इति-आदि
तीन-चार दिवसांपूर्वी कुरियर आलं. कुरियर म्हणजे पुस्तकं आली हे मनात पक्कं ठसलेलं आहे. अतिशय व्यवस्थित पॅकिंग केलेल्या त्या पुठ्यातून पुस्तक बाहेर काढायला मला वेळच लागला. मात्र आतलं पुस्तक हातात पडलं, तेव्हा, 'वाह, क्या बात है' असे उ्दगार नकळत बाहेर पडले. रोहन प्रकाशनाची देखणी निर्मिती असलेलं आणि अरूण टिकेकर यांनी लिहिलेलं ‘इति-आदि’ हे पुस्तक दिमाखदारपणे माझ्या हातात विसावलं. या पुस्तकात काय बरं असेल? अरूण टिकेकर या लेखकानं लिहिलेलं म्हणजे काहीतरी गंभीर, विचार करायला लावणारं असं पुस्तक असेल का, असाही प्रश्न मनाला पडला. जास्त वेळ उत्सुकता न ताणता मी पान उलटलं, तर रोजच्या जगण्यात लागणार्या, दिसणार्या, उपयोगात असणार्या वस्तूंविषयी यातले लेख होते. अनुक्रमणिका बरीच मोठी होती. मी प्रकाशकांची भूमिका वाचली आणि अधिक वेळ न दवडता मी पहिला लेख वाचायला सुरुवात केली.
‘बेगम नूरजहाननं तयार केलं ‘ इत्र-इ-जहांगिरी’....जहांगीरची बेगम नूरजहान ही खूप महत्वाकांक्षी, बुद्धिमान आणि कलासक्त होती हे वाचून ठाऊक होतं. पण या लेखातून तिच्यातला कलाकार, रसिक तिच्याकडून काय काय करून घेत होता ते या लेखातून समजलं. आज आपण जे गुलाबाचं अत्तर लावतो त्याची शोधक नूरजहानच! या सगळ्या शोधाचा रंजक पण अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास या निमित्तानं समजला. मग मन काही थांबायला तयारच होईना. लगेचच दुसरा लेख वाचला, ‘सीताफळा’वरचा! सीताफळाच्या बाबतीत सर्वत्र पसरलेल्या पौराणिक दंतकथा आणि त्या अनुषंगाने मग सीताफळाबरोबर रामफळ, लक्ष्मणफळ, हनुमानफळ आणि काशीफळ कशी अवतरली, ब्राझीलमध्ये असलेलं सीताफळ १६ व्या शतकात हिंदुस्थानात कसं आलं आणि मग ते संपूर्ण देशात कसं पसरलं. या फळात असलेले प्रोटिन्स, फायबर, व्हिटॅमिन सी, बी-२ आणिबी-६, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेड असा सगळा उपयुक्त मामला कळला. इतकंच नाही तर बैठं काम करणार्यांच्या यकृतावर जो परिणाम होतो, तो यातल्या मॅलिक आणि टार्टरिक अॅसिडमुळे कमी होतो आणि अपचनही होत नाही हे वाचून तर हायसं वाटलं.
सीताफळाच्या लेखाची गोडी चाखते न चाखते तोच नाकातली झोकदार नथ समोर आली. दागिन्यांचा सोस माणसाला कसा असतो आणि या दागिन्यांचा नेमका इतिहास काय हे या लेखातून उलगडत गेलं. भारताच्या इतिहासात डोकावून बघितलं तर नथीचे उल्लेख १००० वर्षांपासून पुढे सापडतात. त्या आधी अगदी संस्कृत ग्रंथांमध्येही नथींचे उल्लेख सापडत नाहीत. असं म्हणतात नथ हा प्रकार इजिप्तच्या रानटी लोकांकडून अरबांकडे गेला आणि मग तो फिरत फिरत भारतापर्यंत पोहोचला. जे नथीचं आहे तेच बटाट्याचं. जगभर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या बटाट्याची गोष्ट पुढे प्रतीक्षा करत होती.
दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वताभोवतालच्या प्रदेशात बटाटा अस्तित्वात होता, तर चिली या देशामध्ये गेल्या १० हजार वर्षांपासून तो असल्याचं इतिहास सांगतो. मग पुढे तो स्पेन, इंग्लड, फ्रान्सस, जर्मनी, रशिया करत करत भारतात आला. १४ व्या शतकात चीनमध्ये पोहोचलेल्या बटाट्यानं तर तिथं क्रांतीच केली आहे. संपूर्ण जगात बटाट्याची लागवड करणारा चीन हा देश जगात पहिला क्रमांक टिकवून आहे. असा हा बटाटा गरिबांचा आणि श्रीमंताचा दोघांचाही लाडका आहे. मग पुढल्या लेखांमध्ये सफरचंद, रोजच्या शिवणाला लागणारी सुई, आरसा, पॉटमधलं आइस्क्रीम, आंबा (आंब्याचे प्रकार), पंखा, मच्छरदाणी, कात्री, द्राक्ष, विडा, तांबुल, डाळिंब, सोन्याचांदीची भांडी, कोशिंबीरी, बर्फ, केळी, कलिंगड, कारलं आणि काकडी, चॉकलेट असे अनेक विषयांवरचे लेख या पुस्तकात आहेत. प्रत्येक लेख वाचताना खूपच आनंद मिळतो. अगदी आपल्या रोजच्या खाण्यात असलेली केळी हे सुद्धा फळ आपलं नाही कळल्यावर डोळे विस्फारतात.
मलेशियामधून केळी इसपूर्व २००० मध्ये हिंदुस्थानात आली असं इतिहास सांगतो. स्त्री सौंदर्यांची प्रशंसा करताना केळीची उपमा तिच्या मांड्यांना देणं किंवा सुश्रुतानं केळीचा सांगितलेला औषधी वापर अशा प्रकारे केळीचा इतिहास आणि त्या अनुषंगाने त्या फळाची महती आपल्याला कळत जाते. विशेष म्हणजे आजच्या तरुणाईमध्ये अंगाअंगावर गोंदवून घेण्याचं जे फॅड किंवा फॅशन आहे त्या गोंदणाचा इतिहास देखील या पुस्तकात आहे. खरं तर प्रत्येक लेखाबद्दल लिहीत राहावं आणि सांगत राहावं असं टिकेकरांनी लिहिलं आहे.
अरूण टिकेकरांची ओघवती रोचक भाषा वाचकाला लेख वाचताना गुंतवून ठेवते आणि सुरुवातीला पुस्तकाची जाडी बघून मनावर आलेलं दडपण क्षणार्धात दूर करते. अतिशय सोपी, सरळ भाषा आणि तरीही या भाषेत कुठेही पांडित्याचा लवशेषही नाही. लेखक जसा लिहिताना स्वतः आनंद घेतो, तसाच तो वाचकांना या प्रवासात सामील करून त्यालाही तोच आनंद देतो असंच वाचताना वाटत राहतं. या पुस्तकाची निर्मिती देखणी झालीच आहे, त्याबद्दल रोहन प्रकाशन आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. मात्र सुरेख निर्मितीच्या नादात पुस्तक अंमळ वजनाला जड झालं आहे, त्यामुळे ते सहजपणे बरोबर घेऊन फिरता येणार नाही ही मर्यादा आहे. अर्थात पुस्तकप्रेमींना हे ओझंही गोडच वाटेल यात शंका नाही. तर 'इति-आदि' हे पुस्तक आपल्याजवळ असायलाच हवं. जरुर खरेदी करा, आपल्या जिवलगांना भेट द्या आणि स्वतःच्या संग्रही ठेवा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment