परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष
नुकतीच रोहन प्रकाशनानं ऋषिकेश गुप्तेची तीन पुस्तकं प्रसिद्घ केली. या पुस्तकांचा आकार आणि निर्मिती खूपच देखणी आहे. ऋषिकेश गुप्तेचं परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष हे पुस्तक त्याच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा हटके आहे.
एक स्त्री विधवा होते आणि नंतर तिला भेटलेले पुरुष, एक स्त्री म्हणून त्या त्या पुरुषांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती देखील त्यांच्याकडे कशा प्रकारे बघते आणि त्यांचा उपयोग किंवा वापर कशा पद्घतीने करते हे खूप वेगळ्याच तऱ्हेनं गुप्तेंनी मांडलेलं आहे. तिच्यावर लट्टू झालेले वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या स्वभावधर्माचे पुरुष आणि त्यांना नीट हाताळत शेवटी आयुष्यात स्थैर्य किती महत्वाचं आहे, हे लक्षात घेवून तिनं केलेली त्यातल्या एका पुरुषाची निवड आणि त्याच वेळी त्यानं आपल्याला पूर्ण समाधानी न केल्यास तिनं ‘हातचा राखून ठेवलेला’ असतोच, हे सगळं वाचताना खूपच मजा येते. खरं तर असं वास्तव आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा बघितलेलं असतं, पण ते ज्या पद्घतीनं गुप्तेंनी मांडलंय ते वाचताना खूप वेगळा अनुभव (एव्हरिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर प्रमाणे) येतो. तसंच उत्कंठाही वाढत जाते. हे कथानक उभं करताना गुप्तेंनी विक्रम वेताळ ही पात्रं घेवून कथेची सुरुवात आणि शेवट केलेला आहे.
दुसरी कथा आहे तिळा दार उघड... वयात येणाऱ्या मुलाला लैंगिकतेची जाणीव जेव्हा होते, किंवा करून दिली जाते त्यावर ही कथा बोलत जाते. जन्मत:च या मुलाच्या लिंगावर तीळ दिसतो आणि त्यावर पुढे तो स्त्रियांना वश करण्यात तरबेज कसा होणार वगैरे चर्चा झडायला लागतात. त्याच्या वयाच्या त्या त्या टप्प्यात त्याच्यातले होणारे बदल, त्याला मिळत जाणारं लैंगिक ज्ञान, हस्तमैथुनाचा अनुभव, मित्रांच्या गप्पा आणि शेअरिंग, प्रत्यक्ष स्त्रीचा अनुभव न घेताही मारलेल्या बढाया असं सगळं काही आपण त्याच्या प्रवासात बघत राहतो. या कथेचीही मांडणी देखील गुप्तेंनी निराळ्या तऱ्हेनं केलेली आहे.
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत. एकच सांगेन, कुठलेही नीतिमत्तेचे निकष वगैरे न लावता स्वच्छ मनानं या दोन्ही कथा वाचायला हव्यात, तरच त्यांच्यातली वैशिष्टयं आणि मौज अनुभवता येईल.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment