जुगाड - नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा
आज सातत्यानं बदलणार्या, स्पर्धेशी तोंड देत पुढे जाणार्या कॉर्पोरेट अधिकार्यांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि खरं तर प्रत्येकालाच यशस्वी होण्यासाठी ‘जुगाड’ हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. हे जुगाड प्रकरण आहे तरी काय? खरं तर जुगाड हा एक हिंदी शब्द असून याला समानार्थी शब्द इंग्रजी भाषेत उपलब्ध नाही. जुगाड याचा अर्थ आपली दैनंदिन गरज भागवण्यासाठी सहज सोप्या काटकसरी पद्धतीनं आणि हुशारीनं केलेलं संशोधन! कमतरतेकडून विपुलतेकडे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जुगाड! आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी शोधलेला आणि विचारपूर्वक अंमलात आणलेला जुगाड हा एक उपाय आहे. आपल्या जवळ असलेल्या साधनसामग्रीतून समोर आलेल्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याची कला म्हणजेच जुगाड! जुगाड या पुस्तकात हीच संकल्पना घेऊन अडचणींमधून मार्ग काढत, पुढे जाण्याच्या मानसिकतेबद्दलचा विचार जुगाडचे लेखक नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा या त्रिमूर्तींनी मांडला आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे साचेबद्ध संशोधनाला जास्त लवचिक, काटकसरी आणि अंतःप्रेरणेला प्रमाण मानणार्या मनोवृत्तीची जोड दिली पाहिजे असं लेखकांनी म्हटलं आहे.
एकदा ही लेखक मंडळी गुजराथमधल्या वाळवंटी प्रदेशातल्या एका खेडेगावात पोहोचली. ५० अंश डिग्रीच्या वर गेलेलं तापमान आणि वातानुकुलित गाडीतून बाहेर पडताच अंगावर येणार्या उष्णतेच्या झळा यांनी ही मंडळी घामाघूम झाली. तेव्हा प्रजापती यांनी स्वतः बनवलेल्या मिट्टीकूल नावाच्या मातीच्या फ्रीजमधून त्यांना थंडगार पाणी प्यायला दिलं. प्रजापती यांचा पारंपरिक व्यवसाय कुंभारकामाचा आहे. त्यांचं शिक्षण हायस्कूलपर्यंतही पूर्ण झालेलं नाही. तरीही त्यांनी आपल्या व्यवसायाच्या अनुभवातून आपल्या मनात स्फूरलेल्या कल्पक विचारांमधून आणि स्थानिक गरज लक्षात घेऊन या मिट्टीकूलची निर्मिती केली. हा फ्रीज फक्त २००० रुपयांना मिळत असून आजूबाजूच्या परिसरातच नव्हे तर अल्पावधीतच त्यांच्या विजेविना चालणार्या अल्पखर्चिक फ्रीजची ख्याती इतकी दूरवर पोहोचली की आज परदेशांतूनही त्यांच्या फ्रीजला प्रचंड मागणी आहे. आज भारतातले ५० कोटीहून अधिक लोक विेजेच्या अनियमित पुरवठ्यावर जगत आहेत. उन्हाळ्यात गावातल्या लोकांचं जगणं सुसहय व्हावं यासाठी प्रजापतींनी सुरुवातीला गावातल्या लोकांच्या भाज्या, अन्न, दूध, पाणी थंड राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रजापतींनी हा फ्रीज बनवला आणि त्यानंतर वाढत्या मागणीमुळे त्यांचा यातूनच मोठा उद्योग उभा राहिला. प्रजापतींनी अनेक कारागिरांना विशेषतः स्त्रियांना आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून मातीची भांडी बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. याच प्रशिक्षित कारागिरांना त्यांनी आपल्याच फॅक्टरीत रोजगारही उपलब्ध करून दिला. मिट्टीकूलनं क्रांती केलीच, पण त्याचबरोबर प्रजापतींनी त्यानंतर अनेक उपयुक्त वस्तूंचं उत्पादनही सुरू केलं. प्रजापतींच्या कामाची भारत सरकारनं दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवलं. आज त्यांच्यावर पुरस्कारांची बरसात होते आहे.
प्रजापतीच्या या कामानं प्रभावित होऊन लेखक मंडळींनी भारतभर प्रवास केला आणि अशा पद्धतीचं संशोधन आणि संशोधन करणार्या व्यक्ती शोधल्या, त्यांचा अभ्यास केला. 'जुगाड’ या पुस्तकात उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी यांना त्यांच्या कामासंदर्भात गोष्टी कशा कराव्यात याबाबतीतही अतिशय सोपेपणानं समजून सांगताना सहा तत्वं सांगितली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत नव्या मार्गांचा सतत शोध घेणं, कमतरतेतून विपुलता कशी शोधता येईल हे बघणं, आपले विचार आणि आपली कृती यांच्यात लवचिकता ठेवणं, साधेपणा जपणं, तळागाळातल्या लोकांना आपल्या व्यवसायात सामावून घेणं आणि आपल्या मनाचा कौल मानणं ही ती सहा तत्वं आहेत.
प्रत्येकानं ही जुगाड संशोधक वृत्ती आपल्या अंगी रुजवण्याची कशी गरज आहे हे या पुस्तकातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सांगण्यात हे त्रिमूर्ती यशस्वी झाले आहेत. जागतिक स्तरावरच नव्हे तर भारतातही शिक्षण, आरोग्य, शेती, कला अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये संशोधन व्हायला हवंय. अशा वेळी जुगाड हे पुस्तक खूप मोठी भूमिका निभावण्याचं काम करत आहे. थोडक्यात, जुगाडचा दृष्टिकोन आपल्या कामात रुजवणं आणि काटकसरीनं संशोधन करणं या महत्वाच्या गोष्टींवर लेखकांनी जुगाड या पुस्तकात भर दिला आहे. जागतिक स्तरावर आरएन्डडीसारखं होणारं महागडं संशोधन आणि जुगाड सारखं स्थानिक पातळीवरचं संशोधन यांची सांगड घालून संशोधन करण्याची आज आवश्यकता आहे हे मात्र खरं! टॉप टू बॉटम ऐवजी बॉटम टू टॉप या पद्धतीनं जुगाडचं संशोधन आहे.
जुगाड या पुस्तकाचे लेखक नवी राजू यांचा जन्म भारतात झाला असून त्यांनी फ्रेंच नागरिकत्व स्वीकारलं आहे. सध्या ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थायिक झालेले असून ते स्ट्रॅटेजी कन्सल्टंट आहेत. व्यावसायिक संशोधन आणि नेतृत्व विषयातले ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, लेखक, सल्लागार आणि भाष्यकार आहेत. या पुस्तकाचे दुसरे लेखक जयदीप प्रभू हे दिल्लीतून आयआयटी झालेले असून इंडियन बिझिनेस अँड एंटरप्रायजेस च्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रोफेसर आहेत. तसंच सेंटर फॉर इंडिया अँड ग्लोबल बिझिनेस या केंब्रिज विद्यापीठात जज बिझिनेस स्कूलचे ते संचालक आहेत. मार्केटिंग, संशोधन, कार्यपद्धती आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे जयदीप प्रभू या संशोधनात्मक विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे. जुगाडच्या तिसर्या लेखिका सिमॉन आहुजा या ब्लड ऑरेंज या मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी कन्सल्टन्सीच्या संस्थापक असून त्या तिथेच प्राचार्य म्हणूनही काम करताहेत. कल्पक संशोधन म्हणजेच इनोव्हेशन आणि विकसनशील देश यांच्यातल्या त्या तज्ज्ञ समजल्या जातात.
आज 'जुगाड' या पुस्तकाची भारतातच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये प्रचंड विक्री होताना दिसते आहे. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनानं मराठीत आणलं असून याचा अनुवाद संध्या रानडे यांनी अतिशय सहजसोप्या भाषेत केला आहे. 'जुगाड' जरूर जरूर वाचा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment