह्यादुधाचा अभिषेक करण्यात जराही रस नाही.
त्यामुळे काय लिहावं आणि काय बोलावं. केवळ वाचण्यापुरती आम्ही ही पोस्ट वाचू. पण आनंदानं पितृपक्ष साजराही करू! तेव्हा झोपेचं सोंग घेतलेल्या आपल्यासारख्या अनेकांना जागं करण्याचा प्रयत्न किती करावा हाच खरा प्रश्न आहे!
कधी आईच्या, कधी वडलांच्या अशा भावना जपत आम्ही इमोशनल ब्लाक्मेल चे बळी ठरतो. स्वत ठरवलेल्या लग्नाच्या वेळी हेच आईवडील अनेकदा तू जर हे लग्न केलंस तर माझं प्रेत बघशील अशी धमकी देतात ......अशा धमक्यांना अनेक जण बळी पडतानाही आपण बघतो आणि मग केवळ त्यांच्या सुखासाठी हे पालुपद गिरवत राहतो ....आधी आपण आणि नंतर आपली मुलं.......
परवा देहदानाच्या निमित्त देखील अनेकांची धार्मिकता आडवी आली. मेल्यावरही आमच्या देहाचा आम्हाला मोह सुटत नाही. काय तर म्हणे, देह पंचतत्वात विलीन झाला पाहिजे, त्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही. जाळला तरी पंचतत्वात विलीन होणार आहे, पुरला तरी पंचतत्वात कधीतरी विलीनच होणार आहे मात्र देहदान केलं तर एका गरजूला तुमचा तो अवयव कामी येऊन त्याच्या आयुष्यात आनंद भरला जाणार आहे. कालबाह्य झालेल्या रुढी, रीती, प्रथा आम्ही वडाच्या भोवती दोरा गुंडाळत आणि हरितालिकेला उपवास करत आजही साजर्या करतो. या सगळ्या प्रथांमागचा अर्थ होता, निसर्गाच्या सान्निध्यात राहा. एकत्र येऊन जगण्याचा उत्सव साजरा करा. आपण मात्र सिमेंटची जंगलं तयार केली आहेत आणि एखाद्या वडाची फांदी तोडून ती प्रथा तरीही आनंदानं साजरी करून मनाचं समाधान करतो आहोत. अशा अनेक प्रथा आहेत, तिथे 'का?' हा प्रश्न विचारू या. त्याचं स्पष्टीकरण देऊ या. असले धर्म मानण्यापेक्षा विज्ञानाला धर्म मानू या आणि वैज्ञानिकांच्या कार्याला देवत्व देऊ या!
दीपा देशमुख,
Add new comment