एक से बढकर एक.....

एक से बढकर एक.....

तारीख

सकाळी आठ वाजता पुणे शहरातलं पत्रकार नगर - कृष्णा इमारत - अनिल अवचट यांचं निवासस्थान - नाश्त्यासाठी बाबा आमची आतुरतेनं वाट बघत होता. पोहोचताच इंदूआजीच्या हातची चव आठवावी आणि तशीच साबुदाण्याची खिचडी समोर यावी तशी खिचडी, ओलं नारळ आणि कोथिंबीर टाकून ज्योतीनं समोर ठेवली. अर्थात काकडीची कोशिंबीर सोबत होतीच. मग कोणाकडेही न बघता, न बोलता ती गरमागरम साबुदाण्याची खिचडी पोटात कधी गेली आणि कधी प्लेट रिकामी झाली हे कळलंच नाही. पण त्यानंतरही अन्नपुर्णा ज्योतीने दुसऱ्या राउंडसाठी खिचडी भांड्यात ठेवलेली होतीच. तीही फस्त करून समाधानाने आम्ही बाबाच्या खास  गुहेत शिरलो. मग बाबाला चांगुलपणाच्या चळवळीचं डिजिटल बुक यशवंत शितोळेच्या हस्ते भेट दिलं. 365 दिवस रोज एक याप्रमाणे ३६५ मुलाखती या पुस्तकात समाविष्ट असून कला, संगीत, साहित्य, राजकारण, समाजकारण, क्रीडा अशा सगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांच्या मुलाखती यात क्यूआर कोडने बंदिस्त केलेल्या आहेत. हा उपक्रम चिकाटीने चालवलेल्या यशवंत शितोळे या तरुणाचा खास उल्लेख करावा वाटतो कारण वादळ, वारा, पाऊस, आजारपण, मृत्यू अशी कुठलीही संकटं आणि कुठल्याही अडचणी/अडथळ्यांचा बाऊ न करता कधी कधी तर अगदी हायवेला गाडी उभी करून या पठ्ठयाने मुलाखती घेतल्या पण त्यात खंड पडू दिला नाही. 

बाबाने आम्हाला हमीद पुस्तक भेट दिलं. आज बाबा खुशीत होता...आम्ही दोघांनी मिळून ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा....हे गाणं मन लावून गायलो आणि न राहवून यशवंतनेही आम्हाला कोरसप्रमाणे साथ दिली. मग रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...हेही गाणं झालं...बाबाने मुलतानी राग सादर केला आणि त्यानंतर त्याला एक एक किस्से आठवायला लागले....त्यात नयनची आई शिक्षणतज्ज्ञ जया मोडक यांच्याकडे त्याने ओरिगामीचं एक पुस्तक बघितलं आणि त्या पुस्तकापासून त्याला ओरिगामीचं कसं वेड लागलं यामागची कहाणी सांगितली. त्यानंतर त्याच्या येणाऱ्या पुस्तकांविषयी बोलणं झालं. 

त्या काळी बाबा बुवाबाजीचा पर्दाफाश लेख लिहून करत असे.. निर्मलादेवीविषयी त्यानं एक लेख लिहिला होता...लेख प्रसिद्ध झाल्यावर एके दिवशी त्याला निर्मलादेवीच्या दोन शिष्या भेटल्या. बाबा म्हणाला, तुम्ही माझा लेख वाचला असेल ना? त्या म्हणाल्या, हो वाचला ना. बाबा म्हणाला, तुम्हाला तो लेख वाचून माझा राग आला असेल ना? त्या म्हणाल्या, नाही. बाबाला आश्चर्य वाटलं, माझा राग आला नाही? कसं काय? त्यावर त्या म्हणाल्या, आमच्या गुरूमाई निर्मलादेवींनीच आम्ही चिडतो का, रागावतो का, की संयम दाखवतो याची परीक्षा घेण्यासाठीच तुम्हाला तो लेख लिहिण्याची बुद्घी दिली असणार. आम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालो, म्हणूनच आम्ही तुमच्यावर जराही रागावलो नाहीत. बाबा त्या दोघींकडे स्तिमीत होऊन बघत राहिला!

दुसरा किस्सा बाबाने शिर्डीच्या साईबाबाचा सांगितला. बाबाचा शिर्डीच्या साईबाबावरही एक लेख प्रसिद्ध झाला होता. साईबाबाच्या दर्शनाची ती लांबलचक रांग, साईबाबाची पहाटे पहाटे ती गरम पाण्याची आंघोळ आणि त्यानंतरची आरती आणि बरंच काही.... त्या वेळी बाबा एसटीने प्रवास करत असताना नेमका बाबाच्या शेजारी बसलेला एक माणूस तोच लेख वाचत होता. बाबाने त्याला विचारलं, लेख पूर्ण वाचला का? कसा वाटला? त्यावर तो मनुष्य म्हणाला, वा, खूपच छान. मला खूप आवडला लेख. बाबाने आनंदाने विचारलं, काय आवडलं? तो हात जोडून भक्‍तिभावाने म्हणाला, तुम्ही साईबाबाच्या दिनचर्येचं साक्षात दर्शन घडवलंत! बाबा त्याच्याकडे बघतच राहिला. आज खूप खूप हसलो आणि तिथून बाहेर पडून पाषाणच्या पंचवटी भागात राहणाऱ्या नयनकडे पोहोचलो. 

नयन आमची वाट बघत होती. नयन नेहमीच प्रसन्न आणि उत्साही असते. दुसऱ्याला समजून घेणं हे तिचं वैशिष्ट्य. आज विशेष म्हणजे नयनचा मुलगा रोहित याची भेट झाली आणि पुढल्या भेटीत रोहितचा पॉटरीचा प्रकल्प बघायचं ठरलं. मुंबईच्या चित्रपटविश्वातल्या झगमगाटातून बाहेर येत या तरुणाने अचानक पुण्याजवळ हाताने मातीची भांडी बनवण्याचा उद्योग सुरू केला आणि त्यात तो पूर्णपणे बुडून गेला. हाताने केलेली त्यांची वेगवेगळ्या प्रकारची भांडी बघणं, त्यातून पदार्थ खाणं एक सुरेख अनुभव आहे. 

रोहितला साथ द्यायला त्याचा तगडा कुत्रा स्नोई असतो. स्नोईची कहाणी देखील मजेशीर आहे. रोहितचं शॉप आधी ज्या ठिकाणी होतं, तिथे हा स्नोई असायचा. रोहित या भटक्या स्नोईला आवर्जून खायला द्यायचा, तर कधी प्रेमाने अंगावरून हात फिरवायचा. एके दिवशी रोहितने शॉप बंद केलं कायमचं. त्या वेळी आपलं सामान गाडीत टाकून तो निघाला, तेव्‍हा रोहितच्या गाडीच्या बोनेटवर स्नोई बसलेला त्याला दिसला. काही केल्या तो उतरेना. शेवटी रोहित स्नोईला आपल्या घरी घेऊन आला. तीन वेळा रोहितने त्याला त्याच्या पहिल्या जागी नेऊन सोडलं, पण तो परत घरी यायचा. एकदा तर रोहितचा मित्र अतुल हा स्नोईला दिसला आणि त्याच्या स्कुटरवर चढून तो बसला, उतरेचना. अखेर अतुलने स्नोईला रोहितकडे आणून सोडलं. शेवटी नयन आणि रोहित यांनी त्याला पाळायचं ठरवलं. आज तो रोज सकाळी रोहितबरोबरच कामाला जातो आणि संध्याकाळी त्याच्याचबरोबर परत येतो. रोहितने त्याला जेव्‍हा घरी आणलं तेव्‍हा तो भटका कुत्रा असल्यामुळे प्लेटमध्ये दिलेलं खायचं असतं हे त्याला समजायचं नाही. तो त्या प्लेटमधलं सगळं अन्न खाली सांडून/टाकून मगच खायचा. लोकांनी सतत हिडीसफिडिस केल्यामुळे त्याला प्रेमाची भाषाही समजायची नाही. तसंच रोहित आणि घरावर त्याला आपला हक्क वाटायचा. त्यामुळे नयननं पाळलेली तारा, अन्टेना वगैरे मांजरं आणि डॉक्सी नावाची कुत्री त्याला आवडायची नाही. पण हळूहळू त्यानं  सगळ्यांबरोबर जुळवून घेतलं. ठरलेल्या वेळी प्लेटमधलं खाणं, पाणी पिणं, सकाळी रोहितबरोबर फिरायला जाणं तो शिकला. एक भटका कुत्रा स्नोई आज किती माणसाळला आणि किती रुबाबदार झालाय हे त्याच्याकडे बघून कळतं. एकूणच नयन, रोहित, स्नोई, डॉक्सी यांना भेटून आम्ही बाहेर पडलो.

त्यानंतर कोथरूडच्या ‘साम्राज्य’ इथे आम्ही यमाजी आणि अंजली मालकर यांच्या घरी पोहोचलो. नेहमीप्रमाणे अंजलीने आदरातिथ्य केलं. आम्हाला तिचं नवं पुस्तक ‘मराठवाड्यातील अभिजात संगीत’ भेट दिलं. पुस्तक भेट मिळाल्यानं अर्थातच आमचा आनंद द्विगुणित झाला. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून यशवंत आणि मी राजीव तांबेच्या घराच्या दिशेनं कूच केलं.
राजीव आणि शुभानं आमचं हसून स्वागत केलं. राजीवशी आम्ही पालकत्व या विषयावर पुढल्या उपक्रमासाठी चर्चा केली. त्यानं मला त्याची नव्‍यानं आलेली ‘चोळके कुटुंबीय आणि इतर कथा’ आणि ‘बोलक्या गोष्टी’ ही दोन पुस्तकं भेट दिली. 

मुख्य म्हणजे नुकतीच मी त्याला त्याची पोस्ट वाचून ‘पेन मॅन ऑफ इंडिया’ हा किताब बहाल केल्यामुळे राजीवनं त्याच्या पेनांचा अख्खा संग्रहच माझ्यासमोर आणून ठेवला. हजारो रुपयांच्या किमती असलेले ते मौल्यवान पेन माझ्यासमोर होते. एक एक पेनचा इतिहास तो मला सांगत होता. प्रत्येक पेनचं वैशिष्ट्य, त्यांची निप/निब, त्यांचं सॉफ्ट चालणं किंवा जाडसर चालणं, त्यांचं दिसणं, त्यांचा रंग, त्यांची झळाळी, त्यांचा रुबाब यावर तो भरभरून बोलत होता. मध्येच तो ऑनलाईन पेनवर बोलायला लागला. ऑनलाईन पेन म्हणजे ऑनलाईन विकत मिळतात ते असं माझं अगाध ज्ञान मी पाजळताच ‘ऑनलाईन’ कंपनीचे ते पेन असल्याचं मला समजलं. एकूणच प्रत्येक पेनचं ज्ञान प्राप्त करणं यात मला कमीत कमी ५ वर्षं घालावी लागतील हे कळलं. मात्र एक छंद, एक नाद माणसाला किती झपाटून टाकतो, किती आनंद देतो, त्या वस्तू मग वस्तू राहत नाहीत, तर तुमच्या आयुष्यात त्या जिवित होऊन तुम्हाला साथ देत राहतात हे ते पेन मला सांगत होते. राजीव पेनविषयी बोलताना सगळं जग विसरून गेला होता. तो आणि पेन इतकंच त्याला दिसत असावं. मीही मग लगे हातो, माझ्या आवडत्या हिरव्‍या शाईच्या पेनची एक ऑर्डर राजीवला देऊन टाकली आणि सम्राट झाल्याच्या अविर्भावात त्याच्याकडे विजयी मुद्रेनं बघितलं! त्यानंही उदार मनानं तुझ्यासाठी मी तुला आवडलेलं पेन मागवून देतो असं म्हटलं.

फेसबुकवरची ज्योडी आणि ज्योडीची आई (सई तांबे आणि तिचा मुलगा) मला भेटले. ज्योडीनं मग काही मिनिटांत चित्रकलेची कोरी वही चित्रं काढून भरवून टाकली. त्याच्या कल्पनेतले प्राणी खूपच डेंजर होते. त्यांना राग आल्यामुळे त्यांच्या कपाळावरच्या आठ्या देखील ज्योडीनं एक फट्कारा देऊन दाखवल्या होत्या. एका प्राण्याची सिंहासारखी आयाळ भलीमोठी होती की तो सिंहरूपी तत्सम प्राणी त्या आयाळीत पार लपून गेला होता. असं बरंच काही. ज्योडीच्या आईचा एक झुळझुळता अतिशय सुरेखसा ड्रेस बाल्कनीत झोके घेत तो किती सुंदर आहे हे मला सांगत होता. राजीवची बायको शुभा हिने मला छानसे ऑक्सडाईज्ड कानातले भेट दिले आणि मला ते खूप खूप आवडले. 

राजीवकडून निघून आम्ही धनंजय भावलेकर या चित्रपट दिग्दर्शकाला भेटलो. त्याच्याकडे पाऊल टाकताच प्रथमदर्शनी खूप साऱ्या पुस्तकांनी आमचं स्वागत केलं. ठरवलेल्या विषयावर चर्चा करून आम्ही आनंदात त्याचा निरोप घेतला आणि सेनापती बापट रोडवर मिळून साऱ्याजणीची संपादक गिताली आणि नारी समता मंचच्या साधना दधिच यांना भेटलो. दोघींची धावती भेट घेऊन आम्ही कमिशनर ऑफीसच्या दिशेनं निघालो. 

पुणे शहराचे डेप्युटी कमिशनर ऑफ पुलीस मितेश घट्टे यांच्या केबिनमध्ये प्रवेश करताच त्यांच्या टेबलमागे असलेल्या बांबूच्या झाडाने मन प्रसन्न झालं. मितेशसारखे तरुण अधिकारी जेव्‍हा मी बघते, तेव्‍हा त्यांच्याबद्दलचा वाटणारा अभिमान आणखीनच वाढतो. साहित्य, संगीत, कला, क्रीडा यांची आवड असणारा, भरपूर वाचन असणारा, माणसांची कदर करणारा, त्यांचा आदर करणारा, कामातून जसा वेळ मिळेल, तसा आपल्यासोबत ठेवलेलं पुस्तक काढून वाचणारा हा माणूस. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत दिवस-रात्र काम करताना तो दिसतो. असे अधिकारी आपल्या पदाची शान आणखीनच वाढवतात हे मात्र खरं! मितेश घट्टे यांनी त्यांच्या शर्वरी आणि शरयू या जुळ्या मुलींनी चित्रं काढलेलं एक कॅलेंडर मला भेट दिलं. अतिशय सुरेख कॅलेंडर! गजानन टोंपे या पोलीस अधिकाऱ्याचीही मितेश घट्टे यांनी ओळख करून दिली. पुन्हा लवकरच भेटायचा वादा करत आम्ही त्यांचा निरोप घेतला.

त्यानंतर भेट झाली ती सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णप्रकाश या आयपीएस अधिकाऱ्याशी. आम्ही आयुक्तालयात पोहोचलो, तेव्‍हा मला सुखद धक्‍का बसला. लोकांना बसण्यासाठी आसनव्‍यवस्था, स्वागतकक्षातल्या महिला पोलीस येणाऱ्या प्रत्येकाशी सौजन्याने वागताहेत, हसून बोलताहेत. सगळीकडे स्वच्छ वातावरण आणि प्रसन्न असलेले कर्मचारी. नाहीतर पोलीस स्टेशन म्हटलं की गुन्हेगार, कोऱ्या चेहऱ्याचे पोलीस आणि नैराश्य यावं असं वातावरण असतं. ते इथे अजिबात नव्‍हतं. त्यातच एक बोर्ड माझ्या नजरेला पडला. त्यावर कृष्णप्रकाश यांच्या वतीनं लिहिलं होतं - ‘आपल्या कामात कुठलीही अडचण/अडथळा आल्यास, कोणी साहाय्य करत नसल्यास, कोणाचीही परवानगी न घेता थेट मला येऊन भेटावं.’ हे सगळं इतकं दिलासा देणारं होतं की मधल्या सगळ्या अडथळयांच्या भिंतीच या अधिकाऱ्यानं पाडून टाकल्या होत्या. पण त्याचबरोबर मला हेही लक्षात आलं की या बोर्डमुळे किंवा या अधिकाऱ्याच्या कार्यपद्घतीमुळे येणाऱ्या तक्रारदाराचे प्रश्न तिथल्यातिथेच मार्गी लागत असणार आणि त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज पडत नसणार. खूप छान वाटलं. आजवर मनात असलेली पोलीस कार्यालयांची भीती मनातून पार निघून गेली.

त्याच वेळी मला ज्या वेळी कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवडला रुजू होणार होते, त्या वेळचा व्‍हायरल झालेला व्‍हिडिओ आठवला. त्या वेळी त्यांनी वेषांतर करून आपल्या कार्यालयात कसं कामकाज चालतं ते बघितलं होतं. ती त्यांची बेमालूमपणे केलेली वेशभूषा आठवून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. इतक्यात आमच्या नावानं कोणीतरी पुकारा केला आणि सरांनी आत बोलावलंय म्हटलं. एक वडील आणि एक मुलगी, दोघं केस वाढवून पोनीटेल बांधलेले तरुण आणि यशवंत आणि मी असे कृष्णप्रकाश यांच्या केबिनमध्ये एकाच वेळी शिरलो. त्यांनी हसून आम्हाला बसायला सांगितलं. आमची चौकशी केली. त्या पोनिटेलवाल्या दोन तरुणांनी कृष्णप्रकाश यांना एक मोमेंटो दिला आणि फोटो काढला. फोटो काढताना कृष्णप्रकाश यांनी त्यांच्याच एका कर्मचाऱ्याला पाचारण केलं. आरोग्यविषयक मदत करण्याची तयारी ते तरुण दाखवत होते. त्यांच्याशी अतिशय सौजन्यानं वागून त्यांना बसण्याची विनंती कृष्णप्रकाश यांनी केली. मग आमचं डिजिटल क्यूआरकोड असलेलं मुलाखतींचं पुस्तक बघून खजिना गवसल्यासारखा आनंद व्‍यक्‍त केला. हे डॉक्युमेंटेशन करून तुम्ही खूप चांगलं काम केलंत असं ते यशवंतला म्हणाले. आमच्यासोबतही त्यांनी एक फोटो काढला. त्यानंतर त्यांनी आमच्याशी स्पर्धा परीक्षा आणि त्याचं आजचं चित्र यावर गप्पा मारल्या/चिंता व्‍यक्‍त केली. त्याच वेळी त्यांना एक फोन आला, तेव्‍हा त्यांनी थोडी कपाळावर आठी आणून खाली दोघंजण मला भेटायला तिष्ठत आहेत, त्यांना वर का बोलावलं गेलं नाही असं विचारलं. एकाने लगेचच जाऊन त्या दोघा ज्येष्ठ व्‍यक्‍तींना आत आणलं. स्वत: जागेवरून उठून कृष्णप्रकाश यांनी त्यांना वाट बघावी लागली याविषयी दिलगिरी व्‍यक्‍त केली. आपण त्यांचा जास्त वेळ खातोय हे लक्षात येताच आम्ही निरोपासाठी त्यांची परवानगी मागितली, तेव्‍हा त्यांनी नाही नाही, काढा घेतल्याशिवाय जाता येणार नाही असं म्हणत आम्हाला आग्रहाने थांबायला सांगितलं. इतकं अगत्य की खरोखरंच माझा माझ्या कानांवर/डोळयांवर विश्वासच बसेना. चार ते सहा ही त्यांची सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याची वेळ असल्याने ते आम्हा सगळ्यांचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकत होते. नुकताच कोयत्याचा वापर करून वार करणाऱ्याचा एक व्‍हिडीओ व्‍हायरल झालेला होता, त्यावर घेतलेल्या ॲक्शनबद्दलचे फोन कॉल्स आणि अपडेट्स कृष्णप्रकाश यांना एकीकडे येत होते आणि ते तसतशा सूचना ते आपल्या स्टाफला देत होते. त्यांचं मल्टिटास्किंग प्रत्येक क्षणाला दिसत होतं.

आम्ही घेतलेला काढा अतिशय गरम आणि चवदार होता हे सांगायला नकोच. आम्ही त्यांचा निरोप घेताना मी त्यांच्या मागे असलेल्या पोलिसांच्या टॅगलाईन/ब्रिदवाक्याबद्दल त्यांना विचारणा केली, तेव्‍हा ‘सद् रक्षणाय खलनिग्रणाय’ हे बरोबर असून ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे चूक असल्याचं सांगत त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला उद्यापासून चुकीची अक्षरं इथे दिसता कामा नयेत आणि ताबडतोब ती बदलून घ्या असं सांगितलं. आम्ही त्यांचा निरोप घेतला.

बाहेर शिंदे नावाचे ओळखीचे एक पोलीस अधिकारी भेटले, त्यांच्याशी बोलून आम्ही निघालो. परतीच्या रस्त्यात असताना सकाळपासून ‘एक से बढकर एक’ भेटलेल्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येत होते....मनस्वी मनाचा मृदू व्‍यक्‍तीमत्वाचा बाबा/अनिल अवचट, शिक्षण सुटलेल्या मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्याची धडपड करणारी नयन, मातीची भांडी तयार करणारा कल्पक आणि कष्टाळू रोहित, आता निराधार नसलेला आणि प्रेमाने पूर्ण बदललेला स्नोई, स्नोईच्या आगमनानं बावरलेली डॉक्सी, संगीतात रमणारी अंजली आणि नसानसांत संपादकत्व भिनलेला यमाजी, चित्रपट/माहितीपटाच्या दुनियेत गर्क असलेला धनंजय भावलेकर, विद्या बाळ यांच्यानंतर मिळून साऱ्याजणीची धुरा खांद्यावर घेतलेली गिताली, हाडाची कार्यकर्ती साधना दधिच, संवेदनशील पण तितकाच कठोर, कर्तव्‍यदक्ष पोलीस अधिकारी मितेश घट्टे आणि तुमचा आमचा सुपरहिरो असलेला पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी कालचा दिवस  आणि सायंकाळ सुंदर केली!

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.